.
Musings-विचार

श्वान दिन


इंग्रजीमधे एक फ्रेज आहे, श्वान दिन (Dog Days) या नावाची. हे श्वान दिन असतात तरी कसे? अत्यंत दगदग, चिडचिड, मनस्वी उकाडा, चिकचिकाट आणि आत्यंतिक कष्ट करायला लावणारे दिवस म्हणजे श्वान दिन असा या शब्दांचा अर्थ सध्या तरी लावला जातो. मात्र या अशा त्रासदायक दिवसांना श्वान दिन असे का म्हटले जाते याच्या मागचे कारण अगदीच निराळे आहे. या फ्रेजमधला श्वान आहे तो काही अवनीतलावर असलेला कोणी कुत्रा नाही. हा श्वान आहे, अवकाशातील एक तारका समूह. मोठा कुत्रा किंवा कॅनिस मेजर (Canis Major) या नावाने हा तारका समूह ओळखला जातो. या तारका समूहाची ही ओळख भारतीय मात्र नाही. ती आहे ग्रीक पुराणांतून आलेली! आपल्याकडे या तारका समूहाला नावच नाही. या तारका समूहातला प्रमुख तारा म्हणजे सर्व आकाशस्थ ज्योतींपैकी अत्यंत तेजस्वी व पहिल्या प्रतिचा असलेला व्याध किंवा सिरियस (Sirius) हा तारा.

शरद संपात (22 सप्टेंबर) दिनाच्या एक किंवा दोन महिने पूर्वकालात, हा तारका समूह, सूर्योदयाच्या काही क्षण आधी, पूर्व क्षितिजावर दिसू लागतो व या नंतरचे पुढचे सहा महिने तो रात्री दिसतच राहतो. उत्तर गोलार्धातील देशांच्यात हा काल आत्यंतिक उकाड्याचा व एकूण जिकिरीचा व त्रासदायक असतो आणि त्यामुळेच या त्रासदायक दिवसांना श्वान दिन असे नाव दिले गेलेले आहे.

लोकमान्य टिळकांनी आपल्या ओरायनया ग्रंथात या श्वान दिनांची एक मोठी रोचक उत्पत्ती दिलेली आहे. त्यांच्या मताने, मध्य एशिया मधे वास्तव्य करणार्‍या ऋग्वेदकालीन आर्यांना, हा कॅनिस मेजर तारका समूह, शरद संपात दिनाच्या आधीचे थोडे दिवस दिसू लागत असे. त्यांच्या धर्मशास्त्राप्रमाणे देवांना हविर्भाग देण्याची सर्व धर्मकृत्ये, शरद संपात दिनाच्या आधी संपवणे आवश्यक असे. या दिनानंतर दक्षिणायन किंवा अशुभ काल सुरू होत असल्याने, ही धर्मकृत्ये शरद संपात दिनाच्या आधी संपवावी लागत.  या कारणामुळे एकदा कॅनिस मेजर तारका समूह पहाटे दिसू लागला की वर्षभराची धर्मकृत्ये संपवण्याची एकच लगबग व गडबड, ऋग्वेदकालीन आर्यांची सुरू होत असे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे दिवस कष्टदायक व दगदगीचे असत. तेंव्हा पासून शरद संपात दिनाच्या आधीच्या कालातील या दिवसांचे, श्वान दिन असे नामकरण झाले असावे.

मला असे नेहमी वाटायचे की आपणा सर्वांना कधी ना कधी तोंड द्यायला भाग पाडणार्‍या या अशा दगदगीच्या व त्रासदायक दिवसांना, श्वान दिवस म्हणू नये. आकाशातल्या ज्योतींचा आपल्या हालअपेष्टांशी काय संबंध? आणि कुत्र्यासारख्या माणसाच्या एका सच्च्या व प्रामाणिक मित्राचा संबंध, कशासाठी या नको नको वाटणार्‍या दिवसांशी जोडायचा? तसे बघायला गेले तर प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे हे श्वान दिन वर्षाकाठी निरनिराळ्या वेळीच येत असतात. समग्र विद्यार्थी वर्गासाठी परिक्षेच्या आधीचे दिवसच श्वान दिन असतात. तर हिशेब तपासनीस किंवा बॅन्क कर्मचार्‍यांसारखे आर्थिक उलाढालींशी संबंध असलेल्यांसाठी हे श्वान दिन, आर्थिक वर्ष समाप्त होण्याच्या (31 मार्च), आधीचे काही दिवस असतात. महाराष्ट्रातल्या पोलिसांसाठी हे श्वान दिन नक्कीच गणेशोत्सवाचे दिवस आणि कोणी बडा पदाधिकारी भेट देणार असण्याच्या वेळचे असतात. तर महिन्याचा खर्च आणि उत्पन्न यांची ताळमेळ कशी घालायची? या विवंचनेत असलेल्या सर्वसामान्यांसाठी, हे श्वान दिन प्रत्येक महिन्याच्या शेवटी येत असतात. फॅशन आणि लाईफस्टाईलच्या बाबतीत अतिशय आग्रही असलेल्या मंडळींसाठी, शेजारणीने आणलेली ब्रॅन्डेड पर्स किंवा ऑफिसमधल्या कलीगने घेतलेली कोरी करकरीत गाडी बघितली की पुढचे काही दिवस श्वान दिवसच होतात. थोडक्यात काय, की प्रत्येक व्यक्तीचे श्वान दिन निरनिराळ्या वेळी येतात.

परंतु या वर्षीचा भारतातला घटनाक्रम बघितला तर ऋग्वेदकालीन आर्यांनी लावलेला कॅनिस मेजर या तारका समुहाचा पूर्व दिशेकडचा उदय व दगदगीचे व त्रासाचे दिवस सुरू होणे यातील परस्पर संबंध निदान राजकारणी व राजकारणाशी संबंधित मंडळींसाठी तरी खासच बरोबर ठरतो आहे. माध्यमे आणि माहिती अधिकार कायद्यामुळे मिळालेल्या माहितीमुळे दररोज नवीन नवीन माहिती उजेडात येते आहे. केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्र्यांचे परस्पर वाद विवाद चव्हाट्यावर येत आहेत. बेलारीच्या खाणींतून खनिजे बाहेर काढून त्यावर अमाप नफा मिळवणारे एक राजकारण संबंधी, हैद्राबादच्या तुरुंगात त्यांच्यासारख्याच एका दुसर्‍या बड्या उद्योगपतींबरोबर बॅडमिंटन खेळून श्वान दिन व्यतीत करत आहेत. . तर बडे बडे नेते दिल्लीच्या तिहार तुरुंगाचे हवा पाणी चाखत श्वान दिनांची मजा अनुभवत आहेत. मात्र श्वान दिनांचा सर्वात मोठा त्रास या नेते मंडळींना खरा कधी सुरू झाला असेल तर तो महाराष्ट्राच्या कोपर्‍यातल्या एका खेडेगावातील एका म्हातार्‍याने दिल्लीत केलेल्या उपोषणानंतर! परिणामी एका राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांना, खोडसाळ आरोप केल्याने, बिनशर्त लेखी माफी मागावी लागली आहे तर अनेक मंत्री तेंव्हापासून चूपच बसले आहेत.

श्वान दिनांचे महत्व असे आहे. शेवटी ऋग्वेद लिहिणारे आर्य चूक कसे ठरतील? निदान दिल्लीकरांना तरी तसे वाटत असले तर ते स्वाभाविकच आहे.

27 सप्टेंबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

9 thoughts on “श्वान दिन

 1. mahitipurna lekh

  Posted by anil | सप्टेंबर 27, 2011, 2:07 pm
 2. भाद्रपद महिन्यात कुत्र्यांसाठी-करिता प्रसिद्धच आहे… त्यात वेगळा तो अर्थ काय असणार हे अगदी सन्मान्य आणिक सामान्य ज्ञान कसे सांगायचे हा प्रश्न आपण फार सहजगत्या सोडवून आम्हांस आमचे नसलेले ज्ञान पाजळण्याची संधी दिल्याकारणे आभार…

  Posted by आता विश्वात्मके जेवे म्हणावे की आता विश्वास्मके देवे ह्या संघर्षातून कार्य साधणारे... | सप्टेंबर 27, 2011, 2:12 pm
 3. मी आत्तापर्यंत कॅनिस मेजर म्हणजे मृग नक्षत्र समजत होतो कारण व्याध तारा मृग नक्षत्राशी संबंधित आहे.

  Posted by Abhijit | सप्टेंबर 29, 2011, 2:01 pm
  • अभिजित –

   मृग नक्षत्राला युरोपियन लोक ओरायन असे म्हणतात. भारतीय पंचांगाप्रमाणे या तारकासमुहाचे किंवा नक्षत्राचे नाव मृगशीर्ष असे होते. आता मृग या नावाने संबोधले जाते. लोकमान्य टिळकांच्या मताप्रमाणे, ऋग्वेदकालीन आर्य, सूर्याला म्हातारे माकड किंवा वृषाकपि या नावाने ओळखत होते. या वृषाकपिने किंवा सूर्याने दक्षिणायनात हरणाचे(मृग नक्षत्राचे) रूप घेतले आहे असे ते मानत.
   मृग नक्षत्राच्या मध्यभागी ओळीने 3 तारे एका रेषेत येतात. हे 3 तारे व कॅनिस मेजर मधला सिरियस किंवा व्याध हा तारा एका रेषेत दिसतात. त्यामुळे व्याधाने सोडलेला बाण मृगाच्या छातीत घुसला आहे अशी कल्पना भारतीयांनी केलेली आहे.

   Posted by chandrashekhara | सप्टेंबर 29, 2011, 3:04 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: