.
ताज्या घडामोडी Current Affairs

गटर ऑइल घोटाळाचीनमधल्या शिनहुआ या सरकारी वृत्तसंस्थेने14 सप्टेंबर 2011 या दिवशी एक बातमी प्रसृत केली आहे. या बातमीनुसार, चीनमधल्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने एक मोठ्या स्वरूपातला देशव्यापी घोटाळा उघडकीस आणला असल्याचे जाहीर केले आहे. या घोटाळ्याला या मंत्रालयाने गटारातील तेलाचा घोटाळा‘ (Gutter Oil Scam)असे नाव दिले आहे. या बातमीनुसार हा घोटाळा करणार्‍या समाजकंटकांची टोळी 14 प्रांतांमध्ये पसरलेली आहे व वर्षाला 22.5 लाख मेट्रिक टन एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या खाण्याच्या तेलाची उलाढाल हे समाजकंटक करत आहेत.

चिनी जेवणातील जवळजवळ सर्व डिशेस वॉक या कढईसारख्या भांड्यात स्टर फ्राय पद्धतीने बनवले जात असल्याने अन्नाबरोबर खाण्याच्या तेलाचा मोठा अंश हा असतोच. Fish fillets in hot chili oil सारख्या डिशेस बनवताना तर प्रत्येक वेळी कढई भरून तेल वापरले जाते व नंतर ते फेकून दिले जाते. या तेलाप्रमाणे उरलेले सर्व अन्नही गटारात फेकून दिले जाते. मोठमोठी रेस्टॉरंट्स, हॉटेल्स ही तर प्रचंड प्रमाणात असे अन्न फेकून देतात. सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाच्या बातमीनुसार असे फेकून दिलेले गटारातले अन्न परत एकत्रित करून त्यातील तेलाचा अंश बाजूला काढून ते तेल विकण्याचा धंदा करणारा फार मोठा उद्योग चीनमध्ये सध्या चालू आहे. हे जमा केलेले गटार तेल औद्योगिक कामासाठी वापरले जाते.

या मंत्रालयाच्या माहितीनुसार आता हे गटार तेल औद्योगिक उपयोगासाठी वापरले न जाता परत अन्नपदार्थ बनवण्यासाठी म्हणून विकले जाऊ लागले आहे. या तेलाचा वापर एवढा वाढला आहे की तुम्ही 10 वेळा बाहेर जेवलात तर निदान एकदा तरी अशा तेलात बनवलेले जेवण घ्यालच. झेजिआंग, शॅनडॉंग व हेनान प्रांतामधे छापे घालून पोलिसांनी असे शेकडो टन तेल जप्त केले आहे व 32 समाजकंटकांना अटक केली आहे. या मंत्रालयाने अशा तेलाचे साठे व ते कसे मिळवले जाते याची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.

ही बातमी प्रसृत झाल्याबरोबर ही बातमी आताच का प्रसिद्ध करण्यात आली या बद्दल बरीच चर्चा माध्यमांच्यात झाली आहे. व या चर्चेवरून या गटर ऑइल स्कॅममागचे खरे इंगित काय आहे हे लक्षात येऊ लागले आहे. चीनमधे हे गटार तेल काही आताच वापरायला सुरूवात झाली आहे असे नाही.

श्रीमती ली डिलियन (Ms. Li Dilian) या चेंगडू प्रांताच्या टेलिव्हिजन चॅनेलवर जिआ यू (Jia You!) या नावाचा एक कुकिंग शो प्रस्तुत करत असतात. त्यांनी नुकताच एका तासाचा एक कार्यक्रम, गटार तेल वापरून बनवलेल्या डिशेस, या विषयावर सादर केला होता व तो अतिशय लोकप्रिय झाला होता. ली डिलियन यांच्या मताने काही पदार्थांना या तेलाच्या वापराने जी धुरकट चव येते ती अप्रतिम असते. त्यांच्या मताने पोलिसांच्या या धाडींमागे काहीतरी दुसरेच कारण आहे.

फेकून दिलेल्या अन्नावर प्रक्रिया करून तेल मिळवण्याचा धंदा अतिशय मोठ्या प्रमाणावर करणारे श्री. झांग हे तर या नवीन धोरणामुळे पूर्णपणे गोंधळून गेले आहेत. ते म्हणतात की ही प्रक्रिया करून तेल परत मिळवणे हे इतके दिवस चिनी सरकारचे अधिकृत हरित धोरण होते. व आमचा उद्योग हरित उद्योग म्हणूनच ओळखला जात होता. चीनमधे कधी काय व कसे बदलेल हे सांगणे कठिण आहे. आता आमचा उद्योग एकदम बेकायदेशीर म्हणून घोषित केला गेला आहे. गटार तेल परत मिळवणार्‍या उद्योगांवर ही संक्रात का बरे आली असावी? या विषयी बरीच चर्चा सध्या आंतरजालावर चालू आहे. त्यापैकी दोन कारणे अशी आहेत.

वॉशिंग्टन ब्लेड या वृत्तपत्राचे शांघाय येथील वृत्तप्रमुख श्री. फ्रेड येलिन यांच्या मताने या धोरणामागचे इंगित काही निराळेच आहे. त्यांच्या माहितीप्रमाणे स्टेट कौन्सिलचे (State Council) सभासद असलेल्या एका बड्या असामीचे सरकारी मालकीच्या एका तेल उत्पादक कंपनीशी बरेच लागेबांधे आहेत. या गटार तेलाच्या वाढत्या विक्रीने या तेल कंपनीच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. या सरकारी तेल कंपनीचा फायदा कमी झालेला दिसू नये म्हणून हे सगळे उद्योग करण्यात आलेले आहेत.

अमेरिकेतील ह्युस्टन येथे असलेल्या ल्युब्रिकन्टस ग्रूप(The Lubricants Group) या कंपनीचे सल्लागार श्री टेक्स कोहेन यांनी चिनी सरकारच्या या धोरण बदलाचे फारच रोचक कारण दिले आहे. ते म्हणतात की त्सिंघुआ विद्यापीठातील संशोधन या धोरण बदलावर प्रकाश टाकू शकते. या विद्यापीठातील एक संशोधक वु रान यांनी मागच्या महिन्यात एक संशोधन निबंध प्रसिद्ध केला आहे. निरनिराळी खनिजे व इतर तेले फास्ट ब्रीडर न्युक्लियर रिऍक्टर मध्ये वापरल्यावर, सर्वात जास्त उर्जा या गटार तेलापासून मिळते असे आढळून आले आहे. उर्जेचे हे प्रमाण युरेनियम किंवा थोरियम या धातूंपेक्षा बरेच जास्त आहे. या संशोधनामुळे चीनमधील National Development & Reform Commission ही संस्था, गटर ऑइलचे राष्ट्रव्यापी मोठे साठे बनवण्याच्या उद्योगात बहुदा असावी असे दिसते. पुढच्या काही वर्षात गटर ऑइलचा वापर करून उर्जा निर्मिती करण्यात चीनचा हातही जगात बहुदा कोणी धरू शकणार नाही. चिनी सरकारने गटर ऑइल स्कॅम नावाचा मोठा घोटाळा शोधल्याच्या जो प्रचार चालू केला आहे त्या मागचे इंगित काहीतरी निराळे आहे हे नक्की. खरे खोटे ते फक्त चिनी सरकार जाणे!

21 सप्टेंबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “गटर ऑइल घोटाळा

 1. Dear Shri Aatley,
  Excellent piece of writing , as usual, from your pen .Very interesting and educating
  JKBhagwat

  Posted by jkbhagwat | सप्टेंबर 21, 2011, 6:03 pm
 2. छान लिहिले आहे. 🙂
  माझ्या अनुदिनीचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/

  Posted by prashant redkar | सप्टेंबर 21, 2011, 11:07 pm
 3. Sunder lekhan Navin mahiti Mailaali

  Posted by anil | सप्टेंबर 22, 2011, 1:35 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: