.
अनुभव Experiences

हाऊ एम्बरॅसिन्ग?


माझ्या एक परिचित महिला आहेत. वय पन्नाशीच्या घरात असेल. शरीर यष्टी स्थूलतेकडेच एकूण झुकलेली आहे. मुले मोठी व कर्ती सवरती झालेली आहेत. बाईंचा जीवनाकडे बघण्याचा एकंदर दृष्टीकोन अतिशय निकोप आणि आयुष्य शक्य तितके आनंदात घालवण्याचा आहे. या बाई एका महिला मंडळात मधून मधून जात असतात. तिथे त्यांना काही समवयस्क मैत्रिणी भेटतात व काही काळ आनंदात घालवणे त्या सर्व मैत्रिणींना शक्य होते. त्यांच्या या महिला मंडळाने, एकदा नाचाचा कार्यक्रम करण्याचे ठरवले. नृत्य कसले म्हणाल तर लावणी नृत्य.

सगळ्या सभासद भगिनी, उत्साहाने नाचाची प्रॅक्टिस करू लागल्या. माझ्या या परिचित बाईंनी सुद्धा या नाचात हिरिरीने भाग घेतला. ठरलेल्या दिवशी सगळ्या सभासद भगिनींचे नातलग, मुले, पती यांच्या उपस्थितीत हा नाचाचा कार्यक्रम मोठा छान पार पडला. या बाईंना सुद्धा मजा आली.एकूण सगळ्या जणी आनंदात व खुषीत घरी परतल्या. या बाईंची मुले, जी जरा नाखुषीनेच हा नाच बघायला आली होती, ती मात्र आपल्या आईच्या या डान्सवर अजिबातच खुष नव्हती. त्यांच्या मताने आईचा हा नाच फारच एम्बरॅसिन्ग होता. त्यांना आपल्या आईचा नाच बघणे अगदी अवघड गेले. पुन्हा असले नाच करायचे नाहीत हे आईला सांगायला ती विसरली नाहीत. Twentieth Century Fox या टीव्ही वाहिनीने नुकतेच एक सर्वेक्षण इंग्लंड मधे केले आहे. या सर्वेक्षणासाठी किंवा पाहणीसाठी त्यांनी 1500 इंग्लिश टीन एजर्स कडून माहिती जमा केली होती. या पाहणीचा अहवाल आज माझ्या वाचनात आला. या पाहणीचे निष्कर्ष वाचताना मला माझ्या या परिचित महिलेचा नाच व त्या बद्दलच्या त्यांच्या मुलांच्या कॉमेंट्स, एकदम स्मरणात आल्या. या सर्वेक्षणातील टीन एजर्स काय म्हणतात ते बघूया. या मुलांना सर्वात एम्बरॅसिन्ग जर कोणती गोष्ट वाटत असेल तर ती म्हणजे कौटुंबिक गेटटुगेदर्स किंवा मेळाव्यांच्यामधे या मुलांच्या वडिलांनी केलेला अतिउत्साहात केलेला नाच किंवा आपल्या मुलांवर आपले किती प्रेम आहे याची सर्वांसमक्ष केलेली जाहीरात. या मुलांना आपल्या आईने तेच तेच जुने विनोद सांगणे किंवा मद्य पिऊन तर्र होणे हे ही अत्यंत लाजिरवाणे वाटते. ही मुले म्हणतात की आमच्या आईवडीलांचे वागणे जर पुढे असेच चमत्कारिक आणि एम्बरॅसिन्ग राहणार असले तर आम्ही आमच्या गर्ल किंवा बॉय फ्रेंडची ओळख, आमच्या आईवडीलांशी कधीच करून देणार नाही. या सर्वेक्षणापैकी 63 टक्के मुलांना आपल्या वडीलांचे वागणे जास्त चमत्कारिक वाटते आणि एका आठवड्यात ही मुले तीन किंवा चार तासापेक्षा जास्त वेळ आपल्या आईवडीलांशी बोलण्यात घालवत नाहीत. आंतरजाल किंवा सेलफोन वर मित्रांशी सोशल नेटवर्किंग साईट्सवर ही मुले याच्या किती तरी पट जास्त वेळ घालवतात. या सर्वेक्षणात या मुलांच्या पालकांनाही काही प्रश्न विचारले होते. त्यांची उत्तरेही अशीच मोठी गौप्य स्फोट करणारी वाटतात. मुलांच्यावर आपले चांगले इंप्रेशन पडावे म्हणून हे पालक इतके घायकुतीस आलेले असतात की दहा पैकी सहा पालक त्यांच्या मुलांना आपण पूर्वी हिप्पी, पन्क किंवा मॉड होतो या सारख्या खोट्या गोष्टी सांगत असतात. बीटल्स सारख्या संगीत जलशांना आपण कसे उपस्थित होतो? ही थाप बरेच पालक मुलांना मारतात असे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. नातेसंबंधाबद्दल संशोधन करणारा Jenni Trent Hughes म्हणतो की या असल्या थापा लगेच उघडकीस येतात व मुले अतिशय एम्बरॅस झाल्याने, आईवडीलांशी गप्पा मारण्याऐवजी आपल्या बेड रूम मध्ये वेळ घालवणे जास्त पसंत करू लागतात. मुलांना मारलेल्या या प्रकारच्या थापा प्रथम मुलांना खर्‍या वाटतात व त्या गोष्टी ते आपल्या मित्रांना लगेच सांगतात. हे मित्र जेंव्हा आपल्या आईवडीलांना या गोष्टी पुढे सांगतात तेंव्हा त्या थापा असल्याचे उघडकीस येतेच. आपल्या वडीलांनी सांगितलेली एखादी गोष्ट थाप आहे हे जेंव्हा मुलांना कळते तेंव्हा आपल्या पालकांच्यावरचा त्यांचा विश्वास नष्ट होण्यास वेळ लागत नाही. मनुष्य स्वभाव हा कोठेही गेले तरी तसाच राहतो हे या सर्वेक्षणावरून चांगलेच लक्षात येते. शाळेत जेमतेम काठावर पास झालेला माणूस आपला नेहमी वर्गात पहिला क्रमांक असे किंवा आपण कोणता तरी खेळ कसा उत्तम खेळत होतो? वगैरे सारख्या थापा मुलांना मारतो व त्या थापा अगदी सहजपणे उघडकीस येऊ शकतात. या प्रकारे थापा मारणे, हे कोणत्याही पद्धतीने विचार केला तरी एक मूर्खपणाच असल्याने याचा जास्त विचार करणे मला आवश्यक वाटत नाही. परंतु आईवडीलांनी केलेला नाच किंवा जुने विनोद सांगून लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करणे हे मुलांना का एम्बरॅसिन्ग होते याचे कारण थोडे वेगळे आहे असे मला वाटते. मुले आपल्या आईवडीलांकडे काहीसे रोल मॉडेल म्हणून बघत असतात. अशा प्रकारच्या गोष्टी पालकांनी केल्या की त्यांचे पाय मातीचेच आहेत ही गोष्ट मुलांच्या मनावर ठसू लागते व ते त्यांना बहुदा सहन होत नसावे. काही पालक या बाबत पथ्ये पाळताना दिसतात. आधी सहजतेने सामाजिक मद्यपान करत असलेला एखादा बाप त्याचा मुलगा मोठा झाल्यावर मद्यपान करणे सोडून देतो. किंवा चित्रविचित्र कपडे घालणारी एखादी आई मुलगी मोठी झाल्यावर किंवा सून आल्यावर अगदी सोबर असे कपडे वापरणे सुरू करते. पालकांनी मुलांच्या पातळीला न जाता, “राखावी आपुली अंतरेअसे वर्तन जर केले तर मुलांना चमत्कारिक किंवा एम्बरॅसिन्ग नक्कीच वाटणार नाही. आपल्या आईवडीलांच्या वर्तनाबद्दल मुलांचे असे मत एकदा ग्राह्य झाले की ती आईवडीलांपासून दूर जाणारच. मुले एकदा मोठी झाली की त्यांना असे वाटू लागते की पालकांनी आता थोडे मागे सरकावे व सेंटर स्टेज आपल्याला रिकामे करून द्यावे. पण आईवडीलांच्या वर्तनावरून जर त्यांना असे वाटू लागले की आपल्याला बाजूला सारून, आईवडीलच प्रसिद्धीझोतात राहण्याचा प्रयत्न करत आहेत तर ही मुले आपल्या पालकांपासून दूर जाऊन आपले स्वत:चे असे विश्व निर्माण करू पाहतात व पर्यायाने पालकांना दुरावतात. पूर्वीच्या काळी आपल्या समाजात वडीलधारे म्हणजे सर्वश्रेष्ठ असे समजत असत. त्यांना विचारून सर्व करायचे अशी पद्धत होती. ही पद्धत आता कालबाह्य झाली असल्याने मागे पडत चालली आहे. तरीही आईवडीलांनी अंतर राखून आपले वर्तन आपल्या मुलांना चमत्कारिक वाटणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे असे मला तरी वाटते. 9 सप्टेंबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “हाऊ एम्बरॅसिन्ग?

 1. good article for parent they can learn something new from this article.

  Posted by anil | सप्टेंबर 9, 2011, 10:19 सकाळी
 2. बाईंचा नाच स्वान्त सुखाय होता असे वाटते. त्यांच्या मुलाना हे समजण्याइतका अनुभव नव्हता एवढेच.

  Posted by मनोहर | सप्टेंबर 9, 2011, 10:05 pm
  • मनोहर-

   तुम्ही म्हणता त्या प्रमाणे बाईंचा नाच नक्कीच स्वा न्त सुखाय होता व त्यातून त्यांना भरपूर आनंद मिळाला. त्यांच्या मुलांची रिऍक्शन व इंग्लंडमधल्या टीनएजर्सची रिऍक्शन याच्यात कमालीचे साम्य मला आढळल्यामुळे मी लेखात त्याचा उल्लेख केला आहे.

   Posted by chandrashekhara | सप्टेंबर 10, 2011, 8:25 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: