.
अनुभव Experiences

सुदिन खचित अजि उगवला!


परवा रात्रीची गोष्ट आहे. मी रात्री अगदी गाढ झोपलो होतो. तसा झोपेच्या बाबतीत मी अगदी भाग्यवान आहे. रात्रीचे साडेदहा वाजून गेले की मला झोप अनावर होते व आडवे पडले की काही मिनिटातच मी निद्रादेवीच्या आधीन होतो. असे असले तरी जर काही कारणांनी मला अवेळी जाग आली, तर मात्र परत झोप जाम लागत नाही. कितीही प्रयत्न केला तरी उरलेली रात्र मला चांदण्या मोजण्यात घालवावी लागते. तर परवा रात्री एक वाजण्याच्या सुमारास माझ्या मोबाईलची घंटी वाजल्याने मला जाग आली. ती एकदाच वाजली असल्याने कोणाचा तरी संदेश आला आहे हे उमगले. एवढ्या रात्री कोण मेसेज पाठवणार आहे असे प्रथम वाटून दुर्लक्ष केले. पण तुमचे नातेवाईक परदेशात असले की मनात नाना शंका येऊ लागतात. आणि त्यात माझ्या या मोबाईल फोनला एक अगदी वाईट सवय आहे. फोन किंवा संदेश आला व तो मी बघितला नाही तर प्रत्येक दहा सेकंदानंतर हा मोबाईल कुईक असा आवाज करून माझ्या निष्काळजीपणाची जाणीव करून देत राहतो. इतर वेळी ही सुविधा बरी वाटते पण रात्री एक वाजता जर प्रत्येक दहा सेकंदानंतर तुम्हाला ही सूचना मिळत राहिली तर कोण्याही शहाण्या माणसाचे डोके फिरणार नाही का? हे पुढचे परिणाम लक्षात आल्याबरोबर मी उठलो व आधी संदेश बघितला. तो बघितल्यावर 10 सेकंदानंतर जे माझे डोके फिरणार होते ते आधीच झाले आहे हे माझ्या लक्षात आले . तो संदेश असा होता.

“ CCTV 4 Camera DVR-Spl.Off. Rs. 18700, colour Videocorder Phone Rs. 7000 VAT Cabling extra- Sara , Ent. xxxxxxx/xxxxxxx or SMS CCTV to xxxxxxxx.”

आता हा संदेश वाचल्यानंतर या ज्या कोण साराबाई आहेत त्यांच्या डोक्यावर हा कॅमेरा व फोन आदळावा असा मोह मला झाला नसता तर आश्चर्य होते? पण ते शक्य नसल्याने मी चरफडत पडून राहिलो. आता परत झोप लागणे शक्यच नव्हते. ती उर्वरित रात्र व पुढचा सबंध दिवस तारवटलेल्या अवस्थेत मला काढावा लागला हे सांगणे न लगे.

आता हा एक संदेश बघा.

“Book your xxxx car in Ganesh festival-book tomorrow on auspicious Ganesh Chaturthi and get benefit up to Rs. 49559 Call xxxxxx Conditions apply”

हा संदेश जेंव्हा मला आला तेंव्हा मी माझी चारचाकी एका गजबजलेल्या रस्त्यावरून चालवत होतो. रस्त्यावर, भारतातल्या शहरांमधे असते तशीच, चारचाक्या, स्वयंचलित आणि मानव चलित दुचाक्या, आणि वेळीअवेळी रस्ता ओलांडू पाहणारे पादचारी यांची तुफान गर्दी होती. आता हा संदेश आल्यावर माझी चार चाकी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवणे व मोबाईल बघणे हे क्रमप्राप्त झाले. हा संदेश वाचल्यावर, माझे उर्वरित आयुष्य, कोणतेही वाहन न चालवता फक्त पायी चालत घालवण्याचा संकल्प मी पुढची काही मिनिटे तरी सोडला होता.

मध्यंतरी माझे एक स्नेही जरा गंभीर आजाराने इस्पितळात भरती झाले होते. त्यांना भेटण्यासाठी म्हणून मी गेलो होतो. तिथले वातावरण भलतेच सिरियस आहे हे लक्षात आल्याने आम्ही सर्व चूप चाप बसून होतो. एवढ्यात माझ्या फोनची घंटी वाजली. एक संदेश आल्याची सूचना मिळाली.

“xxxx xxxx Uapis & UPA ka Bharat Luto Shuru! Petrol hike by Rs. 3 ( Rs. 72 and Rs. 75P/Lit) BJP Andolan 16 Sept. 11.30 AM Alka Chauk- xxxxxxxxx Prez bjp”

संदेशातली बातमी जरी क्लेशदायक असली तरी त्या संदेशातली अजब भाषा वाचून माझ्या चेहर्‍यावर स्मित उमटले. तिथल्या परिस्थितीत माझ्या चेहर्‍यावरचे ते स्मित अतिशय विचित्र दिसते आहे व आजूबाजूचे लोक माझ्याकडे बघत आहेत हे लक्षात आल्याने माझी परिस्थिती मोठी अवघड झाली हे मात्र खरे.

मोबाईलवरून येणार्‍या या व अशा संदेशांनी सध्या नुसता उच्छाद आणला आहे. एक वर्षापूर्वी फोन कंपन्यांनी ग्राहकांना अशा प्रकारचे संदेश तुम्हाला नको असले तर एका विविक्षित क्रमांकावर संदेश पाठवून तसे कळवायला सांगितले होते व त्या प्रमाणे मी केलेही होते. परंतु त्याचा फारसा काहीच उपयोग न होता असले संदेश येतच राहिले. टेलेकॉम रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडिया ही सरकारी संस्था या बाबत नियम करत राहिली. मागच्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात असे संदेश पाठवणार्‍यांना दंड करण्यात येईल असे सांगण्यात आले. त्याचा काही उपयोग न झाल्याने रात्री 9 ते सकाळी 9 या कालात व्यापारी संदेश पाठवण्यावर बंदी घालण्यात आली. त्याचाही काही उपयोग झाला नाही.

या सगळ्या उपायांचा काहीच उपयोग न झाल्याने आजपासून प्रत्येक फोन धारकाला 100 संदेशच प्रत्येक दिवशी पाठवता येतील असे नवीन बंधन घालण्यात आले आहे. या बंधनाचा उपयोग होतो आहे असे सध्या तरी दिसते आहे कारण आज मला एकही असा फालतू संदेश आलेला नाही.

काही फोन धारक. विशेषत: तरूण वर्ग मात्र या बंधनांबद्दल आनंदी नाही असे दिसते आहे. ही मंडळी दिवसाला सहजपणे 100 पेक्षा जास्त संदेश पाठवत असावेत. “तू काय करतो आहेस( करते आहेस?)” हा संदेश बहुदा मोबाईलवरचा सर्वात लोकप्रिय संदेश असावा. या संदेशाला 90% वेळा तरी विशेष काही नाही.” असेच उत्तर येते. काही मंडळी, मित्र मैत्रिणींना उगीचच व निरर्थक संदेश पाठवत असतात. त्यांना हे बंधन बरेच जाचक वाटण्याची शक्यता आहे. मात्र माझ्यासारखे इतर ग्राहक मात्र या बंधनामुळे जर हे फालतू संदेश येणे बंद होणार असले तर आनंदाने हे बंधन स्वीकारतील या बद्दल माझ्या मनात तरी शंका नाही.

28 सप्टेंबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: