.
Travel-पर्यटन

लडाख डायरी भाग 7


मंगळवार

खरे तर काल रात्री झोपताना मी ठरवले होते की सकाळी लवकर उठून चांग चेन्मो पर्वताराजीच्या मागून उगवणारा सूर्य व त्याचे पॅनगॉन्ग जलाशयात पडणारे प्रतिबिंब यांचा फोटो काढायला जलाशयाच्या किनार्‍यावर सकाळी सूर्योदयाच्या अगोदर जायचे. पण रात्रीपासून सगळ्या गोष्टी बिघडतच गेल्या. रात्री झोप काही चांगली लागली नाही. दर तासातासाने जाग येत होती. जागे झाल्यावर आपल्याला श्वास अपुरा पडतो आहे असे जाणवू लागे. मग तीन चार वेळा प्राणायामामध्ये करतात तसे दीर्घ श्वसन केले की ठीक वाटून परत झोप लागे. लडाखला आल्यापासून प्रथमच मला इथल्या विरळ हवामानाचा परिणाम काल रात्री जाणवला. पॅनगॉन्ग जलाशय 14000 फुटांवर आहे आणि या प्रकारचा विचलित निद्रेचा त्रास हा अगदी सर्व सामान्य अनुभव आहे, त्यात विशेष असे काही नाही असे मी बर्‍याच जणांकडून ऐकले होते. पण अनुभव मात्र आज आला हे खरे. अशी रात्र गेल्यामुळे सकाळी जाग आल्याबरोबर प्रथम घड्याळ बघितले. सूर्योदयाला अजून बराच वेळ आहे हे लक्षात आल्यावर बरे वाटले. तरीही बाहेर काय परिस्थिती आहे हे बघून यावे असे वाटले व खोलीचे दार हळूच उघडून बाहेर पाऊल टाकले. बाहेर कमालीची थंडी आहे व थंडगार वारेही वहात आहेत. हवेचा एकूण रागरंग बघून या वेळेस जलाशयाच्या किनार्‍यावर फोटो काढायला जाण्याचा बेत मी आता सोडूनच दिला आहे. सुदैवाने माझ्या असे लक्षात आले आहे की माझ्या खोलीच्या खिडकीमधून, चांग चेन्मो पर्वत शिखरे व जलाशयाचे पाणी हे चांगले स्वच्छ दिसत आहेत. त्यामुळे येथूनच सूर्योदयाचा फोटो काढावे असे मी आता ठरवतो आहे. सूर्योदयापूर्वी पर्वत शिखरांच्या कडा उजळलेल्या असतानाचा एक फोटो मला मिळतो पण प्रत्यक्ष सूर्योदय इतका भर्रकन होतो की मी कॅमेरा तयार करून फोटो घेईपर्यंत सूर्य वर आला आहे व तो इतका तेजस्वी दिसतो आहे की आता फोटो घेण्यात काही अर्थच नाही. म्हणजे सूर्योदयाचा फोटो काढण्याच्या माझ्या बेताचा पूर्ण विचका झाला आहे.
कॅम्पच्या व्यवस्थापनाकडून गरमागरम पण गोड मिट्ट चहा दिला जातो आहे. मी दोन कप चहा ढोसतो व अंगात जरा ऊब आल्यासारखे वाटल्यावर, जामानिमा चढवून बाहेर पडतो. आता सूर्य बराच वर आला आहे व त्यामुळे हवाही बरीच सुधारली आहे. जलाशयाच्या किनार्‍यावर एक अखेरची चक्कर मारायचे मी ठरवतो. कालच्या पेक्षा आताची परिस्थिती अगदी निराळीच आहे. जलाशय आणि सूर्य हे दोन्ही नजरेसमोर असल्याने फोटो काढणे अवघडच आहे. मी आजूबाजूला काही पक्षी दिसतात का हे बघतो. पण ते बहुदा आधीच जागे होऊन अन्न शोधण्याच्या मोहिमेवर गेलेले दिसत आहेत. अर्थात लडाखमधे किडे वगैरे प्रकार तसे दुर्मिळच आहेत. टुंडुपच्या सांगण्याप्रमाणे, येथे सर्प वगैरे सरपटणारे प्राणीही नाहीतच. अशा परिस्थितीत या जलाशयावर येऊन पक्षी काय खात असतील हाही एक प्रश्नच आहे. मी असे वाचले होते की येथे राजहंस दिसतात म्हणून. मला मात्र फक्त सी गल च्या जातीतला व पंखाचा वरचा रंग सफेद असलेला फक्त एक पक्षी कालपासून येथे बघायला मिळाला आहे.

सूर्योदयापूर्वी दिसणारा पॅनगॉन्ग जलाशय

मार्सेमिक कॅम्प वरचा ब्रेकफास्ट

काळ्याशार डांबरी रस्त्यावर उडून आलेली पांढरी शुभ्र रेती

किनार्‍यावर थोडा वेळ घालवून मी आता परत कॅम्पवर आलो आहे. ब्रेकफास्ट मिळतो आहे हे समजल्यामुळे डायनिंग शामियान्यामधे मी जातो. ब्रेकफास्टचा एकूण मेन्यू मात्र तब्येतीने आहे. कॉर्न फ्लेक्स, टोस्ट, ऑमलेट आणि ऍप्रिकॉट जॅम. मी ब्रेकफास्टची सांगता आणखी थोड्या गरमागरम चहाने करतो.
आमची गाडी आता लेहच्या रस्त्याला लागली आहे. या प्रवासात आता नवीन फारसे काहीच घडत नाहीये. चांग ला मध्ये सुद्धा हवा आणि एकूण चित्र कालच्याप्रमाणेच आहे. कारू गावाजवळ आम्ही परत एकदा मनाली-लेह रस्त्याला येऊन मिळतो. टुंडुपला मी आठवण करून देतो की हेमिस बौद्धमठ आपल्याला जाताना बघायचा आहे. हेमिस कडे जाणारा रस्ता कारू गावापासूनच फुटतो. या रस्त्याने आम्ही काही किलोमीटर गेल्यावरही या मठाच्या कोणत्याच खाणाखुणा आसमंतात दिसत नाहीत. झान्स्कर पर्वतराजीच्या एका दरीत हा मठ इतक्या बेमालूमपणे लपलेला आहे की अगदी जवळ पोचेपर्यंत तुम्हाला या मठाचा मागमूसही लागत नाही. मी प्रवेशिका विकत घेतो व दरवाजातून आत शिरतो. मठाचे आंगण बौद्ध धर्मपंथीयांनी गच्च भरलेले आहे. याचे कारण मला लगेच समजते. हे दोन तीन दिवस या मठाचा वार्षिक उत्सव चालू आहे. हा उत्सव गुरू पद्मसंभव यांच्या जन्मतिथीला सजरा केला जातो. मठाचा परिसर मात्र बराच मोठा आहे. मठाच्या मुख्य इमारतीसमोर एक मोठे अंगण आहे व आलेल्या भक्तांना ऊन न लागता बसता यावे म्हणून त्यावर एक मोठा शामियाना घातलेला आहे. या अंगणाच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या इमारतीत एक संग्रहालय आहे. लडाखच्या बौद्धमठांत असलेल्या संग्रहालयांपैकी हे संग्रहालय सर्वात उत्कृष्ट मानले जाते. हे संग्रहालय या इमारतीच्या तळघरात आहे व आत कॅमेरा नेण्यास पूर्ण मनाई आहे. प्रवेशद्वाराजवळच तुम्हाला लॉकर्स मिळतात त्यात कॅमेरा ठेवूनच पुढे जावे लागते.
हेमिस बौद्धमठ

हेमिस संग्रहालयाच्या भिंतीवर रंगवलेली चित्रे

हेमिस बौद्धमठ हा लडाख मधील सर्वात श्रीमंत मठ समजला जातो व तेथील व्यवस्था, भिख्खूंचे वेष या सर्वांवरून याची खात्रीच पटते. या मठाची स्थापना 1630 मध्ये करण्यात आली होती व हा मठ दुग पा या पंथाचा समजला जातो. संग्रहालय मात्र खूपच प्रशस्त व मोठे आहे व यातील वस्तूंची संख्याही अफाट वाटते आहे. सोन्याच्या पानाने मढवलेली बुद्ध मूर्ती, सुवर्ण व रौप्य स्तूप, बौद्ध धर्मियांना पवित्र वाटणारे दुसर्‍या शतकापासूनचे जुने थन्गका (रेशमी वस्त्रांवर रंगवलेले किंवा जरीचे काम केलेले बॅनर), वर्तुळाकृती मंडल, लडाखच्या राजांच्या वैयक्तिक उपयोगातल्या वस्तू, जुनी शस्त्रास्त्रे, धार्मिक कार्यासाठी उपयोगात आणली जाणारी उपकरणे व जुन्या काळातील रोजच्या उपयोगाच्या अनेक वस्तू यांनी हे संग्रहालय ठासून भरलेले आहे. मात्र सर्व वस्तू काचेच्या कपाटात नीट मांडलेल्या आहेत व प्रकाश योजनाही उत्तम आहे.फक्त एकच गोष्ट मला खटकली. म्युझियमचा कॅटलॉगही कोठे मिळत नाही व व्यवस्थापन फोटोही काढू देत नाहीत. यामुळे या संग्रहालयतील अमूल्य ठेवा अंधारातच राहतो आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. संग्रहालयाच्या बाहेरील भिंतीवर काही जुनी चित्रे रंगवलेली दिसतात. मठात इतकी गर्दी आहे की मुख्य इमारतीत जाण्याचा विचार मी सोडूनच देतो व गाडीकडे परत वळतो.
थिकसे बौद्धमठ

शे पॅलेस

शे बौद्धमठ

आम्ही आता परत हायवेला लागलो आहोत. ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आता आम्हाला थिकसे मठ व शे येथील पॅलेसचे भग्नावशेष बघायचे आहेत. मी घड्याळाकडे बघतो. माझ्या एकदम लक्षात येते की माझ्याकडे आता पैसे अजिबातच शिल्लक नाहीत. मला लेहला लवकरात लवकर पोचून एटीएम मशीनच्या रांगेत उभे राहिलेच पाहिजे. नाईलाजाने मी टुंडुपला या दोन ठिकाणी गाडी फक्त उभी करण्यास सांगतो व रस्त्यावरूनच फोटो काढून घेतो. मात्र एका जागेला मला कोणत्याही परिस्थितीत भेट द्यायचीच आहे. दहा वर्षापूर्वी जम्मू आणि कश्मिर सरकारने, लेह जवळ एक सिंधु दर्शन घाट बांधला आहे. तेथे जाऊन मला सिंधु नदीच्या पाण्याला स्पर्श करायचा आहे. टुंडुप या घाटाजवळ गाडी थांबवतो. घाटाची रचना मोठी छान केली आहे. बसायला छान शेड्स उभारल्या आहेत. मी घाटावरून उतरून नदीजवळ जातो. ओंजळीत पाणी घेऊन चेहरा पाण्याने धुवून घेतो. हात पाय सिंधु नदीच्या पाण्यात धुतो. मात्र हे पाणी बरोबर काठावरची माती आणत असल्याने पांढरट दिसते आहे व त्याचे प्राशन करण्यास माझे मन धजावत नाही. बरोबर आणलेल्या बाटलीत मी सिंधुचे पाणी भरून घेतो. सर्व भारतात, जी नदी अत्यंत महान व पूजनीय मानली जाते त्या नदीच्या पाण्याला स्पर्श करण्याचे माझे स्वप्न आज अखेरीस पूर्ण झाले आहे. या साध्या गोष्टीसाठी एवढ्या लांब लडाखला यावे लागते एवढेच दुख: मला आहे.
सिंधु दर्शन घाट

सिंधु नदीच्या काठावर

भारतीय उपखंडातील सर्वात महान नदी; सिंधु

गाडी लेहला पोचते आहे. मी टुंडुपचे आभार मानतो. त्याने त्याचे काम उत्तम केले आहे याबद्दल प्रश्नच नाही. मी माझा बॅकपॅक खोलीत टाकतो व मार्केटकडे पळ काढतो. एटीएम मशीनसमोर एवढ्या उन्हात सुद्धा 15/20 लोकांचा क्यू आहेच. मी जवळजवळ पाऊण तास प्रतीक्षा केल्यावर माझी पाळी येते. आणि आज मात्र मी नशिबवान ठरतो आहे. मला एटीएम मशिन कडून पैसे चक्क मिळतात. मी हॉटेलवर परत येतो व शांत मनाने जेवण घेतो.
स्टोक कांगरी पर्वतराजी

लडाखचे एक लॅन्डस्केप

संध्याकाळी मी खरेदी उरकतो. माझा ट्रॅव्हल एजंट माझी भेट घेण्यास येतो. त्याने त्याचे काम चोख बजावले असल्याने आभार मानणे माझे कर्तव्यच असते व ते मी करतो. मला अजून सामानाची आवराआवर करायची आहे. सकाळी लवकर उठायचे आहे कारण आमचे विमान सकाळ 8.45 वाजता निघणार आहे. लेह विमानतळावर सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक असल्याने 6.30 पर्यंत तरी तेथे पोचणे गरजेचे आहे.
या निसर्गसुंदर स्थानी परत मला येता येईल का नाही हे सांगणे मोठे कठिण आहे. मात्र गेल्या सात किंवा आठ दिवसात मनमुराद अनुभवलेला हा लडाख, माझ्या व माझ्या कॅमेर्‍याच्या स्मृतीत मी असेपर्यंत नक्कीच राहणार आहे आणि मी या आठवणींच्या खजिन्यावर पुढच्या कालातील अनेक क्षण सुखात घालवणार आहे हे ही तितकेच खरे आहे.

(समाप्त)
30 ऑगस्ट 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “लडाख डायरी भाग 7

 1. sunder lekh and warnan,congrats for your safe journey in this age.

  Posted by anil | ऑगस्ट 30, 2011, 3:51 pm
 2. Athavaleji tumi ya vayat ladhak la javun alat ! Great! Tumache Anubhav Vachun swata ladhak la javun alo ase vatale. Khup chan !

  Posted by Aniket | ऑगस्ट 30, 2011, 11:06 pm
 3. आपण ज्या उत्साहात आणि विलक्षण उर्जेने लडाख यात्रा केलीत, त्याचे कौतुक करायला माझ्याकडे शब्दच नाहीत. याचे वाचन विशेषतः तरुण लोकांनी करावे आणि हा प्रवास करावा. आता एक विचारतो. आपण अंटार्क्टिक प्रदेशात जाऊन आलात की नाही ? याबाबत मला आठवते, की पुण्याचे श्री. अनिल शिदोरे ही सफर आयोजित करतात. त्यांनी त्यावर लिहिलेले एक पुस्तक माझ्या वाचनात आहे. मला आठवते, ते पुण्याच्याच Continental प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. धन्यवाद.

  मंगेश नाबर.

  Posted by Mangesh Nabar | ऑगस्ट 31, 2011, 5:27 pm
  • मंगेश –

   प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अंटार्टिक मध्ये सफर करता येते की नाही याबद्दल मला काहीच माहिती नाही. शोध घेण्याचा प्रयत्न करतो.

   Posted by chandrashekhara | सप्टेंबर 1, 2011, 8:45 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: