.
ताज्या घडामोडी Current Affairs

राईट टू रिजेक्टगेल्या दोन दशकात,  केंद्रीय सरकार, राज्य सरकार व पुणे महानगरपालिका या तिन्ही संस्थांसाठी मिळून निदान 12 किंवा 13 निवडणुकांमध्ये मतदान करण्याची माझ्यावर किंवा भारतात वास्तव्य करणार्‍या बहुसंख्य वाचकांच्यावर, वेळ आली असणार आहे. यापैकी दोनच निवडणुका मला चांगल्या आठवतात. यापैकी पहिली आठवत असलेली निवडणूक म्हणजे राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी घेतलेली निवडणूक ही आहे. या वेळेस, राजीव गांधी काहीतरी नवीन दिशा किंवा मार्ग देशाला दाखवून देतील असा एक आशावाद सुशिक्षित वर्गात निर्माण झाला होता. अर्थात पुढे एखादा फुगा फुटल्यासारखा तो आशावाद नष्ट झाला ही गोष्ट वेगळी.

दुसरी आठवणारी निवडणूक म्हणजे पुणे महानगरपालिकेची मागची निवडणूक. या निवडणुकीच्या आधी, महानगरपालिकेच्या ट्रॅफिक प्लॅनिंग विभागाने, आमच्या विभागात एक अविचारी व बुद्धी वैभवाचा संपूर्ण अभाव दर्शविणारा एक वाहतुक आराखडा लागू केला होता. पलीकडच्या एका मोठ्या राजरस्त्यावरचा संपूर्ण ट्रॅफिक, आमच्या विभागातल्या एका छोट्या रस्त्यावर महानगपालिकेच्या ट्रॅफिक प्लॅनिंग विभागाने डायव्हर्ट केला होता. पहाटे 5 ते रात्री 1 या कालात या छोट्या रस्त्यावरून, अक्षरश: हजारो वाहने धावू लागली होती. या भागात राहणारे सर्व नागरिक त्या कालात जीव मुठीत घेऊनच वावरत होते. आमच्या भागात राहणार्‍या एका तरूणाला व त्याच्या मित्रांना आपण काहीतरी केले पाहिजे असे वाटले व त्यांनी नागरिकांच्या सभा घेऊन जन जागृती करण्यास सुरूवात केली. नगरसेवकांना आणून प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव करून देणे, रास्ता रोको आंदोलन करणे या सारखे छोटेमोठे उपक्रम या मंडळींनी घडवून आणले. पोलिसही या नवीन व्यवस्थेला पूर्णपणे वैतागलेले असल्याने त्यांनी लगेच या कार्यकर्त्यांना पाठिंबा जाहीर केली. शेवटी तीन आठवडे चालल्यावर हा प्रयोग बंद पडला. ज्या तरूणाने ही चळवळ घडवून आणली त्याला आपण महानगरपालिकेत निवडून जाऊ असे वाटले व म्हणून पुढच्या निवडणुकीत तो आमच्याच वॉर्डातून उभा राहिला.

या दोन निवडणुका मला चांगल्या आठवण्याचे कारण म्हणजे फक्त या दोन निवडणुकांच्यात मी मतदान केले होते. पहिल्या वेळेस राजीव गांधी काही भरघोस कार्य करून देशाची परिस्थिती सुधारतील अशी आशा मला वाटत होती म्हणून मी मतदान केले होते तर दुसर्‍या वेळेस आमच्या विभागात चांगले कार्य केलेला तो तरूण निवडून आला तर कदाचित पुढे आणखी चांगले काम करू शकेल अशी आशा मला वाटली होती व म्हणून मी मतदान केले होते. यापैकी राजीव गांधी यांचे सरकार निवडून आले होते परंतु पुढे त्यांनी विशेष काहीच कामगिरी केली नव्हती. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा स्थानिक कार्यकर्ता निवडून आला तर नाहीच पण. त्याचे डिपॉझिटही जप्त झाले होते. अर्थात तो भाग महत्वाचा नाही. या दोन्ही वेळांना मी कोणाला आणि का मत द्यायला चाललो आहे याची पूर्ण जाणीव मला मतदान करताना होती.

या दोन निवडणुका सोडल्या तर झालेल्या इतर प्रत्येक निवडणुकीमधे, मत द्यायला जावे असे मला कधीच वाटलेले नाही. या निवडणुकांसाठी उभे राहिलेले उमेदवार, त्यांची शैक्षणिक पात्रता, त्यांचे कार्य, त्यांची सचोटी याबद्दल एकतर मला पूर्ण माहिती तरी नसल्याने किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर यादीतील सर्व उमेदवार मत द्यायच्या लायकीचे नाहीत असे मला वाटल्याने मी मतदानाला न जाण्याचेच नेहमी पसंत करत आलो आहे. बर्‍याच लोकांना माझे हे वागणे अयोग्य आहे असे वाटते. मी एक नागरिक म्हणून असलेला माझा हक्क डावलतो आहे किंवा मी माझी जबाबदारी नीट पार पाडत नाही असे यांना वाटते. परंतु माझ्या मनातले मानसिक द्वंद्व हे लोक कधीच समजलेले नाहीत. मतदानाला जाऊन, कोणीही योग्य उमेदवार उभा नसल्याने, कोणत्या तरी अयोग्य उमेदवाराला मत टाकणे म्हणजे पर्यायाने एका अयोग्य उमेदवाराला निवडून आणण्यास मदत करणे असेच मला वाटते. परंतु मी मतदानालाच जात नसल्याने, यादीतील सर्व मतदार मला अयोग्य व नालायक वाटत आहेत हे माझे मत मी अधिकृत रित्या सांगू शकत नाही याचा खेद मात्र मला झाल्याशिवाय रहात नाही. उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी एक उमेदवार, जो माझ्यासारख्या अनेक मतदारांना अपात्र किंवा नालायक वाटत असला, तरी त्याला जरी 1 मताचे मताधिक्य मिळाले तर निवडून येणारच हे भारतीय निवडणूक पद्धतीचे सर्वात मोठे अपयश आहे असे मला वाटत राहिलेले आहे. परंतु मी काय किंवा माझ्यासारखे इतर अनेक मतदार काय? या बाबतीत काहीच करू शकत नसल्याने, स्वत:ला मतदानापासून वंचित ठेवून मानसिक समाधान फक्त प्राप्त करू शकतात.

जन लोकपाल आंदोलनाला अभूतपूर्व जनाधार मिळवून, हे आंदोलन यशस्वी करणार्‍या, अण्णा हजार्‍यांनी आता या महत्वाच्या विषयाला हात घालण्याचे ठरवलेले दिसते आहे. त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनुसार अण्णांनी हा प्रश्न सोड्वण्याचा अगदी सोपा व सुलभ मार्ग सांगितला आहे. मतपत्रिकेवर सर्वात खाली एक रिकामी जागा सोडायची. ज्या मतदाराला वरच्या यादीतील कोणताच उमेदवार पसंत नसेल त्याने ही रिकामी जागा पसंत करायची व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील या रिकाम्या जागेसमोरील बटण दाबायचे. सर्व उमेदवार नापसंत? असे प्रस्तुत मतदाराला वाटत असल्याचे या वरून समजू शकेल. एकूण झालेल्या मतदानाच्या 50% पेक्षा जास्त मते जर सर्व उमेदवार नापसंतया उमेदवाराला मिळाली असली तर ती निवडणूक रद्द ठरवायची.

एका अगदी सोप्या मार्गाने, निवडणूक प्रक्रियेत आमुलाग्र सुधारणा करण्याचा इतका प्रभावी उपाय दुसरा कोणताही नसेल. लोकांना नालायक वाटणारे उमेदवार निवडूनच येणार नाहीत. अशा उमेदवारांना, केवळ आर्थिक पाठबळ आहे म्हणून राजकीय पक्ष तिकिट देणार नाहीत. गुंड व गुन्हेगार मनोवृत्तीचे उमेदवार निवडून येण्यास प्रतिबंध होईल. एकूणच निवडून येणार्‍या उमेदवारांची गुणवत्ता सुधारू लागेल.

अण्णांनी उचललेल्या प्रत्येक नवीन पावलाबरोबर त्यांच्या बद्दलचा माझा आदर शतगुणित होतो आहे यात शंकाच नाही. या माणसाने भारतातील लोकशाही प्रक्रिया व तिच्यातल्या तृटी यांचा जेवढा विचार केला आहे तेवढा इलेक्शन कमिशन मधल्या कोणा तज्ञाने तरी केला असेल का असा प्रश्न मला पडू लागला आहे. पूर्वीच्या एका लेखात अण्णांना मी आशेचा पहिला किरण असे म्हटले होते. त्याची मला आठवण होते आहे. अण्णा आता आशेचा किरण वगैरे राहिलेले नाहीत. या 74 वर्षाच्या म्हातार्‍याला भारताची भविष्यकाळातील आशा, असे म्हणणे आता क्रमप्राप्त आहे असे मला मनापासून वाटते.

14 सप्टेंबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

9 thoughts on “राईट टू रिजेक्ट

 1. sunder lekh nehmipramane

  Posted by anil | सप्टेंबर 14, 2011, 7:32 pm
 2. आपले उपद्रवमूल्य सिद्ध करू पाहणाऱ्यांच्या हाती ही चळवळ जाणार नाही याची काळजी अण्णा घेऊ शकतील असे आपल्याला वाटते काय?

  Posted by मनोहर | सप्टेंबर 14, 2011, 10:24 pm
  • मनोहर –

   कोणतीही चळवळ उपद्रवमूल्य सिद्ध करू पाहणार्‍यांच्या हातात जाण्याचा धोका हा असतोच व त्याच प्रमाणे अण्णांच्या चळवळीतही आहे. असे झाल्यास या चळवळीला मिळत असलेला जनाधार क्षणार्धात वितळून जाईल असे मला वाटते. या जनाधारावर तर अण्णांची चळवळ उभी आहे.

   Posted by chandrashekhara | सप्टेंबर 15, 2011, 9:24 सकाळी
 3. > अण्णा हजार्‍यांनी आता या महत्वाच्या विषयाला हात घालण्याचे ठरवलेले दिसते आहे. त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनुसार अण्णांनी हा प्रश्न सोड्वण्याचा अगदी सोपा व सुलभ मार्ग सांगितला आहे.
  > एकूण झालेल्या मतदानाच्या 50% पेक्षा जास्त मते जर ‘ सर्व उमेदवार नापसंत‘ या उमेदवाराला मिळाली असली तर ती निवडणूक रद्द ठरवायची.
  >

  अण्णा हज़ारे यांचे मत अगदीच बालिश वाटते. ५४०-पैकी ५० वा १०० वा ४०० ज़ागांवर निवडणोक रद्‌द झाली तर उरलेल्या ज़ागांवरून लायक उमेदवार निवडून येतील याची खात्री काय?

  राज्यकारभार चालवणे हे एक वेगळंच शास्त्र आहे. सेवाभावी कार्यकर्त्यांनी अनेक वर्षं कॉग्रेससाठी त्याग केला, रा स्व संघासाठी, सेवादलासाठी त्याग केला. या संघटनाही भारतियांच्या गुणदोषांपासून मुक्त नाहीत. अनेक वर्षं चालणार्‍या या संघटना ज़े करू शकल्या नाहीत, ते एका उपोषणापायी गवगवा झालेले हज़ारे कशावरून करू शकतील? त्यांचे महत्त्वाचे ४-५ साथीदारही त्यांना २-३ महिने नीट टिकवता आलेले नाहीत. त्यांची अनेक मतं फारच अप्रगल्भ आहेत.

  – डी एन

  Posted by Anonymous | सप्टेंबर 14, 2011, 11:42 pm
  • डी. एन –

   मला आपल्यासारखे अण्णा हजारे यांचे मत बालिश वाटत नाही. कोणत्याही जागी निवडणूक लढवायची असली तर आज परिस्थिती अशी आहे की लोकसभेसाठी प्रत्येक उमेदवाराला 10 कोटी रुपये तरी खर्च येतो. हा खर्चच तर भ्रष्टाचाराची जननी आहे. अण्णांचा राईट टू रिजेक्ट अंमलात आला तर आपला उमेदवार रिजेक्ट होणार नाही असा निवडण्याची प्रत्येक पक्ष काळजी घेईल. पर्यायाने उमेदवारांची गुणवत्ता सुधारेल. पुष्कळ वेळा अतिशय जटिल समस्येवर अगदी सोपा असा उपाय असतो. अण्णांचा उपाय असाच आहे.
   अण्णांच्या चळवळीचे महत्व त्यांच्या उपोषणाला नाही. निस्वार्थीपणे देशहितासाठी ते जी चळवळ उभी करू पाहत आहेत त्या क़ॉज ला महत्व आहे. ते कशावरून हे कार्य करू शकतील? याचे उत्तर फक्त काल देऊ शकतो. कार्यात अपयश येईल या भितीने एखादे कार्य हातातच घ्यायचे नाही असे ठरवले तर या जगात कोणतेच कार्य कोणाच्याच हाताने होणार नाही. या साठी कार्य सुरू करणे हे फार महत्वाचे असते. ते अण्णा करत आहेत यातच त्यांचे महत्व आहे. बाकी आपली मते मला तरी पटत नाहीत.

   Posted by chandrashekhara | सप्टेंबर 15, 2011, 9:37 सकाळी
 4. > ते कशावरून हे कार्य करू शकतील? याचे उत्तर फक्त काल देऊ शकतो.
  >
  हे मत मान्य आहे. अण्णांविषयी मला आदर आहे. पण अण्णांपेक्षा फार मोठे, आणि जास्त काळ काम केलेले लोक भारताला सुधारू शकले नाहीत. त्यांचे सर्व प्रयत्न वाया गेलेत असे म्हणता येणार नाही. पण ‘आशेचा पहिला किरण’ म्हणणे हा लगेच हुरळून केलेला दावा वाटतो.

  ‘मी संघ-भाजप-कडे गेलो नाही. स्वार्थ असलेले लोक इकडेतिकडे ज़ातात’ वगैरे अण्णांची मुक्ताफळं अगदीच बालिश आहेत. संघाकडे ज़ाऊन सर्व आयुष्य वाहून घेणारे कुठल्या स्वार्थापायी वागत होते? आता चक्रम विधानं करणारा माणूसही मोठं काम करू शकतो. पण ‘मी बघा कसा नि:स्वार्थी’ हा अण्णांचा सूर गांधीजींसारखा आहे. गांधीजींमुळे देशाचं मोठं नुकसान झालं, असं मला वाटत असल्यामुळे असे पवित्रे घेणार्‍या माणसांबद्‌दल मी जास्त सावध असतो. एकूणही मोठ्या लोकांचा देशाला कितपत फायदा होतो, याचं मला कुतुहल आहे. कारण आपल्या इथले टिळक, सावरकर, आणि अगदी गांधीजीही यांच्या तोडीचे पुढारी इंग्लंड-अमेरिकेत कदाचित झाले नसतीलही, पण तरीही त्यांनी आपल्यावर राज्य केलं.

  राजीव गांधी, शेषन यांच्याबद्दलही गेल्या २०-३० वर्षांत लोकांना आशा होत्या; आता पाळी अण्णांची. त्यांना यश मिळाल्यास मला आनंद होईल पण त्यांना यश मिळेल असं मला वाटत नाही. शिवाजी, टिळक हे लोक देशासाठी ३०-४० वर्षं झुंज़ले. अण्णा हज़ारे यांचं वयही त्यांच्या आड येणार. मोठं काम करणारे लोक सहसा त्यांची मोठी चळवळ सुरू करायला सत्तरीत असेपर्यंत थांबत नाहीत.

  – नानिवडेकर

  Posted by Anonymous | सप्टेंबर 15, 2011, 4:08 pm
 5. It is time of social revolution & obviously we are in now transit period,it wil takes few years but it will get success & better output for next generation. so we shuold wait.
  anna is a great man in modern india.we should support him despite of irritation.

  Posted by Manoj Patil | सप्टेंबर 18, 2011, 3:17 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: