.
Travel-पर्यटन

लडाख डायरी – भाग 5


रविवार

सकाळी डोळे उघडल्यावर लक्षात येते की खिडकीवर सारलेल्या पडद्यांच्या बाजूंनी लख्ख सूर्य प्रकाश आत खोलीत येऊ पाहतो आहे. घड्याळ बघितले तर फक्त सहा वाजलेले आहेत. पण बाहेरचा उजेड बघून मी अंथरूणातून उठतोच. खिडकीवरचा पडदा बाजूला करून बघितले तर भारतातील कोणत्याही खेडेगावात दिसेल तसाच देखावा येथेही बाहेर दिसतो आहे; हिरवीगार शेते, धूळ किंवा चिखलाने भरलेले रस्ते, चरण्यासाठी नेली जाणारी गुरेढोरे, शेळ्याबकर्‍या वगैरे वगैरे. फरक एवढाच आहे की हे सर्व तसेच असून सुद्धा येथे कमालीचे सुंदर दिसते आहे. हॉटेलच्या इमारतीच्या बाजूने सुंदर फुलझाडे लावलेली आहेत त्यात असंख्य प्रकारचे गुलाब पण आहेत. एकूण दृष्य बघितल्यावर मनाला प्रसन्न वाटते आहे हे मात्र खरे! रात्रीही फारशी थंडी नव्हती व त्यामुळे झोप चांगली लागली. सध्या मी सकाळी उठल्यानंतर पहिले काय करतो तर माझ्या कॅमेर्‍याच्या बॅटर्‍या चार्ज झाल्या आहेत की नाही ते बघतो. आज तर बॅटर्‍या फुल चार्ज झालेल्या दिसत आहेत. म्हणजेच रात्रभर वीज असली पाहिजे. वीज आहे हे बघितल्यावर मी बॉयलर चालू करतो आणि मस्तपैकी कडकडीत पाण्याने आंघोळ करून घेतो.

रोजची आन्हिके आटोपून तयार झाल्यावर, मी बाहेर येतो. बाहेरची हवा खूपच आरामदायी आहे हे लक्षात आल्याने मी फिरायला जाण्याचे ठरवतो. वीस पंचवीस वर्षांपूर्वी, पुणे शहर जेंव्हा आजच्यासारखे गजबजलेले नव्हते तेंव्हा सकाळी फिरायला जाणे जसे आल्हादकारक वाटत असे तसेच आज मला येथे हुंडर गावात वाटते आहे. रस्त्यावर गर्दी, वाहने, हॉर्नचे आवाज यातले काहीच नसल्याने मोठ्या आरामाने रस्त्यावरून चालत जाता येते आहे. रस्त्याच्या दोन्ही कडांना झाडी असल्याने उन्हे अजून रस्त्यावर उतरलेलीच नाहीत. पुढे एक साकव दिसतो त्यापाशी जाऊन मी थांबतो. एक अतिशय निसर्ग सुंदर असा झरा येथून वाहताना दिसतो आहे. वरच्या बाजूला रस्त्याच्या कडेला असणारी झाडे जरा पांगल्यासारखी झाली आहेत. तेथून समोर बघितल्यावर एक खूपच ऊंच असलेला पर्वत नजरेसमोर येतो आहे. या पर्वताच्या माथ्यावर एक पांढर्‍या शुभ्र रंगात रंगवलेली बौद्ध मठाची इमारत आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे हा हुंडरचा मठ असला पाहिजे. या मठाच्या बरोबर मागे उत्तुंग असे एक बर्फाच्छादित शिखर आहे. पूर्वेकडून येणारे सोनेरी किरण या शिखरावर पडल्याने ते नुसते चमचमते आहे. मी स्तब्ध उभा राहतो व निसर्गाची ही किमया अनिमिष नजरेने बघतच रहातो.हुंडरमधला एक नैसर्गिक झरा

हिमाच्छादित शिखराच्या पार्श्वभूमीवरील हुंडर मठ

हुंड्रर मधील गोम्पा

हुंडर मोनॅस्ट्री

हॉटेलवर परत येतो ना येतो तोच नाश्ता तयार असल्याची सूचना मिळते. खमंग भाजलेले कुरकुरीत टोस्ट, ऑमलेट व ऍप्रिकॉट जॅम असा नाश्ता समोर आल्याने तब्येतीने मी तो खातो. एवढ्यात काल भेटलेल्या मोटर सायकल चमूमधील महिला पुढारी मला परत एकदा हॅलो म्हणते. ही मंडळी आता लेहला जायला निघाली आहेत. मात्र खारडुंग ला वरून न जाता ते डिगार ला रस्त्याने जाणार आहेत. या खिंडीची उंची कमी असली तरी रस्ता बराच लांबचा पडतो. मात्र श्योक नदीच्या काठाने आणखी काही मैल प्रवास करता येतो. आम्ही पण जाण्यासाठी तयार असल्याने, लेहच्या परतीच्या प्रवासाला निघतच आहोत. आमचा पहिला थांबा या हुंडर गावाच्या जरा बाहेर असलेल्या रूपेरी वाळूच्या वाळवंटावर आहे.आमची गाडी परत एकदा श्योक नदीच्या खोर्‍यामधल्या वाळवंटी भागातून जाते आहे. श्योक नदीचे हे खोरे मात्र अफाट मोठे आहे. या खोर्‍याच्या पूर्व बाजूस, साल्टोरो पर्वतराजीचे पर्वत व बर्फाच्छादित शिखरे एखाद्या सम्राटाच्या दरबारातल्या रूबाबात उभी आहेत तर पश्चिमेला म्हणजे आम्ही प्रवास करतो आहोत त्या बाजूला लडाख पर्वतराजीचे लालसर पिवळट वाळूचे महाकाय डोंगर उभे आहेत. या दोन्ही पर्वत रांगामध्ये, अगदी डोंगराच्या तळाला असलेल्या गर्द झाडीपर्यंत, हे चंदेरी रेतीने भरलेले खोरे पसरलेले आहे. येथे सतत वाहत असलेल्या सोसाट्याच्या वार्‍याने, या चंदेरी वाळूवर मोठमोठ्या लाटा तयार झाल्या आहेत.श्योक व्हॅली

दोन कुबडांचे बॅक्ट्रियन ऊंट

टुंडुप दूरवर दिसत असलेल्या ऊंटांच्या एका मोठ्या तांड्याकडे माझे लक्ष वेधतो. एखादे बालक बसावे त्या पद्धतीने आपले मागचे पाय दुमडून हे उंट उन्हात आराम करत बसलेले आहेत. या ऊंटांना बॅक्ट्रियन ऊंट या नावाने ओळखले जाते यांच्या पाठीवर दोन कुबडे असतात व उंचीलाही थोडेसे बुटके असतात. हे ऊंट लडाख मध्ये कसे आले असावेत याबद्दल निरनिराळी मते आहेत. एका मतप्रवाहाप्रमाणे कुषाण राजा कनिष्क याने इ..नंतरच्या पहिल्या शतकात चिनी तुर्कमेनिस्तान वर केलेल्या स्वारीमधे त्याच्या सैनिकांबरोबर हे ऊंट गांधार देशातून (सध्याच्या पाकिस्तानचा खैबर जवळचा भाग) येथे प्रथम आले असावेत. अनेक स्त्री पुरुष व मुले या ऊंटांच्यावरून या वाळवंटात सफर करताना दिसतात. मात्र मला ऊंटावर बसण्यात काहीच रूची नसल्याने आम्ही पुढे निघतो. थोड्याच अंतरावर असलेले डेस्किट गाव ओलांडून आमची गाडी यू टर्न घेते व एका चढणीच्या रस्त्याला लागते. बरीच ऊंची चढून गेल्यावर एक वाहन तळ लागतो. टुडुंप गाडी थांबवतो. मी खाली उतरून बघितल्यावर लक्षात येते की डेस्किटच्या मठापर्यंत जाण्यासाठी किमान पाचशे फूट तरी ऊंची चढून जावे लागणार आहे. ही चढण चढणे हे खरोखरच मोठे जिकिरीचे काम आहे. ऊंचावर चढून तर जावे लागतेच पण पाषाणात कोरलेल्या पायर्‍या सुद्धा ऊंच म्हणजे काही ठिकाणी तर दीड फूट उंचीच्या आहेत. लडाखच्या विरळ हवेत जरा चार सहा पायर्‍या चढले की दमायला व धापा टाकायला होते. हळूहळू, मधे थांबत थांबत मी वर जाण्यात यशस्वी होतो. डेस्किटचा मठ चढून जाणे ही आपल्या शारिरीक क्षमतेची एक कसोटीच आहे असे म्हटले तरी चालेल. मधे थांबलेलो असताना, समोरून येणारी एक युवती मला अजून किती चढून जायचे आहे म्हणून विचारते. मी तिला अंतर थोडेच उरले आहे असे सांगतो व तिने ही चढण उत्तम रित्या पार केली आहे असे माझे मत तिला देतो. ती हसते व माझ्याकडे बघून तुमच्या वयाला, मला नाही वाटत की मला एवढी चढण चढता येईल.” असे प्रत्युत्तर कॉम्प्लिमेंट देते. आम्ही दोघेही उरलेली चढण चढायला जरा जास्त जोमाने लागतो.हुंडर मधून दिसणारी सॉल्टोरो रिज

डेस्किटचा हा मठ शेराब झांगपो या धर्मगुरूंनी इ.. 1420 मध्ये स्थापन केलेला आहे. या मठाच्या रचनेत सर्वात वरच्या पातळीला दोन कक्ष आहेत. या दोन कक्षांमध्ये एका बाजूने उघडा असलेला एक व्हरांडा आहे. या व्हरांड्याच्या दर्शनी भिंतीवर चारी दिशांचे रक्षक राजे असलेल्या दिक्‍पालांची चित्रे रंगवलेली आहेत. तिथे असलेले एक लामा मला सांगतात की ही सर्व चित्रे इथल्या पर्वत उतारांवर मिळत असलेल्या निरनिराळ्या रंगाच्या खनिजांची पूड करून त्या रंगांनी रंगवलेली आहेत. चित्रांच्यात मुख्य रंग लाल, निळा व जांभळा हेच दिसतात. उजव्या बाजूचा कक्ष म्हणजे जुने दुखांग आहे. या कक्षातील प्रमुख देवता जरा उग्र स्वरूपातील म्हणजे आपल्या कालीमातेसारखी आहे. आहे. गोनकर या नावाने या देवतेला ओळखले जाते. एका मोंगोल आक्रमकाचा कलम केलेला हात या देवतेच्या हातात दाखवलेला असतो.खनिजांपासून बनवलेल्या रंगातील दिक्पालांची चित्रे

वस्त्रांच्छादित देवता गोनकर

बुद्धाचे चित्र असलेले वॉल हॅन्गिन्ग

तिबेटमधील मठाची चित्रे असलेले वॉल हॅन्गिन्ग

मैत्रेय मूर्ती

डेस्किट मठातील लामा

या कक्षात काही अत्यंत दुर्मिळ अशी वॉल हॅन्गिंग्ज लावलेली आहेत. ही तिबेट मधल्या एका मठांमधली असल्याने अत्यंत महत्वाची मानली जातात. उजव्या बाजूचा कक्ष म्हणजे नवे दुखांग आहे. यात आतल्या भिंतीमधे असलेल्या मोठ्या कोनाड्यात, काचेच्या मागे मैत्रेयाची मूर्ती आहे. दोन्ही बाजूंना असलेल्या भिंतीमध्ये असलेल्या काचेच्या कपाटांत जुन्या पोथ्या व हस्तलिखिते नीट मांडून ठेवलेली आहेत. समोरच बसलेले एक लामा माझे स्वागत करतात. आम्ही या मठाबद्दल आणि बौद्ध धर्म, महायान व हीनयान हे पंथ यांबद्दल माझ्या मनात असलेल्या काही शंकांबद्दल बोलतो. लडाखला आल्यापासून धार्मिक आणि इतर गोष्टींबद्दल बरेच ज्ञान व माहिती असलेले व त्या बद्दल बोलू इच्छिणारे हे पहिलेच लामा मला भेटत आहेत. त्यामुळे माझ्या मनातल्या बहुतेक शंकांचे निरसन ते करू शकले आहेत.श्योक व्हॅलीचा देखावा

डेस्किट मठामधून दिसणारा ग्रॅन्ड स्टॅन्ड देखावा

डेस्किटचा मठ

मैत्रेय पुतळा

मी बाहेर येतो व समोर असलेल्या गच्चीत जाऊन उभा राहतो. श्योक व नुब्रा नद्यांचा संगम व त्याचा परिसर माझ्या नजरेसमोर उलगडतो आहे. या जागेवरून दिसणार्‍या देखावा इतका अजोड आहे की या पूर्वी, नजरेच्या एका टप्प्यामधे, इतका भव्य व विशाल परिसर, मी कधी बघितलेलाच नाही व पुढे कधी बघू शकेन असे मला वाटत नाही. अगदी जवळच्याच एका स्वतंत्र डोंगरावर, आसनस्थ मैत्रेय बुद्धाचा एक भव्य पुतळा मला दिसतो आहे. त्याच्या मागे पसरला आहे एक अथांग वैराण प्रदेश. माझ्या उजव्या व डाव्या बाजूंना, लडाख पर्वतराजीचे आणि समोरच्या बाजूला काराकोरम पर्वतराजीचे, ऊंचच ऊंच असे पर्वत उभे आहेत. त्यांच्या मागे आणखी ऊंच असलेली हिमशिखरे, आपला मिजास दाखवत आहेत. आणि या सर्वांच्या मध्ये अस्तावस्तपणे पसरले आहे एक वाळवंट! या वाळवंटात मधून मधून दिसते आहे पांढरी शुभ्र रुपेरी वाळू! तर काही ठिकाणी पांढरसर दिसणारे दगड आणि गोटे!. मधून मधून रानटी झाडे झुडपे परिसराला थोडी हिरवी छटा देत आहेत. हा सर्व देखावा पाहून माझ्या मनासमोर येतो आहे एक पूर्वी कधीही न कल्पलेला असा एक विशाल व उघड्या हवेतील नाट्यमंच! या नाट्यमंचावर नाटक सादर करणार आहेत हे पर्वतराज. एखाद्या सम्राटाच्या दरबाराच्या सीन असावा त्याप्रमाणे या सर्व पर्वताराजांनी मंचावर आपापले स्थान ग्रहण केलेले आहे. आता एन्ट्री व्हायची आहे फक्त सम्राटाची. उशीर होत असल्याने आत्यंतिक नाराजीने, मी तो भव्य देखावा सोडून खाली उतरण्यास सुरूवात करतो. डाव्या हाताला एक छोटा स्टॉल दिसतो. त्यात की चेन, लॉकेट्स या सारख्या गोष्टी विकत मिळत आहेत. डेस्किटची आठवण म्हणून मीही थोडीफार खरेदी करतो. परतीच्या रस्त्यात पुन्हा एकदा मला कालपासून माझ्याशी लपंडाव खेळत असलेले ते बर्फाच्छादित हिमशिखर दिसते. यावेळेस मात्र आमचे स्थान व त्या स्थानाची साधारण उंची यावरून ते हिमशिखर कोणते असेल याचा अंदाज मला बांधता येतो. ते शिखर नक्कीच 22273 फूट उंचीचे अरगनग्लास कांगरी हे शिखर आहे. आम्ही खलसर गावात पोचेपर्यंत 1 वाजायला आलेलाच असल्याने जेवणासाठी येथेच थांबूया असे टुंडुप सुचवतो व आम्ही मान्य करतो. खलसर गावात दोन चार बर्‍यापैकी रेस्टॉरंट्स आहेत. त्यातील एकात मी शिरतो व मला आवडलेले ठुकपा सूप व नूडल्स ऑर्डर करतो.नुब्रा व्हॅलीतील रानफुले

निळ्या फुलांची रान झुडुपे

नुब्रा व्हॅलीला आल्यापासून मी टुंडुपला सांगतो आहे की इथल्या रानफुलांचे फोटो मला काढायचे आहेत. परंतु आतापर्यंत तशी संधीच मिळालेली नाही. खलसर गावाच्या जरा आधी एक खळखळाट करत वाहणारा एक जलप्रवाह आहे. या ओढ्याच्या एका अंगाला निळी फुले आलेली दोन झुडपे मला दिसतात मी त्याचे फोटो काढतो. टुंडुपच्या मताने या झुडपांचे नाव बुर्टसे असे आहे. मी कोठेतरी वाचलेले मला एकदम स्मरते की हे बुर्टसे झुडुप अगदी बर्फाळ परिस्थितीमध्ये सुद्धा पेट घेते व प्रवासी याचा उपयोग पूर्वी अन्न पेये गरम करण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी करत असत. अर्थात ते बुर्टसे झुडुप हेच खरोखर आहे का? हे नक्की सांगणे मला शक्य नसल्याने मी टुंडुपचे मत मान्य करून टाकतो.

भोजन झाल्यावर आम्ही परत एकदा खारडुंग ला ओलांडण्यासाठी निघालो आहोत. खरे सांगायचे तर माझ्या मनात थोडी निराशेची भावना आहे. नुब्रा व्हॅलीच्या या सफरीवर येताना माझ्या मनात आशा होती की कोठेतरी मला काराकोरम पर्वतराजीच्या दादा शिखरांपैकी काही बघायला मिळतील. पण एक अरगनग्लास कांगरी शिखर सोडले तर बाकी एकही हिम शिखर मला दिसू शकलेले नाही. गेल्या दोन दिवसात मी अगणित पर्वत रांगा व हिम शिखरे बघितली आहेत. पण नुब्रा किंवा श्योक व्हॅली या समुद्रसपाटीपासून सुमारे 10000 फूट उंचीवर असल्याने 23 किंवा 24 सहस्त्र फूट उंच असलेली हिम शिखरे, जवळ अंतरावर असलेले पर्वत माझ्या दृष्टीरेषेत आडवे येत असल्याने मला दिसणे शक्यच नाहीत. त्यामुळे थोड्याशा निराश मन:स्थितीतच मी परत खारडुंग ला ओलांडायला निघालो आहे.

मात्र खारडुंग ला माथ्यावर पोचल्यावर आश्चर्याने तोंडात बोट घालायचेच फक्त राहिले आहे. काल या स्थानावर आम्ही होतो तेंव्हा येथे हिम वर्षाव होत होता. जमीन, आजूबाजूचे डोंगर उतार कडे हे सर्व बर्फाने माखलेले होते. जोरदार वारा वहात होता आणि कडाक्याची थंडी होती. आज या सगळ्या गोष्टींचा मागमूसही कोठे दिसत नाहीये. चक्क कडक ऊन पडले आहे आणि थंडी असली तरी बेताचीच आहे. रस्त्यावर बाजूला काही अतिउत्साही तरूण क्रिकेट खेळत आहेत. मी गाडीतून खाली उतरतो व या खिंडीच्या उत्तरेच्या बाजूच्या टोकापर्यंत चालत जातो. समोर दूर अंतरावर, कालपासून मी बघण्याचा प्रयत्न करत असलेली, दक्षिण काराकोरम पर्वतराजीमधली दादा शिखरे, सूर्याच्या सोनेरी किरणांत झळाळत, माझ्यासाठीच एका रेषेत उभी आहेत. एक अत्यंत दुर्मिळ असे दृष्य दाखवून लडाखच्या निसर्ग देवतेने माझ्यावर केवढा कृपा वर्षाव केला आहे हे मी मनोमनी जाणतो व ही शिखरे कोणती असतील याचा अंदाज बांधायला सुरूवात करतो. डाव्या अंगाला दिसणारी 3 शिखरे म्हणजे सासेर कांगरी I, III II आहेत हे लगेच लक्षात येते. त्याच्या उजवीकडे दिसणारी दोन शिखरे बहुधा छुशकु कांगरी व चमशेन कांगरी आहेत. आणि सर्वात उजवीकडे दिसणारे शिखर नक्कीच मला काल पासून बर्‍याच वेळा दिसलेले अरगनग्लास कांगरी हेच आहे. काही थोडे गिर्यारोहक बघू शकत असलेल्या शिखरांचे दर्शन मला घडवून आणल्याबद्दल मी लडाखच्या निसर्ग देवतेचे मनापासून आभार मानतो. माझा मूड आता बदलूनच गेला आहे. समोर दिसणार्‍या व भारतीय सैन्यदल चालवत असलेल्या कॅफेटेरिया मधे मी शिरतो. तिथला मोफत चहा तर मी पितोच पण तिथे विक्रीस असलेल्या वस्तूंपैकी काही आठवण वस्तू व टी शर्टस मी खरेदी करण्यास विसरत नाही. खारडुंग ला येथे दिलेल्या दोन्ही भेटी मी आता या जन्मात विसरणे शक्य नाही.दक्षिण काराकोरम पर्वतराजीमधली दादा शिखरे ; खारडुंग ला वरून

खारडुंग खिंदीतून दिसणारा दक्षिणेकडचा देखावा

खारडुंग ला मधले क्रिकेट

लेहला मी संध्याकाळच्या पाच वाजण्याच्या सुमारास पोचलो आहे. आजच्या दिवसाचे माझे एक महत्वाचे काम अजून बाकी आहे. लेहमधे आल्यापासून इथल्या स्टेट बॅंकेच्या एटीएम मशीन मधून मला रोख रक्कम काढायची आहे. परवाच्या अनुभवामुळे वेळ न गमावता मी बाजारात जातो. येथे स्टेट बॅंकेची दोन एटीएम यंत्रे आहेत. तिथे पोचल्यावर लक्षात येते की रविवार असला दोन्ही मशीन्स समोर भले थोरले क्यू आहेत. दुसरा काही पर्यायच नसल्यामुळे मी क़्यूमधे जॉइन होतो. तिथे उभे राहिल्यावर माझ्या असे लक्षात येते की प्रत्यक्षात येथे दोन क्यू आहेत. एक स्त्रिया व परदेशी पाहुणे यांच्यासाठी तर दुसरा बाकीच्यांसाठी. क्यू मधे उभे असलेल्या बहुतेक स्थानिकांच्या हातात 3/4 तरी एटीएम कार्डे दिसत आहेत. आलिया भोगासी असावे सादर! असे मनात धरून मी एक सुस्कारा सोडतो व शांतपणे उभा राहतो. जवळ जवळ 2 तास उभे राहिल्यावर मला एटीएम केबिन मधे शिरता येते. बाकी सर्व ठिकाणी या केबिन मधे एका माणसाला जाता येते. परंतु येथे कसलाच धरबंध नाहीये व आत 8 ते 10 माणसे उभी आहेत. आणखी 15/20 मिनिटे गेल्यावर माझी पाळी येते. मी मशीन समोर उभा राहिल्यावर मशीन कार्य करत नसल्याची पाटी समोर दिसू लागते. मी अक्षरश: कपाळाला हात लावून घेतो. पण करण्यासारखे काहीच नसल्याने, खरेदी परवावर ढकलून, मला हात हलवत हॉटेलवर परत येण्यावाचून गत्यंतरच नसते. लेहला जाऊ इच्छिणार्‍यांसाठी माझी कळकळीची सूचना आहे की तुम्हाला अवश्यक ती सर्व रक्कम रोख न्या. लडाखमधे रोख रकमेशिवाय दुसरे कोणतेच चलन चालत नाही.

या एटीएम व्यायामामुळे आज माझ्या पायाचे तुकडे पडल्यासारखे वाटते आहे. रात्रीचे भोजन लवकरच उरकून मी पांघरूणात गडप होतो. उद्या आम्ही पॅनगॉन्ग लेकला जाण्यासाठी निघणार.

( क्रमश: )

17 ऑगस्ट 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: