.
अनुभव Experiences

एक हृदयस्पर्शी सोहळा


पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमधून 1959 मध्ये मी एसएससी परिक्षा उत्तीर्ण झालो. त्या वेळी आमची शाळा पुण्यातील एक अग्रणी शाळा म्हणून मानली जात असे. तरीही आपल्या शाळेविषयी काही मुलांना जसे वाटते तसे प्रेम मला या शाळेबद्दल कधीच वाटले नाही. मात्र माझे काही शिक्षक व शाळासोबती यांच्या आठवणींसाठी माझ्या मनाचा एक कोपरा राखून ठेवला गेला आहे हे मात्र नक्की! काही दिवसांपूर्वी, माझी पत्नी, पुण्याच्या जुन्या पेठांमधील एका भागात, रस्त्याने चालत जात असताना, ओळखीचे कोणीतरी आपल्याला पास झाले असावे असे तिला वाटले म्हणून तिने मागे वळून बघितले. ती व्यक्तीही तिच्याकडेच वळून बघत होती. ती व्यक्ती म्हणजे माझा एक शाळा सोबती होता हे माझ्या पत्नीच्या लगेच लक्षात आले. त्यांचे थोडेफार बोलणे झाले व माझ्या पत्नीने या माझ्या शाळासोबत्याचा दूरध्वनी क्रमांक उतरवून घेतला व नंतर मला दिला.

मी अर्थातच नंतर या मित्राला फोन केला व आमचे भेटण्याचे ठरले. दोघेच किती वेळ बोलणार म्हणून त्याने त्याच्या माहितीतील आणखी दोघा मित्रांना त्यांच्या पत्नीसह माझ्याकडे जमण्याचे ठरले असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे हे सर्व जण माझ्याकडे एका रविवारी संध्याकाळी आले. भेळ, आईसक्रीम असा मस्त बेत आम्ही ठरवला होता. त्या संध्याकाळी भरपूर गप्पा झाल्या. आणखी कोण शाळामित्र कोठे आहेत त्याची उजळणी झाली. कोणते शिक्षक अजून हयात आहेत हे कळले. एकूण पाहता ती संध्याकाळ म्हणजे भूतकालातील एक सफरच आहे असे मला तरी वाटले.
त्या संध्याकाळी, गप्पांच्यात असा एक विषय निघाला की 1959 च्या बॅचचे एक पुनर्भेट संमेलन का भरवू नये? बोलणे खूप सोपे होते पण हे घडवून आणणे महाकर्म कठिण होते. एकतर त्या वेळी असलेल्या सर्व वर्गमित्रांची नावे सुद्धा आठवत नव्हती तर त्यांचे पत्ते कोठून माहिती असणार? पण माझ्या पत्नीला प्रथम भेटलेल्या वर्गमित्राला, ही कल्पना एकदम आवडली. म्हणजे तो या कल्पनेने झपाटलाच गेला. हे संमेलन भरवायचेच असे त्याने ठरवले व माझ्यासारख्या दोन चार मित्रांना बोलावून हे करायचेच असे सांगितले. आम्ही त्याला पाहिजे ती मदत करू असे आश्वासन दिले असले तरी हे संमेलन प्रत्यक्षात येईल असे मला तरी काही वाटते नाही.
माझ्या या मित्राने पुढचे 3/4 महिने या संमेलनाचा विचार करण्याखेरीज दुसरे काही केलेच नाही. फेसबूक, इंटरनेट, ई-मेल ही साधने वापरून त्याने झपाट्याने मित्रांचा शोध चालू केला. माझ्या पिढीत परदेशी जाण्याचे खूळ शक्यही नव्हते व बोकाळलेही नव्हते. त्यामुळे बरेचसे शाळा मित्र आताही पुण्यातच रहात होते. माझ्या या मित्राने पायी फिरून पुण्याच्या जुन्या भागांच्यातून, गल्लीबोळांतून, हळूहळू मित्रांची माहिती काढली. एक मित्र सापडला की त्याला माहिती असलेले आणखी दोघे चौघे सापडत. असे करत त्याला एकूण 38 मित्रांची नावे सापडली. त्यांच्याशी संपर्क साधला गेला. मग माझ्या या मित्राने पंधरा एक मित्रांची एक बैठक बोलावली. बोलावल्यापैकी बहुतेक जण आले व त्यांनी ही पुनर्भेट संमेलनाची कल्पना उचलून धरली. एक सुकाणू समिती नेमली, वर्गणी ठरली, कामांचे वाटप झाले आणि हे पुनर्भेट संमेलन भरवायचे नक्की ठरले.
मग या सुकाणू समितीने शाळेच्या विद्यमान प्रमुखांची भेट घेतली. या प्रमुखांना ही संमेलनाची कल्पना खूपच आवडली. आणि आम्ही माजी विद्यार्थी संस्थेला काहीतरी घसघशीत देणगी देणार आहोत हे कळल्यावर त्यांचा आनंद द्विगुणित झाला. आम्हाला जे शिक्षक शिकवत असत त्या पैकी दोघेजण अजून हयात आहेत हे कळल्यावर त्यांना या संमेलनाला बोलावयाचे हे साहजिकच ठरवले गेले. या संमेलनाची आठवण म्हणून वृक्षारोपण करण्याची कल्पना निघाली. शाळाप्रमुखांना ती फारच पसंत पडली. त्यांनी तर अशी विनंती केली की आम्ही बर्‍याच संख्येने झाडे लावून द्यावीत. त्यासाठी पक्के बांधलेले पार, शाळेने बांधून देऊ म्हणून मान्य केले.

माझ्या शाळामित्राच्या या अथक प्रयत्नांमुळे मागच्या रविवारी आमचे हे पुनर्भेट संमेलन यशस्वी रित्या पार पडले. सकाळी नाश्ता झाल्यावर, सर्वांचा ग्रूप फोटो झाला व त्यानंतर एक सभा आयोजित केली गेली. आमचे जे दोन शिक्षक या संमेलनाला उपस्थित राहू शकले त्यातले एक माझे अत्यंत आवडते शिक्षक होते. त्यांना माझे नाव सांगितल्याबरोबर मी कोठे रहात होतो हे त्यांना लगेच स्मरले. 52 वर्षांनंतर, माझ्यासारखा एक सामान्य विद्यार्थी, आमच्या सरांच्या लक्षात अजून आहे हे लक्षात आल्यावर मला पुढे काही बोलताच येईना व डोळ्यात पाणीच उभे राहिले. सभेमधे शाळेला देणगी देणे, गुरूजनांचा सत्कार करणे वगैरे औपचारिकता पार पडल्यावर आम्ही मुख्य कार्यक्रमाकडे वळलो.

शाळा मित्रांचे छंद, व्यासंग काय आहेत हे इतरांना कळावे म्हणून एक छोटेसे प्रदर्शन आम्ही सभागृहाच्या बाजूलाच आयोजित केले होते. यात परदेशी असलेल्या काही जणांच्या पेंटींग्जची छायाचित्रे, वूड कार्व्हिंग्ज, पेपर मॉडेल्स, पुस्तके, काव्य संग्रह असे बरेच काही होते. काही मित्रांची मुले नातवंडे पण आपल्या वडिलांची, आजोबांची शाळा बघण्यासाठी म्हणून आवर्जून आले होते.

हे संमेलन आयोजित करण्यामागचा मुख्य हेतू, इतकी वर्षे दुरावलेल्या शाळा सोबत्यांची, पुन्हा एकदा ओळख करून घ्यायची व जुनी मैत्री परत वृद्धिंगत करायची हाच असल्याने परस्पर ओळखीचा कार्यक्रम हेच आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने या संमेलनाचे मुख्य आकर्षण होते. या कार्यक्रमात पाळीपाळीने एक एक वर्गमित्र आपल्या पत्नीसह सभामंचावर आला व शाळा सोडल्यावर पुढे काय शिक्षण घेतले नंतर नोकरी व्यवसाय काय केला, पत्नीचे शिक्षण, नोकरी व्यवसाय आणि मुलांबद्दलची माहिती त्याने आम्हाला दिली. आता बहुतेक जण निवृत्त झालेले असल्याने सध्या वेळ कसा घालवतो, छंद काय? आणि सोशल नेटवर्किंग कसे करतो या बद्दलची माहिती त्याने थोडक्यात दिली.

माझ्या शाळामित्रांची ही निवेदने ऐकत असताना आमच्या चाळीस किंवा पन्नास जणांच्या या बॅचमधल्या मित्रांच्या गत आयुष्यात केवढा फरक होता? अनेकांना सांसारिक अडचणींना, शारिरीक व्याधींना कसे तोंड द्यावे लागले? हे सगळे ऐकणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे असे मला सतत वाटत राहिले. डॉक्टर, इंजिनीयर, प्राध्यापक, प्रोफेसर व डिपार्टमेंट हेड, युनिव्हर्सिटी प्रोफेसर, प्रथितयश कारखानदार, व्यापारी, बॅन्कर, मॅनेजमेंट, शासकीय अधिकारी या सारख्या सर्व क्षेत्रांत माझ्या मित्रांनी नाव कमावलेले दिसले. बहुतेकांच्या पत्नी सुविद्य आणि काहीतरी व्यवसाय करत होत्या. अर्थात काही जणी गृहिणी होत्या. या संमेलनासाठी एक मित्र कोल्हापुराहून तर एक जण मुंबईहून पुण्याला आला होता.दोघे तिघे परदेशी स्थायिक झाले होते त्यांनी संदेश पाठवले होते.

काही जणांचे आयुष्य खूपच खडतर गेले होते. आयुष्यात आलेल्या सुसंधी, केवळ आजारपणामुळे हातातून सुटल्या होत्या. सरकारी नोकरी करणार्‍यांना आडगावी रहावे लागले होते. एसएससी परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवणार्‍या एकाला तर आयुष्यभर सतत कनिष्ठ पदांच्यावर रहावे लागले होते. एकाने प्रथम सैन्यात अधिकारी, नंतर अमेरिकेत दुकान चालवणे व नंतर उत्पादनाचा व्यवसाय करणे व अखेरीस भारतात येऊन विक्री व्यवसाय करणे या सारखे बहुरंगी व बहुढंगी व्यवसाय केले होते. एका रुक्ष सरकारी ऑफिसात काम करणारा माझा एक मित्र आज सुंदर कविता, गझल करत होता. अपघातामुळे काहींच्या आयुष्यांना कलाटणी मिळाली होती, एक दुर्बलता आली होती. वैयक्तिक आयुष्यात घटस्फोट, पत्नी वियोग या सारख्या दुर्घटनांना काही जणांना तोंड द्यावे लागले होते.

मित्रांची निवेदने ऐकत असताना मला असे सारखे जाणवत होते की भले! जरी आमच्या सगळ्यांचे आयुष्य अगदी भिन्न मार्गांवरून गेले असले किंवा चालले असले तरी आमच्या सर्वांच्या आयुष्यात काहीतरी समान सूत्रे आहेत. विद्युत पुरवठा करणार्‍या एका संस्थेत काम करणार्‍या माझ्या एका मित्राने
भ्रष्टाचारापासून चार हात दूर रहाण्याचा निर्णय घेतलेला असल्याने, आयुष्यभर त्याला मिळालेले प्रत्येक पोस्टिंग हे खेडेगावात किंवा नागरी सुविधा नसलेल्या स्थांनावरच दिले गेले होते. व त्या बद्दल त्याची काही तक्रारही नव्हती. दुसर्‍या एका मित्राने चालून आलेली सरकारी नोकरी न स्वीकारता प्राध्यापकाची नोकरी घेतली होती. तर आणखी एका मित्राने, सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरी तिथला भ्रष्टाचार बघून सोडून दिली होती. औषधांचा व्यवसाय करणारा एक मित्र फावल्या वेळात संस्कृत पुस्तकांचे अध्ययन करत होता. वर उल्लेख केलेल्या व एसएससी परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या माझ्या मित्राला, प्रथम श्रेणीची बढती मिळाल्यावर पोस्ट नाही म्हणून जुन्याच पदावर काम करायला लागले होते व निवृत्त होण्याच्या अगोदर ती पोस्ट दिली गेली होती.
त्यांच्यावर आयुष्यात काहीतरी अन्याय झाला होता हे जरी या माझ्या मित्रांच्या निवेदनावरून स्पष्ट कळत होते तरी अतिशय तटस्थ रित्या त्यांनी हा अन्याय स्वीकारला होता. त्यासाठी आपल्या आयुष्याची मूल्ये त्यांनी गमावली नव्हती. मूल्यांना धरून राहिल्यानेच आज गत जीवनाबद्दल एवढ्या तटस्थपणे ते सांगू शकत होते. शाळेतल्या आम्हा सर्वांच्या आयुष्यात, बरे वाईट, कमी अधिक प्रसंग आले असले तरी आमच्यापैकी कोणीच आपली मूल्ये सोडली नव्हती. खरे तर आम्हा सर्वांमधे, शिक्षण, पदे, आर्थिक परिस्थिती यात काहीच समानता नव्हती तरीही आम्हाला आम्ही सर्व जण एकाच विचार पातळीवर आहोत हे सारखे लक्षात येत होते. हे असे कसे शक्य आहे? याचे गमक मला त्यावेळी लक्षात आले नव्हते परंतु नंतर मात्र आले. शाळेने जे संस्कार आमच्यावर केले होते त्यातूनच ही मूल्यनिष्ठता आमच्या मनात रुजली होती. त्यामुळेच आयुष्यात पुढे काहीही घडले असले तरी शाळेत मिळालेले हे संस्कारधन आम्ही आमच्या मनात एखाद्या आठवणीसारखे जपून ठेवले होते. माणूस घडवताना शाळेचे कार्य किती महत्वाचे असते याची ही जणू एक प्रचिती होती.
हा कार्यक्रम संपला आणि सगळ्यांनाच परत एकदा आपल्या जुन्या मित्रांच्या जवळ आल्यासारखे वाटले पुढचे वृक्षारोपण, भोजन आणि काव्यवाचन हे कार्यक्रम सर्वांनीच एका निराळ्याच मूड मध्ये पण भरपूर आनंदात अनुभवले. संध्याकाळ कधी झाली ते समजलेच नाही.
19 ऑगस्ट 2011
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “एक हृदयस्पर्शी सोहळा

 1. great experience after 52 years

  Posted by anil | सप्टेंबर 6, 2011, 10:45 सकाळी
  • अनिल –
   प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हा अनुभव खरोखरच अतिशय निराळा व टचिंग होता याबद्दल वादच नाही.

   Posted by chandrashekhara | सप्टेंबर 6, 2011, 2:01 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: