.
Musings-विचार

बेरीज वजाबाकी


एखादा माणूस बोलताना सारखा गत आयुष्याचा उल्लेख करू लागला की खुशाल समजावे की तो आता वृद्धत्वाकडे झुकत चालला आहे. आमच्या वेळी असे नव्हते किंवा आमच्या वेळी तसे होते ही वाक्ये ऐकू येऊ लागली की धरून चालावे की तो माणूस वर्तमानकालापेक्षा भूतकालात जास्त रमू लागला आहे. त्या माणसाचे भूतकालात रमणे हे त्याचा भूतकाल, वर्तमानापेक्षा फार काही जास्त चांगल्या रित्या गेला होता, म्हणून नसते. याची कारणे थोडी निराळी असतात असे मला वाटते. यापैकी पहिले कारण म्हणजे या वृद्धत्वाकडे झुकणार्‍याला, वर्तमानकाळाची प्रत्यक्षात भिती वाटू लागलेली असते. सध्याच्या कालाचा वेग , चंगळवादाकडे जाणारी नवीन पिढीची प्रवृत्ती, हे सगळे त्याला सोसत नाही व मानवतही नाही. त्यामुळे भूतकालात जाणेच हे त्याला जास्त सुखकारक वाटत राहते. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे वयानुसार काहीतरी शारिरीक व्याधींनी या ज्येष्ठाच्या शरीरात ठाण मांडलेले असते. कोणाला उच्च रक्तदाब असतो तर कोणाला मधुमेह! गुढगेदुखी, संधीवात या गोष्टींनीही अनेक वृद्ध गांजलेले असतात. या व्याधींनी माणसाची शारिरीक क्षमता कमी होऊ लागली की वर्तमानातील आयुष्याबरोबर गती राखणे त्याना जमत नाही. आपण मागे पडतो आहोत ही जाणीव माणसाला एकदा झाली की आपला जुना काल कसा जास्त छान होता असे त्याला साहजिकच वाटू लागते.

ज्येष्ठ नागरिकांना आपण मागे पडतो आहोत याची जाणीव करून देणारी आणखी एक बाब असते. ती म्हणजे ज्येष्ठांची आर्थिक दुर्बलता. अगदी कितीही उत्तम प्लॅनिंग करून निवृत्तीची सोय केलेली असली तरी ज्या दराने महागाई वाढते आहे त्या दराने ज्येष्ठांचे उत्पन्न वाढणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. त्यामुळे निवृत्त झाल्या झाल्या आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असलेले ज्येष्ठ सुद्धा निवृत्तीला एकदा दहा, पंधरा वर्षे लोटली की खर्च करताना प्रत्येक रुपयाचा विचार करताना दिसतात. भारतात सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बहुतेक शहरांच्यात इतकी मोडकळीस आलेली आहे व व जी आहे त्यात इतकी प्रचंड गर्दी असते की ज्येष्ठांना यातून एकट्याने प्रवास करणे हे एक दिव्यच वाटते. आर्थिक सुबत्ता आता राहिलेली नसल्याने वाहन घेणे परवडत नाही. जुने वाहन असले तर रस्त्यावरच्या गर्द्रीमुळे ते चालवणे धोकादायक वाटते. रिक्षा किंवा टॅक्सी या सारखी भाड्याची वाहने परवडत नाहीत. या अशा अनेक कारणांच्यामुळे बहुतेक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या निवासापासून फारसे दूर जातच नाहीत.

या सगळ्या गोष्टींना उपाय हा असा नाहीच आहे. या गोष्टी काहीही केले तरी पूर्वीसारख्या होणे केवळ अशक्य आहे हे ज्येष्ठ नागरिक मनोमन जाणतात व म्हणूनच भूतकालात रमणे हा एकच विरंगुळा त्यांना समोर दिसतो. पण हे असे स्वप्नरंजन करून व नवीन पिढी, नवीन युग यांच्यावर टीका करत राहून, ज्येष्ठांच्या आयुष्याची गुणवत्ता वाढणार आहे का? हा खरा मूलभूत प्रश्न आहे. जर ही गुणवत्ता वाढणार नसली तर ही टीका करून उपयोग तरी काय? हे लक्षात घेतले पाहिजे.

एक इंग्रजी म्हण आहे की रिकामे मन हे सैतानाचे घर असते. ज्येष्ठांना ही म्हण बरीच लागू पडते. त्यामुळेच प्रत्येक ज्येष्ठाने आपले मन आणि दिवस हा रिकामा ठेवता कामा नये असे मला वाटते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्येष्ठांनी आपल्या रोजच्या आयुष्यातल्या सर्व गोष्टी शक्यतो स्वत:च्या हाताने करणे आवश्यक असते. बर्‍याच महिला, ज्येष्ठत्व आले की स्वैपाकपाणी सोडून देतात. ज्या सोडत नाहीत त्यांचे आरोग्यही या स्वैपाकाच्या कामाने चांगले राहते व मनही रिकामे राहून अनावश्यक गोष्टींचा विचार करत बसत नाही. ज्या कामांना कोठेही प्रवास करण्याची गरज नसते, फारसा खर्च येत नाही, अशा अनेक कामांमधे, छंदामधे, मन रिझवणे शक्य असते. माझ्या एका मित्राची पत्नी मध्ये निवर्तली. दिवस कसा घालवायचा? असा प्रश्न त्याला पडत असेल का? असे मला नेहमी वाटायचे. मधे एकदा त्याने आपण स्वत: करत असलेल्या लाकडी कोरीव कामाचे नमुने आम्हाला दाखवले. स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यात बसलेला मोठा धक्का केवळ या एका छंदाच्या जोरावर त्याने पचवला आहे. माझ्या परिचयातले एक ज्येष्ठ तर दिवसभर निरनिराळ्या इस्पितळांच्यात जाऊन तिथल्या रुग्णांना धीर देण्याचे कार्य करत असतात.

असे सतत कार्य करणारे ज्येष्ठ मग इतर लोकांना हवेहवेसे वाटतात. त्यांचा सहवास हवासा वाटतो. त्यांचे आयुष्य मग वजाबाकीचे न बनता बेरजेचे गणित बनते.

18 सप्टेंबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “बेरीज वजाबाकी

  1. good atrilcle , good lesson for all retired people

    Posted by anil | सप्टेंबर 18, 2011, 4:47 pm
  2. फारच सुरेख.मला खूप खूप आवडले.असेच लिहीत रहा!!!

    Posted by प्रमोद तांबे | सप्टेंबर 18, 2011, 7:16 pm
  3. chan lihile aahe.

    Posted by सुदर्शन | सप्टेंबर 20, 2011, 12:50 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: