.
अनुभव Experiences

घर- एक आवरणे!


बर्‍याच दिवसांपासून माझ्यामागे घरातून एक टुमणे लागले होते तुझी अभ्यास खोली आवर! ” म्हणून. अर्थात प्रथम काही दिवस जाता येता शी! काय पसारा झाला आहे!” अशा तुच्छतादर्शक कॉमेंट्स कानावर पडत होत्या. त्यानंतर घर कोणी आवरणार आहे की नाही!” अशी जगाला उद्देशून फेकलेली वाक्ये ऐकू लागली. यानंतर आता तरी खोली आवरा!” या सारखा माझ्यावरचा थेट हल्ला ऐकू येऊ लागला. आता नक्कीच एक दिवस प्रक्षोभ होणार हे माझ्या लक्षात आल्याने मी सुद्धा शेवटी आज माझी खोली आवरण्याचे मनावर घेतले आहे.

खोली आवरण्याच्या आधी जरा त्रयस्थ नजरेने खोलीकडे बघून घ्यावे असे वाटल्याने चहूकडे नजर फिरविली. खरोखरच खोलीचा अगदी उकिरडा झाला आहे. इंचभर जाडीची धूळ साठलेला कॉर्डलेस फोन, कागदाचे कपटे, अनेक दिवसांपासूनच्या वृत्तपत्रांचा साठलेला ढीग, लेख लिहिताना संदर्भासाठी म्हणून काही शब्द खरडलेले कागद, जुन्या वह्या, डायर्‍या, कधीतरी उपयोगास येईल म्हणून कापून ठेवलेली वृत्तपत्रातील कात्रणे, शाई संपलेली बॉलपेने आणि मेमरी स्टिक्स अगदी भंगार दुकानात दिसते तसे दृष्य दिसत होते. जरा बाजूच्या पुस्तकांच्या कपाटाकडे नजर टाकली. त्या कपाटात जास्तीत जास्त जेवढी पुस्तके ठेवणे शक्य होते त्याच्या अडीच पट तरी पुस्तके कोंबलेली आहेत हे स्पष्ट दिसत होते.पूर्वी कधी तरी नीट लावून ठेवलेल्या पुस्तकांवर, समोरच्या बाजूस, असंख्य पुस्तके दिसत होती. बाजूच्या एका कपाटाला काचेची दारे असल्याने त्यात काही छान दिसतील अशा वस्तू ठेवाव्या असे माझ्या मनात प्रथम होते. सध्या मात्र त्यात पुस्तके, किल्ल्या, संगणकाला प्रिंटर किंवा कॅमेरा जोडण्यासाठी लागणार्‍या वायरी, फालतू छायाचित्रे अशा अनावश्यक गोष्टींचाच भरणा दिसत होता. पलीकडे असलेले गोदरेजचे लोखंडी कपाट बाहेरून जरी आवरल्यासारखे दिसत असले तरी उघडल्यावर आत वाटेल ते, अगदी गरम कपड्यांपासून ते दहा वर्षांपूर्वी मी ऍस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करत असताना काढलेल्या नोट्सची चळत, ऍरल्डाईट, अक्षरश: काय वाटेल ते, होते.

आता हा पसारा आवरायला सुरूवात तरी कोठून करावी? असा प्रश्न साहजिकच मला पडला व मी जरा गोंधळूनच गेलो. पण तेवढ्यात खोलीत कोणीतरी सुपरवायझरच्या अविर्भावात येऊन गेले आहे हे माझ्या लक्षात आल्याने मी गोदरेजच्या कपाटापासून सुरूवात करायचे ठरवले व कामाला लागलो. पहिल्यांदा जुन्या कागदांची चळत बघून अनावश्यक कागद फेकून द्यावे असा विचार केला पण त्या कागदाखाली काही जुनी पत्रे दिसली. ही पत्रे प्रथम फेकून द्यावी म्हणून बघायला घेतली. त्यात पहिले पत्र होते माझ्या आजोबांनी लिहिलेले. मी सर्व प्रथम जेंव्हा परदेशी जाण्यासाठी विमान प्रवास करणार होतो त्या वेळी त्यांनी माझ्या हातात ठेवलेले व ते विमानातच उघडायचे आहे अशी ताकद दिलेले ते पत्र होते. आमच्या घरात विमानाने परदेशी जाणारा त्या वेळेपर्यंत मीच पहिला होतो व त्यामुळे त्यांच्या मनात आलेल्या भावना, माझ्या आजोबांनी इतक्या उत्कट रित्या व्यक्त केल्या होत्या की आजही माझ्या डोळ्यात पाणी उभे राहिले नसते तरच नवल होते. ते पत्र मला फेकून देणे शक्यच नव्हते. त्या कागदांच्या चळतीत अशीच अनेक पत्रे मला सापडली. माझ्या आईला मिळालेली सन्मानपत्रके त्यात होती. मग ते कागद मी तसेच बाजूला ठेवले.

गोदरेजचे कपाट न आवरता प्रथम पुस्तकाचे कपाट आवरावे असा विचार केला. अगदी समोरच गो.रा. परांजपे यांनी लिहिलेले आकाश दर्शन हे पुस्तक समोर दिसत होते. इतक्या सुबोध मराठीत या विषयावर लिहिलेले पुस्तक माझ्या तरी पाहण्यात नाही. त्या पुस्तकाच्या खालीच सूर्य सिद्धांतावर बर्जेस या लेखकाने लिहिलेले माझे आवडते पुस्तक दिसले. ते बघितल्यावर अर्थातच ते चाळण्याचा मोह मला आवरता येणे शक्यच नव्हते. मग मी ते पुस्तक वाचतच राहिलो.

घर आवरणे हे खरे म्हणजे अगदी महा कर्म कठीण काम आहे. माझ्या काही नातलगांनी आपली आई कालवश झाल्यावर दहा वर्षे ओलांडून गेली असली तरी तिची खोली आवरलेलीच नाही. त्यांचे म्हणणे आहे की ती खोली आवरायला घेतली की आईच्या इतक्या आठवणी मनात दाटतात की पुढे काही करताच येत नाही. मला इतके दिवस काही त्यांचे हे म्हणणे फारसे पटले नव्हते. पण आज माझी स्वत:ची खोली आवरताना त्यांचे म्हणणे किती सयुक्तिक आहे हे मला चांगलेच जाणवू लागले आहे.

मी कोठेतरी वाचले आहे की तुम्हाला तुमचे घर किंवा एखादे कपाट आवरायचे असले तर ते कपाट उघडा. गेले एक वर्ष ज्या वस्तूंना तुम्ही हातही लावलेला नाही अशा वस्तू बाजूला काढा व सरळ त्या फेकून त्या. जर तुम्हाला त्या गोष्टी मागच्या वर्षभर लागलेल्या नसतील तर या पुढे नक्कीच लागणार नाहीत. सांगणे खूप सोपे आहे हो, पण कोणत्या तरी वेळेला, किंवा प्रसंगी तुम्हाला प्रिय असलेल्या एखाद्या व्यक्तीने, अगदी सहज म्हणून दिलेली एखादी वस्तू, गेल्या पाच वर्षात वापरली नाही म्हणून फेकून देण्याचे धाडस करणे मला तरी शक्य नाही.

शेवटी आज निदान टेबल तरी आवरावे म्हणून टेबलाजवळ गेलो. आणि समोरच्या घड्याळाकडे लक्ष गेले. 12 वाजायला थोडीच मिनिटे शिल्लक होती. घर आवरायचे म्हणून मी आज स्नान सुद्धा केले नव्हते. कामात वेळ गेला की माणसाला शुद्धबुद्ध रहात नाही हेच खरे!. मी पटकन उठलो व स्नानगृहाकडे निघालो. खोली आवरण्याचे काय? दुपारी पटकन आवरून टाकू. असे मनाला समजावत!

4 ऑक्टोबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “घर- एक आवरणे!

 1. Tumcha lekh wachun faar bare watle. Karan mazya kholit hi khup pustake, CDs ahet.
  Kadhihi awaryacha wichar karawa lagla tar mazi awastha ashich hote. Mazi bayko matra mi tila dilela awarnyacha shabda kadhich palat nahi asa mhante. Pan to palana impossible ahe asa mala watata.
  Ek goshta nakki ki mi jagat asa ektach manus nahiye he tumcha lekh wachlyawar kalale ani thode bare watale.

  Cheers
  Nilesh Joglekar

  Posted by nileshjoglekar | ऑक्टोबर 4, 2011, 2:21 pm
 2. “….तुम्हाला प्रिय असलेल्या एखाद्या व्यक्तीने, अगदी सहज म्हणून दिलेली एखादी वस्तू…. ”

  अगदी अगदी, मनातील बोललात !

  तुमच्यासारखाचे मीही कधीकधी पेटून उठतो इनमिनतीन खोल्यांच्या फ्लॅटमधील अस्ताव्यस्तपणा पाहून. मुलाच्या लग्नापूर्वी तर घरात कहर होता अक्षरशः. जी पाहिजे ती वस्तू मिळविणे त्यापेक्षा ‘कोहिनूर’ साता समुद्रापल्याड जाऊन आणणे सोपे वाटे. त्याच्या लग्नानंतर पुढच्याच आठवड्यात एका रविवारी अगदी एकटा असताना तिरीमिरीने साफसफाईचा निर्णय घेतला. नऊला सुरू केलेले काम साधारणतः दोनला संपले आणि काढून काढून काय काढले, तर कित्येक वर्षे हातही न लावलेल्या बेडशीट्स, चादरी, उशा, कव्हर्स, बाजाराच्या पिशव्या आणि जुने टॉवेल्स. सोबत असलेल्या अपार्टमेन्टच्या शिपायालादेखील पाच तासानंतर ‘इतकाच’ पसारा पाहून हसू फुटले होते. त्याला वाटले होते की, ‘सर, जवळजवळ सारी तिजोरी रिकामी करणार !” पण कसचे काय. एखादी वस्तू हाती घेतली की ती देणारी व्यक्ती समोर दिसायची. माझी धाकटी बहीण माझ्यासमोरच देवाघरी गेली होती, तिने आपल्या मुलासाठी वेळोवेळी घेतलेल्या अनेक वस्तुंचा ढीग एका कोपर्‍यात रचला होता. त्यातील कित्येक वस्तू [न वापरल्याने] आता कुचकामी झाली आहेत हे मला पटत होते. पण साध्या कंगव्याला जरी बोटे लागली, तर कुठून तरी बहीण, ‘नको रे आण्णा, असू दे तो कंगवा. म्हैसूरच्या राजवाड्यातील आहे’ असे कानात पुटपुटत आहे असे वाटते होते. मग राहिला तो पसारा परत आहे त्याच जागी.

  फार हळवे होत असतो आपण काही काही बाबतीत.

  अशोक पाटील

  Posted by अशोक पाटील | ऑक्टोबर 4, 2011, 5:25 pm
 3. छान लेख.

  माणसाला मोठे घर का हवे असते? = पसारा करायला जागा कमी पडू लागते म्हणून 😉

  आधी इमोशन्स आवरायला लागतात हेच खरे 🙂

  सहज

  Posted by Sahaj | ऑक्टोबर 5, 2011, 7:03 सकाळी
  • सहज –

   प्रतिसादासाठी धन्यवाद. इंग्रजीमधील Work expands to fill available time याच्या धर्तीवर पसारा उपलब्ध जागेप्रमाणे वाढत रहातो असे म्हणायला हरकत नाही.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 5, 2011, 7:51 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: