.
Travel-पर्यटन

लडाख डायरी – भाग 3


शुक्रवार

आज सकाळी लवकरच जाग आली. काल रात्री लामायुरूमध्ये अगदी अनपेक्षितपणे चांगलीच थंडी पडली होती. तसे बघायला गेले तर लडाखमधे जुलै महिना हा वर्षातला सर्वात गरम महिना म्हणून समजला जातो. काल रात्री सारखी थंडी जर येथे जुलै महिन्यात पडत असेल तर इतर वेळी गोठून जाण्याचीच वेळ येत असेल असे मला वाटत रहाते. सुदैवाने आज सकाळी वीज तरी चालू आहे. मी लगेच गरम पाण्याचा बॉयलर सुरू करतो व मस्तपैकी कडकडीत गरम पाण्याने आंघोळ करून घेतो. खाली भोजन गृहात आज ब्रेकफास्टचा मेन्यू पण आवडीचाच असल्याने भरपूर ब्रेकफास्ट करून मी लेहला परतण्यासाठी तयार होतो. बाहेर आल्यावर लक्षात येते की आमचे चालक महाशय व गाडी हे दोन्ही बेपत्ता आहेत. आता मात्र या माणसाच्या बेभरंवशीपणाचा मला राग येऊ लागला आहे. वैतागून मी लेहला माझ्या ट्रॅव्हल एजंटला फोन लावतो. 15 मिनिटात चालक महाशय उगवतात. त्यांच्या एकूण अवतारावरून ते आताच जागृत अवस्थेत आलेले असावेत हे लक्षात येते. त्यांची सर्व आन्हिके उरकून ते तयार होईपर्यंत हात चोळत बसण्याशिवाय मला काहीच पर्याय नाही. चालक महाशयांबरोबर आज कोणत्या ठिकाणांना भेटी द्यायच्या याचा आराखडा ठरवण्याचा मी प्रयत्न करतो. परंतु त्या बेताला चालक महाशयांचे फारसे सहकार्य आहे असे मला दिसत नाही. एवढ्यात माझ्या ट्रॅव्हल एजंटचा एक स्थानिक सहकारी उगवला असल्याचे मला कळते. त्याला परिस्थिती विशद करून सांगितल्यावर सर्व काही सुरळीत झाल्यासारखे मला तरी वाटू लागते. लेहला परतताना आज चार स्थानांना भेट द्यायची हे चालक महाशय मान्य करतात. मी सांगेन त्या वेळेस व त्या ठिकाणी या चालकाने मला घेऊन जावे एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. त्या साठी या चालक महाशयांची मला विनवणी करावी लागते आहे हे काही मला पटत नाही. या मूर्ख माणसाची आज संध्याकाळी हकालपट्टी करून दुसरा चालक घ्यायचा असे मी माझ्या मनाशी नक्की ठरवतो.सिंधू नदीकाठी असलेले एक गाव

सिंधू नदीच्या काठावर असलेल्या सासपोल या गावापर्यंतचा आमचा प्रवास अगदी आरामदायी व बाहेर दिसत असणार्‍या सृष्टीसौंदर्यामुळे परत एकदा अतिशय नयन मनोहर होतो. या सासपोल गावाजवळ, सैनिकांनी बांधलेल्या एका लोखंडी पुलावरून, सिंधू नदी परत एकदा आम्ही ओलांडतो व या फाट्यापासून 7 किलोमीटर अंतरावर असणार्‍या आलचीगावाचा रस्ता आम्ही पकडतो. आलची गाव सिंधू नदीच्या डाव्या किनार्‍यावर वसलेले आहे. या गावाला आदर्श गाव समजले जाते. लामायुरूच्या मानाने या गावातली घरे, दुकाने व इतर जागा नीटनेटक्या, स्वच्छ आणि जरा आधुनिक स्वरूपाच्या वाटतात हे मात्र खरे! या गावात असलेला बौद्ध मठ, ‘धर्म चक्र मठम्हणून ओळखला जातो. लडाखमधले बहुतेक बौद्ध मठ पर्वत उतारावर, शक्य तितक्या उंच जागी बांधलेले असतात. मात्र आलची मठ हा नदीच्या पात्राजवळ असलेल्या एका उतरत्या प्रस्तरावर बांधलेला आहे. आमची गाडी या गावात असलेल्या मुख्य चौकात थांबते. या चौकात पर्यटकांच्या इतर व्हॅन्स, बसेस, या शिवाय दोन तीन मिनिट्रक पण उभे आहेत. त्यांच्यावरच्या सामानाची पण चढउतार चालू आहे असे दिसते.

आलची मठाकडे जाणारा रस्ता अनेक छोट्या दुकानांच्या मधून जातो. आपल्याकडे कोणत्याही देवस्थानाबाहेर जशी फुले, उदबत्या, प्रसाद विकणारी दुकाने ओळीने असतात तसाच हा प्रकार आहे. मात्र ही दुकाने असले पूजेचे साहित्य न विकता, पर्यटक ज्या शोभेच्या निरर्थक वस्तू खरेदी करत असतात त्या वस्तू विकताना दिसत आहेत. मी या दुकानांतून उगीचच एक चक्कर मारतो. कोरीव काम केलेल्या लाकडी किंवा तांब्यापितळेच्या वस्तू, भांडी, मूर्ती, मुखवटे, चित्रे, बांगड्या, खड्यांच्या माळा, ब्रेसलेट्स आणि बौद्ध प्रार्थना चक्रे सुद्धा, या सारख्या असंख्य वस्तूंनी ही दुकाने खचाखच भरलेली आहेत. या असल्या शोभेच्या वस्तू पुण्यामुंबईला पण सगळीकडे मिळतात. मला त्यांचे काहीच अप्रूप वाटत नसले तरी परदेशी पर्यटक मात्र सपाटून खरेदी करताना दिसत आहेत. मी पुढे निघतो. मठाकडे जाणारा रस्ता उतरत्या खडकावर असल्याने, पायर्‍या खोदून बनवलेला आहे. रस्त्याच्या कडेला एक उघडा पाट बांधलेला आहे. मात्र या पाटातून सांडपाणी वगैरे न जाता, पर्वत उतारावरून वहात येणारे अत्यंत स्वच्छ व शुद्ध पाणी, जोराने वाहते आहे. कोणालाही पिण्याचे पाणी हवे असले की या पाटात प्लॅस्टिक पाईप टाकायचा व खालच्या बाजूला पाणी भरायचे. या गावाने केलेली पाणी पुरवठ्याची ही पद्धत अगदी सोपी व सोईची आहे हे मात्र नक्की.

लामायुरू येथील मठाची संस्थापना ज्यांनी केली होती, तेच बौद्ध विद्वान, रिनचेन झांगपो यांनी, तिबेटच्या राजाच्या आज्ञेप्रमाणे, कश्मिरहून लडाखला आल्यानंतर, आलची येथील मठाचीही संस्थापना केलेली आहे. कदाचित त्यामुळे हा मठ बांधण्यासाठी कश्मिरहून कारागिरांना पाचारण केले गेले असावे. या कश्मिरी कारागिरांचा, या मठाच्या बांधणीवर आणि मुख्यत्वे लाकडी कोरीव कामावर उमटलेला ठसा अजुनही स्पष्टपणे दिसतो आहे. हा मठ म्हणजे एका पाठोपाठ बांधलेल्या व साधारण चौरस आकार असलेल्या 5 कक्षांची एक मालिका आहे असे म्हणता येते. हे कक्ष किंवा मंदिरे ही आलची गावापासून सुरुवात केली तर नदीच्या बाजूकडे म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे एका प्रस्तर उतारावर बांधलेली आहेत. हा मठ प्रथम काडमपा पंथाच्या अनुयायांचा होता. दलाई लामा यांच्या आज्ञेवरून लडाखमध्ये जेंव्हा गेलुग्सपा पंथाचा प्रसार झाला तेंव्हा येथील लामा व भिख्खू यांनी हा नवा पंथ स्वीकारण्याचे नाकारले व त्यामुळेच मूळ बांधणी व चित्रकला अजुनही मूळ पूर्वीचीच राहिलेली आहे. अर्थात सध्या हा मठ गेलुग्सपा या पंथाचेच अनुसरण करतो. मठातील पहिल्या मंदिराचे नाव सोमा लेखांगअसे आहे, परंतु हे एक लहानसे मंदिर असून आत फक्त एक स्तूप आहे. मला तरी तिथे फारसे बघण्यासारखे काही दिसत नाही.तीनमजली सुमत्सेक मंदिर

दर्शनी लाकडी जोडणीवरील कोरीव काम व बुद्ध मूर्ती

तुळयांच्या आधारावरचे कोरीव काम

सुमत्सेक मंदिरातील अवलोकितेश्वर मूर्ती

पायाखालच्या प्रस्तरात कोरलेल्या आणखी थोड्या पायर्‍या उतरत मी आणखी थोडा पुढे जातो. समोर एक तीनमजली मंदिर दिसते आहे. या मंदिराचे नाव आहे सुमत्सेक मंदिर‘. मंदिराच्या दर्शनी बाजूला जुनी लाकडी बांधणी आहे. ही मंदिरे अकराव्या शतकात बांधली गेली होती. म्हणजेच ही लाकडी बांधणी निदान नऊशे वर्षांपूर्वीची तरी आहे. ही लाकडी बांधणी, त्यावरचे कोरीवकाम, वक्राकार आकार दिलेल्या तुळया व वासे यावर असलेली भारतीय किंवा मुस्लिमपूर्व कश्मिर मधल्या वास्तुशिल्पाची छाप, स्पष्टपणे माझ्यासारख्या या विषयातील अनभिज्ञ माणसाला सुद्धा ओळखू येते आहे. सुमत्सेक मंदिराच्या अंर्तभागात, मध्यभागी एक स्तूप आहे. बाजूच्या तिन्ही भिंतींना मोठे कोनाडे काढलेले आहेत व त्यात मैत्रेय, अवलोकितेश्वर व मंजुश्री या बुद्धावतारांच्या मोठ्या आकारातल्या मूर्ती आहेत. मंदिर तीनमजली असले तरी वरच्या मजल्यावर जाण्यासाठी कोणताच जिना वगैरे ठेवलेला नाही. मात्र वरच्या मजल्यांच्या तक्तपोशींना मधे मोकळी जागा सोडलेली असल्याने , छतामधून झिरपणारा सूर्यप्रकाश थेट तळमजल्याच्या जमिनीपर्यंत पोचतो आहे. मी आणखी थोडा पुढे जातो. पुढे एक अंगणासारखा दिसणारा भाग आहे. या अंगणाच्या समोर व डाव्या अंगाला बैठ्या इमारती मला दिसतात. समोरची इमारत बहुदा भिख्खूंसाठी असलेले स्वैपाकघर आहे. तिथे असलेले दोन लामा गरम चहाचा एक पेला माझ्या हातात देतात. चहाची चव लडाखमध्ये सगळीकडे लागते तीच आहे गोड मिट्ट आणि दुधाळ. डाव्या बाजूला असलेले दोन कक्ष म्हणजे मंजुश्रीलोट्सायांची मंदिरे आहेत. दोन्ही मंदिरांच्या प्रवेशद्वाराच्या लाकडी चौकटींवर, बारकावे दाखवणारे कोरीव काम आहे. या कोरीव कामावरच्या नक्षीकामात, मधून मधून बुद्ध मूर्ती कोरलेल्या दिसतात. मंजुश्री मंदिराच्या आत बोधिसत्वाच्या मोठ्या प्लॅस्टरच्या मूर्ती आहेत तर रिनचेन झांगपो यांना समर्पित केलेल्या लोट्से मंदिरात, सोनेरी वर्ख चढवलेली बोधिसत्व शाक्यमुनी (गौतम बुद्ध) यांची मोठी मूर्ती आहे. लोट्सा मंदिराच्या प्रवेशद्वारावरचे कोरीव काम

मंजुश्री मंदिराच्या प्रवेशद्वारावरचे कोरीव काम

मंजुश्री मंदिरातील मूर्ती

लोट्सा मंदिरातील सुवर्ण वर्ख चढवलेली बुद्ध मूर्ती

लोटसे मंदिराच्या वरच्या अंगाला असलेले प्रार्थना गृह किंवा दुखांग ही आलची मठातील सर्वोत्कृष्ट वास्तू आहे असे मला वाटते. या कक्षाच्या बाहेरील बाजूस एक अंगण आहे. अंगणातून कक्षात जाण्याच्या द्वाराच्या लाकडी चौकटीवर सुंदर कोरीव काम केलेले आहे. मी या द्वारातून आतल्या कक्षात प्रवेश करतो. समोरच्या भिंतीवर मध्यभागी असलेल्या कोनाड्यात, वैरोचन या बुद्धावताराची मूर्ती आहे. बाजूच्या कोनाड्यांत रत्नसंभव व अमिताभ यांच्या मूर्ती आहेत. कक्षाच्या इतर भिंती संपूर्णपणे या व इतर बुद्धावतारांच्या छोट्या प्रतिमा व मोठ्या आकाराची मंडले यांनी सजवलेल्या आहेत. या मंडलांच्यात सुद्धा, बुद्धावतार व काही सांकेतिक चित्रे रंगवलेली आहेतच. या चित्रांचे अजंठ्याच्या चित्रांशी असलेले साम्य माझ्या लगेच लक्षात येते. ही भित्तीचित्रेही तितकीच जुनी आहेत. पण या दुखांगमध्ये छायाचित्रे घेण्यास पूर्ण मनाई असल्याने मला फोटो घेणे शक्य होत नाही. तिथल्या लामाच्या परवानगीने एक फोटो कसाबसा मिळतो. फोटोच्या मदतीशिवाय आलची मठातील चित्रकला स्मरणात ठेवणे हे जवळजवळ अशक्यप्रायच आहे. काही फोटो येथे विक्रीसाठी ठेवलेले आहे. पण ते मुख्यत्वे धार्मिक कारणासाठी ठेवलेले आहेत व त्यांची गुणवत्ता मला योग्य वाटत नाही. रिकाम्या हाताने मी बाहेर येतो व परत गावातील मुख्य चौकाचा रस्ता पकडतो. वाटेत एक बर्‍यापैकी कॅफेटेरिया दिसल्याने आत शिरण्याचा मोह आवरत नाही. फळांचे रस हे येथे बरेच लोकप्रिय आहेत असे दिसते. मी मात्र माझ्या नेहमीच्या ब्लॅक टी वरच समाधान मानतो.

आलची दु-खांग मधील रंगवलेली भित्ती-चित्रे

आता आम्ही परत एकदा कारगिललेह रस्त्यावर आलो आहोत. मी माझ्या घड्याळाकडे बघतो. दुपारचे साडेबारा वाजायला आले आहेत. कोठेतरी भोजनासाठी थांबावे असे माझ्या मनात येते. आमच्या चालकाच्या मनाने आम्ही येथून थोड्या अंतरावर असलेल्या फाट्यावर डावीकडे वळून, लिकिर मठाकडे जावे असे आहे. गेलुग्सपा पंथाचा असलेला हा लिकिर मठ येथून पाच किलोमीटर अंतरावरच आहे व तेथे असलेले एक रेस्टॉरंट चांगले असल्याने आमची सोय चांगली होईल असे आश्वासन त्याने दिल्याने लिकिर मठाकडे जाण्याचे मी ठरवतो. लडाख पर्वतराजीच्या एका दरीच्या कोपर्‍यात हा मठ आहे. आज जरी तो आडबाजूला असल्याचे भासत असले तरी लेहला जाणारे काफले पूर्वी ज्या मार्गाने जात असत त्या मार्गावरच हा मठ असल्याने तो पूर्वीच्या राजमार्गावरच होता असे म्हणता येते. लिकिरला जाणारा रस्ता मात्र अतिशय खराब परिस्थितीत आहे. 2010 साली या सर्व भागात अतिवृष्टीमुळे प्रचंड पूर आले होते व त्या वेळी लडाखमधील बहुतेक रस्ते वाहूनच गेले होते. हा रस्ताही तेंव्हापासूनच अतिशय खराब झाला आहे. मुख्य रस्ते दुरुस्त करण्यात शासनाला यश आले आहे. परंतु हे आड रस्ते मात्र अजुनही खराब परिस्थितीतच आहेत. लिकिर मठ एका उंच चढावर आहे.

लिकिर मठ; नयनमनोहर व रमणीय

मैत्रेय बुद्धावताराची 75 फूट उंचीची मूर्ती; लिकिर मठ

या मठाचे दुरून दिसणारे दृष्य मात्र खरोखरच अफलातून आहे. लडाख पर्वतराजीच्या बर्फाच्छादित शिखरांच्या पार्श्वभूमीवर असलेला हा मठ व त्या भोवती असलेली हिरवीगार शेते आणि त्या शेतात फुललेली मोहरीची पिवळी जर्द फुले यामुळे मठाच्या परिसरात असलेला निसर्ग इतका रमणीय दिसतो की या भागातून पुढे जाऊच नये असे वाटत राहते. या सगळ्या निसर्गवैभवात या मठाशेजारी उभारलेला, 75 फूट उंचीचा, मैत्रेय या बुद्धावताराचा पुतळा भर घालतो आहे. लिकिर मठाजवळच्या वाहन तळावर आमची गाडी थांबते. मी कॅमेरा उचलतो व समोरचा चढ चढण्यास सुरूवात करतो. पहिले आकर्षण अर्थातच मैत्रेय या भविष्यातील बुद्धाचा 75 फूट उंचीचा आसनस्थ पुतळा आहे. चमकणार्‍या सोनेरी रंगाने रंगवलेली ही मूर्ती मोठी छान दिसते आहे. येथून काही पायर्‍या पुढे चढून गेल्यावर मठाचा जुना प्रार्थना कक्ष किंवा दुखांग लागतो. येथे असलेले एक लामा माझे स्वागत करतात. आम्ही जरा त्वरा करावी असे त्यांचे म्हणणे आहे कारण दुखांग बरोबर 1 वाजता एका तासासाठी बंद होणार असतो. मी त्या लामांना विनंती करतो की थोडा अधिक वेळ त्यांनी आम्हाला द्यावा. लामा माझी विनंती चक्क मान्य करतात. दुखांग कक्षाच्या बाह्य भिंतीवर लामायुरू मठाप्रमाणेच, दिक्‍पालांची किंवा चारी दिशांचे संरक्षण करणार्‍या राजांची चित्रे आहेत. आतल्या बाजूच्या भिंती, बॅनर्स किंवा ठंका आणि तोरणे यानी सजवलेल्या आहेत. एका बाजूस असलेल्या काचेच्या कपाटात, अनेक जुनी हस्तलिखिते नीट मांडून ठेवलेली दिसत आहेत. समोर एका काचेच्या पार्टिशनच्या मागे बोधिसत्व व अमिताभ यांच्या मूर्ती आहेत. परंतु आता हा कक्ष बंद असल्याने या मूर्ती धूत वस्त्राने झाकलेल्या आहेत. एका बाजूचे वस्त्र उचलून मी या मूर्ती बघू शकतो. कक्षाच्या बाजूला असलेल्या चार पायर्‍या मी चढून जातो. समोरच्या बाजूला या लिकिर मठाचे जे प्रमुख आकर्षण समजले जाते ते पुराण वस्तू संग्रहालय आहे. आम्हाला आधी भेटलेले लामा आमच्या बरोबर वर येतात. या संग्रहालयात जुन्या काळची शस्त्रे, वाद्ये, दागिने, जुन्या पोथ्या, लडाखी पेहराव, नाणी आहेत. पण मला खास रुची असलेले आणि 800 ते 900 वर्षांपूर्वीच्या कालापासून असलेले जुने बॅनर, वॉल हॅन्गिंग्स आणि तोरणे यांनी हे संग्रहालय इतके समृद्ध आहे की दर्शक चकित होऊन जातो. बरेचसे बॅनर हे नैसर्गिक रंग वापरून रेशमी किंवा सुती वस्त्रांवर रंगवलेले असले तरी रेशमी भरतकाम केलेले, सोनेरी शाईने रंगवलेले आणि जरीकाम केलेले बॅनर्सही बघायला मिळतात. काही अगदी जुने बॅनर्स आता फिके झाले असले तरी त्यातल्या चित्रांच्यात जे बारकावे दाखवले आहेत ते बघून हे बॅनर्स तयार करण्यासाठी किती परिश्रम घेतले गेले असतील याचे मोठे आश्चर्य मला वाटत राहते. विसाव्या शतकाच्या सुरवातीला सर ऑरेल स्टाईन या पुराणवस्तू संशोधकाने, चीनमधल्या रेशीम मार्गावर असलेल्या डुनहुआंग येथील गुंफांच्यातून मिळवलेले काही बॅनर्स व चित्रे नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात मी पाहिली आहेत. लिकिर संग्रहालयात असलेली चित्रे व बॅनर्स नवी दिल्ली येथील संग्रहालयात असलेल्या चित्रांच्या तोडीचीच आहेत या बद्दल मला तरी काही संदेह वाटत नाही.

वॉल हॅन्गिंग; लिकिर संग्रहालय

रेशमी वॉल हॅन्गिंग; लिकिर संग्रहालय

दारावरचे एक तोरण; लिकिर संग्रहालय

बॅनर; लिकिर संग्रहालय

धर्मगुरूंची चित्रे असलेले बॅनर; लिकिर संग्रहालय

अवलोकितेश्वराचे चित्र रंगवलेले बॅनर; लिकिर संग्रहालय

मुखवटे; लिकिर संग्रहालय

या संग्रहालयाच्या समोरच एक मोठी गच्ची आहे. या गच्चीवरून दिसणारा समोरच्या झान्स्कर पर्वतराजीचा देखावा मी काही क्षण डोळे भरून पहात राहतो. व आपली भोजनाची सुट्टी माझ्यासाठी गमावणार्‍या व अजुनही माझ्या बरोबर असलेल्या, लामांचे मन:पूर्वक आभार मानतो व जिन्याने पायर्‍या उतरून खाली येतो.

लिकिर मठातून दिसणारा झान्स्कर पर्वतराजीचा देखावा

या ठिकाणी मठाचा नवीन प्रार्थना कक्ष किंवा दुखांग आहे. या ठिकाणी असलेले वज्र भैरव या देवतेचे लाकडी कोरीव काम केलेले मंडल, अकरा मस्तके व 1000 हस्त असलेल्या अवलोकितेश्वराची मूर्ती हे खासच प्रेक्षणीय आहे.

वज्र-भैरवाचे लाकडी मंडल; नवीन दु-खांग; लिकिर मठ

11 मस्तके असलेल्या अवलोकितेश्वराची मूर्ती; नवे दु-खांग, लिकिर मठ

चांदीचा स्तूप; नवे दु-खांग;लिकिर मठ

गुरू पद्मसंभव; नवे दु-खांग; लिकिर मठ

वाहन तळाजवळ असलेले रेस्टॉरंट, मोठ्या वृक्षांची गर्द छाया असलेल्या एका अंगणात आहे. झाडांच्या मधून मी सहज वर बघतो. मैत्रेयाचा पुतळा त्या झाडातून मला डोकावताना दिसतो. त्याचा फोटो काढण्याचा मोह मला आवरत नाही. भोजनासाठी मी एक खास लडाखी डिश मागवतो, नूडल्स आणि ठुपका सूप. वाटाणे, वाळवलेले पनीर व पालेभाज्या यांचे व पुदिन्याच्या स्वादाचे सूप जरा झणझणीतच वाटते आहे. मात्र नूडल्स आणि हे सूप हे कॉम्बिनेशन मात्र खूपच चविष्ट आहे यात शंकाच नाही.

उपहारगृहात डोकावून बघणारा मैत्रेय पुतळा

आता आम्ही परत एकदा कारगिल रस्त्याला येऊन लागलो आहेत. आताचे ऊन मात्र फारच कडक वाटते आहे. हातावर ऊन पडले तरी चटके बसल्यासारखे होते आहे. सुदैवाने माझ्या अंगात पूर्ण बाह्यांचा स्वेटर असल्याने मला सन बर्न होण्य़ाची भिती नाही. लडाखला हवा विरळ असल्याने सूर्य प्रकाशात असणारे अती नील किरण हवेत शोषलेच जात नाहीत. त्यामुळे येथे हात पाय झाकले जातील एवढे कपडे परिधान करणे आवश्यकच असते. नाहीतर सन ब्लॉक क्रीम तरी वापरावी लागते.

आमच्या प्लॅनप्रमाणे आमचा पुढचा थांबा बॅसगो किल्याचे भग्नावशेष हा आहे. या किल्याला लडाखच्याइतिहासात फार महत्वाचे स्थान आहे. लडाखच्या राजांची ही राजधानी होती. .. 1683 मध्ये कोणत्या बौद्ध पंथाचे अनुसरण करायचे यावरून लडाखचा राजा व तिबेटचे पाचवे दलाई लामा यांच्यात कलह निर्माण झाला. यामुळे दलाई लामांची तिबेटी सेना लडाखवर चाल करून आली. लडाखच्या राजाने 3 वर्षे हा किल्ला झुंजवला. अखेरीस त्याने मुघल सम्राट औरंगजेब याची मदत मागितली. त्या वेळेस कश्मिर हा मुघल सम्राटांच्या ताब्यातला प्रदेश होता. औरंगजेबाने ती मदत दिली व मुघल सेना व दलाई लामांची तिबेटी सेना यांच्यामध्ये झालेल्या युद्धात, तिबेटी सेनेचा पराभव झाला. यानंतर या त्रिवर्गामध्ये तह झाला.

बॅसगो किल्ल्याचे भग्नावशेष

या बॅसगो किल्याचे अवशेष बघण्याचा माझा बेत मात्र धुळीस मिळाला आहे. मुख्य रस्त्यावरून आत वळून, किल्याकडे जाणारा रस्ता आम्ही घेतला खरा! परंतु थोड्याच वेळात, रस्त्यावरचा एक पूल वाहून गेलेला असल्याने, आम्हाला थांबावेच लागले. येथून वरपर्यंत चालत जाणे एवढाच पर्याय आहे. परंतु आम्हाला सकाळी निघण्यास उशीर झाल्याने येथे पोचायलाच एवढा उशीर झाला आहे की चालत वर जाणे आता शक्य नाही कारण असे केले तर पुढच्या शेड्यूल मध्ये गडबड होणार आहे. आमच्या ड्रायव्हरला हा रस्ता नादुरुस्त आहे हे माहिती असलेच पाहिजे. त्याने मुद्दामच सकाळी उशीर करून आम्हाला येथे थांबता येणे शक्य होणार नाही याची तजवीज केली आहे. माझ्या चालकाबद्दलच्या रागामध्ये आणखीनच भर पडली आहे व संध्याकाळी त्याची हकालपट्टी करण्याचा माझा निर्धार पक्काच होत चालला आहे. मनात चरफडतच मी चालकाला गाडी मागे घ्यायला सांगतो.

आमचा पुढचा थांबा गुरुद्वारा पथ्थर साहिबहा आहे. लेहपासून सुमारे 25 मैलावर असलेले हे स्थान, एक मोठा पाषाण व परंपरागत चालत आलेली एक कहाणी यामुळे निर्माण झालेले असे श्रद्धास्थान आहे.

या पाषाणाला मोठ्या रोचक आकाराचा एक खड्डा (peculiar depression)आहे. शाळेतल्या इतिहासातल्या पुस्तकात शीख गुरू नानक यांचे जे चित्र दिलेले असते त्या चित्राच्या आऊटलाईन सारखा या खड्ड्याचा आकार आहे. या पाषाणाबद्दल येथे अशी कहाणी सांगितली जाते की तिबेट व लडाखच्या दौर्‍यावर आलेले गुरु नानक या स्थानी रोज मनन चिंतन करत असत. पलीकडे असलेल्या टेकडीवर एक राक्षस रहात असे. गुरू नानक यांना मारून टाकावे म्हणून या राक्षसाने एक दिवस हा पाषाण टेकडीवरून ध्यान लावून बसलेल्या गुरू नानक यांच्यावर सोडला. नानकांना स्पर्श झाल्याबरोबर त्या पाषाणाचे मऊ मेण झाले व गुरू नानकांची छबी त्या पाषाणावर उमटली. .. 1517 मध्ये काही बौद्ध लामांनी या स्थानावर एक गुरुद्वारा बांधले. भारतीय पायदळाने 1948 मध्ये हे गुरुद्वार देखभाल करण्यासाठी म्हणून स्वत:च्या ताब्यात घेतले.

गुरुद्वारा पथ्थर साहिब

हे गुरुद्वार रस्त्याच्या अगदी कडेलाच असल्याने, गाडी थांबल्याबरोबर उतरून आत जाणे शक्य आहे. मी आत जातो. पादत्राणे काढून आणि हात, पाय धुवून एका प्रशस्त शामियान्यात प्रवेश करतो. पथ्थर साहिब पाषाण आतल्या एका कक्षात आहे. तेथे गेल्यावर पाय जुळवून जमिनीवर बसावे लागते व आपले कपाळ जमिनीला टेकवून आपली श्रद्द्धा व्यक्त करायची असते. मी तसे करतो व बाहेर येतो. बाहेर पायदळातील बरेच सैनिक बसलेले आहेत. त्यांच्यामध्ये मी जाऊन बसतो. तेथे देत असलेला प्रसाद मी घेतो व या पथ्थर साहिबाची सर्व कहाणी एका सैनिकाकडून ऐकतो. त्या सैनिकांच्या मध्यात बसून ती गोष्ट ऐकताना, श्रद्धा ही माणसाचे धैर्य टिकवून ठेवण्यासाठी किती आवश्यक व महत्वाचे कारण आहे याची जाणीव मला होते. हे धर्मस्थान येथे असलेल्या सर्व सैनिकांसाठी, अत्यंत पवित्र आणि पूज्य असे स्थान आहे. लडाखमध्ये बदली झालेला प्रत्येक सैनिक, आपल्या ड्युटीवर जॉइन होण्याआधी या धर्मस्थानाला भेट देऊन आपले लडाख मधले कार्य सुरळीत पार पडावे म्हणून प्रार्थना करतो आणि लडाख़ मधला कार्यकाल संपला की परत जाण्याआधी आपल्याला सुखरूप ठेवल्याबद्दल या धर्मस्थानाकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परत एकदा भेट देतो.

लडाख मधला कार्यकाल हा कोणत्याही सैनिकासाठी, त्याच्या व्यावसायिक आयुष्यातील सर्वात कष्टप्रद आणि कठिण अशी जबाबदारी समजली जाते. व येथे येणार्‍या प्रत्येक सैनिक व अधिकारी यांच्या मनात थोडीशी भिती, थोडीशी अनिश्चितता ही असतेच. सैनिकांच्या मनातील ही भिती किंवा अनिश्चितता ओळखून, भारतीय सैनिकी मुख्यालयाने हे धर्मस्थान जास्त जास्त सैनिकप्रिय करण्याचे धोरण स्वीकारले आहे. येथे प्रार्थना केल्याने सैनिकांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत होते आहे.

नानक हिल

गुरुद्वारा पथ्थर साहिबच्या बरोबर समोर एक मध्यम आकाराची दगड धोंडे विखरून पडलेली एक टेकडी आहे. या टेकडी वर जाण्यासाठी पायर्‍याही बनवलेल्या आहेत. टेकडीच्या उंचीचा एकूण आकार लक्षात आल्यावर मी शांतपणे परत गाडीत जाऊन बसतो व चालकाला गाडी पुढे घेण्याबद्दल सांगतो. लेह शहराच्या जवळ जेंव्हा आमची गाडी पोचते तेंव्हा मी घड्याळात बघतो. दुपारचे साडेचार वाजले आहेत. आज आम्हाला आणखी एका जागेला भेट द्यायची आहे. मी चालकाला त्या बद्दल विचारतो. अत्यंत निर्विकारपणे आम्हाला जिथे जायचे आहे ते भारतीय पायदलाने निर्माण केलेले द हॉल ऑफ फेमहे संग्रहालय, संध्याकाळी 5 वाजता बंद होते असे तो आम्हाला सांगतो. म्हणजे आज तेथे जाणे आम्हाला शक्य नाही. आता मात्र माझा पारा चांगलाच वर गेलेला आहे. या मूर्ख माणसाने सकाळी निघायला उशीर करून, आमच्या सर्व कार्यक्रमाचा विचका करून टाकला आहे हे माझ्या लक्षात येते. आम्ही भेट देऊ इच्छित असलेली दोन स्थळे गळली तर त्याची ड्यूटी लवकर संपेल व घरी लवकर जाता येईल असा हिशोब बहुदा या मागे असावा हे माझ्या आता लक्षात येते आहे.

गाडी मला हॉटॆलवर सोडते. मी ट्रॅव्हल एजंटला फोन लावून काय घडले ते सांगतो. तोही बहुदा विस्मयचकित झालेला दिसतो आहे. तो मला शांत करण्याचा प्रयत्न करतो. संध्याकाळी मला भेटण्याचे नक्की करतो व हॉल ऑफ फेमची भेट पुढच्या कार्यक्रमात ऍडजस्ट करून देतो असेही वचन देतो.

ग्रामीण भागाला भेट देऊन आल्यानंतर लेहच्या हॉटेलमधल्या सुखसोईंनी शरीर व मन हे दोन्ही जरा सुखावते आहे. गरम चहा घेऊन त्यानंतर आराम करावा असे मनात येत असतानाच आज वेळ आहे तर लेहच्या बाजारात एक चक्कर मारावी असा विचार जास्त दृढ होतो व माझी पावले हॉटेलच्या जवळच असलेल्या बाजाराकडे वळतात. लेह तसे मोठे शहर आहे. लोकसंख्या फार नसली तरी त्याचा विस्तार बराच मोठा आहे. पण माझ्यासारख्या पर्यटकांना ज्यात रुची वाटेल अशी बहुतेक सर्व दुकाने शहराच्या जुना बाजार किंवा ओल्ड मार्केट या भागातच दाटीवाटीने बसलेली आहेत. हा जुना बाजार म्हणजे दोन मुख्य रस्ते व असंख्य छोट्या छोट्या, अरूंद व वाकड्यातिकड्या गल्ल्या यांचा मिळून बनलेला आहे. कपडे, शोभेच्या वस्तू, अन्न पदार्थ, पुस्तके, बॅग्ज यासारख्या पर्यटकांना लागणार्‍या सर्व वस्तूंची दुकाने येथे आहेत. स्टेट बॅंकेचे एक एटीएम मशीन देखील येथे आहे. मात्र मला त्याच्यापुढे मोठा क्यू दिसल्याने त्याचा वापर नंतर करण्याचे मी ठरवतो.

लेहच्या या मार्केटमध्ये फिरत असताना, काही महिन्यांपूर्वी एका पुस्तकात वाचलेली माहिती मला स्मरते आहे. लेह हे शहर गेली दोन किंवा तीन हजार वर्षे तरी या भागातले व्यापाराचे एक प्रमुख केंद्र होते. लेह व चीनच्या शिंनजिआंग प्रांतातील यारकंड व काशगर या शहरांबरोबर येथून मोठा व्यापार चालत असे. ही दोन्ही शहरे प्रसिद्ध रेशीम रस्ता किंवा सिल्क रोडवर असल्याने व्यापारी काफले येथून अगदी नियमितपणे या शहरांच्या पर्यंत येजा करत असत. लोकर,रेशीम व रेशमी वस्त्रे, रशियात बनलेले कातडे, मसाले, मीठ, रत्ने, सुवर्ण भुकटी, फेल्ट व चहा यासारख्या वस्तूंचा येथून मोठा व्यापार चालत असे. या बाबतचा एक अहवाल सांगतो की

” 1846 या वर्षी 300 मण (6000 किलो) सुका मेवा येथून निर्यात केला गेला. 2400 मण लेना शालींची लोकर आणि 5000 मण मेंढ्यांची लोकर येथे आयात केली गेली. या आकड्यांवरून लेहमधल्या व्यापाराच्या उलाढालीची कल्पना येते

एका पुरातन व्यापारी केंद्रामधून मी फेरफटका करतो आहे ही भावना मला जरा गंमतीची वाटते आहे. चीनने सीमेवरील मार्ग पूर्ण बंद केल्याने गेली 60 वर्षे मात्र हा व्यापार पूर्णपणे थंडावलेला आहे. चीनच्या डोक्यात कधी ना कधी प्रकाश पडेल व ते लेह मार्गे होणारा व्यापार परत चालू करतील एवढी आशा करणेच फक्त आपल्या हातात आहे. असे झाले तर लेह हे भारतातील एक प्रमुख आयातनिर्यात केंद्र सहजपणे बनू शकते व मध्य एशिया बरोबरचा भारताचा व्यापार अनेक पटींनी वाढू शकतो.

संध्याकाळचे 7 वाजले असल्याने मी हॉटेलवर परततो. माझा ट्रॅव्हल एजंट माझी वाटच बघतो आहे. आमच्या चालकाच्या आजच्या मूर्खपणाबद्दल तो माझी क्षमा मागतो. त्याने माझ्यासाठी दुसरी गाडी व चालक उद्यापासून ठरवलेला आहे व आणखी दोन दिवसांनंतर हॉल ऑफ फेमबघण्याची व्यवस्था पण त्याने केलेली आहे.

उद्याचा एकूण बेत मला ठीक वाटतो आहे व त्यामुळे मी जरा आनंदात आहे. मी जरा लवकरच भोजन घेऊन माझ्या खोलीकडे वळतो. उद्या नुब्रा व्हॅलीला भेट देण्यासाठी निघायचे आहे.

क्रमश:

30 जुलै 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “लडाख डायरी – भाग 3

 1. लडाखमधून निर्यात होणारा सुका मेवा म्हणजे बदाम-पिस्ते नसून चिर्गोसा हे टरबुजाच्या बीच्या आकाराचे, आकाराने थोडे मोठे व जास्त टपोरे फळ आहे याची नोंद आपण घ्यावयास हवी होती

  Posted by मनोहर | जुलै 30, 2011, 10:30 pm
  • मनोहर –

   हा मूळ अहवाल इंग्लिश मधे आहे व तो असा आहे.
   “According to figures available for the year 1846, about 300 mounds (6000 Kg) dried fruits were exported, 2400 mounds of Lena shawl wool and 5000 mounds of sheep wool was imported in Leh market. This gives a good idea about the volumes and quantities of goods that passed Leh through this trade route. ”
   यातील ड्राईड फ्रूट्स या शब्दाचे भाषांतर सुका मेवा असे मी केले आहे. त्यात काही फारसे चूक आहे असे मला वाटत नाही. या शिवाय लेह हे व्यापारी केंद्र असल्याने फक्त लडाख मध्ये निर्माण झालेला माल निर्यात केला जात असे नाही. दुसरीकडून आणलेला माल हा सुद्धा निर्यात केला जात असे.

   लडाख मधे स्थानिक उत्पादन फक्त जरदाळू आणि चिर्गोसा यांचेच होते. लदाखी जरदाळू लहान व दिसायला काळपट दिसतात. त्यामुळे ते मुख्यत्वे जॅम किंवा इतर प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्यातच वापरले जातात. अफगाणिस्तान मधून आलेले जरदाळू मोठे व पांढरे असतात. ते सरळ खाल्ले जातात.

   Posted by chandrashekhara | जुलै 31, 2011, 8:53 सकाळी
 2. Sir, you are great
  Thanks for your work, poor people like us never thought to travel as you, but you are doing
  wonderful work and share your time with us. Thanks again…..

  Posted by arun karekar | ऑगस्ट 2, 2011, 5:46 pm
  • Arun Karekar-

   Many thanks for your response. I however could not get what you meant by saying that poor people like you can never travel like me. Not every person who travels is rich. There are people who might hire a car and there are also back packers who travel by government run buses and trek. When I was young, I have travelled through entire Kashmir valley, on state Govt. buses. What matters is the will to travel.

   Posted by chandrashekhara | ऑगस्ट 3, 2011, 8:53 सकाळी
   • Sir,
    Plz don’t misunderstand , I mean to say “poor’ people means the population of our class,
    who can’t get proper meal at two times a day. I stay in domblvali but rearly visit mumbai seaface. But it is your greatness that you share your all your time with us, and we feels
    that we are also travel with you.
    thanks, Arun

    Posted by arun karekar | ऑगस्ट 4, 2011, 3:57 pm
   • Arun-

    There is no misunderstanding. I am happy that you are enjoying my blog. That is most important I think

    Posted by chandrashekhara | ऑगस्ट 4, 2011, 5:46 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: