.
ताज्या घडामोडी Current Affairs, Health- आरोग्य

डिस्ट्रेस्ड जीन्स


अलीकडच्या तरूण पिढीची जीन्सच्या पॅन्ट्स ही एक क्रेझ आहे. अलीकडचे कोणताही तरूण किंवा तरुणी या वस्त्र प्रावरणातच बहुदा आपल्याला आजकाल दृष्टीस पडतात. आता तरूण पिढीची ही क्रेझ आहे असे मी म्हणतो आहे हे खरे! पण मी सुद्धा अलीकडे, प्रवासात, थंडीमधे फिरायला जाताना, या जीन्सच वापरतो. अतिशय दणकट व मळखाऊ असलेल्या या पॅन्ट्स वापरायला खूप सोईस्कर पडतात हेच त्यांच्या लोकप्रियतेचे इंगित आहे. गेली सात आठ वर्षे या जीन्समधला आणखी एक नवीन प्रकार अतिशय लोकप्रिय झाला आहे. या प्रकाराला डिस्ट्रेस्ड किंवा ताबडलेल्या जीन्स असे नाव आहे. या प्रकारच्या जीन्स विकत घ्यायला तुम्ही दुकानात गेलात तर आपण जुन्या बाजारातील एखाद्या दुकानात तर आलेलो नाही ना? असे क्षणभर वाटण्याची शक्यता आहे, कारण या जीन्स बराच काळ वापरल्यावर जशा झिजलेल्या, मळलेल्या व फाटक्या अवस्थेत दिसतील तशा अवस्थेत विकायला ठेवल्यासारख्या दिसतात.

जगभर लोकप्रिय असलेल्या या डिस्ट्रेस्ड जीन्स मुख्यत्वे बनवल्या जातात तीन किंवा चार मोजक्या देशात. या देशांपैकी सिंहाचा वाटा बांगला देश व चीन या दोन देशांचा आहे. चीन जरी सध्या प्रमुख निर्यातदार देश असला तरी कामगारांचे वाढते पगार, महागाई व युआनची मूल्य वृद्धी यामुळे चीन मधील उत्पादकांचा धंदा बांगला देशचे उत्पादक पुढे खाऊन टाकणार हे स्पष्ट दिसते आहे. मागच्या वर्षी बांगला देशी उत्पादकांनी, 18 बिलियन अमेरिकन डॉलर्स किंमतीचे कपडे निर्यात केले होते. जगातील प्रमुख ब्रॅन्ड्स पैकी जवळ जवळ प्रत्येक ब्रॅन्ड बांगला देश कडून काहीना काही प्रमाणात तयार कपडे विकत घेतोच आहे.

या आकर्षक वाटणार्‍या बाह्य चित्रामागे बांगला देशी कामगारांना करावे लागणारे अपरिमित कष्ट, त्यांना मिळणारे अल्प वेतन आणि आरोग्यास विघातक पर्यावरण असलेले कारखाने ही सगळी विदारक सत्ये लपून जात आहेत. तयार कपडे बनवणार्‍या या कारखान्यांत हे कामगार 11 तासाची शिफ्ट करतात व त्या बद्दल त्यांना सुमारे 70 अमेरिकन डॉलर (3500 भारतीय रुपये) एवढाच पगार मिळतो. बांगला देश मधे असे 4000 पेक्षा जास्त कारखाने आहेत. या कारखान्यांपैकी बहुतेक कारखाने गचाळ व घाणेरड्या वस्त्यांमधे, दाटीवाटीने बसवलेले असतात. कारखान्यांत योग्य वायुवीजन व प्रकाश नसतो. कामगारांना कोणतीही सर्वसामान्य सुविधा येथे दिली जात नाही.

बांगला देश मधील कपडे उत्पादन उद्योगाचे एक वैशिष्ट्य म्हणजे निळे डेनिम या कापडापासून बनणारे जीन्स सारखे कपडे येथे मोठ्या प्रमाणात बनवले जातात. 1990 सालानंतर एक विशेष प्रकारचे डेनिम कापड जगभर खूपच लोक प्रिय झाले. डिस्ट्रेस्ड किंवा वापरलेले डेनिम असे नाव असलेल्या या कापडाचे शिवलेले कपडे, नवे असतानाच,अनेक वर्षे वापरलेले गेले आहेत असे दिसतात. हे फिनिश आणण्यासाठी या कापडावर बारीक रेतीचा मारा अतिशय जोरात केला जाईल अशी व्यवस्था असते. रेतीचा हा जोरदार मारा करण्यासाठी हवेचा कॉम्प्रेसर वापरला जातो. या कॉम्प्रेसरने उच्च दाबाचा हवेचा झोत तयार केला जातो व या हवेच्या झोतात बारीक रेती मिसळून स्प्रे पेंटिंग़ करावे तसा हा हवेचा मारा एका नॉझल मधून या डेनिम कपड्यावर केला जातो. अशी प्रक्रिया केल्या जाणार्‍या कारखान्यांतील पर्यावरणावर या प्रक्रियेचा किती भयानक परिणाम होत असेल त्याची कल्पनाच करता येत नाही. या कारखान्यांतील हवा, सिलिका कणांच्या धुळीने भरलेली असते व कारखान्यात काम करणारे सर्व जण ही हवा श्वासोच्छ्वासावाटे रोज 11 तासांहून जास्त वेळ ग्रहण करत राहतात. याचा ताबडतोब दिसणारा परिणाम म्हणजे डोळ्यातून सारखे पाणी येत राहते व स्वच्छ हवा न मिळाल्याने प्रचंड थकवा जाणवतो. जास्त काळानंतर हे सिलिका कण फुफ्फुसात जाऊन बसतात व सिलिकॉसिस नावाचा एक गंभीर आजार या कामगारांना होऊ शकतो. दीर्घ श्वसन न करता येणे, खोकला, अशक्तपणा आणि वजन कमी होणे या सारखी लक्षणे या आजारात दिसून येतात. ही व्यक्ती जर या अशाच हवेत काम करत राहिली तर त्या व्यक्तीचा मृत्यू ओढवू शकतो. सगळ्यात भयानक गोष्ट ही आहे की हा आजार एकदा एखाद्या व्यक्तीला झाला की ती व्यक्ती त्यातून कधीच बरी होऊ शकत नाही.

बांगला देशातील कपडे कारखान्यांनी ही रेती प्रक्रिया वापरणे सुरू करण्याच्या आधी ही प्रक्रिया तुर्कस्तान देशातील इस्तंबूल शहराच्या जवळपास असलेल्या कपडे बनवणार्‍या कारखान्यांत वापरली जात होती. तुर्कस्तान हा देश सुद्धा डेनिम कपड्यांचा मोठा निर्यातदार आहे. 2004 साली तुर्कस्तानच्या पूर्व भागामधील बिंगोल या ठिकाणी, एक डॉक्टर, सैनिकी दलात प्रवेश मिळवण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करत होता. या डॉक्टरला असे आढळून आले की तो चाचण्या करत असलेल्यापैकी अनेक उमेदवारांना, सिलिकॉसिस हा आजार झालेला आहे. जास्त चौकशी केल्यावर या डॉक्टरला असे समजले की या अशा आजारी उमेदवारांपैकी सर्व जण, इस्तंबूल मधील डेनिम कपडे बनवणार्‍या कारखान्यांत काम करत होते, जेथे ही रेती प्रक्रिया वापरली जात होती. आतापर्यंत हा आजार बांधकाम व खाणकाम या उद्योगांत काम करणार्‍या कामगारांतच दिसून येत असे. डेनिम कपडे बनवणार्‍या कारखान्यातील कामगारांत हा आजार प्रथमच या वर्षी आढळून आला होता.

सिलिकॉसिस या आजारामुळे नंतरच्या वर्षांमधे तुर्कस्तान मधले, हे डिस्ट्रेस्ड डेनिम कपडे शिवणार्‍या कारखान्यांतले 46 कामगार मृत्युमुखी पडले व 1200 कामगारांना या रोगाची ची लागण झाली आहेहळून आले. ही माहिती बाहेर आल्यावर, 2009 साली, तुर्कस्तानच्या सरकारने हवेच्या झोतात मिसळून रेती कपड्यांवर मारण्याच्या प्रक्रियेला, संपूर्ण बंदी घातली आणि या वर्षी या रोगामुळे अपंगत्व आलेल्या कामगारांना अपंगत्व अलाउन्स देणे सुरू केले आहे.

बंगला देश सरकार किंवा तेथील कपडा उद्योग यांनी मात्र अजून या प्रक्रियेवर बंदी आणण्याचा कोणताही विचार केलेला दिसत नाही. पाश्चात्य जगातील आर्मानीसारख्या काही ब्रॅन्ड्सनी आपण ही प्रक्रिया केलेले डेनिमचे कपडे आता विकत नसल्याचे घोषित केले आहे. मात्र अजुनही बरेचसे व्रॅन्ड या विषयावर मौनच बाळगून आहेत. क्लीन क्लोद्स कॅम्पेन या नावाचा एक आंतर्राष्ट्रीय दबाव गट आता निर्माण झाला आहे. हा गट आता सर्व महत्वाच्या तयार कपडे खरीददारांवर ही प्रक्रिया केलेले कपडे न खरिदण्याबद्दल दबाव आणत आहे. युरोपियन युनियन व जागतिक आरोग्य संस्था यांनीही अशा कपड्यांवर बंदी घालावी म्हणून हा गट प्रयत्नशील आहे. त्याच प्रमाणे सिलिकॉसिस या आजाराने जे कामगार पिडीत आहेत त्यांना योग्य ती भरपाई दिली जावी असा या दबाव गटाचा प्रयत्न आहे.

या सगळ्या प्रयत्नांना कधी व कितपत यश ये ईल हे सांगणे कठीण आहे.

बांगला देश मधले गरीब कामगार जर अशी बंदी घातली गेली नाही किंवा बांगला देश सरकारने तुर्कस्तान सारखी काही पावले उचलली नाहीत तर या आजाराला बळी पडत राहणार हे निश्चित आहे.

एक ग्राहक म्हणून आपण सर्वांनी हे डिस्ट्रेस्ड डेनिम कपडे खरेदी करणे बंद केले तर निदान काही गरीब बांगला देशी कामगारांना या भयानक आजारापासून नक्की वाचवता येईल असे मला वाटते.

5 ओक्टोबर 2011

 

 

 

 

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “डिस्ट्रेस्ड जीन्स

 1. good information and everone can contrubute by banning these products.

  Posted by anil | ऑक्टोबर 5, 2011, 4:26 pm
 2. प्रिय श्री. चंद्रशेखर आठवले यांस,

  कधी माहितीपूर्ण तांत्रिक अनुभव, कधी दूरच्या सफरीचा सचित्र वृत्तांत, कधी एखादी सामाजिक समस्या, तर कधी घर आवरण्यासारख्या साध्यासुध्या घरगुती विषयावर एक सुंदर ललितरम्य लेख ही आणि आणखी अनेक अशी आपल्या या अनुदिनीची वैशिष्ट्ये मला आवडतात. त्यातूनच तुमचे हे लेख रोज ठराविक वेळी मी वाचण्यास उत्सुक असतो. आपल्या या लेखमालांचे एक किंवा अधिक मुद्रित पुस्तके असावीत, असे का कुणास ठाऊक मला राहून राहून वाटते. या लेखांपैकी विशेष भावलेले लेख अनुदिनी प्रमाणे एखाद्या साप्ताहिकात किंवा मासिकात ( उदा. साधना, अंतर्नाद ) यावेत.

  मंगेश नाबर.

  Posted by Mangesh Nabar | ऑक्टोबर 5, 2011, 5:41 pm
 3. तुमचे मत मला पटते ……दुनया हि पैसा यवरचालत आहे आणि ….. विक्नायाना काही फरक पडत नाही आपण का विकतो बस त्यांना पैसा पाहिजे आसतो..आणि हल्ली dublicatecha वापर खूप प्रांनात होत आहे.. ब्रांड हे फक्त नाव राहिले कोलीटी धूळ खात गेली…..

  Posted by geeta | ऑक्टोबर 13, 2011, 8:48 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: