.
ताज्या घडामोडी Current Affairs

दादागिरी


भारतीय नौदलाच्या, आयएनएस ऐरावत या युद्धनौकेने, या वर्षीच्या जुलै महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात, दक्षिण मध्य व्हिएटनाम मधल्या न्हा ट्रॉन्ग या बंदराला भेट दिली होती. या भेटीनंतर ही युद्धनौका उत्तर व्हिएटनाम मधील है फॉन्ग या बंदराकडे निघाली होती. 22 जुलै 2011 या दिवशी ही नौका न्हा ट्रॉन्ग बंदराजवळच्या व्हिएटनामच्या किनार्‍यापासून सुमारे 45 नॉटिकल मैल अंतरावर दक्षिण चिनी समुद्रात असताना, या नौकेला खुल्या रेडियो चॅनेल वरून एक संदेश मिळाला. हा संदेश देणारी व्यक्ती स्वत:ला चिनी नौदल या नावाने संबोधत होती. हा संदेश देणारी व्यक्ती या युद्धनौकेला दमात सांगत होती की ” तुम्ही चिनी सार्वभौमत्व असलेल्या समुद्राच्या भागात आहात. येथून ताबडतोब निघून जा.”

लंडनच्या फायनान्शियल टाईम्स या वृत्तपत्राने या घटनेचा वृतान्त देताना असे म्हटले आहे की एका अज्ञात चिनी युद्धनौकेने या भारतीय युद्धनौकेला स्वत:ची ओळख पटवून देण्यास व ही भारतीय नौका दक्षिण चिनी समुद्रात कशासाठी आली आहे? याचा खुलासा देण्याची मागणी केली होती. मात्र भारत सरकारचे परराष्ट्र खाते व भारतीय नौदल यांच्या खुलाशाप्रमाणे, आयएनएस ऐरावत या युद्धनौकेला वर निर्देश केलेला संदेश मिळाला होता हे सत्य आहे. परंतु या भारतीय नौकेला आसमंतात कोणतीही नौका किंवा विमान दिसून आले नाही. 5650 टन वजनाच्या व 206 नौसैनिक सज्ज असलेल्या या नौकेने या अज्ञात संदेशाकडे पूर्ण दुर्लक्ष केले व स्वत:ची ओळख पटवणे किंवा इतर काहीही माहिती कोणालाही न देता, है फांग या व्हिएटनामी बंदराच्या दिशेने आपला प्रवास चालूच ठेवला. व्हिएटनामच्या परराष्ट्रखात्याच्या प्रवक्त्याने, आपल्या सरकारला या घटनेची काहीही माहिती नाही असे सांगितले तर चिनी परराष्ट्र खात्याने आपण या घटनेबाबत चिनी संरक्षण मंत्रालयाकडून खुलासा मागवला होता मात्र अद्याप या बाबत आपल्याला कोणतीही माहिती प्राप्त झाली नसल्याचे सांगितले.
या घटनेनंतर, अपेक्षेप्रमाणे व्हिएटनामने भारताला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. भारतातील व्हिएटनामी राजदूत न्युएन थान टान यांनी या चिनी कुरापतीला टोला लगावत घोषणाच करून टाकली की ” भारतीय नौकांचे, व्हिएटनामी सार्वभौमत्व असलेल्या सागरामधे, स्वागतच आहे.”
चिनी सरकारने अधिकृत रित्या असा दावा केला आहे की “संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावर त्यांचेच सार्वभौमत्व आहे.” व्हिएटनाम व फिलीपाईन्स या देशांना अर्थातच हा दावा अमान्य आहे. उत्तर पॅरासेल्स या द्वीप समुहावर चीनने दावा सांगितलेला आहे. हा दावा व्हिएटनामला अजिबात मान्य नाही. त्याचप्रमाणे भरपूर तेलसाठे असलेल्या स्पार्टली द्वीप समुहांवरचा चिनी दावा, फिलिपाईन्स आणि त्या शिवाय तैवान, ब्रुनेई आणि मलेशिया या देशांच्या सरकारांना सुद्धा पूर्णपणे अमान्य आहे. भारतीय नौदलाच्या नौकांचे व्हिएटनाम स्वागत का करतो आहे याचे कारण या पार्श्वभूमीवर बघणे आवश्यक आहे.
न्हा ट्रॉन्ग बंदर
भारतीय युद्धनौकेला पाठवलेला अज्ञात संदेश हे कोणत्याही एखाद्या आंतर्राष्ट्रीय संघर्षात, चिनी सरकार नेहमीच कशा रितीने पावले उचलते याचे एक उत्तम उदाहरण आहे. प्रथम कोणत्याही भूप्रदेशावर किंवा सागरावर आपलीच मालकी असल्याचा दावा करायचा. मग तेथे आलेल्या लोकांना किंवा समुद्र असल्यास नौकांना, हा चिनी प्रदेश असल्याचे सांगून बाहेर जायला सांगायचे, हे चिनी सरकार नेहमीच करत आलेले आहे. लडाख व अरूणाचल प्रदेशामध्ये त्यांनी 1955-60 या काळात हेच केले होते. दक्षिण चिनी समुद्रात या वर्षी घडलेल्या या प्रकारच्या घटनांमध्ये, आयएनएस ऐरावत या नौकेबरोबरची घटना ही सर्वात ताजी अशी घटना आहे. मागच्या काही महिन्यात व्हिएटनामी तेलशोधक जहाजांच्या केबल्स चिनी नौकांनी कापल्या होत्या किंवा फिलिपाईन्सच्या मच्छीमार नौकांवरील मच्छीमारांना चिनी बोटींनी अडवून या भागातून बाहेर जाण्यास सांगितले होते. या दोन्ही देशांनी या प्रकारच्या चिनी वर्तणुकीला असलेला आपला स्पष्ट विरोध दर्शवला होता. या भागातील सर्वच देशांना, चिनी सरकारची ही वर्तणूक एखाद्या गल्लीतील दादाने गुंडगिरी करावी त्याच पद्धतीची वाटते आहे.
या चिनी दादागिरीला तोंड देण्यासाठी, भारतीय नौदलाचा वापर व्हिएटनाम मोठ्या कौशल्याने करत आहे. आयएनएस ऐरावत या नौकेने न्हा ट्रॉन्ग बंदराला दिलेल्या भेटीचा बराच गाजावाजा केला गेला. या नौकेचे कप्तान व इतर अधिकारी यांची कान्ह होआ प्रांताचे अधिकारी व सरकार यांच्याशी एक बैठक आयोजित केली गेली. इ.स.1288 मधे युआन राजघराणे चीनवर राज्य करत होते. या राजाच्या नौदलाच्या संपूर्ण धुव्वा याच वर्षी, बाख डान्ग येथील युद्धात, एक व्हिएटनामी दर्यासारंग ट्रान हुन्ग डाओ उडवून व्हिएटनामला विजय मिळवून दिला होता. या ट्रान हुन्ग डाओ याच्या पुतळ्याला व युद्धाच्या स्मारकाला आयएनएस ऐरावत या नौकेचे कप्तान व अधिकारी यांनी पुष्पचक्रे प्रदान केली. 2011 या वर्षाच्या सुरूवातीला, भारतीय नौदलाची डिस्ट्रॉयर नौका आयएनएस दिल्ली व क्षेपणात्र वाहक नौका आयएनएस किर्च या दोन्ही नौकांनी व्हिएटनाम मधील हो चि मिन्ह सिटी जवळील न्हा रॉन्ग बंदराला अधिकृत भेट दिली होती. आयएनएस ऐरावत या नौकेची न्हा ट्रॉन्ग बंदराची भेट या दोन नौकांच्या भेटीनंतर थोड्याच कालानंतर ठरवली गेली होती.
भारत सरकारने आता एक अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेनुसार “आंतर्राष्ट्रीय समुद्रांच्यात, ज्यात दक्षिण चिनी समुद्राचा सुद्धा अंतर्भाव आहे, आंतर्राष्ट्रीय कायद्यामधील सर्वमान्य तत्वांनुसार, कोणालाही जाण्याची मुभा असली पाहिजे या धोरणाला भारताचा संपूर्ण पाठिंबा आहे. ”या घोषणेवरून असे म्हणता येईल की भविष्यात सुद्धा भारतीय युद्धनौकांच्या व्हिएटनामी बंदरांच्या भेटी अशाच प्रकारे चालू राहतील. व्हिएटनामी नौदल व भारतीय नौदल यांच्यामधील या परस्पर संबंधांमुळे, या दोन्ही देशातील मित्रत्व आणि व्ह्युहात्मक सहकार्य (strategic partnership) यांच्यामध्ये भरीव वाढ होत असल्याने दिसल्याने, व्हिएटनाम या भेटींना बरेच महत्व देतो आहे.
भारत सरकार मागची आठ ते दहा वर्षे, व्हिएटनाम बरोबर एक व्यापक स्वरूपातले संरक्षण सहकार्य करते आहे. या योजनेच्या अंतर्गत, भारताने व्हिएटनामला अद्यावत शस्त्रास्त्रे, नौका विरोधी क्षेपणास्त्रे दिली आहेत व नौदल आणि वायूदलाच्या सैनिकांना शिक्षण दिले जात आहे. ऑस्ट्रेलियन वृत्त वाहिन्यांच्या माहितीनुसार, या परस्पर सहकार्याच्या अंतर्गत, व्हिएटनामने भारतीय नौदलाच्या नौकांना न्हा ट्रान्ग बंदरातील सुविधांचा वापर करण्याची मुभा दिली आहे व त्यामुळे हे परस्पर सहकार्य आता आणखी वरच्या पातळीला पोचले आहे असे म्हणता येते. या नव्या कराराप्रमाणे, न्हा ट्रा न्ग सुविधा वापरणारी, आयएनएस ऐरावत ही पहिलीच भारतीय युद्धनौका आहे. दक्षिण चिनी समुद्रामधील या भागात, भारताला एवढा रस का आहे? याची दोन प्रमुख कारणे आहेत असे वाटते. निकोबार बेटावर भारतीय नौदलाचा एक मोठा तळ उभारण्यात येणार आहे. या तळामुळे मलाका सामुद्रधुनीवर बारीक लक्ष ठेवणे भारताला शक्य होणार आहे. हा तळ व मलेशिया आणि इंडोनेशिया यांच्या नौदलांबरोबरचे सहकार्य, यामुळे मलाका सामुद्रधुनीतील समुद्री मार्ग हा भारतीय जहाजांसाठी सुरक्षित झाला आहे. ही सुरक्षा व्यवस्था, थेट दक्षिण चिनी समुद्रापर्यंत नेण्याला व्हिएटनाम बरोबरचे सहकार्य उपयुक्त ठरणार असल्याने त्यात भारताला रस असणे साहजिकच आहे. या शिवाय सर्वात महत्वाचे कारण म्हणजे व्हिएटनाम बरोबरच्या सहकार्याने, भारताला आपल्या नौदलाची, छोट्या प्रमाणातली का होईना!, उपस्थिती चीनच्या अगदी परसात ठेवता येणार आहे. ही उपस्थिती, चीन पाकिस्तानच्या मदतीने भारताच्या उत्तर सीमांवर ज्या कटकटी निर्माण करतो आहे त्यासाठी एक प्रभावी उपाय आहे.
भारत आणि व्हिएटनाम यांच्यातील वाढत जाणार्‍या या सहकार्यावर, चीन बारीक नजर ठेवून आहे असे लक्षात येते. चिनी वृत्त माध्यमांनी नुकत्याच केलेल्या एका विश्लेषणात म्हटले आहे की ” भारतीय नौदलाच्या नौकेने, व्हिएटनामला दिलेल्या भेटीवरून, दक्षिण चिनी समुद्रातील तंट्यामध्ये, व्हिएटनाम तिसर्‍या शक्तीचा शिरकाव करून घेण्याच्या प्रयत्नात आहे हे स्पष्ट दिसते आहे. त्याचप्रमाणे भारताला दक्षिण प्रशान्त महासागरात उपस्थिती हवी आहे हेही त्याच्या या खेळीवरून स्पष्ट दिसते आहे.”
भारताच्या “पूर्वेकडे लक्ष’ या धोरणाला, व्हिएटनाम व भारतीय नौदलांचे हे सहकार्य चांगलेच पाठबळ देणार आहे. मात्र पुढील कालात बरीच अनिश्चितता या भागात राहणार आहे हे नक्की. मात्र भारताने जर योग्य अशा खेळ्या केल्या तर त्याला दक्षिण चिनी समुद्रात आपली उपस्थिती कायम स्वरूपाची करता येईल आणि याचा फायदा, भारत व व्हिएटनाम यांना तर होणारच आहे; परंतु चीनच्या दादागिरीलाही थोडा वचक बसल्याने, सर्व एसिआन गटाच्या राष्ट्रांनाही याचा लाभ होईल असे वाटते.
6 ऑगस्ट 2011
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: