.
Health- आरोग्य

नव्या आक्रमणाचा धोका


भारतीय उपखंडावर गेल्या पाच हजार वर्षात जेवढी आक्रमणे झाली त्यातले ब्रिटिशांचे आक्रमण व1962 मधले चिनी आक्रमण ही सोडली तर बाकी सर्व आक्रमणे ही वायव्येकडून झालेली आहेत. अगदी गेल्या साठ वर्षाचा इतिहास जरी बघितला तरी सुद्धा 1947, 1965, 1971 आणि 1999 यातील युद्धे सुद्धा या वायव्येकडच्या आक्रमणांमुळेच झालेली आहेत. आता 2011 मध्ये एका नवीनच आक्रमणाचा धोका भारताला निर्माण झाला आहे असे दिसते. हे आक्रमण वायव्येकडूनच होऊ शकत असले, तरी याला भारताच्या वायव्येकडचे, पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान हे देश कारणीभूत असणार आहेत असे मात्र म्हणता येणार नाही.

कारण हे आक्रमण मानव निर्मित नसून फक्त मानवाद्वारे त्याचा प्रसार होतो आहे. हे आक्रमण आहे पोलिओ या महाभयानक व्हायरसचे.

लहान मुलांना ग्रासून, त्यांचे सर्व भावी आयुष्य अंधकारमय करून टाकणार्‍या या रोगाचे प्रमाण 1980च्या दशकापर्यंत सुद्धा प्रचंड होते. या दशकात दरवर्षी, 125 देशांच्यात मिळून साडेतीन लाखाहून जास्त मुले या रोगाची शिकार होत असत. जगभर पसरलेल्या या रोगाविरूद्ध लढा देण्यासाठी प्रथम दंड थोपटले ते रोटरी या एका जागतिक सेवाभावी संस्थेने! वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने या रोगाशी लढा देण्याची धुरा रोटरीकडून पुढच्या एक दोन वर्षातच उचलली. गेली पंचवीस वर्षे या दोन्ही संस्था जगभरच्या अनेक देशांत दरवर्षी, पोलिओची लस, पाच वर्षाखालील मुलांना मोफत देण्याचे काम करत आहेत. हे काम इतके प्रभावी ठरले आहे की या वर्षी पाकिस्तान-अफगाणिस्तान हे देश सोडल्यास, इतर जगभर मिळून झालेल्या पोलिओच्या केसेस फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच आहेत.

भारतापुरते बोलायचे तर भारतात दर वर्षी अंदाजे 7.5 कोटी मुलांना पोलिओची लस मोफत दिली जाते. या वर्षीच्या पहिल्या 8 महिन्यात फक्त 1 पोलिओ केस झाल्याचे अधिकृतपणे सांगितले गेले आहे. ही केस 13 जानेवारी या दिवशी पश्चिम बंगालमधे सापडली होती. या मुळे भारतातील आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी सुटकेचा एक निश्वास नक्की टाकला असणार. परंतु त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाहीये.

चीन या देशातून पोलिओ या रोगाचे उच्चाटन झाल्याचे अधिकृत रित्या मानले जात होते. गेली 10 वर्षे चीनच्या भूमीवर एकही पोलिओची केस झाल्याचे कळले नव्हते. 1999 मधे चीनमधे शेवटचा पोलिओ रुग्ण सापडला होता. या वर्षी अचानक, चीनच्या पश्चिमेला असलेल्या शिंजियांग या प्रांतातील होतान व त्याच्या जवळपासच्या भागात 7 पोलिओच्या केसेस सापडल्या आहेत. या बातमीमुळे चीनमधेही काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील 45 लाख मुलांना पोलिओची लस आता देण्यात येणार आहे. चीनमधे सापडलेल्या पोलिओ केसेस मधील व्हायरसचे जनुकीय विश्लेषण केल्यावर चिनी डॉक्टरांना असे लक्षात आले आहे की चीनमधे आलेला हा व्हायरस डब्ल्यूपीव्ही 1 या प्रकारचा असून तो पाकिस्तान मधून आला आहे.

प्रत्यक्ष पाकिस्तान मधे या वर्षी 84 पोलिओ केसेस झाल्या आहेत व त्यापैकी 83 केसेस या डब्ल्यूपीव्ही 1 प्रकारच्या व्हायरसच्या आहेत. हा व्हायरस अतिशय जलद रित्या पसरून जास्तीत जास्त मुलांना रोगाची शिकार बनवत असल्याने सर्वात धोकादायक म्हणून मानला जातो. भारताच्या दृष्टीने सर्वात धोकादायक असलेली गोष्ट म्हणजे या केसेस पैकी बर्‍याच केसेस सीमावर्ती भागात झाल्याचे सांगितले गेले आहे. पाकिस्तान सरकार या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून 2.13 कोटी मुलांना पोलिओ लस देण्याचा कार्यक्रम हातात घेणार आहे. यात 62 जिल्हे पूर्णपणे कव्हर होतील तर 31जिल्ह्यात जास्त धोका असलेल्या ठिकाणी लस देण्यात येणार आहे. पाकिस्तानअफगाणिस्तान सीमेवरील सर्व भागासकट, पंजाब, सिंध, बलुचिस्तानचा काही भाग, इस्लामाबाद या ठिकाणी ही लस देण्यात येणार आहे. मात्र सध्या पाकिस्तानचा बराचसा भाग सध्या पुराच्या पाण्याखाली असल्याने या स्थानांवर लस देणे शक्य होणार नाही.

पाकिस्तान मध्ये आतापर्यंत झालेल्या केसेसचा आकडा बघितल्यावर भारतातील आरोग्य विभागाची अक्षरश: झोप उडाली आहे. पाकिस्तान कडून येणारे हे आक्रमण थोपवायचे कसे? हा एक मोठा गंभीर प्रश्न भारतीय आरोग्याधिकार्‍यांपुढे येऊन उभा ठाकला आहे.

भारताच्या आरोग्याधिकार्‍यांनी पंजाब सरकारच्या मदतीने वाघा, अटारी या सारख्या सरहद्दीवरील प्रवेश मार्गावर पोलिओ लस देण्याचे बूथ उभारले आहेत. पाकिस्तान कडून येणार्‍या प्रत्येक 5 वर्षाखालील मुलाला सक्तीने पोलिओ लस देण्यात येणार आहे. पायी चालत, बसने किंवा ट्रेनने, अशा कोणत्याही वाहनाने सरहद्द ओलांडणार्‍या प्रत्येक 5 वर्षाखालील मुलाला ही लस पुढचे 4 महिने दिली जाणार आहे.

पाकिस्तान मध्ये या नवीन सापडलेल्या केसेस मुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे असे मला वाटते. आतापर्यंत पोलिओची लागण झालेले व न झालेले अशा दोन वर्गात, देशांचे वर्गीकरण करण्यात येत असे. या वर्गीकरणाला फारसा काही अर्थ आता उरलेला नाहीये. आता फक्त पोलिओ विरहीत जगच असू शकेल. ते जो पर्यंत होत नाही तोपर्यंत वायव्येकडून येणार्‍या या आक्रमकाविरूद्ध जगाचा लढा हा चालूच ठेवणे आवश्यक ठरणार आहे.

19 सप्टेंबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “नव्या आक्रमणाचा धोका

  1. good visionary article

    Posted by anil | सप्टेंबर 19, 2011, 3:40 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: