.
Musings-विचार

अपमानास्पद लाजिरवाणे


रोज सकाळी मी माझ्या घराजवळ असलेल्या एका पार्कमधे फिरायला जात असतो. हा पार्क तसा जरा गंमतीदार आकाराचा आहे. 2ते 3 किलोमीटर लांब असलेला हा पार्क फक्त 50 किंवा 60 मीटर रूंद आहे. त्यामुळे एका बाजूला एक सायकल ट्रॅक व उरलेल्या जागेत मधे एक जॉगिंग ट्रॅक व बाजूला हिरवळ व झाडे असे या पार्कचे स्वरूप आहे. मला हा पार्क आवडतो कारण एका टोकापासून सुरूवात करून दुसर्‍या टोकापर्यंत भरभर चालत जाऊन परत आले की भरपूर व्यायाम होतो.

आज सकाळी मी फिरून परत येत होतो. साधारण सकाळचे नऊ वाजले असावेत. जॉगिंग़ ट्रॅकवर तुरळक हा होईना! लोक अजून फिरत किंवा पळत होते. शाळा कॉलेजला जाणारी तरूण मंडळी त्यांचे खोगीर घेऊन जाताना दिसत होती. इतक्यात माझे लक्ष या जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला असलेल्या हिरवळीकडे गेले. क्षणार्धात जे काही मी बघितले ते जास्त वेळ बघणे माझ्या संस्कारात बसत नसल्याने माझी मान आपोआपच खाली गेली व व समोरचा पायाखालचा रस्ता बघत मी चटकन पुढे निघालो. त्या हिरवळीवर एक मध्यमवयीन बाई चक्क लघुशंका करायला बसल्या होत्या. खरे म्हणजे या पार्कच्या दोन्ही टोकांना स्वच्छता गृहे बांधलेली आहेत. त्यामुळे स्वच्छता गृहांची कमतरता हे काही कारण या बाईंच्या वर्तणुकीला देणे शक्य नाही. अडाणीपणा व नागरिक शास्त्राचे पूर्णपणे अज्ञान हीच कारणे मी या कृतीला देऊ शकतो.

पुण्यासारख्या मोठ्या शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या व जेथे माणसांची सतत वर्दळ आहे त्या ठिकाणी जर असा टोकाचा अडाणीपणा दाखवला जाऊ शकतो तर खेडेगावांच्यात काय होत असेल? याची कल्पनाही करवत नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेचा भाग असलेल्या युनिसेफ (UNICEF) या संस्थेने नुकतेच काही आकडे प्रसिद्ध केले आहेत. या आकड्यांप्रमाणे, जगातील लोकसंख्येच्या 58 टक्के लोक अजूनही उघड्यावर शौच विधी करत असतात. परंतु सर्वात शरमेची गोष्ट मला ही वाटते की भारतीय लोकसंख्येच्या 54 टक्के किंवा अंदाजे 64 कोटी लोक यापैकी सर्वात मोठा हिस्सा आहेत. बाकी कोणत्याही देशातील लोकांवर, एकूण लोकसंख्येच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात, उघड्यावर शौचविधी करण्याची वेळ येत नाही. भारताखालोखाल क्रमांक असलेल्या इंडोनेशियामधे फक्त 5टक्के किंवा 5.7 कोटी लोकांवर ही वेळ येते तर या खालोखाल चीनमधल्या 5.6 कोटी लोकांना अजूनही याच अडचणीला तोंड द्यावे लागते. आता यातल्या किती लोकांच्यावर स्वच्छता गृहे उपलब्धच नसल्याने ही वेळ येते आहे आणि किती लोक अडाणीपणामुळे असे वागतात हे मात्र सांगणे मोठे कठीण आहे. स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा भारत या लाजिरवाण्या बाबतीत आघाडीवरच आहे. भारतातल्या 60 टक्के स्त्रिया सुद्धा उघड्यावर हे विधी करत असतात. या आकड्यांवरून भारतातील नागरिक आणि विशेषत: स्त्रियांना वैयक्तिक आरोग्याकडे किती दुर्लक्ष करावे लागत असले पाहिजे याची सहज कल्पना येऊ शकते. भारताचे ग्रामीण विकास विभागाचे मंत्री श्री. जयराम रमेश याला भारतावरचा सर्वात मोठा काळा डाग मानतात व त्यांचे मत संपूर्णपणे ग्राह्य आहे हे कोणीही मान्य करेल. श्री जयराम यांच्या मते भारताच्या अंतर्गत, हरयाणा, सिक्कीम, महाराष्ट्र व केरळ या राज्यांत असलेली परिस्थिती इतकी वाईट नाही. मात्र देशाच्या इतर राज्यांतील परिस्थिती फारच लाजिरवाणी आहे. उत्तर प्रदेशातील 10 टक्के जनतेला वैयक्तिक स्वच्छता न राखता आल्यामुळे रोगांची शिकार व्हावे लागते. देशामध्ये असलेल्या 6 लक्ष खेडेगावांपैकी फक्त 25000 खेड्यांमध्ये सर्व नागरिकांना स्वच्छता गृहे उपलब्ध आहेत.

वैयक्तिक आरोग्य न राखता आल्याने सबंध समाजाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अतिसार किंवा डायरिया या रोगाची लागण भारतात दर वर्षी 4 लक्ष लोकांना होते व त्यात 90% लहान मुले असतात. भारताच्या एकूण ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टच्या 6.4 टक्के किंवा 2.4 ट्रिलियन रुपयांचा आर्थिक फटका भारताला या वैयक्तिक अनारोग्यामुळे दर वर्षी बसत असतो. भारत सरकार 1 लक्ष कोटी रुपये ग्रामीण विकासावर खर्च करत असते मात्र यापैकी फक्त 2000 कोटी रुपये स्वच्छतागृहे व वैयक्तिक आरोग्य संबंधी कार्यक्रमांवर खर्च होतात. श्री जयराम यांचे मंत्रालय आता या साठी 10000 कोटी रुपये खर्चाची मागणी करत आहेत. वैयक्तिक आरोग्याची जाणीव सर्व नागरिकांना केवळ कायदेकानून करून होणार नाही याची त्यांना कल्पना असल्याने स्वच्छता उत्सव नावाचा एक कार्यक्रम राबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे व एक राजकीय व सामाजिक चळवळ उभी राहिली तरच परिस्थितीत सुधारणा शक्य आहे असे त्यांना वाटते.

देशाचा विचार करता हे वरील आकडे मोठी भयावह परिस्थिती सूचित करत असले तरी सर्वात मोठा परिणाम वैयक्तिक स्वच्छता पालन न करणार्‍या व्यक्तीच्या आयुष्यावर होत असतो. व्यक्ती आणि विशेषकरून स्त्रिया यांना रोजच्या आयुष्यात केवळ घरात स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत म्हणून, दिवस उजाडण्यापूर्वीच अगोदर, स्त्रियांच्या एका गटाने बाहेर जाऊन, आपले प्रातिर्विधी उरकून येणे या सारख्या अत्यंत लाजिरवाण्या आणि अवघड प्रसंगांना रोज तोंड द्यावे लागते. अशा स्त्रियांना अत्यंत अपमानास्पद वाटणे साहजिकच आहे. त्यांना या परिस्थितीत समाजात मानाने राहणेही मोठे कठीण बनते. भारतातील पुरुषांना शेते, रस्ते, भिंती या सगळ्या गोष्टी सार्वजनिक मुतार्‍या आहेत असे कदाचित वाटत असावे असे त्यांच्या वागण्यावरून एकूण दिसून येते. मात्र स्त्रियांना या बाबतीत धीर धरून जी कळ काढावी लागणे इथल्या सामाजिक परिस्थितीत आवश्य्क बनते त्याला दुसरीकडे कोठेही तोड नसेल.

या लाजिरवाण्या प्रसंगातून बहुसंख्य भारतीयांची सुटका होईल तेंव्हाच विकास झाला आहे असे म्हणता येईल. देशातील प्रत्येक दुसर्‍या व्यक्तीकडे आज मोबाईल आहे पण प्रत्येक दुसरी व्यक्ती उघड्यावर शौचास बसते ही परिस्थिती खासच भूषणावह आहे असे म्हणता येणार नाही.

3 ऑक्टोबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

10 thoughts on “अपमानास्पद लाजिरवाणे

 1. आम्हांस तरी लाटते की आपण आपले वि४ थेट विंटरनेट वर मांडणे आणि वरील लेखातील अपमानास्पद-लाजिरवाणे ह्यात फारसा काही फरक नाही…

  Posted by ಇಂಟರನೇಚ 1 સુલભ शौचालय | ऑक्टोबर 3, 2011, 2:51 pm
  • धनुर्धारी-

   वा वा म्हणजे आपले गुरुदृष्टी हे संकेतस्थळ सुलभ शौचालय प्रमाणेच आहे असे आपल्याला म्हणायचे असावे.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 3, 2011, 4:49 pm
 2. भारतात ५४ टक्के लोकांना बन्द बाथरूमची सोय नसल्याचं प्रमाण सर्वाधिक असेल, तर जागतिक टक्केवारी ५८ कशी असू शकेल? ती ५४-पेक्षा कमी हवी. आणि भारतात एकूण ५४ टक्के लोकांना ती गैरसोय असेल, तर स्त्रियांमधे त्याचं प्रमाण ६० का? ते ५४-च्या आसपासच असायला हवं.

  ७०-८० वर्षांपूर्वी खेड्यातला एक माणूस शहरात आला, आणि ‘शहरवासी संडासात मलविसर्जन करणारे गलिच्छ लोक आहेत, आणि ती क्रिया उघड्यावर करायला हवी’ म्हणून खेड्यात परतला, अशी कुठलीशी आठवण पु भा भाव्यांच्या एका पुस्तकात आहे.

  – नानिवडेकर

  Posted by Anonymous | ऑक्टोबर 3, 2011, 2:55 pm
  • नानिवडेकर-

   कदाचित माझी शब्दरचना तुम्हाला गोंधळाची वाटली असेल. मला असे म्हणायचे आहे की जगाच्या 700 कोटी या लोकसंख्येपैकी 58% लोकांना उघड्यावर शौचविधी करणे भाग पडते. या 58 टक्के किंवा 400 कोटी लोकांमधे भारताच्या लोकसंख्येच्या 54% म्हणजे 64 कोटी भारतीय आहेत. बहुतेक ठिकाणी असलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे पुरुषांसाठी असल्याने त्याचा वापर स्त्रियांना करता येत नाही व म्हणून 60% स्त्रिया स्वच्छतागृहांपासून वंचित राहतात.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 3, 2011, 4:47 pm
 3. sarkar jage vhave ani soi and janjagran awashak ahe

  Posted by anil | ऑक्टोबर 3, 2011, 6:21 pm
 4. भारतात अनेक ठिकाणी रस्त्यावर फक्त पुरुषांसाठीच मुतारी असते, पण इथे चर्चा मलविसर्जनाची आहे. आणि माझ्या पाहण्यात तरी सर्वच सुलभ शौचालयांत स्त्रियांसाठी एक भाग असतोच. मात्र माझा अनुभव मुंबई-पुण्यापुरताच आणि बरेच वर्षांपूर्वी दक्षिण भारतात केलेल्या एका प्रवासापुरताच मर्यादित आहे. तरी ६० टक्के स्त्रिया – म्हणजे पुरुषांपेक्षा ६ टक्के जास्त टक्केवारीनी – हा प्रश्न अनुभवतात, ही तफावत मोठी वाटते.

  – नानिवडेकर

  Posted by Anonymous | ऑक्टोबर 3, 2011, 8:37 pm
  • नानिवडेकर –

   60% स्त्रिया उघड्यावर शौचास बसतात व 54% पुरुष हेच करतात हे आकडे अधिकृत आहेत. असे का होते याला अनेक कारणे असू शकतात. शौच गृहांची अनुपलब्धता, स्त्रियांचा अशा सार्वजनिक ठिकाणी जाण्याला असलेला विरोध हे ही कारण असू शकते. तफावत का आहे याचे कारण शोधण्यासाठी मोठा सर्व्हे कदाचित करावा लागेल.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 4, 2011, 8:05 सकाळी
 5. महाराष्ट्राची परिस्थीती बरी आहे असे म्हणून चालणार नाही. आकडेवारी पेक्षा प्रत्यक्ष शौचास बाहेर जाणारे लोक अधिक असतात. ब-याच लोकांनी सरकारच्या योजनांचा फायदाकरुन घेत संडास बांधले पण तो ते अनेक कारणांनी वापरत नाहीत. (विज, पाणी नसणे, ड्रेनेज ची सोय नसणे, घरात वास येणे इत्यादी )
  मुख्य म्हणजे लोकांची मानसिकता बदलणे फार अवघड आहे. शिक्षणामुळे ते साधेलच असे नाही. माझा वैयक्तिक अनुभव म्हणजे माझा एका एमएनसी मध्ये कार्यरत असलेला अभियंता मित्र जो खेड्यातला आहे. तो अजिबात गावरान वगैरे नाही. तो विंग्रजी बुके वाचतो व ड्यूड प्रकारात मोडतो. असा मुलगा उघड्यावर बसण्याचे समर्थन करतो ही माझ्यासाठी खूप आश्चर्याची गोष्ट होती. त्याच्या समर्थनाचे कारण उघड्यावर बसल्याने मोकळे वाटते, गावात आहे तेच बरे आहे वगैरे वगैरे असे होते.
  मुद्दा असा की एवढे उच्चशिक्षित लोक असा विचार करतात तिथे गावातल्या कमी शिक्षित व अशिक्षित लोकांना समजावणे किती अवघड आहे?

  Posted by Abhijit | ऑक्टोबर 3, 2011, 10:31 pm
  • अभिजित-

   तुम्ही मांडलेला मुद्दा अतिशय योग्य आहे. असे घडत असल्यास प्रश्नाची गंभीरता आणखी वाढते यात शंकाच नाही. लोकांची मानसिकता कशी बदलते याचे एक उदाहरण हरियाणा मधले आहे. येथील खेडेगावातल्या मुली लग्न ठरवले जाताना सासरी शौचकूप असला तरच त्या संबंधाला मान्यता देतात. महाराष्ट्रातही असे काहीतरी घडण्याची आवश्यकता आहे.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 4, 2011, 7:56 सकाळी
 6. आगदी बरोबर नागरी शास्त्राचे ज्ञान आसने खूप गरजेचे आहे… punaya सारख्या जागेत आणि दिवसा धावल्या आसे करेल ताना धाडस होते तरी कसे?

  Posted by geeta | ऑक्टोबर 13, 2011, 8:39 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: