.
Travel-पर्यटन

लडाख डायरी- भाग 4


शनिवार

शाळेमधे आपण जो भूगोल शिकतो त्यात भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तरेला असलेल्या हिमालय पर्वताने अत्यंत अभेद्य अशी एक तटबंदी आपल्या उत्तर सीमेवर उभी केलेली आहे ही गोष्ट आपल्याला पक्की शिकवली जाते. शाळेत शिकवलेला हा भूगोल, भारताचा ईशान्य व उत्तर भाग लक्षात घेतला तर अगदी बरोबरच आहे. मात्र लडाख ज्या प्रदेशाचा एक भाग आहे, तो भारतीय उपखंडाचा वायव्य विभाग लक्षात घेतला तर परिस्थिती थोडी भिन्न आहे हे लगेच लक्षात येते. या वायव्य सीमेवर, शाळेत शिकल्याप्रमाणे, हिमालयाची तटबंदी तर आहेच पण या शिवाय आणखी तीन महाविशाल अशा पर्वतीय तटबंद्या, हिमालय व मध्य एशिया यांच्यामधे पसरलेल्या आहेत. या सर्व पर्वतीय तटबंद्या किंवा पर्वतराजी, साधारण आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे, एकमेकाला समांतर अशा पसरलेल्या आहेत. हिमालयाकडून मध्य एशियाकडे एखाद्याने प्रवास करायचा ठरवला तर त्याला हिमालयाचाच भाग मानला जात असलेली पीरपंजाल ही पर्वतराजी प्रथम आडवी येते. यानंतर झान्स्कर पर्वतराजी, लडाख पर्वतराजी व अखेरीस काराकोरम पर्वतराजी या एका पाठोपाठ एक अशा आडव्या येतात. या सगळ्या पर्वतराजी ओलांडल्याशिवाय मध्य एशिया मध्ये प्रवेश करणे शक्य नसते. या पर्वतराजींच्या मध्ये ज्या दर्‍या निर्माण झालेल्या आहेत त्यात अर्थातच मोठ्या नद्यांची खोरी निर्माण झालेली आहेत. या सर्व नद्या कोणत्यातरी एका हिमनदापासून उगम पावतात व अखेरीस सिंधू नदीला जाऊन मिळतात. पीरपंजाल व झान्स्कर या पर्वतराजींच्या मधे असलेल्या खोर्‍यातून झान्स्कर नदी वाहते व या खोर्‍याला झान्स्कर खोरे असे नाव आहे. झान्स्कर व लडाख पर्वतराजींमधे सिंधू नदीचे खोरे आहे. लेह हे शहर याच खोर्‍यात वसलेले आहे. लडाख व काराकोरम या पर्वतराजींमधे श्योक व नुब्रा या नद्यांची खोरी आहेत

हा सगळा शाळकरी भूगोल मी आज का आठवत बसलो आहे याला एक कारण आहे. मी आज नुब्रा व्हॅलीला जाण्यासाठी निघणार आहे आणि आपल्याला जिथे जायचे आहे तिथली माहिती लक्षात असली की एकूण बरे पडते असा माझा पूर्वानुभव आहे. माझा नवा ड्रायव्हर टुंडुप त्याची इनोव्हा गाडी घेऊन आताच आला आहे. अगदी किडकिडीत अंगयष्टी असलेला हा नवा चालक एकंदरीत माहितगार व उत्साही दिसतो आहे आणि मधून मधून चक्क हसतो आहे. आमच्या आधीच्या चालक महाशयांच्या कपाळावरची आठी तीन दिवसात गेल्याचे कधी न दिसल्याने, हा बदल मला नक्कीच स्वागतार्ह वाटतो आहे. कदाचित त्यामुळेच आज निघताना मी बराच उत्साही आहे.

खारडुंग ला कडे जाणारा रस्ता

आमची गाडी लेह शहर सोडून उत्तरेला जाणार्‍या रस्त्याने निघाली आहे. शहराच्या बाहेर पडल्याबरोबरच रस्त्याला खडा चढ सुरू झाला आहे. नुब्रा व्हॅलीकडे जाताना पहिला अडथळा कोणता येत असेल तर लेहच्या उत्तरेला असलेली लडाख पर्वतराजी ओलांडण्याचा. या पर्वतराजीतील बहुतेक शिखरे, 19000 ते 20000 फुटावर असल्याने ही पर्वतराजी ओलांडण्यासाठी फक्त 3खिंडीतील मार्ग उपलब्ध आहेत. यापैकी पहिली खिंड म्हणजे वारी ला. परंतु या खिंडीत मोटर गाडी जाऊ शकेल असा रस्ताच नाही. मोटरगाड्या जाऊ शकतील अशी दुसरी खिंड दिगार गावाजवळ आहे व त्यामुळे या खिंडीला दिगार ला असे नाव आहे. ही खिंड तशी कमी उंचीवर म्हणजे 17720 फूट उंचीवर आहे. परंतु लेह मधून निघाले तर या खिंडीतला रस्ता घेण्य़ासाठी बरीच लांबची चक्कर पडते. लेह च्या सर्वात जवळ असलेली खिंड म्हणजे खार्डुंग ला! ही खिंड 18380 फुटावर असल्याने या खिंडीतून जाणारा रस्ता, मोटरगाड्या जाऊ शकणारा जगातील सर्वात उंच रस्ता म्हणून प्रसिद्ध आहे.

आमची गाडी हळूहळू हा खडा चढ चढते आहे. जसजसे आम्ही वर जातो आहोत तसतसे, एखाद्या वाळवंटातील मरूस्थलाप्रमाणे दिसणारे हिरवेगार लेह, आकाराने छोटे छोटे होत चालले आहे. आता मला फक्त दिसतो आहे माझ्या सभोवती चहूबाजूंना पसरलेला लालसर पिवळट वाळूचा समुद्र. समुद्रात लाटा उठाव्यात तशा या वाळूच्या समुद्रात दिसत आहेत, वेडेवाकडे पसरलेले, अनेक चढ आणि उतार.

यातले काही चढ तर इतके खडे आहेत की हे चढ न कोसळता जागेवर स्थिर कसे राहू शकतात? याबद्दल मनात शंका निर्माण व्हावी. युगानुयुगे या पर्वत उतारांवरून, प्रत्येक हिवाळ्यात बर्फाचे थर घसरत खाली येत असल्याने हे उतार काही वेळा इतके पॉलिश केल्यासारखे दिसतात की डोंगर उतारांच्या रस्त्यावरून आपण गाडीतून चाललो आहोत हे विसरायलाच होते. या सगळ्या विजनवासात, गाडीच्या समोरच्या काचेतून दिसणारा डांबरी रस्ताच फक्त तुम्हाला विश्वास देत रहातो की तुम्ही अजून एकविसाव्या शतकातल्या नागरी जीवनातच आहात. गाडी एक यू टर्न घेते. एक क्षणभरच मला लेहचा हिरवा ठिपका दिसतो व नाहीसा होतो. त्यामुळे आपण लेहपासून बरेच अंतर पार करून आल्याची जाणीव मला होते आहे. तसे पहायला गेले तर खारडुंग ला लेहपासून फक्त 35 किलोमीटर अंतरावरच आहे.

समोरच्या बाजूस एका सपाट जागेवर, पत्र्याच्या थोड्या शेड्स व काही वाहने मला दिसतात. या जागेला साऊथ पल्लू असे नाव असले तरी प्रत्यक्षात ते एक सैनिकी चेक पोस्ट आहे. या रस्त्याने जाणार्‍या प्रत्येक वाहनाची व त्यातील प्रवाशांची येथे तपासणी केली जाते. आमचा चालक टुंडुप खाली उतरतो व आमचे इनर लाइनपरवाने तपासणीसाठी देतो. नुब्रा व्हॅली किंवा चॅन्गथांग सारख्या भागात जाऊ इच्छिणार्‍या सगळ्या प्रवाशांना हे परवाने घ्यावे लागतात. तुमचा वाहन चालवण्याचा परवाना किंवा व्होटर्स कार्ड या सारखे फोटो कार्ड तुमच्याजवळ असले की फारशी कटकट न होता हे परवाने तुम्हाला लेह मधल्या स्थानिक अधिकार्‍यांकडून मिळू शकतात. माझ्या ट्रॅव्हल एजंटनेच हे परवाने मला काढून दिले आहेत.

इंडिया गेट

थोड्या दिरंगाई नंतर आम्ही आता पुढे निघालो आहोत. टुंडुप दूर उंच क्षितिजावर दिसणार्‍या एका रेडिओ टॉवर कडे माझे लक्ष वेधतो. खारडुंग खिंड तेथे आहे. टुंडुप एकदम हसतो आणि कोणत्याही भारतीयाला जबरदस्त मजा वाटेल अशी एक बातमी मला देतो. त्याच्या मताने खारडुंग खिंडीत सध्या हिम वर्षाव होतो आहे. बहुतेक भारतीयांसाठी हिमवर्षाव ही सिनेमात किंवा चित्रात दिसणारी गोष्ट असते. काही जणांचे नातेवाईक परदेशात स्थायिक झालेले असतात. त्यांच्याकडून वर्णन ऐकलेले असते. परंतु स्वत: भारतात हिमवर्षाव अनुभवणे आणि ते सुद्धा भर उन्हाळ्यात, हा एक अतिशय दुर्मिळ असाच अनुभव म्हणावा लागेल. जसजसे आम्ही वर जातो आहोत तसतसा आमच्या गाडी समोर दिसणारा रस्ता आता जास्त जास्त खराब होत चालला आहे. गाडी पुन्हा एकदा यू टर्न घेते. रस्त्याच्या बाजूला एक पत्र्याची शेड आहे. त्या शेडमधे एक जेसीबी मशीन व एक बुलडोझर तैय्यार स्थितीत ठेवलेले दिसत आहेत. या रस्त्यावर कधीही व कोठेही दुर्घटना घडू शकत असल्याने, सैनिकी पद्धतीने त्यांनी यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे. समोर रस्त्यावर एक गंमतीदार दृष्य दिसते आहे. रस्ता करताना मधे आलेला एक डोंगर पहाड तोडून हा रस्ता बनवलेला आहे. त्या पहाडाच्या दोन्ही बाजूचा कडा एखाद्या विशाल द्वाराचे बाजूचे खांब दिसावेत तशा अवस्थेत ठेवल्या गेल्या आहेत. या द्वाराला इंडिया गेट असे मोठे समर्पक नाव बॉर्डर रोड्स संस्थेच्या इंजिनीयर्सनी दिलेले आहे. आता रस्ता कोरडा दिसत नाहीये.

हिमवर्षाव

खारडुंग ला जवळ

बर्फ वितळल्यामुळे पाण्याचे ओघळ रस्त्यावरून वाहताना दिसत आहेत. समोर एक पाटी दिसते. त्यात सूचना दिलेली आहे की आता पुढचा रस्ता कच्चा आहे. जिथे जिथे पाण्याचा मोठा प्रवाह येतो आहे तिथे पीव्हीसीचा एक मोठा पाईप रस्त्याखाली गाडून तो प्रवाह रस्त्यावर न येता पाणी खालून वाहून जाईल अशी व्यवस्था केलेली आहे. गाडी पुन्हा एक वळण घेते आणि रस्ता एकदम धुक्यातच बुडून जातो. आम्ही आता हिम वर्षावाच्या भागात पोचलो आहोत. गाडीच्या समोरच्या काचेवर हिम भुरभुरते आहे. पातळ पोह्यांसारखे दिसणारे हिमखंड काचेवर पडून त्यांचे पाणी होते आहे. मी बाजूची काच खाली करून हात बाहेर काढतो. हातावर पडणारे हिम हा एक मोठा गंमतीदार अनुभव वाटतो आहे. पण बाहेर चांगलेच गार आहे हे लक्षात आल्याने मी काच परत बंद करून घेतो. आतापर्यंत सतत समोर दिसणारा कोणत्या ना कोणत्या पर्वत उताराचा भाग एकदम नाहीसा झाला आहे. समोर ढग व धुक्याने गच्च भरलेले आकाशच एकदम दिसू लागले आहे. आम्ही जगातील सर्वात ऊंच व मोटरगाडी जाऊ शकणार्‍या अशा रस्त्यावर म्हणजेच 18380 फुटावर पोचलो आहोत. अशा परिस्थितीत आणि हवेत सुद्धा, खार्डुंग ला वाहने व माणसे यांनी भरलेले आहे. मी बरोबर आणलेला विन्ड चीटर व टोपी चढवतो व बाहेर पडतो. समोरच जगातील सर्वात उंच स्थानावर आहोत असा दावा करणारा एक कॅफेटेरिया आहे. तेथे चहा व फराळाचे जिन्नस विकले जाताना दिसत आहेत. मी गरम गरम चहा व बिस्किटे घेतो. तिथल्या थंडीत चहा पिण्याची लज्जत काही औरच न्यारी आहे हे नक्की. मी बाहेर येतो व जमिनीवर आताच पडलेल्या बर्फावर चालण्यातली मजा अनुभवतो. पायाखाली असलेले बर्फ चालताना कुरकुर चुरचुर आवाज करते. जवळच एक दुकान देखील आहे. खारडुंग ला ची आठवण म्हणून काहीतरी वस्तू व टी शर्टस येथे विकत मिळतात. मी या दुकानाला परतीच्या वेळी भेट द्यायची ठरवतो.

जगातील सर्वात जास्त उंचीवर असलेला कॅफेटेरिया

खारडुंग ला वरून खाली उतरण्याचा रस्ता

नॉर्थ पल्लू

खाली उतरण्याचा प्रवास तसा शांतपणे पार पडतो. खाली तळाला आल्यावर टुंडुप बाजूच्या एका मोठ्या रमणीय अशा स्थानाकडे बोट दाखवतो. त्याच्या मताने जे पर्यटक स्वत:चे पॅक्ड भोजन बरोबर घेऊन येतात ते इथे भोजन करतात. आम्ही पुढे जातो व खारडुंग गावात जेवण करण्यासाठी थांबतो. तिथे दोन तीन बरी रेस्टॉरंट्स दिसत आहेत. मी रोटी आणि एक भाजी मागवतो आणि प्यायला कोक. तिथली वेट्रेस मला मोमोखाऊन बघा असे सुचवते. मोमो किंवा मुकमुक हे करंजीच्या आकाराचे मोदक असतात. आत मटण किंवा वाळवलेल्या भाज्या व चीज घालून ते उकडलेले असतात. माझ्या जेवणाला आलेली ही लडाखी चव जरा मजा आणते. माझ्या शेजारील टेबलवर बसलेल्या एक बाई मला विचारतात की मी काय ऑर्डर केले आहे? मी त्यांना या मोमोज बद्दल सांगतो. नंतर जेवताना त्यांच्याबरोबर मी चार शब्द बोलतो. छाया भट्टाचार्यहेसनेर या बाई, भारतीय वंशाच्या व मूळच्या कलकत्याच्या असल्या तरी त्यांचे पती जर्मन असल्याने सध्या जर्मनीत रहातात. दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयाशी त्या संबंधित आहेत. भारतीय इतिहास, संस्कृती व कला या विषयांवर बरेच संशोधन केल्याचे त्या सांगतात. सध्या त्यांना राष्ट्रीय संग्रहालयाने टागोर नॅशनल फेलोशिप, लडाखी कलांचे अध्ययन करण्यासाठी दिली आहे व त्यासाठी लडाखच्या दौर्‍यावर त्या आल्या असल्याचे त्या मला सांगतात. मी सातवाहन राजांच्या बद्दल काही लेख लिहिल्याचे त्यांना सांगतो. त्यांनी पूर्वी या विषयावर काम केलेले असल्याने त्यांना या बद्दल बरीच रूची आहे असे दिसते.

जेवण करून आता आम्ही परत पुढे निघालो आहोत. खारडुंग ला चा बर्फ, थंडी वगैरे आता मागे पडले आहे व परत एकदा लडाखचा भाजणारा सूर्य तळपू लागला आहे. बाजूचे दृष्य आता परत वाळवंटी प्राकृतिक झाले आहे. पर्वतांची उंची येथे जरा कमी वाटते आहे मात्र तुटलेल्या कड्यांनी निर्माण झालेल्या दर्‍या, इतक्या खोल आहेत की आत डोकावून बघायला सुद्धा भिती वाटावी. हळूहळू आम्ही लडाख पर्वतराजीच्या पायथ्याच्या टेकड्यांशी पोचतो आहोत. आजूबाजूला बारक्या निळ्या फुलांनी फुललेली खुरटी झुडुपे पण दिसू लागली आहेत. गाडी परत एकदा वळते आणि लांबवर एका पाठोपाठ असलेल्या अनेक पर्वत मालिकांच्या मधे असलेल्या व्ही आकाराच्या खिंडीतून, मला एका पूर्णपणे बर्फाच्छादित असलेल्या व अतिशय ऊंच अशा पर्वत शिखराचे क्षणभरच दर्शन होते. हे शिखर काराकोरम पर्वतराजीमधल्या कोण्यातरी पर्वताचे असले पाहिजे हे माझ्या लक्षात येते. मी माझ्या जवळचे नकाशे वगैरे बघतो पण हे कोणते शिखर असावे या बद्दल मला कोणताच अंदाज बांधता येत नाही कारण आता हे शिखर परत एकदा पुढच्या बाजूस असलेल्या पर्वत रांगांच्या मागे लपून गेले आहे. गाडी परत एकदा एक यू टर्न घेते. आता माझ्या डोळ्यासमोर उलगडतो आहे एका नदीच्या खोर्‍याचा भव्य देखावा. या नदीच्या खोर्‍याच्या दुसर्‍या बाजूला आहे एक विशाल आणि उत्तुंग पर्वत राजी. नदीचे खोरे मात्र अगदी सपाट दिसते आहे. मधून मधून पांढरट गोलसर आकाराच्या दगडगोट्यांनी भरलेले तर मधून मधून पांढर्‍या रेतीचे पॅचेस. या सगळ्या मधून वाहणारी नदी एखाद्या जाड स्केच पेनची वेडीवाकडी, जाड, बारीक, स्पष्ट, अस्पष्ट रेषा कागदावर उमटावी तशी दिसते आहे. ही नदी म्हणजे लोअर श्योक नदी आहे असे टुंडुप मला सांगतो. या नदीच्या पात्रात मधून मधून हिरवे ठिपके पॅचेस दिसत आहेत. आम्ही जसजसे खाली येतो आहोत तसतसे या हिरव्या पॅचेसचे हिरवीगार वनश्री व पत्र्याच्या शेड्स असलेल्या खेडेगावांच्यात रूपांतर होते आहे.

लडाख पर्वतराजीच्या पायथ्याच्या टेकड्या

खालसर गाव; श्योक नदीचे खोरे

आता आम्ही नदीच्या पात्राच्या पातळीला आलो आहोत. नदी इतकी वेडीवाकडी वळणे घेते आहे की एका क्षणाला अगदी जवळ भासणारा प्रवाह, गाडी जरा पुढे गेली की लांबवर गेल्यासारखा वाटतो आहे. आता समोर खालसर हे गाव दिसते आहे. येथे सैनिकी ठाणीही आहेत. टुंडुप रस्त्याच्या कडेला मोकळी जागा बघून गाडी थांबवतो. मी खाली उतरतो व समोरचा कल्पना सुद्धा करता येणार नाही एवढा भव्य दिसणारा देखावा बघत राहतो. नदीच्या खोर्‍याच्या पलीकडे एक विशाल व उत्तुंग अशी पर्वतराजी दिसते आहे. ही पर्वतराजी मला गेली 49 वर्षे बघायची होती. काराकोरम पर्वतांबद्दल मी प्रथम ऐकले होते 1962 साली. त्या वर्षीच्या 22 ऑक्टोबरला, वर्तमानपत्रांच्यात अगदी त्रोटक स्वरूपात असलेल्या बातम्या आल्या होत्या, चीनने भारतावर केलेल्या आक्रमणाबद्दल! या काराकोरम पर्वतराजीमध्ये काराकोरम खिंड म्हणून ऐतिहासिक महत्व असलेली खिंड आहे. या खिंडीजवळच असलेल्या दौलत बेग ओल्डी या ठाण्याजवळच्या सैनिकी चौक्यांवर, चिनी सैनिकांनी हल्ला चढवला होता. ही काराकोरम खिंड नेहमीच भारत व चिनी तुर्कमेनिस्तान (सध्याचे शिंजियांग) यांच्या सीमारेषेवरचे महत्वाचे स्थान म्हणून मानली गेलेली आहे. त्या वेळेला काराकोरम पर्वत व ही खिंड याबद्दल माहिती मिळवण्याचा मी बराच अयशस्वी प्रयत्न केला होता. माझ्याकडे रीडर्स डायजेस्ट या संस्थेचा एक ऍटलास होता. तो बघून मी काराकोरम पर्वत व ही काराकोरम खिंड हे कसे दिसत असतील याची कल्पना करू शकत होतो. काही वर्षांनंतर बंगलोर विमानतळावर मी एक विचित्र दिसणारे विमान बघितले होते. पंखे( प्रॉपेलर्स) असलेल्या या विमानाच्या डोक्यावर एक जेट इंजिन बसवलेले होते. हे विमान तर फेअरचाइल्ड पॅकेट आहे हे मी ओळखू शकलो होतो. त्या वेळेस हिंदुस्थान एअरॉनॉटिक्स या कंपनीत काम करणार्‍या मित्राने मला अशी माहिती दिली होती की काराकोरम मधल्या दौलत बेग ओल्डी येथील विमानतळावर हे विमान उतरवता यावे म्हणू त्याला हे खास जेट इंजिन बसवले गेले होते. दौलत बेग ओल्डी किंवा काराकोरम खिंड बघणे मला कधीच शक्य होणार नसल्याने निदान काराकोरम पर्वतराजी जरी बघता आली तरी बघावी अशी सुप्त इच्छा माझ्या मनात गेली इतकी वर्षे होती. 1965 मध्ये कश्मिर खोर्‍यात काही महिने मला राहण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी मी लडाखला येण्याचा खूप प्रयत्न केला होता. परंतु सैनिक सोडून बाकी कोणालाही लडाखला जाण्याची परवानगीच मिळू शकत नसल्याने मला काहीच करता आले नव्हते. लडाख पर्यटकांसाठी 1974 मध्ये प्रथम खुला करण्यात आला होता.

यामुळेच, खालसर गावाजवळ, श्योक नदीच्या किनारी असलेल्या त्या रस्त्याच्या कडेला उभे राहून समोरची उत्तुंग पर्वतराजी बघताना मला अनेक वर्षांपासून मनात असलेली एक सुप्त इच्छा पूर्ण झाल्याचे आंतरिक समाधान मिळत होते व एकूणच लडाखला आल्याचे चीज झाल्यासारखे वाटत होते. या खालसर गावाच्या जरा पुढे श्योक आणि नुब्रा या नद्यांचा संगम आहे. ही नुब्रा नदी आपल्या सर्वांना परिचित असलेल्या सियाचिन हिमनदातून जन्म घेते. आम्ही सध्या प्रवास करत असलेला रस्ता श्योक नदीच्या डाव्या किनार्‍यावर आहे आणि हा रस्ता सरळ हुंडर गावाकडे जातो. माझ्या बेताप्रमाणे मला श्योक नदी ओलांडून नुब्रा नदीच्या डाव्या किनार्‍याला जायचे आहे त्यामुळे तिरिथ गावाजवळ असलेला व उजवीकडे जाणारा फाटा घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. समोर एक सस्पेन्शन पद्धतीचा लोखंडी पूल दिसतो आहे. या पुलाजवळ सैनिकांचा कडक बंदोबस्त आहे कारण नुब्रा नदीच्या खोर्‍यात जाण्याचा हा एकुलता एक मार्ग आहे. आमची गाडी या पुलाजवळ थांबते. पुन्हा एकदा इनर लाईन परवाने वगैरे तपासणी होते व आम्हाला पुढे जाण्याची परवानगी मिळते.

नुब्रा नदीच्या खोर्‍यातला हा भाग नितांत सुंदर आहे. नदीचे पात्र आणि हा रस्ता यांच्यामध्ये गर्द झाडी आहे. हिरवी गार शेते, जरदाळूच्या बागा, पॉपलर व विलोचे वार्‍यावर डुलणारे वृक्ष हे सगळे इतके रमणीय आहे की येथेच थांबावे असे वाटत रहाते. रस्ता मात्र तसा अरूंदच आहे. समोरून वाहन आले की वेग कमी करावा लागतो. समोरून येणारी बहुतेक वाहने ही सैनिकी आहेत. या रस्त्यावर आम्हाला लागलेले पहिले गाव म्हणजे सुमुर! या गावातल्या बागा मोठ्या नयनमनोहर दिसत आहेत. येथून पुढे रस्ता एकदम चढा आहे. आम्ही एका छोट्याशा टेकडीवर चढतो आहोत. मात्र डाव्या हाताला नुब्रा नदीचे पात्र आता आमच्याच दिशेने येताना दिसते आहे. अगदी शेजारून वाहणार्‍या या नुब्रा नदीचे, सियाचिन हिमनदातून येणारे, पाणी मात्र मातकट दिसते आहे. टुंडुपच्या मताने हे पाणी एकदम मचूळ लागते.

नुब्रा नदीच्या खोर्‍यातील फुललेली रानटी झुडुपे

नितांत सुंदर पॅनामिक परिसर

नदीच्या पलीकडच्या काठावर एक हिरव्यागार वनश्रीत डुबलेले गाव दिसते. टुंडुप या गावाचे नाव मुर्गी किंवा चिकन आहे असे सांगतो व आपल्याच विनोदावर हसतो. रस्त्याच्या कडेला अनेक रानटी झुडपे दिसत आहेत. या सर्व रानटी झुडपांवर आता फुलोरा फुललेला आहे. निळी, गुलाबी, जांभळी अशी फुले या रानवट झुडपांवर उमललेली आहेत.

मुर्गी गावाच्या आणखी थोडे पुढे आल्यावर परिसर एकदम बदललाच आहे. माळराने मागे पडून सगळीकडे हिरवी शेते, मोहरीची फुले, जरदाळूच्या बागा आणि इतर वृक्ष दिसू लागले आहेत. टुंडुपच्या सांगण्याप्रमाणे, आमचे पोचण्याचे पॅनामिक गाव आता जवळ आले आहे. गाडी, पुढे जाणारा मुख्य रस्ता सोडून एका चढाच्या रस्त्यावर वळण घेते. हा मुख्य रस्ता पुढे सासोमा आणि सियाचिन बेस कॅम्प यांच्याकडे जातो. ही दोन्ही ठिकाणे अगदी निराळ्या कारणांसाठी महत्वाची मानली जातात. थोडे वर चढून आल्यावर आमची गाडी, काही थोड्या गाड्याच मावू शकतील अशा एका मोकळ्या जागेवर थांबते. मी खाली उतरून थोड्या पायर्‍या चढून वर जातो. पॅनामिकच्या, भूगर्भातून येणार्‍या गरम पाण्याच्या प्रसिद्ध झर्‍यांजवळ मी आता पोचलो आहे.

लडाखच्या या ट्रिपचा बेत जेंव्हा मी आखला होता तेंव्हा पॅनामिक गावाला मला जाता येईल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. हे नुब्रा नदीचे खोरे अगदी अलीकडेच पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. येथे येणारे बहुतेक लोक इथले गरम पाण्याचे झरे बघण्यासाठी येतात. माझ्या दृष्टीने मात्र या पॅनामिक गावाचे ऐतिहासिक अस्तित्व सर्वात महत्वाचे आहे.

गेली तीन हजार वर्षे तरी पॅनामिक गाव हे लेहहून चिनी तुर्कमेनिस्तान मधल्या यारकंड व काशगर या शहारांकडे जाणार्‍या व्यापारी काफिल्यांसाठी, शेवटचे नागरी सुविधा असलेले स्थान होते. या ठिकाणी हे व्यापारी काफिले, अन्नधान्य व प्रवासासाठी लागणार्‍या इतर वस्तू, जनावरांसाठी वैरण वगैरे गोष्टी खरेदी करत असत. पुढे कश्मिर दरबारने येथे या काफिल्यांच्या सोईसाठी खास व्यवस्था सुरू केली होती. हवे असल्यास येथे खेचरांसारखी जनावरे व त्यांचे मालक करारावर मिळत असत. त्याचप्रमाणे चिनी तुर्कमेनिस्तान मधून येणार्‍या काफिल्यांसाठी, एका अत्यंत दुर्गम व वैराण प्रदेशातून प्रवास करून आल्यावर, पॅनामिक स्थान हे विश्रांती व शरिराचा शीण घालवण्याचे एक ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. पॅनामिक हे गाव या काफिल्यांच्या उन्हाळी मार्गावरचे किंवा तबिस्तान वरचे गाव होते. पॅनामिक वरून पुढे गेल्यावर हे काफिले सासोमा गावापर्यंत (15 किमी.) पुढे जात व नंतर एका नदीच्या घळीतून उजवीकडे वळून मी सध्या उभा आहे ती पर्वतरांग चढण्यास सुरूवात करून सर्वात अवघड आणि जीवघेण्या सासेर खिंडीकडे रवाना होत.

चिनी तुर्कमेनिस्तान मधे राहणारे व ज्यांना हाज किंवा मक्का यात्रा करायची आहे अशा हजारो किंवा लाखो मुस्लिमांनी मागच्या हजार वर्षात याच मार्गाने मक्केचा प्रवास केलेला आहे. हे सर्व यात्रेकरू किंवा काफिल्यातील व्यापारी, हे पॅनामिक येथे थांबून तेथील गरम पाण्याच्या झर्‍यात आपले श्रम विसरत असत. एकोणिसाव्या शतकात, यारकंडच्या सुलतानाने, मध्य एशियामधील एक अत्यंत हुशार रस्ते बांधणी तज्ञ अली हुसेनयाला सासोमा जवळच्या अरूंद घळीत रस्ता बांधण्यासाठी पाठवले होते. अगदी आता आतापर्यंत हा रस्ता वापरात होता.

1889च्या उन्हाळ्यात, भारतातील तत्कालिन ब्रिटिश सरकारचे परराष्ट्र खात्याचे सचिव मॉर्टिमर ड्यूरांड यांनी फ्रान्सिस यंगहजबंड या तरूण सेनाधिकार्‍याला, काराकोरम सीमेपार असलेल्या प्रदेशात, या काफिल्यांवर होत असलेल्या लुटारू हल्ल्यांची चौकशी व गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी पाठवले होते. आपल्या वन्डर्स ऑफ हिमालयाज्या पुस्तकात या अधिकार्‍याने पॅनामिक गावामधे रशियन व अफगाणी काफिल्यांशी झालेल्या आपल्या भेटीचे वर्णन केले आहे.

चीन मधील सुप्रसिद्ध रेशीम मार्गावरील सर्वात थोर उत्खनन शास्त्रज्ञ, सर ऑरेल स्टाइन यांना 1908 मध्ये फ्रॉस्टबाईट झाले होते. त्यांचा पाय व जीव वाचवण्यासाठी त्यांना चिनी तुर्कमेनिस्तान मधून काराकोरम खिंड मार्गाने भारतात आणले गेले होते. या प्रवासाचे वर्णन त्यांनी आपल्या रुइन्स ऑफ डेझर्ट कॅथेया पुस्तकात केले आहे. त्यात आपल्यावर उपचार करण्यासाठी पॅनामिक गावात रेव्ह. एस. श्मिड्ट लेहहून स्वत:ची तब्येत बरी नसताना कसे आले होते व त्यांच्या वेळेत केल्या गेल्या उपचारामुळे आपला पाय कसा वाचला याचे सविस्तर वर्णन केले आहे. 1937 मध्ये सुप्रसिद्ध गिर्यारोहक एरिक शिप्टन यांनी या विभागाचे सर्वेक्षण केले होते. एक सुपिक व्हॅली असे ते पॅनामिकचे वर्णन करतात.

मी आता उभा आहे त्या स्थानापासून दिसणारा परिसराचा देखावा खरोखरच अवर्णनीय आहे. मी उभा आहे ती पर्वतांची रांग काराकोरम पर्वतराजीचा एक प्रमुख भाग आहे व ती सासेर मुझताघ पर्वतराजी या नावाने ओळखली जाते. ही पर्वतराजी येथून थेट चिनी सीमेपर्यंत जाते. या पर्वतराजीमधले एक प्रमुख शिखर, सासेर कांगरी 2(25170 फूट) मी उभा आहे त्याच्या बरोबर पूर्वेकडे, 25 किलोमीटरवरच आहे. अर्थात मी 10000 फुटावर उभा असल्याने, मला हे पर्वत शिखर दिसणे शक्यच नाही. मात्र समोरच्या बाजूस मला अनेक बर्फाच्छादित शिखरे दिसत आहेत. समोर दिसणारी पर्वतांची रांग ही अतिशय प्रसिद्ध अशा साल्टोरो पर्वतराजीचे दक्षिणेकडचे शेपूट आहे. ही पर्वतराजी, पत्यक्षात सासेर मुझताघ पर्वतराजीला (ज्यावर मी उभा आहे) चिनी सीमेवरच्या, इंदिरा कॉल या स्थानापाशी (जिथून सियाचिन हिमनद उगम पावतो) जाऊन मिळते. त्यामुळे या दोन पर्वतराजींनी तयार केलेल्या एका लघुकोनीय व्हॅलीमधून प्रथम सियाचिन हिमनद व नंतर नुब्रा नदी हे वहात येतात.

पॅनामिक मधून दिसणारा साल्टोरो रिजच्या दक्षिण शेपटाचा देखावा

वर निर्देश केलेल्या फ्रान्सिस यंगहजबंड यानेच आपल्या आधीच्या एक मोहिमेत, या सियाचिन हिमनदाच्या उगमाचे, इंदिरा कॉल हे स्थान व नुब्रा नदीचे हे खोरे (वॉटर शेड) शोधले होते व त्यावरून इंदिरा कॉल हा नैसर्गिक रित्या तयार झालेला भारत व चीन यांच्या सीमारेषेवरचा बिंदू आहे हे सिद्ध केले होते.

या साल्टोरो पर्वतराजीचा उत्तर भाग हा भारताच्या संरक्षण व व्यूहात्मक धोरणांच्या दृष्टीने असलेला एक अत्यंत महत्वाचा भाग समजला जातो. एखाद्या खंजिराच्या आकाराचा असलेल्या या भागामुळे भारताचे दोन उपद्रवी शेजारी पाकिस्तान व चीन हे या भागात एकमेकापासून दूर ठेवले जातात. 1984 मध्ये एक अत्यंत महत्वाचे व्युहात्मक धोरण म्हणून, ‘ऑपरेशन मेघदूतया नावाने केलेल्या एका चढाईत, भारताने या पर्वतराजीचा कबजा घेतला. ही पर्वतराजी व याच्यामधे असलेल्या दोन खिंडी या जगातील सर्वात उंच लढाईचे मैदान म्हणून ओळखल्या जातात. 1980 च्या दशकात येथे मोठ्या प्रमाणात युद्धे खेळली गेली. साल्टोरो पर्वतराजीला आणखी एक अनन्यसाधारण महत्व आहे. काराकोरम खिंडीतून मध्य एशिया बरोबर भारताला भविष्यात कधीही व्यापारी संबंध ठेवायचे असले तर या साल्टोरो पर्वत रांगेवर भारताचा कबजा असणे आवश्यकच आहे.

या विचार चक्रात गुंग होऊन मी उभा असल्याने शेजारी असलेल्या एका स्टॉल वरची एक लडाखी मुलगी मला चहा पाहिजे आहे का? असे विचारते आहे? याकडे माझे आधी लक्षच जात नाही. मी तिला एक कप चहा द्यायला सांगतो. चहा अगदी गरम व छान आहे. तो पीत असताना माझ्या लक्षात येते की सूर्य जरा जास्तच तळपतो आहे आणि उन्हात उभे रहाणे तितकेसे आरामदायी वाटत नाहीये. त्या लडाखी मुलीचा स्टॉल एका निळ्या प्लॅस्टिकच्या खाली आहे. त्या प्लॅस्टिकच्या खाली मी शिरतो. तिथल्या छायेत थंड वाटते आहे. मी उभा आहे त्याच्या बर्‍याच वर उष्ण पाण्याचे झरे आहेत. हे पाणी पाट बांधून खाली आणलेले आहे. या पाटाचा तळाचा थर पिवळाधम्मक दिसतो आहे. मी या तळाचा एक तुकडा खरवडून निघतो का ते बघतो. हा पिवळा थर म्हणजे प्रत्यक्षात शेवाळ्याचा थर आहे. या शेवाळ्यावर गंधकाचे क्षार बसून पिवळा रंग निर्माण झालेला दिसतो आहे. चहाचा स्टॉल चालवणारी लडाखी मुलगी मी गरम झर्‍यात स्नान करणार का म्हणून मला विचारते आहे. मी तिला एकदम हो म्हणतो. टॉवेल्स तिच्याकडेच उपलब्ध आहेत. लडाखच्या शासनाने येथे मोठी सुरेख स्नानगृहे बांधली आहेत. टाईल्स बसवलेली ,स्वच्छ व मोठी अशी ही स्नानगृहे आहेत. गरम पाणी एका शॉवरमधून येते आहे. गेली 2 किंवा 3 हजार वर्षे मध्य एशिया व त्याच्या पलीकडे असलेल्या रशियामधून आलेल्या असंख्य वाटसरूंनी या स्थानावर स्नान केलेले आहे. त्यांच्या यादीत माझा पण आता समावेश करायला हरकत नाही.

पॅनमिक गरम झर्‍याच्या पाण्यासाठी काढलेल्या पाटातील तळाचा पिवळा साका

आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. तिरिथ जवळचा सस्पेन्शन पूल ओलांडल्यावर आम्ही उजवीकडे वळतो व श्योक नदीचे खोरे एका काठापासून दुसर्‍या काठापर्यंत ओलांडायला सुरूवात करतो. हा सबंध भाग पांढरट दगडगोटे व पाणथळ जमीन यांनी व्यापलेला आहे. रस्ता अगदी सपाट व सरळ असल्याने, टुंडुप स्पीड रेसिंगची आपली हौस भागवून घेतो आहे. दुसर्‍या काठाला पोचल्यावर, रस्ता थोडा वर चढतो आहे. एका यू टर्नवर सकाळी दिसलेले बर्फाच्छादित उंच शिखर परत एकदा मला दर्शन देते. मला अजूनही ते कोणते असावे या बद्दल काहीच अंदाज बांधता येत नाहीये.

नयनमनोहर श्योक व्हॅली

काराकोरम मधले एक अनामिक शिखर

आम्ही डिस्कीट गाव पार करून पुढे जातो. आता आम्ही पांढर्‍या शुभ्र वाळूच्या प्रदेशात शिरलो आहोत. बाजूला दिसणार्‍या वाळूवर, वार्‍यामुळे मोठा लाटा निर्माण झालेल्या आहेत तर एका बाजूला उंट पण दिसत आहेत. वारा आमच्या बाजूला वहात असल्याने उडणारी रूपेरी वाळू रस्त्यावर येऊन रस्ता दुधाळ रंगाचा बनवते आहे. एकाच दिवशी हिम वर्षाव व आता वाळूचे वादळ दर्शवणारा लडाखचा निसर्ग म्हणजे एक अजबखानाच मला वाटतो आहे. तेवढ्यात माझे लक्ष मागे जाते. दूर मागे आकाशात काळे ढग जमा झाले आहेत आणि पावसाचा शिडकावा होतो आहे आणि वर आकाशात एक पूर्ण अर्धवर्तुळाकृती दुहेरी इंद्रधनुष्य झगमगते आहे.

हुंडरमधली रानफुले

शेवटी आम्ही आमचे आजचे मुक्कामाचे ठिकाण असलेल्या हुंडर गावात शिरतो आहोत. प्रथम हिमवर्षाव, मग वाळूचे वादळ आणि इंद्र धनुष्य यानंतर हुंडर गाव म्हणजे संपूर्ण विरोधाभास आहे. गर्द झाडी, ठिकठिकाणी वाहणारे लहानमोठे झरे, जरदाळूच्या बागा, मोहरीची शेते, गाई, शेळ्या आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांच्यावर फुललेली सुंदर रानटी फुले. माझे डोके तर चक्रावूनच गेले आहे. आमची गाडी स्नो लेपर्ड गेस्ट हाऊस समोर उभी राहते. हे हॉटेल मोठे सुंदर आहे. सभोवती फुललेली फुले बघत मी माझ्या खोलीकडे जातो. खोली बघितल्यावर मी जरा नाराजच झालो आहे. तशी खोली आरामशीर, उबदार आहे शेजारील टॉयलेटही स्वच्छ व ठीक आहे. परंतु ही खोली हॉटेलमधली सर्वात जुनी खोली आहे हे एकूण बांधणीवरून दिसते आहे. मी माझी नाराजी झटकून टाकतो व गावात चक्कर मारायला निघतो. माझे हॉटेल म्हणजे सगळा घरगुती कारभार आहे. रात्रीचे जेवण मालकांच्या पत्नीनेच बनवलेले आहे. जेवण रुचकर व चविष्ट आहे. नेहमीच्या रोट्यांऐवजी गहू आणि बार्ली यांच्यापासून बनवलेल्या छोट्या भाकर्‍या आहेत. हा पदार्थ मी प्रथमच खातो आहे. मी जेवत असताना भोजन गृहात फटफट्या किंवा मोटरसायकल्स वरून प्रवास करणारे 15 बायकर्स व त्यांची गाईड व लीडर असलेली एक स्त्री हे जेवायला आत शिरतात. ही मंडळी गेले 2 दिवस हॉटेलात मुक्कामासाठी आहेत हे समजल्यावर मला जुनाट खोली का मिळाली आहे याचे रहस्य उमगते. ते बीअर मागवतात व त्यानंतर मोटर सायकल्स बद्दलच बोलत रहातात. जेवणानंतर त्यांच्या गाईड व लीडर असलेल्या बाई गप्पा मारायला येतात. या बाई व त्यांची टोळी हे हिमालयात गेला महिनाभर त्यांच्या फटफट्यांवरून फिरत आहेत. भारतात फिरायला रॉयल एनफिल्डसारखी दुसरी फटफटी नाही असे तिचे मत ती ठासून मला सांगते आहे.

मी खोलीत येतो व काही मिनिटातच निद्राधीन होतो.

क्रमश:

7 ऑगस्ट 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

8 thoughts on “लडाख डायरी- भाग 4

 1. Farach chan sunder varanan vachayla milale, best wishes for your next journy

  Posted by anil | ऑगस्ट 8, 2011, 4:48 pm
  • अनिल –

   धन्यवाद. लडाख अतिशय निसर्ग रमणीय आहे हे खरेच आहे. त्यामुळे तिथले वर्णन करणे हे सुद्धा मनाला आनंद देऊन जाते.

   Posted by chandrashekhara | ऑगस्ट 9, 2011, 9:32 सकाळी
 2. श्री चंद्रशेखरजी
  लडाख डायरी भाग – ४ लेख वाचला , लेख खूप छान लिहीला आहे . तुमची लिहीण्याची हातोटी छान आहे . तुम्ही एक उत्तम प्रवासवर्णन लेखक आहात ह्यात वाद नाही . लडाख बद्दल माझे ही कुतूहल जागृत झाले आहे. जर भविष्यात शक्य झाले तर लडाख व लेह ला भेट द्यायला आवडेल . तुम्ही ह्या भारतिय भूभागाची नव्याने ओळख करून दिलीत . आम्ही लेह , लडाख ह्यांच्या बद्दल फक्त वर्तमान पत्रातच वाचतो तेही चिन पाकीस्तान संबधात सैनिकी बातम्यांबद्दल . हा इतका सुंदर परिसर आहे . हे तुमच्या लेखांवरून कळाले . लेह , लडाख मधील काही गावे मी तुमच्या लेखात वाचली व त्यांची छायाचित्रे ही बघितली बघून जानवले की ही गावे अतिशय दुर्गम अशा पट्ट्यात आहेत . काही ठिकाणी तर २० ते २५ घरे मिळून गाव तयार झालेले दिसते . मला आश्चर्य वाटते की ते लोक कसे राहत व जगत असतील . त्यांचा नोकरी व्यवसाय काय असेल . ते काम काय करत असतील . त्यांचं उत्पन्न कीती असेल , आपल्या प्रमाणे तिकडे शहरी सुविधा नसतील कदाचीत मोबाईल , इंटरनेट . हॉस्पिटल्स . कारण तिकडची गांव अगदी सिंपल दीसतात . त्या लोकांबद्दल कुतुहल वाटतं एकूनच त्यांच्या लाईफस्टाइल बद्दल जाणून घ्यावसं वाटतय . आपल्याला शक्य झाले तर जरूर लिहा . मला तर तिकडच्या निसर्गाचा खूप मोह झालाय . तुमचे फोटो पाहिल्यावर वाटते की तिकडे राहायला निघून जावे स्वताची मोठी दुर्बीन व खगोल वेधशाळा उभारावी अन खगोलनिरिक्षणाचा आनंद लूटावा . तिकडचा भाग खूप उंच असल्यामूळे आकाशनिरिक्षन ही मजेदार होईल लाईट पोल्युशनचा प्रॉब्लेम येणार नाही .
  संदीप

  Posted by sandeep deokar | ऑगस्ट 8, 2011, 5:49 pm
  • संदीप –

   लडाख हे सध्या पर्यटकांसाठी एकदम हॉट डेस्टिनेशन बनले आहे. तरूण पर्यटकांना विमान प्रवास करण्याची काहीच आवश्यकता नसते. बहुतेक जण श्रीनगर ते लेह व लेह ते मनाली असा प्रवास रस्त्याने करतात. हा प्रवास खूपच कमी खर्चात हो ऊ शकतो. त्याचप्रमाणे लेहमधे जाऊन पुढील प्रवासाची व्यवस्था करणे पूर्ण शक्य आहे. पुण्या मुंबईच्या प्रवासी कंपन्यांची कॉस्ट ही बरीच जास्त असते.

   Posted by chandrashekhara | ऑगस्ट 9, 2011, 9:37 सकाळी
 3. लडाखमध्ये भारत-अफगाणिस्तान सीमेवरील पीरपंजाल पर्वतराजी, भारत-तिबेट सीमेवरील काराकोरम पर्वतराजी व चीन-तिबेट सीमेवरील नाव मला माहीत नसलेली पर्वतराजी या तीन पर्वतरांगा एकत्र आल्या आहेत. आपण दिलेली नावे लडाखमधील स्थानिक नावे असावीत.

  Posted by मनोहर | ऑगस्ट 8, 2011, 10:21 pm
  • मनोहर –

   तुमच्या माहितीसाठी लडाखचा नकाशा देत आहे.
   https://i0.wp.com/www.mapsofindia.com/maps/jammuandkashmir/leh-ladakh-map.jpg
   लडाख मधल्या पर्वतराजींची नावे या नकाशावरून तुमच्या लक्षात यावीत. मी म्हटल्याप्रमाणे पीर पांजाल पर्वतराजी ट्रान्स हिमालयन रेन्ज म्हणूनही ओळखली जाते.

   Posted by chandrashekhara | ऑगस्ट 9, 2011, 9:43 सकाळी
 4. धन्यवाद ! चंद्रशेखरजी
  मला तुमच्या बद्दल ही जाणून घ्यावेसे वाटते . तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राशी निगडीत होतात , मी ही इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स ह्या विषयांशी संबधीत अध्यापणाचे कार्य करतो . आपण करत असलेल्या व्यवसायाबद्द्ल जरा विस्ताराने कळाले तर मला आनंद होइल . अर्थात आपली मर्जी असेल तर , आपण ज्या काळात अभियांत्रिकीची पदवी घेतली त्या काळात अभ्यासक्रम कसा होता . आत्ता कीती बदल झाला आहे . ह्याबद्दल मला आपले मत मोलाचे वाटते

  संदीप

  Posted by sandeep deokar | ऑगस्ट 9, 2011, 2:01 pm
  • संदीप –

   माझ्या व्यावसायिक आयुष्याबद्दल मी या ब्लॉगवर आव्हान या नावाने 3/4 पोस्ट लिहिली आहेत त्यावरून तुम्हाला थोडीफार कल्पना येऊ शकेल. मी ज्या काळात अभियांत्रिकीची पदवी घेतली तेंव्हा व्हॅक्यूम ट्यूब्ज किंवा व्हॉल्व्ह्ज हेच वापरात होते, ट्रा न्झिस्टर हा प्रकार नुकताच बाजारात आला होता. इंटिग्रेटेड सर्किट्स वगैरे फक्त परदेशी मासिकांतल्या चित्रातून आम्ही बघत असू. टेलेव्हिजन, व्हिडियो वगैरे फक्त वाचन करण्याच्या गोष्टी होत्या.
   त्या काळात व्यवसाय करणे हा गुन्हा करण्यासारखे वाटावे अशी बंधने होती. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारी परवानगी घ्यावी लागे. आयात वस्तू तर मिळत नसतच. भांडवलासाठी 20 किंवा 21 टक्के दराने कर्ज घ्यावे लागत असे. एकूण काय तर उद्योजकांसाठी काळ खूप कठिण होता.

   Posted by chandrashekhara | ऑगस्ट 10, 2011, 3:54 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: