.
अनुभव Experiences

तहान लाडू- भूक लाडू


लहानपणी वाचलेल्या गोष्टींमध्ये,त्या गोष्टींमधला राजकुमार राजाच्या आज्ञेवरून, किंवा व्यापारधंदा करण्यासाठी निघालेला एखादा तरूण मुलगा, हे जेंव्हा प्रवासाला जाण्यासाठी निघत, तेंव्हा त्यांची आई त्यांना तहान लाडूभूक लाडू नावाचे काहीतरी पदार्थ बरोबर खाण्यासाठी म्हणून करून देत असे. (आता राजकुमाराची आई म्हणजे राज्याची राणी; ती हे पदार्थ स्वत: करत असे की आपल्या स्वैपाक्याकडून करून घेत असे हे सांगता येत नाही.) हे तहान लाडूभूक लाडू कसे असतात याचे लहान वयात मला खूप कुतुहल असे. पण हे पदार्थ माझ्या आई किंवा आजी यांनाही कधी करता आले नाहीत किंवा कोणाकडे गेल्यावर कधी खायलाही मिळाले नाहीत. लहानपणची ही एक इच्छा अपूर्णच राहून गेली.

पुढे एकदम हे तहान लाडूभूक लाडू हा काय प्रकार आहे याचा साक्षात्कार झाला. त्याचे काय झाले की एकदा काहीतरी कामासाठी म्हणून मी बंगलुरूला गेलो होतो. जाताना रेल्वेचे आरक्षण मिळाले होते. येताना काहीतरी व्यवस्था करू असे ठरवून मी तिथे पोचलो तर खरा! ज्या कामासाठी गेलो होतो ते काम व्यवस्थित पार पडले. परंतु परतीचे तिकिट मात्र जाम मिळेना. शेवटी कोणीतरी सल्ला दिला की केंपगौडा सर्कल जवळ काही बस कंपन्यांच्या कचेर्‍या आहेत तिथे जाऊन चौकशी केल्यास काही व्यवस्था होऊ शकेल. बंगलुरू पासून पुणे काय तर मुंबईपर्यंत जाणार्‍या चांगल्या दहा ते पंधरा बसेस रोज रात्री सुटतात असे समजले. लगेच एका बर्‍या वाटलेल्या बस कंपनीत आरक्षण करून टाकले. नंतर आरामात जेवणखाण उरकून रात्री बस थांब्यावर पोचलो. बस तयारच होती. थोड्याशा उशीराने का होईना बस सुटली. रात्रभर बसून प्रवास करावा लागणार होता पण त्या वयात तो ठीक होता. बस पहाटे पहाटे बेळगावला पोचली. चहा पाणी करून आम्ही निघालो. सकाळी 9च्या सुमारास कोल्हापुरच्या आसपास बस एकदम थांबली. समोर वाहनांची एक लांबलचक रांग उभी असलेली दिसली. जरा चौकशी केल्यावर समजले की शेतकरी संघटनेचे रास्ता रोको असल्याने रस्ता बंद आहे व संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तो बंदच राहणार आहे. आपल्या जागेवर बसून राहणे किंवा इकडे तिकडे फेरफटका मारणे एवढे दोनच उपाय वेळ घालवण्यासाठी करण्यासारखे होते ते केले. घड्याळ अत्यंत हळू चालते आहे हे जाणवले, पण उपाय नव्हता. 12 वाजून गेल्यावर आपल्याला प्रचंड भूक लागली आहे हे जाणवू लागले. कोणीतरी बातमी आणली की जरा दूरवर एक खोपटवजा उपहारगृह आहे. तिथे गेल्यावर काळसर रंगाचा चाय मिळाला पण खायला फक्त मिरच्यांची भजी आहेत असे लक्षात आले. शेवटी ती विकत घेतली पण कोल्हापूरची मिरची म्हणजे काय चीज असते हे त्या दिवशी प्रथम समजले. शेवटी त्या मिरची भोवती असलेला पिठाचा पापुद्रा व चहा यावर समाधान मानावे लागले. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बसमधल्या सर्वांचीच अगदी दयनीय अवस्था झाली होती. त्या वेळेस अगदी मागच्या सीटवर बसलेल्या एका बाईंना बहुदा आमची दया आली व त्यांच्या बरोबर असलेल्या सामानातला लाडूचिवडा त्यांनी बसमध्ये वाटला. प्रत्येकाला अर्धा लाडू व मूठभर चिवडा वाटणीस आला असावा. पण लहानपणापासून शोधत असलेला तहान लाडूभूक लाडू हा प्रकार काय आहे हे त्या दिवशी प्रथम समजले. त्या दिवसापासून प्रवासाला निघताना खाण्याचा काहीतरी पदार्थ व पाणी स्वत:बरोबर घेऊनच निघायचे असा दंडक स्वत:वरच लावून घेतला.

अलीकडे बर्‍याच वेळा प्रवास विमानानेच होतो. विमानात कशाला खाण्याचे पदार्थ घेऊन निघायचे? पण विमान प्रवास आणि बसचा प्रवास यात तसा मूलभूत फरक काही नसतो हे अनुभवले असल्याने बरोबर तहान लाडूभूक लाडू हे घेतलेच पाहिजेत हा आपला निर्णय किती बरोबर आहे याचेही बरेच अनुभव आले. एकदा सिंगापूरहून भारतात इंडियन एअरलाइन्सच्या विमानाने येण्याचा मूर्खपणा मी केला (परत नक्की करणार नाही.) 7-45 ची फ्लाइट असल्याने घरून फक्त चहा पिऊन 6 वाजता सिंगापूर विमानतळावर पोचलो. सिक्यूरिटी सारख्या सर्व औपचारिकता पार पाडून विमानाच्या गेटवर सात सव्वा सातला जाऊन बसलो. समोर इंडियन एअरलाइन्सचे एक जुनाट विमान उभे दिसत होते. आता फ्लाइट अनाउन्स होईल म्हणून सगळी मंडळी वाट बघत होती. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, विमान सुटण्याचा पत्ता नाही. शेवटी 11 वाजता विमान सुटले. विमान सकाळचे असल्याने त्यांच्याकडे शिळे समोसे व एक कडक पाव एवढेच अन्न पदार्थ होते. आमचे विमान भारतात उतरले तेंव्हा संध्याकाळ होत आली होती. (सिंगापूरमधे रात्र व्हायला आली होती.) म्हणजे 10 ते 12 तासात एक समोसा व कोमट( माझ्या कोकणातल्या आजीचा शब्द वापरायचा तर मांजर मुतवणी) चहा एवढ्यावरच मंडळींना समाधान मानावे लागले होते. मी आणि इतर काही प्रवासी हे मात्र आनंदात होतो. कारण आमच्याजवळ आमचे तहान लाडूभूक लाडू होते ना!.

आपले गुजराथी बांधव मात्र या बाबतीत मोठे आग्रही असतात. रेल्वे प्रवासात कोठेही बघावे. त्यांच्याजवळ एक मोठा डबाभर खाण्याचे पदार्थ, जेवणाचा डबा हे असतेच. शेव गाठिया, पापडी, खाकरे असल्या पदार्थांची रेलचेल असते. बोहरी समाजातले व्यापारी प्रवासी तर बरोबर बिर्याणी वगैरे सुद्धा घेऊन प्रवास करत असतात. एवढे सगळे नाही केले तरी बिस्कीटांचे 2/3 पुडे, सॅन्डविचेस, एखादा चिक्कीचा पुडा हे तर प्रवासात बरोबर घ्यायलाच हवे.

परदेश प्रवासात तर आणखीनच नाटके होतात. एकदा लंडनच्या हीतथ्रो विमानतळावर मला सकाळी 10 ते रात्री 9 एवढा वेळ काढायचा होता. 1991 मधली गोष्ट आहे. चहाचा कप सुद्धा अर्ध्या पौंडाला मिळत होता (अंदाजे 30 ते 35 रुपये) बरं मी अमेरिकेतून भारताला चाललो असल्याने माझ्याजवळ डॉलर व रुपये होते. आता चहा प्यायचा म्हणजे डॉलरचे पौंड करा. उरलेली रक्कम नाण्यांच्यात मिळणार. त्याचे मग काय करायचे? पण माझ्याजवळ तहान लाडूभूक लाडू असल्याने मला काहीच अडचण आली नाही. परदेश प्रवासात दोन गोष्टी मी कटाक्षाने बरोबर ठेवतो. एक म्हणजे गुळाच्या पोळ्या व दुसरे बेसनाचे लाडू. जेवण मिळत नाही किंवा फार महाग आहे. खा दोन लाडू! आणि वर एक ग्लासभर थंड पाणी प्या किंवा दोन गुळाच्या पोळ्या खा. जेवण झाले! संध्याकाळपर्यंत परत भूक लागणार नाही.

तहान लाडूभूक लाडू यांचे असे महात्म्य आहे.

17 सप्टेंबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “तहान लाडू- भूक लाडू

  1. sunder lekh good lesson for frequently travelling person

    Posted by anil | सप्टेंबर 18, 2011, 4:39 pm
  2. nice idea sir jii 🙂

    Posted by सुदर्शन | सप्टेंबर 20, 2011, 12:53 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: