.
People व्यक्ती

मॅग्नोलिया अव्हेन्यू


मी अमेरिकेत रहात असताना रोज एका रस्त्याने फिरायला जात असे. या रस्त्याला बॉबव्हाइट अव्हेन्यू असे नाव तिथल्या म्हणजे सनीव्हेल गावाच्या स्थानिक प्रशासनाने दिलेले होते. हा काही खूप वर्दळ वगैरे असलेला असा रस्ता नव्हता. दोन्ही बाजूंना टुमदार बैठी घरे, पुढे मागे अंगण, भरपूर झाडे आणि मधूनच जाणारी एखादी गाडी असेच दृष्य या रस्त्याने जाताना दिसत असे. या रस्त्याला दोन्ही बाजूंना छान पदपथ ठेवलेले होते. त्यावरून फिरत जायला खूप छान वाटे. या दोन्ही बाजूंच्या फूटपाथवर मधे मधे मोकळे चौकोन सोडून त्यात झाडे लावलेली होती. साधारण मध्यम ऊंचीचे व भरपूर पाने असलेले हे वृक्ष होते. या झाडांची पाने मोठी, फताडी व काळसर रंगाची होती. थोडक्यात म्हणजे हे झाड दिसायला काही फारसे प्रेक्षणीय मला कधी वाटले नव्हते.

या रस्त्याने पुढे गेले की फ्रीमॉन्ट अव्हेन्यू नावाचा एक वर्दळीचा रस्ता लागत असे. हा रस्ता ओलांडला की पुढे लागणार्‍या मॅने ड्राइव्ह या रस्त्यावर दोन्ही बाजूंना अत्यंत लोभसवाणे दिसणारे मेपल वृक्ष दिसत असत. त्या मेपल वृक्षांच्या मानाने ही बॉबव्हाइट अव्हेन्यू वरची काळपट व फताड्या पानांची झाडे अगदी काहीतरीच वाटत असत. ही झाडे इथल्या म्युन्सिपालिटीने का लावली असावीत असे आश्चर्य मला रोज फिरायला जाताना वाटत असे.

एप्रिल किंवा मे महिन्यातली गोष्ट आहे. त्या दिवशी फिरायला जात असताना माझ्या पत्नीने माझे लक्ष सहज एका झाडाकडे वेधले. या झाडाच्या काळपट फताड्या पानांमधे मोठ्या आकाराचे पांढरे काहीतरी दिसत होते. जरा जवळ जाऊन, इकडून तिकडून बघितल्यावर लक्षात आले की हे तर एक भले थोरले फूल आहे. या फुलाला इतर फुलांना असतात तशा पाकळ्या नव्हत्या. कळी मधे एकावर एक असणारे पापुद्रे, पाकळ्यांसारखे उलगडले होते. मध्यभागी गुलाबी रंगाचे केसर दिसत होते आणि मुख्य म्हणजे एका अनामिक सुगंधाचा नुसता घमघमाट सुटला होता. त्या दिवसापासून आम्हाला हा एक नादच लागल्यासारखे झाले. रोज फिरायला जाताना कोणत्या झाडाला फुले आली आहेत? ती कशी दिसत आहेत? हे बघायचे आणि त्यांचा सुगंध रोज एकदा श्वास भरभरून घ्यायचा हे एक रूटीनच होऊन गेले. उन्हाळ्याचे काही दिवस हे चालले आणि मग अचानक फुलोरा संपला. मॅग्नोलियाचे वैभव संपून गेले. पण या झाडांकडे बघण्याची माझी दृष्टी मात्र आता बदलूनच गेली. ते झाड दिसले की त्याची फुले, त्यांचा सुगंध, हेच आठवू लागले. हे झाड कसे दिसते आहे? त्याची पाने कशी आहेत? हे सगळे एकदम नजरेआड झाले. त्या नंतर बॉबव्हाइट अव्हेन्यूला मी मॅग्नोलिया अव्हेन्यू म्हणूनच ओळखू लागलो. आज आठ वर्षांनंतरही, माझ्या मनातला मॅग्नोलिया फक्त सतत फुललेलाच राहिला आहे.
निसर्गाची किमया जरी आपण सोडून दिली तरी एखाद्या व्यक्तीचा पण असाच एखादा पैलू अचानक आपल्या नजरेसमोर येतो आणि त्या व्यक्ती बद्दलची आपली बघण्याची दृष्टीच बदलून जाते. एक दोन वर्षापूर्वी मी एका शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला गेलो होतो. स्टेजवर एक काळा सावळा, किडकिडीत आणि दिसायला अगदी सर्व साधारण असा एक तरूण बसला होता. त्याने अंगात अगदी साधा म्हणजे ज्याला मळकटही म्हणता येणार नाही आणि तथाकथित राजकीय मान्यवर घालतात त्या प्रकारचा कडक इस्त्रीचा पांढरा शुभ्र ही नसलेला, असा एक पांढरा झब्बा-पायजमा घातला होता. काही प्रथितयश गायक अंगावर पांघरतात तशी शाल सुद्धा मला त्याच्या अंगावर दिसली नाही. या सगळ्या दृष्यामुळे मी एकूण काही फारसा प्रभावित झालो नाही आणि असेल कोणीतरी होतकरू गायक! एवढीच अपेक्षा त्याच्या गाण्याबद्दल माझ्या मनात राहिली. परंतु त्याने पहिला षडज लावल्याबरोबरच फक्त माझेच नाही तर सभागृहातल्या सर्वांचे कान टवकारले गेले. हे प्रकरण काही साधेसुधे दिसत नाही ही जाणीव सर्वांनाच झाली. पुढचा दीड तास त्या तरूण गायकाने आपली गायकी आमच्या समोर अशी काय उभी केली की सभागृहातले आम्ही सगळे अक्षरश: स्तिमित झाले. त्याचा ख्याल ऐकताना तर ठायी ठायी आम्हाला भीमसेन जोशींची आठवण त्या दिवशी होत राहिली. जयतीर्थ मेवूंडी हे नाव आता परत कधीही कानावर आले तरी आठवतो त्या दिवशीचा पूरिया धनश्री. त्याच्याबद्दलचे बाकी काही डोळ्यासमोर येतच नाही, आठवतच नाही.
या वर्षीच्या एप्रिल महिन्यात अशीच एक व्यक्ती भारतातल्या सर्वांच्या नजरेसमोर आली. तसे बघायला गेले तर अण्णा हजारे हे नाव माझ्या कानावर गेली पंधरा,वीस वर्षे या ना त्या निमित्ताने पडलेले आहे. राळेगण सिद्धी या गावाचा त्यांनी केलेला कायापालट, महाराष्ट्र सरकारला माहिती अधिकार कायदा त्यांनी आपल्या उपोषणाच्या ताकदीवर कसा करायला लावला, महाराष्ट्र शासनातील काही भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करण्यास त्यांनी महाराष्ट्र शासनाला कसे भाग पाडले, या गोष्टी मला नक्कीच माहिती होत्या. तरीही अण्णांची माझ्या मनातली इमेज ही महाराष्ट्रातील एक सचोटीचा सामाजिक कार्यकर्ता या पर्यंतच मर्यादित राहिली होती.
परंतु एप्रिल महिन्यात अण्णांनी मध्यवर्ती सरकारने लोकपाल कायदा लवकरात लवकर पारित करावा व तो लोकपाल कायदा आपण म्हणतो तसाच असला पाहिजे यासाठी देशव्यापी आंदोलन सुरू केले. वादळवार्‍यात कोठेतरी एखादी ठिणगी पडावी व तिचे रूपांतर महाभयंकर आगीत व्हावे तसा प्रकार या आंदोलनाच्या वेळी दिसून आला. देशभरच्या तरूण वर्गाने अण्णांना उचलून डोक्यावर घेतले व काही दिवसात महाराष्ट्राच्या एका कानाकोपर्‍यात बसून सत्यासाठी झगडणारा हा म्हातारा देशभरच्या तरूणांच्या गळ्यातला ताईत बनला. राष्ट्रीय पातळीवरच्या वृत्त वाहिन्या, आंतरजालावरचे नेटिझन्स यांनी अण्णांना न भूतो न भविष्यती असा पाठिंबा दिला व अण्णा एकदम प्रथम क्रमांकाचे नेता बनले.
काही टीकाकारांनी, अण्णा या गटाच्या पाठिंब्याने वर आले, त्या वृत्त वाहिनीच्या पाठिंब्याने वर आले वगैरेसारखी बरीच विश्लेषणे करून बघितली. पण त्यात काही अर्थ आहे असे मला तरी वाटत नाही.
अण्णा पहिल्या पासूनच उत्तम नेते आहेत. त्यांचे हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसले तरी आपल्या छोट्याशा भाषणात सुद्धा श्रोत्यांची नस कशी पकडायची याचे त्यांना अंगभूतच ज्ञान आहे. चळवळ कशी उभी करायची, केंव्हा पुढे न्यायची, केंव्हा माघार घ्यायची आणि कोणतीही प्रतिकूल परिस्थिती डावपेच करून आपल्या चळवळीच्या फायद्यासाठी कशी वापरायची या बद्दलचे त्यांचे कौशल्य खरे तर अफलातून आहे.
पण या सर्व गुणांपेक्षा त्यांची महानता आहे ती त्यांच्या व्ह्युहात्मक कौशल्यात( Strategic skill). या कौशल्याची चुणूक, त्यांनी गेल्या पंधरवड्यात आपल्याला इतक्या जबरदस्तपणे दाखवून दिली आहे की या बाबतीत त्यांची तुलना गांधीजी या एकाच व्यक्तीशी होऊ शकेल असे मला वाटते. मी तर आता अण्णांचा पूर्णपणे ‘फॅन’ झालो आहे. भारताच्या लोकशाहीला लागलेली कीड जर समर्थपणे कोणी नष्ट करू शकणार असेल तर राळेगण सिद्धीमधे राहणारा व 74 वर्षे वय असलेला अण्णा हजारे हा म्हाताराच करू शकेल या बद्दल माझ्या मनात तरी संदेह नाही. भ्रष्टाचार निर्मूलन, लोकपाल वगैरे गोष्टींशी अण्णांचे नाव आता इतके निगडित झाले आहे की ही चळवळ माझ्या मनात तरी आता फक्त अण्णामय झाली आहे.
निसर्ग काय? किंवा एखादी व्यक्ती काय? जोपर्यंत त्यांच्यामधले विशेषत्व लोकांच्या समोर येत नाही तोपर्यंत सर्व साधारणच वाटत राहतात. वाट पहावी लागते ती हे विशेषत्व उमलण्याची. त्या नंतर ज्या कारणामुळे हे विशेषत्व उमलते, ते कारणच त्या विशेषत्वाच्या आधीन होते. आपल्या स्मरणात शेवटी उरते ते फक्त विशेषत्व.
1 सप्टेंबर 2011
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “मॅग्नोलिया अव्हेन्यू

  1. Nice article with necessary explanation of nature and Human being, Writing flow is excellent, i think evryone who is reading this article definitlly reads , in one stroke only.
    Always waiting for next blog

    Posted by anil | सप्टेंबर 8, 2011, 11:50 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: