.
Travel-पर्यटन

प्रवास आणि मोबाईल विना?


काही दिवसांपूर्वी मी दख्खनच्या राणीने मुंबईहून पुण्याला येत होतो. अलीकडे या गाडीला वातानुकुलित आसन कक्ष नावाचे डबे बसवलेले असतात. मी लहान असताना दख्खनची राणी मोठी प्रसिद्ध गाडी होती. या गाडीला फक्त आठ का नऊ डबे असत. त्यात एक डबा खानपान सेवेचा असे. उरलेल्या डब्यांना प्रथम वर्गाचे डबे असत. प्रवास इतका आरामदायी असे की काही विचारू नका. तुम्ही चौघे जण प्रवास करत असलात तर स्वतंत्र कंपार्टमेंट प्रवासासाठी मिळत असे त्यामुळे प्रायव्हसी पण असे. 1960-70 च्या दशकात कधीतरी आसन कक्ष आले. तरी ही आसने बरी होती म्हणायला हरकत नाही. एका ओळीत चार आसने असत. त्यामुळे भरपूर जागा असायची. खरे तर प्रथम वर्गात एका ओळीत 3 माणसांचीच बसण्याची व्यवस्था असते. पण आधुनिकीकरणाच्या नावाखाली आणखी एक माणूस एका ओळीत रेल्वेने घुसडला. ही व्यवस्था बरीच वर्षे होती नंतर 1990 च्या दशकात हे आसन कक्ष वातानुकुलित केले गेले. या बरोबरच एका ओळीत 5 माणसांना बसवण्याला सुरूवात झाली. म्हणजे भाडे तेवढेच पण प्रत्येक प्रवाशाला जागा मात्र आणखी कमी अशी सुधारणा रेल्वे करत गेली.

तर हे आसन कक्ष वातानुकुलित असल्याने डब्यांचा रूळावरून जात असल्याने ऐकू येणारा खडखडाट आता डब्याच्या आत कमी ऐकू येतो. हे जरी चांगले असले तरी त्यामुळे प्रवाशांच्या आपापसांतल्या गप्पा या खाजगी राहूच शकत नाहीत. त्या सार्वजनिकच होऊन जातात. त्यात भरीस भर म्हणून मोबाईलचे रिंग टोन व फोनवरचे बोलणे हे ही सगळ्यांना ऐकू जातेच. मी एकदा पुण्याहून निघालेलो असताना माझ्या समोरचे गृहस्थ घराची किल्ली बरोबर घेऊन आले. घरच्या लोकांची अडचण होऊ नये म्हणून त्यांनी त्यांना पोचवायला स्टेशनवर आलेल्या पण आता परतीच्या रस्त्यावर रिक्षामधे असलेल्या बायकोला फोन लावला. पुढची 5 मिनिटे त्यांच्या घराची डुप्लिकेट कोणत्या खिडकीच्या मागे कशी दडवून ठेवलेली आहे याचे बारीक वर्णन डब्यातल्या आम्हा इतर प्रवाशांना नीट कळले. कोणी गैरफायदा घेऊ इच्छिणारा जर डब्यात असता तर त्या गृहस्थांच्या घराचे काही खरे नव्हते.

तर त्या दिवशी मुंबईहून परत येत असताना सहप्रवाशांना सारखे फोन येत होते. बहुतेक प्रवाशांना ते कोठेपर्यंत आले आहेत? हीच विचारणा होत होती. “कर्जतला पोचलो. खंडाळ्याला पोचलो.” वगैरे वगैरे. लोणावळा सुटले तसे डब्यातून बाहेर फोन जाऊ लागले न्यायला येता आहात ना?” कुठे उभे राहायचे? शिवाजीनगरला उतरणार की पुणे स्टेशन? क्वचित एखादा फोन मुंबईलाही होत होता. मी बहुदा एकटाच असा प्रवासी होतो की ज्याला एकही फोन आला नाही व करावासा वाटला नाही. मी घरून निघताना निघत असल्याचे कळवले होते. नेहमीच मी पुणे स्टेशनला उतरतो. त्या दिवशी तसाच उतरणार होतो. सांगण्यासारखे काहीच नव्हते.

मला मोबाईल फोनची सेवाच उपलब्ध नव्हती तेंव्हाचे दिवस आठवले. कामानिमित्त मी नेहमीच पुणेमुंबई अशा एका दिवसाच्या ट्रिप्स करत असे. सकाळी एकदा घरून निघालो की त्यानंतर रात्री परत घरी पोचेपर्यंत घराशी काहीच संपर्क रहात नसे. फॅक्टरीमध्ये सुद्धा संपर्क होणे कठीण होते. अगदी फारच अडचण असली तर एक दोन कॉंन्टॅक्ट क्रमांक आम्हास माहीत असत. पण सहसा त्याचा वापर करत नसू.

एकदा एशियाड सेवेने मुंबईला निघालेलो असताना, रस्त्यावर वाहतुक मुरंबा असल्याने, लोणावळ्या जवळच्या मळवली गावात संबंध दिवस काढून मी परत रात्री पुण्याला आलेलो आठवते. पण घरी काही पत्ताच नसल्याने मी मुंबईला गेलोच नाही हे रात्रीच कळले.

मोबाईल विना प्रवासाला तशा दोन बाजू होत्या. पुष्कळ वेळा अज्ञानात सुख असते त्या प्रमाणे फॅक्टरीत आलेले किंवा घरगुती प्रॉब्लेम मला दुसर्‍या दिवसापर्यंत समजत नसत. त्यामुळे ज्या कामासाठी मी प्रवासाला निघालेलो असे त्या कामावर लक्ष नीट लावून ते काम करत यायचे. मधे आम्ही काही मित्र दिल्लीला गेलो होतो. तेथे माझ्या बरोबरचे मित्र त्यांच्या धंद्याचेच प्रश्न दिल्लीला बसून बहुतेक वेळ सोडवताना दिसले. म्हणजे दिल्लीचे काम बाजूलाच राहिले. पण खरोखरच काही सिरियस प्रॉब्लेम असला तर तो मला लगेच कळत नसे व त्यामुळे नुकसानही होत असे.

पण मग कोणता प्रवास जास्त बरा? मोबाईल विना का मोबाईल सकट? या प्रश्नाचे उत्तर मी अर्थातच मोबाईल सह असेच देईन. मोबाईल बरोबर असला तर तुम्हाला आणि घरातल्या सगळ्यानाच एका प्रकारे सुरक्षितता वाटते. पूर्वी परदेश प्रवासाला निघाले की विमानतळावर शिरल्यानंतर तुम्हाला कोणताही संपर्क घरच्यांशी ठेवता येत नसे. एकदा माझी हॉन्गकॉन्गची फ्लाईट 24 तास उशीरा सुटली. पण ही गोष्ट मला विमानतळावरून घरी आणि परदेशातल्या नातेवाईकांना कळवणे सुद्धा इतके कठीण गेले की विचारू नका. आता विमानतळावर मोबाईल चालतात त्यामुळे विमानात बसेपर्यंत व विमान उतरल्याबरोबर घरी संपर्क साधता येतो.

मात्र मोबाईल हा एखाद्या दुहेरी शस्त्रासारखा आहे. त्याचा गैर उपयोगही हो ऊ शकतो किंवा बहुतेक वेळा होतोच. तो टाळता आला तर ही आधुनिक सुविधा आपल्याला जास्त उपयोगी आणि सोईची पडेल असे मला तरी वाटते.

2 ऑक्टोबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “प्रवास आणि मोबाईल विना?

  1. Khara ahe. Mobile cha sujaan wapar kela pahije

    Posted by nileshjoglekar | ऑक्टोबर 3, 2011, 2:59 pm
  2. nice aticle

    Posted by anil | ऑक्टोबर 3, 2011, 6:26 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: