.
Musings-विचार

ज्येष्ठत्व निलंबित!


माझ्या परिचित असलेल्या एका गृहस्थांना दोन दिवसापूर्वी कार्डियाक अस्थमाचा त्रास होऊ लागल्याने इस्पितळात दाखल व्हावे लागले. आता यांना गृहस्थ कसे म्हणायचे हा सुद्धा एक प्रश्नच आहे कारण त्यांची पत्नी काही वर्षांपूर्वीच निवर्तली आहे. परंतु दुसरा समर्पक शब्द न सुचल्याने मी त्यांना गृहस्थ म्हणतो आहे. हे गृहस्थ पुण्यात एकटेच रहातात. वय आहे साठीच्या जवळपास! दोन मुलगे आहेत. त्यांची लग्ने झालेली आहेत. नातवंडे आहेत. आर्थिक दृष्ट्याही सर्व काही ठीक ठाक आहे. या दोन मुलांपैकी एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झालेला आहे तर दुसरा भारतातच पण जरा दूरच्या एका शहरात राहतो आहे.

इस्पितळात दाखल करायचे म्हटल्यावर मित्र परिचित यांनी त्यांना दाखल केले. भारतातल्या मुलाला फोन सुद्धा केला. कितीही लवकर यायचे ठरवले तरी एखाददुसरा दिवस हा यायला लागतोच. हे दोन दिवस या गृहस्थांच्या मित्र परिवाराने त्यांची छान काळजी घेतली आहे. भारतात रहात असलेला मुलगा, सून आता येऊन दाखल झाले आहेत. मित्र परिवाराने आतापर्यंत तरी या गृहस्थांची काळजी घेतली असली तरी त्या मित्रांनाही स्वत:ची घरे व संसार हे आहेतच. मुलगा साहजिकच आपल्या वडिलांना आपल्या बरोबर आपल्या नोकरीच्या गावी त्यांनी यावे म्हणून आता आग्रह करतो आहे. माझ्या परिचित गृहस्थांना आता खरा यक्ष प्रश्न पडला आहे की काय करायचे?

तसे बघायला गेले तर या गृहस्थांना पत्नी निवर्तल्यावर एकटे रहाण्याची बर्‍यापैकी सवय झाली आहे. त्यांचे रोजचे जीवन ते एकट्याने तरीही सहजतेने जगू शकत आहेत. दिवसभराचे शेड्यूल, कोणत्या मित्रांच्या बरोबर कोठे भेटायचे? काय करायचे हे सगळे ठरलेले असते. आता या वयाच्या माणसाला रोजच्या आयुष्यातला नियमितपणा हा बहुदा एक आवश्यक घटक असतो. ठराविक वेळेला सकाळी उठणे, फिरायला जाणे. जेवणांच्या ठराविक वेळा पाळणे हे सगळे व्यवस्थित पाळले जाते.

वर्षभरापूर्वी हे गृहस्थ मुलाकडे अमेरिकेला 6 महिने रहायला म्हणून गेले. कसे तरी दोन तीन महिने काढून अत्यंत कंटाळलेल्या अवस्थेत परत आले. मुलाकडे जरी सुबत्ता असली तरी त्याच्याकडे परदेशात जाऊन रहाणार्‍या आईवडीलांना जे एक केविलवाणे अवलंबित्व जाणवत रहाते. समवयस्क मित्र मैत्रिणी नसल्याने जो एकटेपणा जाणवत राहतो तो सहन न झाल्याने ते शेवटी परत आले. या अनुभवामुळे अमेरिकेला परत जायचे नाही हे आता त्यांनी नक्की ठरवून टाकले आहे.

भारतातल्या दुसर्‍या मुलाकडे गेले तरी अडचणी या आहेतच. जागा लहानच आहे. ती मंडळी तरूण असल्याने, आहारात, विहारात नियमितपणाचा पूर्ण अभाव आहे. एक दिवस सकाळी लवकर उठतील तर दुसर्‍या दिवशी शनिवार आहे म्हणून सकाळी 9 वाजले तरी घरात सामसूम असेल. जेवण सुद्धा सूनबाईंच्या लहरीवर असते. कधी भेळ तर कधी इडली सांबार. जेवणाच्या वेळा ही ठरलेल्या नाहीत. एखाद दिवशी सकाळी 11 वाजता न्याहरी व जेवण हे एकत्रित केलेला ब्रन्च तर दुसर्‍या दिवशी जेवण दुपारी अडीच वाजता! अर्थात या सगळ्यात काही त्या कुटुंबाचे चुकते आहे असे म्हणता येणार नाही. त्यांचे वय तरूण असल्याने हा अनियमितपणा त्यांना रुचतो व चालतो. माझ्या परिचितांचे मात्र त्या घरात हाल होतात. त्यांना हवी असलेली पोळी भाजी, वरण भात काही त्यांना मिळत नाही व त्यामुळे तब्येतीच्या सारख्या कुरबुरी चालू राहतात. या कारणामुळेच ते एकटे पुण्याला आपल्या घरी राहणे पसंत करतात.

पण आता मात्र खरोखरच प्रश्न निर्माण झाला आहे. डॉक्टरांच्या मते त्यांना कार्डियाक अस्थमाचा त्रास सुरू झाला असल्याने त्यांनी एकटे राहणे योग्य ठरणार नाही. कारण कधी काय होईल हे सांगता येणार नाही. बिचार्‍यांची मानसिक परिस्थिती अगदी दोलायमान व डळमळीत झाली आहे.

मला वाटते की सध्या साठीला आलेल्या पिढीचा हा अगदी कॉमन प्रॉब्लेम होतो आहे. नवीन पिढी आता अतिशय स्वतंत्र विचाराची व कृतीची असल्याने त्यांना आपले आयुष्य स्वत:च्या कल्पनेप्रमाणे घालवावे असे वाटते व ते योग्यच आहे. मुलांना भार न होऊ देता आपण आपले उर्वरित आयुष्य जगावे असे साहजिकच या पिढीला वाटते आहे. परदेशात अनेक ज्येष्ठ किंवा वृद्ध आपले आयुष्य स्वतंत्रपणे व एकट्याने जगत असतात. पण त्यांच्याकडे असलेल्या सुविधा, वैद्यकीय मदत ही इतक्या उच्च प्रतिची असते की असे जगणे सहज शक्य होते. भारतात ज्येष्ठांना सुविधा फक्त कागदोपत्रीच मिळतात. प्रत्यक्षात परिस्थिती निराळीच आहे.

माझे परिचित काय ठरवतील ते कळेलच. माझा कयास आहे की ते पुण्यातच आणि सध्यासारखे एकटेच बहुदा राहतील.

29 सप्टेंबर 2011

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

25 thoughts on “ज्येष्ठत्व निलंबित!

 1. काका.. छान लिहिलं आहे.
  जुन्या लोकांच्या आणि आत्ताच्या लोकांच्या पिढी मध्ये बरीच तफावत जाणवते. दोन्ही बाजूने अ‍ॅडजस्ट करणारे खूप कमी लोक बघायला मिळतात. तसं पाहायला गेलं तर हा खूपच गंभीर प्रश्न आहे.

  अजित

  Posted by अजित | सप्टेंबर 29, 2011, 6:45 pm
  • अजित
   दोन्ही प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

   ऍडजस्टमेंट करण्याचा सर्व जण प्रयत्न करत असतातच. परंतु जेंव्हा विचारसरणीमधे खूपच फरक जनरेशन गॅप मुळे पडतो तेंव्हा काय करायचे? हा प्रश्न जुन्या पिढीसमोर येतो.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 2, 2011, 8:34 सकाळी
 2. “माझा कयास आहे की ते पुण्यातच आणि सध्यासारखे एकटेच बहुदा राहतील.”
  आणि तसं ही बघितलं तर ,नात्यातील ओलावा हा जर तुम्ही जवळ किंवा एकत्र राहत असाल तरच जास्त असतो असं ही निदर्शनास येते.एकाच शहरात राहून वडीलधाऱ्या मंडळींना न भेटणारे, असे कित्येक जण आपणास दिसतात.वेळेचे,कामाचे हे फक्त दिखावे अन बहाणे असतात.ह्या प्रकारात मोडणाऱ्या त्या त्या मंडळींनी जर स्वतःशी प्रामाणिक राहून जर स्वतःलाच हा प्रश्न विचारला तर त्यांना ही हे म्हणणे मनापासून पटेल,आणि ही वास्तवता नि कटू सत्य तुमच्या त्या गृहस्थांनी जाणल्या मुळे सुद्धा ते आजवर एकटे जीवन जगण्यात कदाचित जास्त आनंदी असतील.

  Posted by mynac | सप्टेंबर 30, 2011, 12:07 सकाळी
 3. chan lekh ahe gambir prashna mandelela ahe sunder

  Posted by anil | सप्टेंबर 30, 2011, 10:35 सकाळी
 4. “माझाही नुसता कयासच नव्हे तर खात्रीच आहे की ते पुण्यातच आणि सध्यासारखे एकटेच राहतील.

  कारण ही नव्या पिढीची मंडळी तरूण असल्याने,व २१ व्या शतकातिल असल्याने त्यांची संपूर्ण जीवनशैली व विचारही आमुलाग्र बदललेले असून वागण्यात एक प्रकारचा बेफामपणा व बेदरकारपणा जाणवतो. प्रवृत्तीत चंगळवाद आलेला दिसतो.वागणे एकदम स्वैर व भोगवादी आढळून येते. त्यांच्या आहारात, व विहारातही नियमित पणाचा संपूर्ण अभाव आहे.जवळपास रोजचं जंक व फास्ट फूड लागते व आवडतेही.स्वत:च्या मताप्रमाणे वागताना ते इतरांचा जराही विचार करत तर नाहीतच,पण ह्यात आपले काही तरी चुकते आहे असेही त्यांना वाटतच नाही.
  मला असे वाटते की जेवण-खाण,आचार-विचार,वडीलधार्‍यांचा आदर,वक्तशीरपणा,नम्रता,त्याग,भावूकता,नाते संबंध,प्रामाणिकपणा, तसेच कपड्यापासून संगीतापर्यंत सर्वच बाबतीत ह्या उतारवयात त्यांच्या आवडी निवडिंशी पदोपदी जुळवून घेणे त्यांना कठीणच नव्हे तर अशक्य होईल.आणि म्हणूनच मला मनापासून असे वाटते की जोपर्यंत हात पाय व शरीर साथ देत आहे तोपर्यंत त्यांनी एकटेच राहावे .’ .

  Posted by प्रमोद तांबे | सप्टेंबर 30, 2011, 12:45 pm
  • प्रमोद तांबे –

   तुम्ही केलेले वर्णन जरा जास्तच कडक वाटते आहे. इतक्या भडक रंगात नव्या पिढीला रंगवण्याची गरज मला तरी वाटत नाही. मात्र तुम्ही काढलेला निष्कर्ष मात्र पटतो.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 2, 2011, 8:39 सकाळी
 5. हा प्रश्न नक्कीच गंभीर आहे.
  भारतातले लोक खूप श्रीमंत तरी आहेत, पैशाची अडचण नाही. माझे श्वशुर याच अवस्थेत होते, त्यांनी २४ तास कळजी घेण्यासाठी एक माणूस ठेवला होता. चांगल्या संस्थेने पाठवलेला.

  परदेशात सोयी आहेत म्हणतात, पण पैसा बक्कळ लागतो नि सर्वांजवळ असतोच असेहि नाही.

  माझ्या मनात वारंवार वानप्रस्थाश्रम, सन्यास इ. विचार येतात. करायचे काय अट्टाहासाने आणखी काही वर्षे जगून? कुणाला काय फायदा आहे? शिवाय शेवटी ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ हे सत्य आहे.

  असा एक आपला विचार. असो.

  Posted by Anand | सप्टेंबर 30, 2011, 6:05 pm
  • आनंद –

   भारतातले सर्वच लोक काही श्रीमंत नाहीत. सगळ्याना काळजी घेणारी नर्स परवडत नाही. परदेशातील परिस्थितीबद्दल तुम्ही केलेला खुलासा डोळे उघडणारा वाटला. भारतातील लोकांना परदेशातील ज्येष्ठ फार सुखी जीवन जगत आहेत असे वाटत असते.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 2, 2011, 8:41 सकाळी
 6. ज्येष्ठत्व निलंबित हा आपला भेदक लेख वाचून मला ( एक ज्येष्ठ निवृत्त ) माझ्या कित्येक मित्रांची आणि ओळखीच्या मित्रांची आठवण आली. एक वय वर्षे ८७ असून विधुर आहेत. उत्तम लेखक असून त्यांनी लिहिलेली काही पुस्तके आजही वाचनीय आहेत. यांचा विविध वयाच्या मित्रांशी पत्रे, फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून सतत संपर्क आहे. चौफेर वाचन करत असून नेहमी आनंदात राहातात. राजकारण आणि प्रचलित घटनांवरून आजही ते आमच्याशी चर्चा व वाद विवाद करत आहेत. तरुण मित्रांशी यांचे चांगले जमते.

  दुसरे एक वय वर्षे ८२ असून मुंबईच्या बी.ए. आर.सी. मध्ये शास्त्रद्न्य होते. हे विधुर असून तीन मुलगे असले तरी मुंबईच्या आपल्या दोन खाणी घरात एकटे राहातात. यांचा ज्योतिष्य शास्त्राचा ब-यापैकी अभ्यास असल्यामुळे त्यांच्याकडे सल्ला मागण्यासाठी परिचित येत असतात. यांना मात्र आपल्या एकाही मुलाकडे प्रकृतीच्या कारणाशिवाय राहणे पसंत नाही. शेजारी आणि परिचित मित्रांकडे मदत घेऊन यांनी आपले आयुष्य एकटे राहण्याचे ठरवले आहे.

  मंगेश नाबर.

  Posted by Mangesh Nabar | ऑक्टोबर 2, 2011, 6:12 pm
  • मंगेश –

   तुम्ही म्हणता तशी अनेक उदाहरणे डोळ्यासमोर आहेत. कदाचित आता भावी कालातील समाज व्यवस्था अशीच असेल याची ही नांदी असू शकते.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 3, 2011, 7:29 सकाळी
 7. श्री चंद्रशेखर यांस
  तुमचा लेख खुपच विचार करायला लावणारा आहे यात शंका नाही.
  मला प्रतिक्रिया वचल्यावर आश्चर्य वाटले की कुणीही “ह्याच्या पुढे काय करणे जरूर आहे / शक्य आहे” अशा प्रकारचे मत व्यक्त केले नाही – अर्थात आपलीही लेख पसिद्ध करताना अशी काही अपेक्षा नसावी.

  तरीपण आपण सर्व-सामान्य जन इतके अलिप्त राहू शकतो का? किंवा “(अजुनतरी) हे संकट माझ्यावर आलेले नाही तेव्हा मी कशाला त्यावर जास्त विचार करू?” असे विचार करणारा आपला समाज झाला आहे का? असा प्रश्न आहे.

  मला स्वत:ला तरी अशा कठीण प्रसंगी मी काहीतरी मदत केली पाहिजे असे नक्कीच वाटते. काय व कशी त्या साठी आपणाकडून सुचना/सल्ला मिळाला तर तो सगळ्या समविचारी लोकांना उपयोगी होईल.
  रवि करंदीकर (मस्कत)

  रवि करंदीकर

  Posted by Ravi Karandikar | ऑक्टोबर 3, 2011, 1:30 pm
  • रवि करंदीकर
   प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपल्या कोणा परिचितावर किंवा मित्रावर असा प्रसंग ओढवला तर त्याला मदत करणे हे प्रथम दृष्ट्या महत्वाचे आहे. समाज व्यवस्थेत जे बदल होत आहेत त्यांच्यात परिवर्तन घडवून आणणे हे खूपच कठीण कार्य आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आयुष्याचा अखेरीचा काही काळ एकट्याने घालवायचा आहे हे नवीन कालातील सत्य आहे. त्यांच्या या अवस्थेत त्यांना मदत करण्यासाठी हेल्प लाईन सारख्या व्यवस्था जर सुरू करता आल्या तर ही मोठी मदत ठरेल असे मला वाटते. या हेल्प लाईन मधे वैद्यकीय उपाय योजना तर पाहिजेतच पण या शिवाय या मंडळींना बाजारातून काही वस्तू आणून हव्या असल्या किंवा काही दुरुस्तीचे काम करून हवे असले तर त्या बाबतीत मदत होणे गरजेचे आहे. यासाठी ज्येष्ठ नागरिक मूल्य देण्यास तयार असतात. त्यांना फक्त आपल्याला कोणी फसवेल अशी भिती वाटत राहते.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 3, 2011, 5:45 pm
 8. श्री.चंद्रशेखर जी ~

  लेख वाचला आणि कितीही अप्रिय वाटण्यासारखी परिस्थिती असली तरी आजच्या गतीमान युगातून निर्माण झालेले नात्यातील नवे बंध अटळपणे [‘असहायतेपणे’ असा मुद्दाम वापर करीत नाही] ज्येष्ठांनी करणे क्रमप्राप्त आहे. ‘अ’ कडे मन रमत नाही म्हणून ‘ब’ कडे रमेल हा विचार करण्यापूर्वी तिथेही रमलेच नाही मन तर तिसरा विकल्प जवळ असणार नाही हे कुणाही सुशिक्षिताला सहजरित्या कळणे गरजेचे मानले पाहिजे. उगा सूनबाईला दूषण देण्यात काही हशील नाही. दुसरीकडे त्या गृहस्थांना एखादी मुलगी असती आणि तिच्या सासर्‍यानाही अगदी इकडच्या सूनेसारखाच अनुभव आला असता आणि त्यानी धाग्यातील गृहस्थांकडे त्याविषयी तक्रार केली असती तर ते कोणत्या तोंडाने आपल्या मुलीची बाजू डीफेन्ड करणार ? सांगायचा मुद्दा असा की सध्या बाजारात जी हवा आहे तिचा गारवा फक्त ‘जोडप्या’ साठीच राखीव आहे असे मानले जाते. त्या ठिकाणी आई-बाप उपरे आहेत. “मुलगा बायकोच्या आहारी गेला आहे’ अशी टिपिकल ‘सुलोचना’ अभिनित रडणे-भकणे कालबाह्य झाले आहे.

  मी कोल्हापूरचा आणि मुलगा [जो एकुलता एक आहे] पुण्यात नोकरीला. त्याला पत्नीही पुण्याचीच मिळाली आणि नव्याच्या नवलाईने त्या दोघांनी मला कोल्हापूरसोडून पुण्यातील त्यांच्या प्रशस्त फ्लॅटमध्ये कायमचे राहण्यास बोलाविले. या दुनियादारीतील टक्केटोणपे मी योग्यरितीने जाणून घेतले असल्याने अगदी हसतमुखाने मी मुलग्याला आणि सूनबाईला ‘सुखाने राहा’ असे सांगून परत कोल्हापूरला आलो. आजही दुसर्‍या वा चौथ्या शनिवारी मी पुण्याची ट्रीप करतो आणि ते दोनच दिवस त्या जोडीसमवेत आनंदाने व्यतीत करतो. त्यांच्याकडे गाडीची सोय असूनही मला स्टॅण्डवर कुणीही नेण्यास येऊ नये असे मी अगदी निक्षून सांगितलेले असते. पीएमटीची इतकी चांगली सोय असताना पुण्याच्या भरगच्च ट्रॅफिकमधून मुलाने/सुनेने स्वारगेटवर यावे इतका मी स्वतःला व्हीआयपी समजत नाही. रविवारी दुपारी भोजनानंतरही त्यांच्या कॉलनीतून स्वारगेटला एकटाच बसने येतो. त्यांच्या आग्रहात खूप आपुलकी प्रतीत होते मला, पण मी नेमके जाणतो की आपली मर्यादा तितपतच. यात गोडी राहते.

  कोल्हापूरात मी कधीही एकटा पडत नाही, पत्नी नसूनही. हरेक क्षेत्रातील मित्रपरिवार भरपूर आहे. वाचनात इतके मन रमते की महिनोनमहिने मी इडियट बॉक्सकडे जातही नाही. [मी तर असे म्हणेन की खरंच मनाला कसलीही चिंता लावून घ्यायची नसेल तर पन्नाशी पार केलेल्या प्रत्येक पुरुषाने टीव्हीशी आपले नाते एकदम तोडून टाकावे. अतिशय घाणेरडा प्रकार आहे पुरुषांनी टीव्ही मालिका तासनतास पाहणे, आणि त्याचेच सिम्प्टम्स आपल्या रक्तेपेशीमध्ये बिंबवून कधी मुलाच्या तर कधी सुनेच्या नावाने बोट मोडीत बसणे.] तब्येत रोजच्या स्वीमिंगमुळे ठीकठाक आहे. जर कोणत्या ना कोणत्या कारणपरत्वे आजारी पडलोच तर मुलाने+सुनेने इकडे येऊनच मला पाहावे अशी गरज बिलकुल नाही, इतपत मी ४० वर्षे एकत्र राहिलेल्या डझनभर मित्रांवर विसंबून राहू शकतो. मुलावर अवलंबून राहावे अशी आर्थिक चिंता जशी मला नाही तद्वतच माझ्या पश्चात माझी शिल्लक आणि जी काही थोडीफार घरदाराची इस्टेट आहे ती त्यालाच मिळणार असल्याने त्यालाही कसलीही धाकधूक नाही.

  इन अ नट्शेल ~ विशिष्ट परिस्थितीत एकटे राहण्यामध्ये जी मजा आहे ती उभयपक्षी कायमचे सौहार्दपूरक वातावरण निर्माण करते.

  Posted by अशोक पाटील | ऑक्टोबर 3, 2011, 7:47 pm
 9. अशोक पाटील –

  आपला अनुभव वाचून फार छान वाटले. अलीकडच्या कालात आपली मर्यादा जाणून त्या प्रमाणे ज्येष्ठांनी राहण्यातच सर्वांचे सौख्य आहे. मात्र आपल्या प्रतिसादात एका महत्वाच्या मुद्याकडे आपले दुर्लक्ष झालेले दिसते. जो पर्यंत ज्येष्ठ नागरिक धडधाकट असतात आणि त्यांची मनोधारणा आपल्यासारखी असते तो पर्यंत फारसे काहीच प्रश्न उभे रहात नाही. पुढे जेंव्हा याच ज्येष्ठाची तब्येत ठीक रहात नाही व त्याला व्याधी सुरू होतात तेंव्हा त्याचे काय होणार व त्याने काय करायचे? हा खरा कळीचा मुद्दा आहे.

  Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 4, 2011, 8:01 सकाळी
 10. नमस्कार ~

  नाही, प्रकृतीचा मुद्दा माझ्याकडून दुर्लक्षिला जाणे संभवत नाही. मी त्या संदर्भात प्रतिसादात उल्लेख केला नाही, एवढ्यासाठीच की सार्‍या समस्येचे मूळ आहे ते ज्येष्ठाचे राहणीमान आणि त्यातून उदभवणारी प्रकृतीची गार्‍हाणे. मूळ लेखात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अमेरिका आणि युरोपीअन देशात सरकारच सीनिअर सिटिझन्सची जबाबदारी उचलत असल्याने तिकडे प्रकृतीवरून काही समस्या उदभवत असतील असे नाही. तिथे मुलगा आणि मुलगी विशी ओलांडताच आईवडिलांपासून स्वतःच अलग होतात आणि स्वतंत्रपणे आपल्या आयुष्याची वाटचाल करतात. मग त्यावेळी ते शिकत असोत-नसोत, नोकरी करत असतील-नसतील हे मुद्दे समोर येत नाहीत. या सप्टेम्बरमध्येच प्रदर्शित झालेला The Entitled हा एका ‘बेकारीग्रस्त’ युवकाच्या समस्येवरील इंग्रजी चित्रपट पाहिला. बेकार असूनही तो आपल्या आईवडिलांपासून दूर राहतो आणि आईकडे अधूनमधून घरी येऊन तिच्या प्रकृतीविषयी विचारपूस करताना आई आपला मुलगा अजून नोकरीला नाही म्हणून त्याला काही पैसे देवू करते तर हा युवक म्हणतो, ‘मला लाज वाटत्ये की ग्रॅज्युएट होऊनसुद्धा मला अजून तुमच्या पैशावर अवलंबून राहावे लागते.’ ~ म्हणजेच तो बेकार असला तरी त्याने आईवडिलांपासून बाहेरच राहणे हे तिथल्या समाजाने स्वीकारले आहेच [कुमारी मुलीही वेगळ्या राहतात]. दुसरा अर्थ असाही की, मग मुलानेही आईवडिलांच्या प्रकृतीविषयी चिंता करणे अपेक्षित आहे, त्यासाठी सरकारी यंत्रणा आहे. किंबहुना सरकारचे ते कर्तव्यच मानले जाते.

  असे इथे होईल का? या प्रश्नाला या क्षणी तर ‘व्हावे’ असा आशावाद प्रकट केला जातो. त्यामुळे तसे होईल वा होणार नाही असे दोन विकल्प असल्याने ज्येष्ठांनी योग्यवेळेपासूनच ‘ऑन् देअर ओन्’ तशी योग्य ती तरतूद करणे क्रमप्राप्त [वा अटळ म्हणू या] आहे. अर्थात हे माझे व्यक्तिगत मत आहे. मी माझ्यापुरते इतके स्पष्ट् करू शकेन की, मला नोकरीतून मिळालेल्या पैशातील ठराविक – वा अंदाजीत – रक्कम माझ्या वैयक्तिक प्रकृतीस्वास्थ या कारणासाठी राखून ठेवली आहे. आज मुंबई-पुणेच काय पण भौगोलिकदृष्ट्या छोटे समजल्या जाणार्‍या शहरातही अनेक चांगल्या सेवासुविधांनी सज्ज असलेली हॉस्पिटल्स कार्यरत आहेत. मेडिक्लेम सारखी विमासंरक्षण दिली जातात. कित्येक देवस्थान, प्रतिष्ठानामार्फत ज्येष्ठांना मोफत [होय अगदी मोफत] वैद्यकिय सेवा पुरविली जातात. अशा परिस्थितीत “मला मुले पाहात नाहीत” असा बेसूर काढणे, सध्याच्या काळात तरी, योग्य नाही असे म्हणतो.

  Posted by अशोक पाटील | ऑक्टोबर 4, 2011, 10:16 सकाळी
 11. बादवे यावरुन आठवले की अथश्री नावाची परांजपे यांची ओल्डएजहोम कितपत यशस्वी झाली म्हणता येईल?

  सहज

  Posted by Sahaj | ऑक्टोबर 6, 2011, 10:44 सकाळी
  • सहज –

   परांजप्यांची अथश्री स्कीम बरीच यशस्वी झालेली असावी. कारण त्याच पद्धतीच्या आणखी स्कीम्सच्या जाहिराती मी मागे बघितल्या होत्या.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 7, 2011, 9:27 सकाळी
   • श्री.चंद्रशेखर…

    “बरीच यशस्वी” म्हणजे मला नक्की तुम्हाला काय म्हणायचे आहे ते समजले नाही. ‘यशस्वी’ असा प्रयोग केला असता तर ठीक होते, पण ‘बरीचशी’ चे योजन All is not well with King असाही होऊ शकतो.

    “ओल्ड एज होम – वृद्धाश्रम’ यांची उपयुक्तता कितीही महत्वाची असली तरी सार्वजनिक आणि काही ठिकाणाच्या खाजगी पातळीवर चालविल्या जाणार्‍या वृद्धाश्रमांची स्थिती दयनीय आहे हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. आमच्या कोल्हापुरात तर एका ठिकाणी वास्तव्य करीत असलेल्या तब्बल ८० वृद्ध स्त्री-पुरुषांनी मॅनेजमेन्टविरूद्ध थेट कलेक्टर ऑफिससमोर तंबू ठोकून उपोषण चालू केले होते.

    दोन खाजगी (याच शहरातील) गृहे पाहिली आहेत. तेथील परिस्थितीचे वर्णन करणे वा टंकणे माझ्या बोटाना शक्य नाही.

    ~~ तरीही तुम्ही आणि वर श्री.सहज म्हणतात त्याप्रमाणे परांजपे संचलित ‘अथश्री’ विषयी शक्य असल्यास सविस्तर इथे वाचायला मला नक्की आवडेल.

    Posted by अशोक पाटील | ऑक्टोबर 7, 2011, 1:35 pm
   • अशोक पाटील –

    मी बरीच यशस्वी म्हणतो आहे कारण व्यापारी दृष्टीने यशस्वी झाली आहे म्हणून. तिथे प्रत्यक्षात रहात असलेल्या लोकांकडून ती यशस्वी झाल्याचे समजल्यावरच या स्कीमला संपूर्ण यशस्वी म्हणता येणे शक्य होईल. मला अजून तिथे रहाणारे कोणीच न भेटल्याने मी बरीच यशस्वी असा शब्दप्रयोग केला आहे.

    Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 7, 2011, 3:00 pm
   • अथश्री

    अथश्री स्कीम माझ्या ऐकीव माहीतीप्रमाणे अशी व्यवस्था आहे की जिथे फक्त जेष्ठ नागरीकांनाच फ्लॅट घेता येतो (वास्तव्य करता येते). येथील घरे जेष्ठांना उपयुक्त सोयी असलेली आहेत जसे नॉन्स स्कीड फ्लोरींग, व्हिलचेयर ने आण करता येईल असे उतार रस्ते, लिफ्ट. तसेच भरोश्याची कामगार वर्ग यांची सोय, कोणि आजारी असेल तर डबा घरपोच अशी सोय / मेस अशी पण सोय, नर्स डोक्टर लवकर उपलब्ध इ इ ऐकीव माहीती. याला नेहमीसारखा टिपीकल वृध्दाश्रम म्हणता येणार नाही पण जे जेष्ठ नागरीक स्वतंत्र राहू शकतात व जर का त्यांना तब्येतीच्या अडचणी आल्याच तर अशी सेवा लगेच उपलब्ध असणे व ते आपल्याच घरी ती सेवा उपलब्ध असल्याने इतर नातेवाईक मित्रांवर अवलंबून न रहता, त्या जेष्ठ नागरीक संकूलात राहू शकतात.

    आता भारतात रियल इस्टेट न खपणे हे जरा विरळाच. त्यामुळे ही स्कीम खपणे उर्फ व्यापारी तत्त्वावर यशस्वी होणे यात विशेष बाब नसावी. माझा प्रश्न असा होता की असा जेष्ठ नागरीकांचा अडीअडचणींना सामोरे जात स्वावलंबी जगण्याचा मार्ग असलेला प्रयोग कितपत यशस्वी ठरला आहे? म्हणजे याची कोणाला सविस्तर माहीती आहे का?

    ‘हम दो, हमारा एकमेव किंवा एक भी नही’ च्या जमान्यात यापुढे अश्या कम्युनिटींना मागणी असणारच.

    Posted by Sahaj | ऑक्टोबर 7, 2011, 4:34 pm
 12. थॅन्क्स सहज ~

  छान माहिती आहे ही आणि अगदी स्वागतार्हही. अशासाठी की, आज कित्येक तरुण कुटुंबप्रमुख असे आहेत [मी स्वतः पाहिले आहेत] जे आपला संसार नेटका सांभाळून वृद्ध आईवडिलांच्यासाठी स्वतंत्र योजना आखून त्यासाठी येणारा खर्च सहज पेलू शकतात. पण गोची अशी की शासन व्याख्येनुसार नजरेसमोर येणारे ‘वृद्धाश्रम’ या नव्या पिढीतील कु.प्र.ला नको असते [असे दिसते]. त्याला कारणही असा निर्णय घेण्यापूर्वी त्याने आपल्या मित्रासमवेत त्या जागेवर जाऊन घेतलेला आढावा. मी पाहिलेल्या वृद्धाश्रमांचा ल.सा.वि. फार दयनीय आहे हे बेधडकपणे मी सांगू शकतो इतका मी त्या परिसराच्या जवळ गेलो होतो.

  पण ‘अथश्री स्कीम’ अंतर्गत ज्या बाबी तुम्ही आपल्या प्रतिसादात मांडल्या आहेत त्या पाहता एक गोष्ट प्रकर्षाने नजरेसमोर येते ती म्हणजे मेडिकलची तातडीने उपलब्ध होणारी सुविधा. अपार्टमेन्टची बांधणीही जेष्ठांना सर्वार्थाने सोयिस्कर अशीच केली जाणार हे तर उघडच आहे; तरीही मेसची सोय ही जादाची सुविधा मानली पाहिजे. मग तुम्ही शेवटी म्हटल्याप्रमाणे ‘हमारा एकमेव भी नही’ अशी स्थिती जरी असली तरी जे आहेत त्यांच्यासमवेत एकोप्याने [हे महत्वाचे आहे] राहिले तर उरलेला काळ हसतखेळत जाईल यात दोन्ही पक्षांना शंका राहणार नाही.

  वृद्धापकाळात एकट्याने, फटकून, राहिले तर तिचा कसा ‘नलिनी जयवंत’ होतो हे समाजाने पाहिले आहेच. ती वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून ‘अथश्री’ स्कीम यशस्वी होणे काळाची गरज आहे.

  Posted by अशोक पाटील | ऑक्टोबर 8, 2011, 9:54 pm
 13. तब्येत या कळीच्या मुद्द्यावर येऊन हा विषय थांबतो. जयश्री स्कीम आहे कुठे, याची माहिती मिळेल काय ?

  मंगेश नाबर

  Posted by Mangesh Nabar | ऑक्टोबर 9, 2011, 3:31 सकाळी
  • बरोबर!! मुळ लेखात जो मुद्दा आला आहे त्यावरुनच अथश्री संकुलाची आठवण झाली.
   थेट जाल दुवा देणे प्रशस्त वाटले नाही पण अथश्री हाउसींग, पुणे असे गुगल मधे धुंडाळले तर नक्की सापडेल. (मात्र जयश्री स्कीम – कल्पना नाही 🙂 )

   Posted by Sahaj | ऑक्टोबर 9, 2011, 7:36 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: