.
Travel-पर्यटन

लडाख डायरी- भाग 6


सोमवार

आज लडाखमधल्या शेवटच्या सफारीवर मी आता निघणार आहे. आजचे उद्दीष्ट आहे पॅनगॉन्ग जलाशय! टुंडुप, त्याची इनोव्हा गाडी घेऊन प्रवेशद्वाराजवळ थांबला असल्याचा निरोप मला मिळाला असल्याने हॉटेलमधला ब्रेकफास्ट संपवून मी चहाचा शेवटचा घुटका घेतो व हॉटेलच्या बाहेर पाऊल टाकतो. गाडीजवळ पोहोचल्यानंतर टुंडुपच्या चेहर्‍यावरचे मनमोकळे हास्य बघून आजचा आपला प्रवास निर्विघ्नपणे व छान पार पडणार याची मला खात्री पटते. तरीही मी टुंडुपला लामायुरूच्या ट्रिपहून परत येताना हॉल ऑफ फेम संग्रहालय बघण्याचे राहून गेल्याची आठवण करून देतो. ते संग्रहालय आज आपण प्रथम बघू व नंतर पुढे जाऊ असे टुंडुप मला सांगतो. गाडी संग्रहालयाच्या इमारतीसमोर थांबते व मी खाली उतरतो. संग्रहालयाची ही इमारत एखाद्या बौद्ध गोम्पासारखी बांधलेली आहे त्यामुळे एकूण परिसरात ती मिसळून जाते आहे व झान्स्कर पर्वतराजीच्या पार्श्वभूमीवर मोठी खुलून दिसते आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना ठेवलेल्या दोन उखळी तोफांमुळे, प्रवेशद्वारालाही शोभा आली आहे. मी आत जातो व माझ्यासाठी एक प्रवेशिका घेतो. संग्रहालयाचे फोटो, काही शुल्क दिल्यावर काढता येतील हे ऐकल्यावर मला साहजिकच बरे वाटते व त्याचेही शुल्क मी भरून टाकतो. प्रवेशद्वारासमोर असलेल्या कक्षात, लडाखचा, एक मोठ्या आकाराचा, उठावाचा नकाशा ठेवलेला आहे. लडाखची भौगोलिक वैशिष्ट्ये व येथे भारतीय सैन्य व वायुदल ज्या महत्वाच्या लढाया लढले ती सर्व स्थाने या नकाशात ठळकपणे दर्शवलेली असल्याने नकाशा मोठा रोचक आणि माहितीपूर्ण झाला आहे. डाव्या बाजूच्या पहिल्या कक्षात लडाखी लोक, त्यांचा पेहराव, रोजच्या जीवनात ते वापरत असलेल्या वस्तू, लडाख मधले वनस्पती, पक्षी आणि प्राणी यांच्यासंबंधी माहिती देणारे तक्ते, मॉडेल्स व काही प्रत्यक्ष वस्तू ठेवलेल्या आहेत. याच्या पुढच्या कक्षात लडाख मधले विरळ हवामान व कडाक्याची थंडी यांना तोंड देता यावे म्हणून सैनिकांसाठी खास बनवलेले कपडे घातलेली मॉडेल्स ठेवलेली आहेत. त्याच प्रमाणे या हवामानात नेहमीचा स्वैपाक करणे शक्य नसल्याने सैनिकांसाठी जे खास हवाबंद अन्न व पेये बनवली जातात त्यांचीही माहिती मिळते आहे. संग्रहालयातल्या बाकी सर्व कक्षांमध्ये, 1948 ते 1999 या कालखंडात, भारतीय सैन्य व वायुदल यांनी लडाख मध्ये लढलेल्या लढायांची वर्णने डिसप्ले बोर्ड व त्रिमिती मॉडेल्स यांच्या सहाय्याने मांडलेली आहेत. यामध्ये,1999 मधल्या अतिशय प्रसिद्ध अशा टायगर हिल, टोलोलिंग व PT 4875 या स्थानांवरच्या लढाया, 1962 मधली गुरुंग हिल वरची लढाई, 1971 मधली टुरटुक मोहिम आणि 1984 मधली सियाचिन हिमनदाजवळील साल्टोरो पर्वतराजीवरची ऑपरेशन मेघदूत ही मोहिम यांचा अंतर्भाव आहे. या सर्व मोहिमांची, त्रिमिती मॉडेल्स, चित्रे आणि वर्णने असलेले डिसप्ले बोर्डस मांडलेले असल्याने अतिशय छान माहिती मिळते आहे. 22 वर्षाचा कॅप्टन विजयंत थापर याने 1999 सालच्या कारगिल युद्धात एक इतिहास घडवण्याच्या आधी, आपल्या वडिलांना लिहिलेले पत्र वाचून माझ्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे. त्या वेळच्या त्याच्या भावना आणि पाकिस्तानी आक्रमणामुळे जागृत झालेली त्याची देशभक्ती यांचे मोठे भावनोत्कट चित्रण त्याच्या या पत्रात वाचता येते आहे. पहिल्या मजल्यावरच्या एका कक्षामध्ये, कारगिल युद्धात मारल्या गेलेल्या पाकिस्तानी सैनिकांची शस्त्रे, ते सैनिक पाकिस्तानी होते हे सिद्ध करणारी कागदपत्रे वगैरे मांडून ठेवलेले आहेत. 1999 मधील कारगिल युद्धातील पाकिस्तानी शस्त्रात्रे

कारगिल युद्धात मृत झालेल्या पाकिस्तानी सैनिकांजवळची कागदपत्रे

हे सर्व कक्ष बघितल्यावर अगदी सत्य सांगायचे म्हटले तर माझेच अश्रू आवरणे मला कठिण वाटते आहे व मनात भावनांचा एवढा कल्लोळ उठला आहे की मी संग्रहालयाच्या मागील बाजूस असलेल्या एका द्वाराने समोरील पटांगणात, मोकळा श्वास घेता येईल म्हणून जातो. या पटांगणाच्या टोकाला, दगडी बांधकाम केलेले एक हुतात्मा स्मारक उभारलेले आहे. 1947 ते 1999 या कालखंडात, लडाखमध्ये जे सैनिक शहीद झाले त्या सर्वांची नावे या स्मारकाच्या तिन्ही बाजूंना काळ्या ग्रॅनाईट दगडामध्ये सोनेरी अक्षरांनी कोरलेली आहेत. मी या स्मारकासमोर डोळे मिटून व मान झुकवून क्षणभर स्वस्थ उभा राहतो. शेकडो नावांच्या या यादीमध्ये, माझ्या आठवणीत असलेले एक नाव, मला लगेच सापडते. 1962 च्या चीन बरोबरच्या युद्धामधला व चुशुल गावाजवळच्या रेझांग ला येथील लढाईमध्ये अतुलनीय कामगिरी केलेला सर्वश्रेष्ठ सेनानी व योद्धा असे ज्याला म्हणता येईल त्या मेजर शैतान सिंह ( परम वीर चक्र) त्याचे हे नाव आहे. (मुंबईच्या बॉलीवूडने या मेजर शैतान सिंहच्या रेझांग ला येथील ऐतिहासिक लढाईवर, हकीगत हा सुप्रसिद्ध चित्रपट बनवला होता. ) हॉल ऑफ फेम संग्रहालय बघून मी अश्रू भरल्या डोळ्यांनी व जड अंत:करणाने बाहेर पडतो आहे. असे असले तरी या सर्व शूर सैनिकांचा व त्यांनी माझ्या देशासाठी केलेल्या कामगिरीचा मला प्रचंड अभिमानही वाटतो आहे. लेहलडाखला भेट देणार्‍या प्रत्येक भारतीयाने या संग्रहालयाला भेट दिलीच पाहिजे असे मला वाटते.

हॉल ऑफ फेम संग्रहालयातील हुतात्मा स्मारक

हॉल ऑफ फेम संग्रहालय

पॅनगॉन्ग जलाशयाकडे जाण्यासाठी प्रथम लेहमनाली हायवे घेऊन कारू या गावापर्यंत प्रवास करावा लागतो. सिंधू नदीच्या काठाकाठाने जाणारा हा रस्ता, बहुदा लडाखमधील सर्वात जास्त वस्ती असलेल्या भागातून जात असावा. रस्त्याने जाताना एका पाठोपाठ एक अशी गावे लागत आहेत. कारू गावापासून मनालीचा रस्ता पुढे सिंधू नदीच्या काठानेच जातो. मात्र आम्ही, डावीकडे म्हणजे उत्तरेला, चांग ला खिंडीकडे जाणार्‍या रस्त्याला वळलो आहोत. चांग ला खिंड ही जरी जगातली तिसर्‍या क्रमांकाची सर्वात ऊंच खिंड असली तरी मोटरगाडी जाऊ शकेल असा रस्ता असलेली ती दुसर्‍या क्रमांकाची खिंड आहे. आता परत एकदा लालसर पिवळट रंगाच्या माती व दगडांनी आच्छादलेल्या, डोंगराळ प्रदेशातून आमचा प्रवास सुरू झाला आहे कारण आम्ही परत एकदा लडाख पर्वतराजी ओलांडण्याच्या प्रयत्नात आहोत. मात्र आता आम्ही खारडुंग ला खिंडीच्या बरेच पूर्वेला आहोत आणि बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनचे रस्ता दुरुस्तीचे काम येथे मोठ्या प्रमाणावर चालू असल्याने, हा रस्ता बराच जास्त सुस्थितीत दिसतो आहे. रस्त्याचे बरेचसे भाग, नुकतेच डांबरीकरण झल्यासारखे दिसत आहेत. त्याचप्रमाणे आम्हाला मधून मधून डांबरीकरणाचे काम चालू असल्याने, थांबावेही लागते आहे. आमची गाडी एका फाट्यावर येते. येथून एक छोटा रस्ता शक्ती या गावाकडे जातो आहे तर त्या मानाने मोठा रस्ता उजवीकडे वळून डोंगरावर वर चढून जाताना दिसतो आहे. आम्ही मुख्य रस्त्याने पुढे जाण्यासाठी उजवीकडे वळतो. थोड्या ऊंचीवर आल्यावर, डाव्या बाजूला, शक्ती गावामधील हिरवीगार शेते आणि पिवळीधमक मोहरीची शेते आजूबाजूच्या वैराण डोंगराळ प्रदेशात, मोठी खुलून दिसत आहेत.

शक्ती गाव; विहंगम दृष्य

आता रस्ता सतत वर आणि वर चढतो आहे. जवळ जवळ एका तासाच्या प्रवासानंतर आधी बर्‍या अवस्थेत असलेल्या या रस्त्याचे स्वरूप, एक कच्चा व खराब रस्ता असे झाले आहे. याचा अर्थ आता माझ्या चांगला लक्षात येऊ लागला आहे. आम्ही नक्कीच आता डोंगर माथ्याच्या किंवा चांग ला खिंडीच्या जवळ पोचलो आहोत. आजूबाजूला छोटी छोटी अनेक झुडुपे दिसत आहेत. ही झुडुपे रानटी असली तरी त्यांच्यावर फुललेली निळी फुले मी नुब्रा व्हॅलीमधे बघितली होती त्यापेक्षा अगदीच निराळी व सुंदर आहेत. ही झुडुपे रानटी असली तरी त्यांच्यावरची फुले बघितली तर हे झुडुप कोणत्याही बागेत किंवा बगिच्यात लावायला सुद्धा योग्य वाटते आहे. गाडीचा वेग आता आणखीनच मंदावला आहे आणि चाकाखालचा रस्ता अतिशयच खराब झाला आहे. समोर मोकळे आकाश पण आता दिसते आहे. म्हणजेच आम्ही चांग ला खिंडीत (17600फूट) पोचलो आहोत. मी गाडीतून खाली उतरतो व आजूबाजूला नजर टाकतो. पश्चिम बाजूला म्हणजे ज्या बाजूकडून आम्ही वर चढलो त्या बाजूला असलेले डोंगर उतार बहुतांशी हिमाच्छादित दिसत आहेत. मात्र प्रत्यक्ष खिंडीमध्ये हिम किंवा बर्फ अजिबातच नाही. पूर्वेला काहीच दिसू शकत नाहीये. कारण एक महाकाय पर्वत अगदी रस्त्याच्या बरोबर समोर उभा आहे. मला खरे म्हणजे आशा वाटत होती की चांग ला मधून मला श्योक नदीचा दक्षिणेकडचा भाग, चांग चेन्मो नदीचे खोरे आणि त्याच्या पलीकडे असलेली कोंगका खिंड व अक्साई चिनचा काहीतरी भाग दिसू शकेल. पण एखादा काळा पडदा टांगावा तश्या स्वरूपात असलेल्या या पर्वताने माझी दृष्टी पूर्णपणे झाकूनच टाकली आहे. थोड्याशा निराश अंत:करणाने मी बाजूला असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये शिरतो.

चांग ला खिंडीकडे जाणारा रस्ता

चांग ला खिंडीजवळची रानफुले

चांग ला खिंड

चांग ला बाबा मंदिर

गाडी चांग ला मध्ये थांबवतानाच, टुंडुपने आम्हाला येथेच लंच करून घ्या अशी सूचना दिलेली आहे. त्यामुळे एका तंबूमध्ये असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये, जेवणासाठी काय मिळेल अशी मी चौकशी करतो. फक्त मॅगी नूडल्स मिळतील हे उत्तर ऐकून मला जरा आश्चर्य वाटते. परंतु या ऊंचीवर मॅगी नूडल्स शिजण्यासाठी सुद्धा 20 ते 25 मिनिटे लागतील हे कळल्यावर मी मॅगी नूडल्सची ऑर्डर लगेच देऊन टाकतो. वास्तविक मला नूडल्स आवडत असल्या तरी मॅगी नूडल्स हा खाद्य प्रकार मला अजिबात आवडत नाही व पुण्याला मी तो कधी खातही नाही. येथे नाईलाजाने दुसरे काही उपलब्धच होऊ शकत नसल्याने तो खावा लागतो आहे. जेवण झाल्यावर मी चांग ला खिंडीच्या परिसरात एक चक्कर मारतो. खारडुंग ला प्रमाणेच येथेही इंडियन आर्मीने एक मंदिर बांधले आहे. हे मंदिर चांग ला बाबा मंदिर या नावाने ओळखले जाते व ये जा करणारा प्रत्येक सैनिक या मंदिरात जाऊन नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाही. प्रत्यक्ष खिंडीत जरी बर्फाचा लवलेशही दिसत नसला तरी आजूबाजूच्या डोंगरांवर नुकत्याच पडून गेलेल्या हिम वर्षावाच्या खुणा जागोजागी दिसत आहेत मात्र खारडुंग ला च्या मानाने इथली जमीन मला जास्त खडकाळ व गडद मातकट रंगाची वाटते आहे.

चांग ला खिंडीतील कॅफे

चांग ला मध्ये

आता आमची गाडी परत एकदा डोंगर उताराला लागली आहे. समोर दिसणार्‍या एका पाटीनुसार आता आम्ही चॅन्गथान्गया भागात प्रवेश करतो आहोत. हा भाग सरहद्दीवरचा एक संवेदनाक्षम भाग असल्याने भारतीय सैनिक दले या भागाची सर्व व्यवस्था बघतात. मात्र सरहद्दीवरची ठाणी व त्यावरचे पोलिस यांची सर्व व्यवस्था मात्र भारततिबेट पोलिस दल अजुनही बघते. वास्तविक रित्या चॅन्गथान्ग भाग हा एक पठारी प्रदेश आहे व तो पार तिबेट पर्यंत पसरलेला आहे. अक्साई चिन हा चीनने 1962 मध्ये बळकवलेला भारतीय मालकीचा भूप्रदेश सुद्धा या चॅन्गथान्ग पठाराचाच एक भाग आहे.

आता आमची गाडी घाट उतरून डारबुक या एका छोट्या गावाशी पोचली आहे. श्योक नदी रिमो या हिमनदातून उगम पावून दक्षिणेकडे प्रथम वहात येते व या डारबुक गावाजवळ एक पूर्ण यू टर्न घेऊन उत्तर दिशेला आपला प्रवास सुरू करते. मात्र स्योक नदीचे पात्र आणि डारबुक हे गाव यामध्ये विशाल पर्वत उभे असल्याने येथून श्योक नदीचे पात्र दिसण्याची सुतराम शक्यता नाही. आता आम्ही उजवीकडे वळून टांन्गत्से गावाकडे निघाली आहे. हे गाव या भागातले महत्वाचे ठाणे दिसते आहे. सर्व वाहने येथे थांबून त्यांची चौकशी केली जाते व त्याशिवाय त्यांना पुढे जाता येत नाही. टुंडुप खाली उतरतो व तिथल्या अधिकार्‍यांना आमची इनर लाईन परमिट्ससादर करतो व त्यांनी परवानगी दिल्यावरच आम्ही पुढे जाण्यासाठी निघतो. पुढे थोड्या अंतरावर पॅनगॉन्ग जलाशयाला भेट देण्यासाठी म्हणून काही शुल्क द्यावयाचे असते व ते आम्ही भरतो. या ठिकाणापासून आणखी एक रस्ता फुटतो. हा रस्ता चुशुल या गावाकडे जातो. रस्त्यावर चुशुल कडेही पाटी वाचल्यानंतर माझे मन परत एकदा 1962च्या त्या दुख:द कालात गेले आहे. तेंव्हा झालेल्या भारतचीन युद्धातील, रेझांग ला ची लढाई व त्यात परम वीर चक्र मिळवलेले मेजर सैतान सिंह यांची परत एकदा मला आठवण होते आहे. या रेझांग ला च्या लढाईचा एक डिसप्ले बोर्ड हॉल ऑफ फेम संग्रहालयात मी नुकताच बघितला आहे. त्यातील वर्णन मी खाली उद्धृत करतो आहे.

रेझांग ला ची लढाई 18 नोव्हेंबर 1962 या दिवसाच्या पहाटेपासूनच सुरू झाली. रेझांग ला खिंडीचे संरक्षण करणार्‍या सैनिकांना आश्चर्यचकित करता आले तर पहावे म्हणून चिनी सैनिकांनी एक छुपा हल्ला प्रथम केला.परंतु या चढाईत त्यांना यश मिळाले नाही. मेजर शैतान सिंह व त्यांचे शूर सैनिक यांना चिनी सैनिक आता कोणत्याही क्षणी मोठी चढाई करतील याची खात्री पटल्याने, श्वास रोखून व बंदुकीच्या घोड्यावरची आपली बोटे हलू सुद्धा न देता ते वाट बघत राहिले. अगदी झुंजुमुंजु होत असतानाच चिनी सैनिक बंदुकीच्या गोळ्यांच्या टप्प्यात आलेले या सैनिकांना दिसू लागले. मेजर शैतान सिंह यांनी आपल्या सैनिकांना गोळ्या झाडण्याचा हुकुम दिला. त्यांच्या कंपनीतील जवळ जवळ प्रत्येक हत्यार फायर करत असल्याने थोड्याच काळात या खिंडीकडे येणार्‍या सर्व घळ्यांच्यात मृत व जखमी चिनी सैनिकांच्या शरीरांचा खच पडला. सरळ रित्या केलेला हा हल्ला, अयशस्वी झाल्याचे पाहिल्यावर चिनी सैन्याने रेझांग ला वर तोफगोळ्यांची आग पाखडण्यास सुरूवात केली. आपल्या कंपनीला सर्व बाजूंनी चिनी सैनिकांनी वेढले आहे हे पाहिल्यावर मेजर शैतान सिंह यांनी आपल्या सैनिकांच्या जागा व मशीन गन्सच्या पोस्ट्सची फेररचना केली. ही फेररचना ते वैयक्तिक लक्ष देऊन करत असतानाच, शत्रूने झाडलेल्या मशीन गनच्या एका फैरीमध्ये , त्यांच्या एका हाताला अनेक गोळ्या लागल्या व तो संपूर्णपणे निकामी झाला. काही काळानंतर मशीन गनच्या एका फैरीतील गोळ्या त्यांच्या पोटावर लागल्या व या जखमांना ते थोड्याच वेळात बळी पडले. त्यांचे पार्थिव अवशेष तीन महिन्यांनंतर मिळाले. कशाही प्रकारे विचार केला तरी रेझांग ला लढाईमधे लढून मृत पावलेला प्रत्येक सैनिक हा एक हीरो होता व कृतज्ञ देश या प्रत्येकाची सतत आठवण ठेवील. कुमांअ रेजिमेंटचे हे सैनिक, शेवटचा सैनिक व शेवटची गोळी असेपर्यंत रेझांग लाच्या बर्फाच्छादित डोंगरांच्यावर लढत राहिले. रेझांग लाचे रक्षण करत असलेल्या 118 सैनिकांपैकी 109 सैनिकांनी वीरगती पत्करली. 5 सैनिक पकडले गेले व 4 सैनिक तळावर परत येण्यात यशस्वी झाले. या सर्व सैनिकांच्याकडे असलेली हत्यारे चिनी सैनिकांच्या आधुनिक आणि कित्येक पटींनी जास्त मारक अशा हत्यारांच्या मानाने अत्यंत जुनाट व कालबाह्य झालेली. होती.”

रेझांग लाची लढाई

माझी खात्री आहे की चुशुल गावाला जाण्यासाठी कोणाही असैनिक व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही व रेझांग ला लढाईच्या, चुशुल जवळ असलेल्या, स्मारकाला भेट देण्याची माझी इच्छा कधीच फलद्रूप होणे शक्य नाही. अर्थात पॅनगॉन्ग जलाशय, रेझांग लापासून फारसा दूर नसल्याने या लढाईतील सैनिकांना मी श्रद्धांजली तेथे वाहू शकतोच.

चॅन्गथांग मधल्या हिरवळीवर चरणारे रानटी घोडे

चॅन्गथांग दरीतळ 

टांगत्सेगावापासून आमचा पुढचा प्रवास, डोंगरमाथे व ऊंचसखल दर्‍या यामधून न होता हिरव्यागार दिसणार्‍या एका सुपीक दरीच्या तळाच्या बाजूने चालू झाला आहे. या दरीतळाच्या दोन्ही बाजूंना विशाल असे पर्वत उतार असले तरी हा दरी तळच 13000 फूट ऊंचीवर असल्याने बाजूचे पर्वत तेवढे ऊंच वाटत नाहीत. हा दरीतळ, वर्षातील बहुतेक काळ बर्फाच्छादितच असल्याने, येथे झाडे अशी काही दिसत नाहीत. दिसते ते फक्त ताजे लुसलुशीत गवत व त्यातून मधून मधून डोकावणारी काळसर हिरव्या रंगांची झुडुपे. हिरव्यागार हिरवळीच्या पार्श्वभूमीवर, इथला अतिशय कडक व जीवघेणा हिवाळा सहन करू शकणारी ही झुडुपे, म्हणजे हिरवळीवर पडलेले काळसर हिरवे डाग असल्यासारखेच लांबवरून भासतात. काही रानटी घोडे व याक या गवतावर चरताना दिसत आहेत. इथले स्थानिक रहिवासी असलेल्या भटक्या जमातीच्या चांगपालोकांचे, पांढर्‍या रंगाचे तंबू देखील मधून मधून दिसत आहेत. मधूनच एखाद्या वेळेला, अंगावर भरपूर केस असलेला पण उंदराच्या जातीचा मरमॉटहा प्राणी देखील रस्त्यावर आम्हाला आडवा जातो आहे. आम्ही आमच्या मुकामाच्या ठिकाणाच्या जसजसे जवळ जातो आहोत तसतसा रस्त्याच्या कडेला दिसणारा गवताळ प्रदेश लुप्त होऊन त्याची जागा आता पांढर्‍याशुभ्र वालुकामय प्रदेशाने घेतली आहे. पूर्वेकडून येणार्‍या वार्‍यांनी ही पांढरी रेती, रस्त्यावर पसरून, चाकाखालचा काळाशार डांबरी रस्ता पांढराशुभ्र होतो आहे व आपण बर्फावरून प्रवास करतो आहोत असे उगीचच मला वाटते आहे. आता आम्ही, पाणी पार आटून गेलेल्या एका ओढ्यापाशी आलो आहोत. या ओढ्याला स्थानिक लोक पागल नाला किंवा वेडा नाला असे म्हणतात. या नाल्याने मागच्या काही वर्षात आपला प्रवाह सतत बदलून वर बांधलेले दोन किंवा तीन पूल उध्वस्त करून टाकले आहेत. त्यामुळे स्थानिकांनी हे नाव या नाल्याला दिलेले आहे. आता सैन्यदलाने नाला पार करण्यासाठी एक लोखंडी पूल बर्‍याच वरच्या ऊंचीला बांधला आहे. पण त्यामुळे फक्त हा नाला पार करण्यासाठी बर्‍याच उंचीवर चढून जाऊन परत खाली तळाला यावे लागते आहे.

पागल नाला

पॅनगॉन्ग जलाशयाचे प्रथम दृष्य

समोर दूर क्षितिजावर डोंगरांची दिसणारी रांग आता मध्यभागी विलग होताना दिसते आहे. त्या डोंगरांच्या मागे एक ऊंच बर्फाच्छादित शिखर चमचमताना दिसते आहे व विलग झालेल्या पर्वतांच्या मधे तळापाशी एक तेजस्वी निळा ठिपका झळाळतो आहे. टुंडुप त्या निळ्या ठिपक्याकडे बोट दाखवतो व आपण पॅनगॉन्ग जलाशयापाशी पोचलो आहोत असे सांगतो. या सफरीवर निघण्यापूर्वी गूगल अर्थच्या सहाय्याने मी माझा गृहपाट उत्तम रित्या पार पाडलेला आहे व त्यामुळे हे बर्फाच्छादित शिखर चेन्मो कांगरी (214123 फूट) असले पाहिजे हे माझ्या लक्षात आले आहे. या शिखराच्या उजव्या बाजूस जी कमी उंचीची हिमाच्छादित शिखरे दिसत आहेत तेथूनच भारत व चीन यांमधली प्रत्यक्ष ताबा रेषा जाते आहे. या शिखरांच्या डाव्या हाताला एक खळगा दिसतो आहे ती बहुदा जगातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात ऊंच असलेली मार्सेमिक ला खिंड (18314 फूट) आहे.

आमची गाडी आणखी थोडी पुढे जाते. समोर दिसणारा तो निळा ठिपका आता मोठा मोठा होत चालला आहे. आता आम्ही दोन डोंगरांच्या तळाशी असलेल्या एका घळीतून बाहेर पडलो आहोत. माझ्या दृष्टीसमोर आता सबंध जगातील एक अत्यंत सौंदर्यपूर्ण असा समजला जाणारा पॅनगॉन्ग जलाशय पसरला आहे. 14200 फूट उंचीवर असलेला हा जलाशय, एशिया मधला सर्वात मोठा जलाशय समजला जातो. हा जलाशय रुंदीला 6 ते 7 किलोमीटर आहे तर लांबीला अंदाजे 130 किलोमीटर आहे. या जलाशयाचा निम्मा भाग भारताच्या हद्दीत येतो तर निम्मा तिबेट्मधे (चीन) मोडतो. 1962 मध्ये चीनने या जलाशयाचा बराचसा आणखी हिस्सा बेकायदेशीरपणे बळकावला आहे व त्यामुळे आता फक्त 1/4 भाग भारताच्या हद्दीत आहे.

मार्सेमिक कॅम्प

पॅनगॉन्ग जलाशयाच्या उत्तर टोक़ाजवळ (लुकुन्ग खेड्याजवळ), ‘मार्सेमिकहे नाव दिलेला एक कॅम्प उन्हाळ्याच्या सीझनपुरता वसवलेला आहे. या कॅम्पमधे राहण्यासाठी तंबूंची व्यवस्था आहे व तेथे राहण्यासाठी माझे आरक्षण झालेले आहे. आमची गाडी या कॅम्पजवळ थांबते व मी खाली उतरतो. कॅम्पच्या ऑफिसमध्ये गेल्यावर, माझ्या आरक्षणाबद्दल काहीतरी गोंधळ झालेला आहे हे माझ्या लक्षात येते. कॅम्पचा मॅनेजर मला सांगतो आहे की माझे आरक्षण अशा तंबूसाठी झालेले आहे जेथे चार सहा तंबूंसाठी मिळून, एकाच स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. या व्यवस्थेला माझी काही ना नाही परंतु प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघितल्यावर असे दिसते की हे फायबर ग्लासचा एक डब्बा वापरून बनवलेले हे स्वच्छतागृह, तंबूपासून निदान 50 मीटर तरी अंतरावर आहे. तेथे जाण्यासाठी पायवाट नाही व खाचखळग्यामधूनच जावे लागणार आहे. कॅम्पमधे रात्री दिवे अर्थातच नसणार. मी कॅम्प मॅनेजरला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की स्वछतागृह कॉमन असले तरी चालेल परंतु ते तंबूंच्या जवळ असणे माझ्यासाठी आवश्यक आहे. बरीच चर्चा केल्यावर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी शक्य तो प्रयत्न करतो असे कॅम्प मॅनेजर मला सांगतो. मी माझा बॅकपॅक एका तंबूत टाकतो, कॅम्प मॅनेजरने दिलेला गरम गरम चहा संपवतो व परत गाडीकडे वळतो. टुंडुप, गाडी पॅनगॉन्ग जलाशयाकडे घेतो.

पॅगॉन्ग जलाशयाचा पॅनोरामिक देखावा

जलाशयाच्या पश्चिम किनार्‍यावरची पॅनगॉन्ग पर्वतराजी

पॅनगॉन्ग जलाशय, त्याच्या चहू बाजूंनी असलेली पर्वतांची पार्श्वभूमी, लडाखमधल्या कडक सूर्यप्रकाशामुळे दिसणारे जलाशयाचे तेजस्वी व चमचमणारे पाणी हे सगळे कल्पनेपेक्षाही अतिशय सुंदर आहे. जलाच्या पृष्ठभागावर हलक्या लाटा पसरताना दिसतात व या लाटांवर पडणारा सूर्यप्रकाश एक तेजस्वी झळाळी त्या पाण्याला आणतो आहे. आजूबाजूला थोडेफार लोक बहुदा असावेत परंतु या परिसराची भव्यता व विशालता यात आम्ही सर्व इतके हरवून गेलेले आहेत की या लोकांची जाणीव सुद्धा माझ्या मनाला होत नाहीये. मी जलाशयाचे थोडे पाणी माझ्या ओंजळीत घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु पाणी इतके थंड आहे की माझी बोटे आणि हात एकदम गारठूनच जातात. पाण्याची चव मचूळ आहे. वर्षानुवर्षे डोंगर उतारांवरून वाहत येणार्‍या क्षारांमुळे ती तशी झाली आहे. माझ्या नजरेसमोर म्हणजे जलाशयाच्या पूर्व किनार्‍याच्या मागे, चांग चेन्मो पर्वतराजी उभी आहे. पाण्याच्या लगत असलेले पर्वत उंचीला कमी असलेले आहेत तर महाकाय व बर्फाच्छादित असलेली पर्वत शिखरे या कमी ऊंचीच्या पर्वतांच्या मागे दिसत आहेत. दक्षिण दिशेला मला बर्‍याच बुटक्या टेकड्या दिसत आहेत तर पश्चिमेला म्हणजे मी उभा आहे त्या किनार्‍याच्या मागे, थोडीफार बर्फाच्छादित शिखरे मधूनमधून डोकावत असणारी पॅनगॉन्ग पर्वत राजी दिसते आहे. या पर्वतराजीच्या डाव्या अंगाला सर्वात ऊंचीचे कान्गजू कान्गरी ( 22063 फूट) हे शिखर दिसते आहे. उत्तरेला किनार्‍याच्या पल्याड आणि एका पर्वताच्या पायथ्याशी काही घरे दिसत आहेत. हे बहुदा लुकुंग गाव असावे. लुकुंग गावाच्या डावीकडे भारतीय सैन्य दलाचे ठाणे आहे. यामध्ये असलेल्या व इगलू सारख्या दिसणार्‍या फायबर ग्लास पासून बनवलेल्या पांढर्‍या शुभ्र गोल झोपड्यांमुळे हे ठाणे अगदी ठळकपणे दिसते आहे. किनार्‍यांच्या लगत असलेले सर्व पर्वत पूर्णपणे वैराण आहेत. मात्र अनेक युगांपासून दर वर्षी त्यांच्या उतारांवरून घसरत जाणार्‍या हिमनदांमुळे, या पर्वतांवर पांढरट पिवळे चट्टे उठले आहेत. आफ्रिका किंवा दक्षिण अमेरिकेतील मूळ अदिवासी योद्धे जसे आपल्या अंगावर रंगाचे पट्टे रंगवून घेत असत तसेच काहीसे हे पर्वत दिसत आहेत.

मार्सेमिक ला; अक्साई चिनचे महाद्वार

आमच्या कॅम्पचे मार्सेमिक हे नाव, परत एकदा मला, भारत आणि चीन यांच्यामधले युद्ध आणि त्याच्यातला भारताचा उडालेला धुव्वा, यामुळे स्मरणात पक्के राहिलेल्या 1960 मधल्या त्या लाजिरवाण्या कालाकडे घेऊन जाते. खरे तर हे सगळे प्रकरण 1952 मध्येच सुरू झाले होते. सैनिकी दलाच्या दिल्ली येथील प्रमुख कार्यालयाकडे अशा बातम्या येऊ लागल्या की अक्साई चिनमधे चिनी सैनिकांचे आगमन झाले आहे. सैनिक दलाने दोन अधिकार्‍यांना या बातम्यांची शहानिशा करण्यासाठी अक्साई चिनला पाठवले होते. हे अधिकारी व त्यांच्याबरोबर असलेले सैन्य दल हे आज आम्ही लेहहून ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने पॅनगॉन्गला आले होते व येथून पुढे लुकुंगमार्सेमिक लाकोन्गका ला या मार्गाने अक्साई चिन व तिबेट यांच्या सरहदीवरच्या कनक ला पर्यंत गेले होते. या अधिकार्‍यांनी भारताच्या भूमीवर चिनी अभियंते काम करत असल्याचा अहवाल सरकारला दिला होता. दुर्दैवाने पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या तत्कालीन भारत सरकारने या अहवालाकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते व परिणामी चीनने भारतीय मालकीचा हा मुलुख बळकवला होता. चीनचे या भागातले आक्रमण जेंव्हा सर्वसामान्य भारतीय जनतेला ज्ञात झाले तेंव्हा सरकारविरूद्ध बराच आरडाओरडा झाला आणि लोक बरेच संतापले. यामुळे गृह मंत्रालयाने फारशी माहिती न घेता व फारसा काही विचार न करता डीएसपी करम सिंह या पोलिस अधिकार्‍याला अक्साई चिन मधे जाऊन एक पोलिस चौकी उभारण्यासाठी पाठवले. हा अधिकारी व त्याच्या बरोबरचे 40 पोलिस अक्साई चिनकडे परत लेहपॅनगॉन्गलुकुन्गमार्सेमिक लाकोन्गका ला या मार्गाने होते. या पोलिसांनी जेंव्हा कोन्गका लाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला तेंव्हा चीनच्या पीएलए दलाच्या सैनिकांनी त्यांना वेढा घातला होता. हे चिनी सैनिक स्वयंचलित शस्त्रास्त्रे, मशीन गन्स यांनी सज्ज व हिमकालीन पेहराव परिधान केलेले होते. या सैनिकांनी करम सिंह यांना परत जाण्याचा हुकुम दिला. तो न जुमानता करम सिंह हे खाली वाकले व जमिनीवरची मूठभर माती उचलून त्यांनी आपल्या छातीला लावली व हा मुलुख माझा आहे असे चिनी सैनिकांना दर्शवून दिले. त्यांच्या या कृतीला भारतीय माध्यमांनी (त्यावेळेस फक्त वृत्तपत्रे होती) प्रचंड प्रसिद्धी दिली होती. करम सिंह ऐकत नाहीत हे बघितल्यावर स्वयंचलित रायफल्स व मशीन गन्स यांनी सुसज्ज चिनी सैनिक व साधा गणवेश परिधान केलेले व दुसर्‍या महायुद्धकालीन एन फिल्ड 303 रायफल्स हातात असलेले भारतीय पोलिस यांच्यामध्ये धुमश्चक्री सुरू झाली. अर्थात दोन्ही पक्षांमधली सैनिकी असमानता एवढी प्रचंड होती की एका दिवसातच कर्म सिंहाबरोबर असलेल्या 20 पोलिसांपैकी 10 मृत्युमुखी पडले व करम सिंह यांना शरण जावे लागले. काही दिवसांनंतर बरीच मानहानी करून त्यांची सुटका चिनी सैनिकांनी केली होती व त्यांना कोन्गका ला खिंडीच्या पश्चिमेला सोडून दिले गेले होते. ही घटना कोन्गका ला घटना म्हणून ओळखली जाते व या युद्धात शहीद झालेल्या पोलिसांचे एक स्मारक कोन्गका ला खिंडीजवळील हॉट स्प्रिंग्ज या ठिकाणी उभारलेले आहे. अर्थात हे स्मारक कोणत्याही असैनिक व्यक्तीसाठी आऊट ऑफ बाऊंड्स असल्याने ते बघणे व तेथे या शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करणे हे मला अशक्यप्रायच आहे. मी किनार्‍यासमोर जेथे उभा आहे साधारण त्याच्या समोरच मार्सेमिक ला पुढे ऊंचीवर आहे. त्यामुळे मी क्षणभर डोळे मिटतो व कोन्गका लाच्या त्या शूर पोलिसांना माझी श्रद्धांजली अर्पण करतो.

आमची गाडी आता जलाशयाच्या पश्चिम किनार्‍यावरून दक्षिणेकडे निघाली आहे. जलाशयाच्या उत्तर टोकाच्या भागात अतिशय शांत वाटणारे पाणी आता अजिबातच शांत वाटत नाहीये. पूर्वेकडून येणारा भणाणणारा वारा या भागात जलाशयावर मोठ्या लाटा उसळवतो आहे. लाटा समुद्रासारख्या विशाल जरी नसल्या तरी त्यांचा जोर मनात धडकी भरेल असाच वाटतो आहे. किनार्‍याजवळ मात्र या लाटांचा जोर काहीसा मंदावतो आहे. काही थोड्या जागा सोडल्या तर किनार्‍यावर रेती अशी अजिबातच दिसत नाही. सगळीकडे पाणथळ जमीन, खडी व दगड गोटे यांचेच साम्राज्य आहे. मात्र इतर ठिकाणी दिसते तसे पाणगवत इथे अजिबातच नाही; फक्त काही झुडुपे या खडी व दगडगोट्यांतून आपली मान ऊंच करून वर आलेली दिसत आहेत. आणखी थोडे दक्षिणेला गेल्यावर आम्ही स्पॅन्गमिक या गावापाशी पोचलो आहोत.

पॅनगॉन्ग जलाशयाचा किनारा

पॅनगॉन्ग जलाशयाचे अप्रतिम सौंदर्य

स्पॅन्गमिक हे खेडे अगदीच छोटे आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच घरे मला दिसत आहेत.मात्र दोन चार हिरवी शेते आणि एक झाड यथे उभे आहे. पॅनगॉन्गला पोचल्यापासून उभे असलेले हे पहिलेच झाड मला दिसते आहे.दोन घरे आधुनिक पद्धतीने बांधलेली दिसत आहेत. बाकीची घरे, बकर्‍यांचे गोठे, संरक्षक भिंती हे मात्र परंपरागत म्हणजे येथे सापडणारे दगडगोटे एकमेकावर रचून बनवण्यात आलेली आहेत. हे छोटे गाव येथील बकर्‍यांच्या अंगावरच्या पश्मिना लोकरीच्या गुणवत्तेबद्दल प्रसिद्ध आहे. मात्र या गावालगतचा जलाशयाचा किनारा हा पाणथळ व अस्तावस्तपणे माजलेल्या मोठमोठ्या झुडुपांनी व्यापलेला असल्याने इथे किनार्‍याजवळ जाणे शक्य नाही. मी किनार्‍यापासून थोड्या अंतरावर असलेल्या रस्त्याच्या कडेला उभा राहून आसमंताचे निरिक्षण करतो. माझ्या उजव्या हाताला असलेले पॅनगॉन्ग पर्वतराजीच्या विशाल पर्वतांचे, दक्षिणेच्या बाजूला छोटेखानी टेकड्यांत रूपांतर झाले आहे. या टेकड्यांचा शेवट व डाव्या हाताला असलेले चांग चेन्मो पर्वतराजीचे पर्वत यांच्या मध्ये बरोबर दक्षिणेला असलेला एक मोकळा भाग दिसतो आहे. या मोकळ्या भागात, अगदी दूरवर, मला काळसर रंगाच्या काही टेकड्या अस्पष्ट दिसत आहेत. या काळसर टेकड्या जलाशयाला बांध घालावा तशा अगदी दिसत असल्याने हे स्पष्ट आहे की जलाशयाने या ठिकाणी एकदम काटकोनात डावीकडे वळण घेतले आहे. माझ्या बायनॉक्यूलर्स मधून या टेकड्यांचा बराच स्पष्ट असा देखावा दिसतो आहे. माझ्याजवळ असलेल्या नकाशाप्रमाणे, दूर अस्पष्ट दिसत असलेल्या या टेकड्या, नक्कीच गुरुंग किंवा ब्लॅक टॉप या टेकड्यांचा भाग आहेत. याच टेकड्यांवर 1962 साली एक मोठी लढाई लढली गेली होती. रेझांग लाच्या लढाई प्रमाणेच ही लढाई सुद्धा आता इतिहासाचा एक भाग बनली आहे आणि हॉल ऑफ फेमसंग्रहालयात या लढाई बद्दलचा डिसप्ले बोर्ड आपल्याला बघता येतो. या डिसप्ले बोर्डावरचे वर्णन मी खाली उद्धृत करत आहे.

गुरुंग टेकड्यांवरची लढाई 18 नोव्हेंबर 1962 ला सकाळी पावणेसहा वाजता सुरू झाली होती. कॅप्टन पी एल खेर यांच्या नेतृत्वाखाली तैनात असलेल्या दोन प्लॅटून्सवर चिनी उखळी तोफखान्याने प्रथम आग पाखडण्यास सुरूवात केली होती. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सेकंड लेफ्टनंट एस डी गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या तोफखान्याने, चिनी तोफांवर गोळाबारी सुरू केली. यावेळी चढाई करणार्‍या चिनी सैनिकांवर स्वत:च्याच तोफा आग पाखडू लागल्याने त्यांना माघार घ्यावी लागली.

पुन्हा चढाई करणारे किनी सैनिक 150 यार्ड अंतरावर आल्यावर कॅप्टन खेर यांनी गोळ्या चालवण्याचा हुकुम दिला. या वेळी आणखी चिनी सैनिक स्पॅन्गुर गॅपच्या बाजूला असलेल्या घळींमधून चढाई करत होते. सेकंड लेफ्टनंट एस पी एस बसवानी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या, 20 लान्सर्स या रणगाडा पथकाच्या, बी स्क्वॅड्रनच्या ए एम एक्स रणगाड्यांनी तोफा डागाण्यास सुरूवात केली. सुरवातीस चिनी सैनिकांनी गुरखा सैनिकांना त्यांच्या स्थानांवरून मागे जाण्यास भाग पाडले. परंतु शूर गुरखा सैनिकांनी आपल्या खुकरी तलवारींने प्रतिहल्ला करून आपले स्थान परत काबीज केले. या दरम्यान कॅप्टन खेर हे गोळी लागून जखमी झाले. परत एकदा एक मोठी चिनी चढाई सुरू होण्याची लक्षणे त्यांना दिसत होती. या वेळी त्यांच्या समोर दोन पर्याय होते. एकतर आहे त्याच स्थानांवरून लढाई चालू ठेवणे किंवा शेजारील कॅमल्स बॅक या टेकडीवर जाऊन (ही टेकडी जास्त उत्तम रित्या लढवली जाऊ शकत होती) लढाई चालू ठेवणे. कॅप्टन खेर यांनी दुसरा पर्याय निवडला व आपल्या स्वत:च्या स्थानावर तोफगोळे बरसवण्याचा आदेश दिला. या वेळेस सेकंड लेफ्टनंट गोस्वामी हे आपल्या निरिक्षण स्थानावरून

तोफगोळ्यांचा मारा अचूक कोठे करायचा याचे हुकुम देत होते. खेर याच्या हुकुमाप्रमाणे गोस्वामी यांनी कॅमल्स बॅक कडे जाण्यास सुरूवात केली. परंतु याच वेळी त्यांना गोळी लागल्यामुळे ते रणांगणावर पडले व हलणे शक्य नसल्याने पडून राहिले. रात्री एका गस्ती पथकांने त्यांचा माग काढला व त्यांना परत आणले. अतिशय कडाक्याच्या थंडीमुळे त्यांना फ्रॉस्ट बाईट झाल्याचे आढळून आले व प्राण वाचवण्यासाठी त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले. या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना महावीर चक्र प्रदान करण्यात आलेले आहे. “

गुरुंग हिल्सची लढाई

मी माझ्या जागेवर स्तब्ध उभा राहून डोळे मिटून घेतो व गुरुंग हिल व त्याच्या पलीकडे असलेली रेझांग ला खिंड लढवताना शहीद झालेल्या त्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहतो.

पॅनगॉन्ग जलाशयाचा परिसर इतका सुंदर आहे की शब्दात त्याचे वर्णन करणे खरोखरीच एक अवघड गोष्ट आहे. सूर्य पूर्व क्षितिजावर उगवून पश्चिमेला पॅनगॉन्ग टेकड्यांच्या मागे अस्ताला जाईपर्यंतच्या कालात या जलाशयाचे रंग तेजस्वी निळा या पासून ते गर्द हिरव्या रंगापर्यंत सतत बदलत राहतात. या परिसराचे कितीही फोटो काढले तरी ते पुरेसे वाटतच नाहीत. स्पॅन्गमिक वरून परतताना टुंडुप मला एक जागा दाखवतो. या ठिकाणी बॉलीवूडच्या एका सुप्रसिद्ध चित्रपटातले एक गाणे एका ख्यातनाम अभिनेत्यावर चित्रित झाले होते, अशी माहिती टुंडुप मला देतो. परंतु या सुंदर जागेचा संबंध एका बॉलीवूड चित्रपटाशी व त्याच्या अभिनेत्याशी जोडला जावा हे मला फारसे रूचत नाही. मी या जागेचा संबंध डीएसपी करम सिंह व मेजर शैतान सिंह यांच्याशी जोडणे केंव्हाही जास्त पसंत करीन.

ग़ाडीने मी आता मार्सेमिक कॅम्पवर परत आलो आहे. मला कोणता तंबू द्यायचा या बद्दलचा विवाद आता सोडवला गेला आहे. तंबूंच्या ओळीच्या मागच्या बाजूला असलेली एक खोलीच मला कॅम्प व्यवस्थापनाने दिली आहे. खरे तर मला तंबूमध्ये राहायचे होते परंतु हवामानाचा एकून रागरंग बघता ही व्यवस्था मला जास्त योग्य ठरेल असे वाटते. मी माझ्या घड्याळाकडे बघतो. संध्याकाळचे 7.30 झाले आहेत. परंतु अजुनही बाहेर बराच उजेड आहे. मी जलाशयाच्या किनार्‍यावर एक चक्कर मारून येण्याचे ठरवतो. सूर्य माझ्या मागे अस्ताला जातो आहे. दिवसाचे शेवटचे किरण आता शांत झालेल्या पाण्यावर पडत आहेत. माझ्या अगदी बरोबर समोर मार्सेमिक ला व त्याच्या पलीकडे चिनी सैनिकांनी 1962 मध्ये बळकवलेले, पर्वत दिसत आहेत. एकंदर देखाव्याच्या भव्यतेमुळे मी अगदी निशब्द होतो व अनिमिष नेत्रांनी तो देखावा बघत राहतो. असाच काही वेळ गेल्यावर माझ्या एकदम लक्षात येते की वार्‍याचा जोर बराच वाढला आहे व माझी माकडटोपी पुरेशी वाटत नाहीये. माझ्या विन्ड चीटरचे हूड मी डोक्यावर ओढून घेतो व कॅम्पकडे परततो.

रात्री 9 वाजता भोजनासाठी उभारलेल्या एका खास शामियान्यात रात्रीचे भोजन दिले जाते. हा शामियाना अतिशय उबदार आणि सुखकारक आहे. आत टेबलांच्या लांब रांगा व बसायला खुर्च्या मांडलेल्या आहेत. जेवण अगदी गरमागरम व रूचकर आहे. या अशा वैराण जागी व पॅनगॉन्ग जलाशयाच्या शेजारी, संपूर्ण भारतीय जेवण एवढ्या लोकांना द्यायचे म्हणजे एक अद्भुत करामतच आहे असे मला वाटते. कॅम्पचे व्यवस्थापन व सेवकवर्ग अतिशय अदबशीर व काळजीने वागणारा वाटतो आहे. मी माझ्या खोलीकडे परत असताना सहज आकाशाकडे माझे लक्ष जाते. आकाश तेजस्वी तार्‍यांनी नुसते झळाळते आहे. खूप वर्षांनी असे तेजपुंज तारे मला बघायला मिळत आहेत. मी सप्तर्षी व ब्रम्हहृदय या सारखे काही तारे सहज ओळखतो. पण आता बाहेर चांगलेच थंडगार झाले आहे आणि मला ही थंडी फारशी सहन होत नाहीये. मी खोलीकडे परततो व पांघरूणात शिरतो. माझ्या गादीवर येथे दोन गालिचे पसरलेले आहेत. त्या मधे शिरले की थंडी पळून जाते. अंथरूण पांघरूणाची ही लडाखी पद्धत मला एकदम पसंत पडते. कॅम्प मधले दिवे दहाला बंद होतात. मी झोपेच्या अंमलाखाली कधी शिरतो ते मला कळतही नाही.

(क्रमश🙂

28 ऑगस्ट 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “लडाख डायरी- भाग 6

 1. sunder varnan ahe evdya unchiwar bhartat ek motha jalasha ahe prathamch samajle.
  Dhanyawad

  Posted by anil | ऑगस्ट 29, 2011, 10:54 सकाळी
  • अनिल –

   प्रतिसादाबद्दल धन्यवाद. लडाख मधे या जलाशया सारखे आणखी जलाशय, जगातली सर्वा ऊंचीवर असलेली खिंड व त्यातून जाणारा रस्ता यासारखी अनेक ठिकाणे आहेत की जी बघण्यासारखी आहेत. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर लडाखला एकदा तरी भेट द्यावी असे मी म्हणेन.

   Posted by chandrashekhara | ऑगस्ट 30, 2011, 8:36 सकाळी
 2. Chandrashekharji – Your posts are extraordinary. I read your articles over and over but still do not feel satisfied. Always look for your new post.
  Best Regards
  Vishwas Deshpande

  Posted by Vishwas Deshpande | जून 19, 2012, 8:05 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: