.
Travel-पर्यटन

लडाख डायरी- भाग -2


गुरुवार

लडाखला पोचण्यासाठी तीन मार्ग उपलब्ध आहेत. यापैकी पहिला मार्ग हिमाचल प्रदेशातल्या मनालीपासून, रोहतांग पास या मार्गाने लेहला पोहोचतो. दुसरा मार्ग कश्मिरची राजधानी, श्रीनगर पासून आहे व तो जोझिला, ड्रास व कारगिल मार्गाने लेहला पोहोचतो. तिसरा मार्ग अर्थातच हवाई मार्ग आहे. दिल्लीहून लेहसाठी थेट विमानसेवा आहे. बहुतेक लोक श्रीनगर किंवा मनाली या पासून रस्त्याने येणे पसंत करतात. एकतर रस्त्याने येण्याचे हे दोन्ही मार्ग कमी खर्चाचे आहेत व लेह समुद्रसपाटीपासून 11000 फूट उंचीवर असल्याने तेथे पोचल्यानंतर विरळ हवेचा त्रास होऊ नये म्हणून जी सक्तीची विश्रांती घेणे आवश्यक असते ती विश्रांती, रस्त्याने केलेल्या या वाहन प्रवासात, ही उंची हळूहळू गाठलेली असल्याने, गरजेची नसते व लेह मधला कार्यक्रम, पोचल्याच्या दिवसापासून सुरू करता येतो. मात्र यापैकी कोणत्याही रस्त्याने आले तरी किमान दोन दिवसांचा प्रवास आवश्यक असतो. मी विमानाने लेहला येणे पसंत केले कारण एकतर एवढा लांबचा व दोन दिवस लागणारा प्रवास बसने करण्याची कल्पना काही मला फारशी सुखकारक वाटली नाही आणि जो प्रवास रस्त्याने करायचा तो लडाखमधे फिरण्यासाठी करावा, लडाख़ला जाण्यासाठी करू नये असेही मला वाटले.

आजच्या माझ्या भटकंतीचा बेत म्हणजे लेहकारगिल रस्त्यावर, लेहपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या लामायुरू या खेड्याला भेट देणे हा आहे. लेहकारगिल रस्त्यावर, सिंधू नदीच्या काठावर असलेल्या खालत्से व बुधखारबू या गावांच्या मध्ये लामायुरू हे गाव येते. लामायुरूला जाण्यासाठी सिंधू नदीच्या काठाकाठाने व बटालिक या गावातून जाणारा जुना लेहकारगिल रस्ता सोडून, खालत्से पासून निघणारा एक दुसरा रस्ता घ्यावा लागतो. मात्र हा दुसरा रस्ताही जातो शेवटी कारगिल येथेच. अलीकडे, हा रस्ता जास्त सुरक्षित असल्याने, कारगिलवरून येणार्‍या किंवा तेथे जाणार्‍या प्रवाशांच्यात, लोकप्रिय होऊ लागला आहे. या लामायुरू गावात एक प्रसिद्ध असा जुना बौद्ध मठ आहे. कारगिलवरून लेहला येणारे बरेचसे प्रवासी याच मार्गाने येत असल्याने या बौद्ध मठाला भेट देत असतात. परंतु ते येथे रहात नाहीत. या मठाला एक धावती भेट देऊन ते परत मार्गस्थ होतात. माझा बेत मात्र लामायुरूला आजची रात्र रहाण्याचा आहे. माझा ट्रॅव्हल एजंट लडाखच्या याच भागातला असल्याने, काल त्याने मला एक कल्पना दिली होती. या लामायुरू मठामधे काल या मठाचा वार्षिक उत्सव साजरा केला गेला होता म्हणे! या उत्सवाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे आज, येथे एक पूजा समारंभ होतो. तो जर मी लामायुरूला लवकर पोहोचलो तर मला बघता येण्यासारखा आहे. बौद्ध मठामध्ये, वर्षातून एकदा होणारी पूजा बघण्याची संधी सहज मिळते आहे असे कळल्यावर साहजिकच मी आज भल्या पहाटे लामायुरूला जाण्यासाठी निघण्याचा बेत ठरवला आहे.

लवकर उठण्याचे ठरवल्यामुळे पहाटे 5 वाजताच मला जाग आली आहे. उठल्यावर आपले डोके किंचित जड वाटते आहे हे लक्षात आल्याने मी पटकन पॅरासेटामॉलची अर्धी गोळी तोंडात टाकतो. लेहमधे किंवा लडाखमधेच, वीज उत्पादन बेताबाताचेच असल्याने, वीज कधी गायब होईल याचा काहीच अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे बहुतेक हॉटेले पाणी गरम करण्यासाठी, जळाऊ लाकडे इंधन म्हणून वापरत असलेले, बॉयलर्स सर्रास वापरतात. या बॉयलर्सच्या वापरामुळे, हॉटेलात गरम पाणी दिवसातल्या काही विशिष्ट वेळेला व थोड्या काळासाठीच मिळते. मात्र आज पहाटे नळाला गरम पाणी येते आहे हे बघून साहजिकच बरे वाटते आहे कारण एवढ्या थंडीत गार पाण्याने स्नान करण्याची कल्पना करणेही अशक्यच आहे. मी तयार होऊन खाली हॉटेलच्या लॉबीमध्ये येतो. माझे वाहन आणि त्याचा तो शिष्ठ ड्रायव्हर यांचा तर कुठेच पत्ता दिसत नाहीये. तसेच हॉटेलच्या लोकांनी, पहाटे बरोबर नेण्यासाठी, नाश्ता पॅक करून तयार ठेऊ म्हणून सांगितले होते तो नाश्ताही अजून तयार नाही. या परिस्थितीवर तोड काढण्याचे काहीच साधन माझ्या हातात नाही त्यामुळे शांतपणे हॉटेलच्या लॉबीमधल्या एका खुर्चीमध्ये मी बसतो व डोळे मिटून घेतो.

जरा वेळाने ड्रायव्हर महाराज गाडी घेऊन उगवतात. त्यांच्या कपाळावर आजही आठ्याच दिसत आहेत. कालच या महाशयांनी एका माणसाला वक्तशीरपणाबद्दल ऐकवले होते याची आठवण झाल्याने मी त्यांना उशीराचे कारण विचारतो पण छद्मी हास्याशिवाय दुसरे काहीच उत्तर मला मिळत नाही. हॉटेल कडून मिळणारा, पॅक केलेला नाश्ता माझ्या हातात एव्हाना आलेला असल्याने, मी मार्गस्थ होण्याचा प्रयत्न सुरू करतो. माझ्या जवळ असलेला फक्त एक बॅकपॅक गाडीत टाकताना सुद्धा ड्रायव्हर महाराजांच्या चेहेर्‍यावर एकूण नाखुषीचीच छटा असते. अखेरीस 6 वाजण्याच्या सुमारास मी मार्गस्थ होतो.

आमची गाडी, लष्करी सैनिक व अधिकारी यांच्यासाठी बांधलेले एक भव्य इस्पितळ व फक्त या इस्पितळाच्या वापरासाठी म्हणून बांधलेले एक औष्णिक वीज निर्मिती केंद्र. यांना ओलांडते व लेह विमानतळाला वळसा घालून, लेहकारगिल रस्त्याला लागते. रस्त्याच्या दोन्ही अंगांना, पुण्याच्या पूर्व भागातून प्रवास करताना किंवा आळंदीच्या किंवा नगर रस्त्यावर जशी सैनिक तुकड्यांच्या उपयोगाची मोठमोठी आवारे लागतात तशीच आवारे येथेही दिसत आहेत. लेह हा एक मोठा सैनिकी तळ असला पाहिजे याचे हे एवढेच दृश्य स्वरूप प्रवाशांना येथे दिसू शकते.

या भागाला स्पिटुक असे नाव आहे. यापासून पुढे मात्र लेहच्या परिसरात दिसणारा सपाट भूभाग हळूहळू नाहीसा होताना दिसतो आहे व आपण डोंगराळ दर्‍याखोर्‍यांच्या प्रदेशात प्रवेश करतो आहोत हे लक्षात येते आहे. महाराष्ट्रात आणि विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात राहणार्‍या माझ्यासारख्याला, डोंगराळ दर्‍याखोर्‍यांच्या प्रदेशाचे अप्रूप वाटण्याचे खरे म्हणजे काही कारण नाही. पण लडाखचा हा डोंगराळ प्रदेश काही निराळाच आहे. महाराष्ट्रात काय किंवा इतर कुठेच इथल्यासारखा डोंगराळ भाग मी बघितल्याचे मला स्मरत नाही. महाराष्ट्रातल्या सर्व डोंगर पर्वतावर दिसणारा काळा बॅसॅल्ट खडक येथे दिसतच नाही. इथले सगळे डोंगर, एका विशिष्ट पिवळट ग्रे रंगाचेच आणि मुरमाचे बनलेले आहेत असे प्रथम दर्शनी तरी दिसतात. मात्र या डोंगरांमध्ये वैशिष्ट्ये तरी किती असावीत? काही डोंगर उतार इतके गुळगुळीत सपाट आहेत की ते सिमेंटने बांधून काढले आहेत की काय? असे वाटावे. या उतारांवरून जर दोन पाच गोट्या खाली सोडल्या तर त्या नक्की जोराने घरंगळत खाली येतील इतके गुळगुळीत हे उतार दिसतात. मात्र दुसर्‍याच बाजूला या उताराला अगदी करवतीने कापून काढलेले असावे तसे कडे व खोल दर्‍या दिसतात. काही डोंगरांवर खडे आणि दगड यांचा अक्षरश: सडा सांडलेला दिसतो. काही उतारांवर मोठमोठे पिवळट ग्रे खडक, पाहणार्‍याच्या कल्पना शक्तीनुसार, उभे, बसलेले किंवा आडवे पडलेले असे दिसतात. काही ठिकाणी तर हे खडक क्यू लावून उभे आहेत की काय असा भास होतो. पर्वत शिखरे सुद्धा विविध रूपांची! कुठे अणकुचीदार सुळ्यासारख्या टोकांची शिखरे तर कुठे अर्धगोल आकाराची. कुठे गुळगुळीत तर कुठे दातेरी. ही पर्वत शिखरे आणि पर्वत सुद्धा अफाट उंच!. महाराष्ट्रातले बहुतेक पर्वत, डोंगर या वर्गात बसणारे असतात. लडाख मधल्या टेकड्यांनाच मुळी पर्वत म्हणता येईल. पर्वत शिखरे तर इतकी उत्तुंग की मान अगदी तिरपी करून बघितल्याशिवाय शिखर दृष्टीक्षेपातच येत नाही.लडाखचा परिसर

आमची गाडी जसजशी या प्रदेशातून पुढे पुढे जाते आहे तसतशी माझी खात्रीच पटत चालली आहे की आपण नक्की एखाद्या वाळवंटातून प्रवास करतो आहोत. पण गाडी एक वळण घेते व नजरेसमोर अचानक येतो एक हिरवागार पट्टा. हिरवे लुसलुशीत गवत, पॉपलर व विलो यांची वार्‍यावर डोलणारी हिरवीगार झाडे व डोंगर कपारीतून खळखळत वाहणारे झरे. लडाखच्या परिसरामधली हीच तर जादू आहे.सिंधू नदी

एका क्षणापूर्वी सभोवती दिसणार्‍या पिवळट वाळवंटाची जादूची कांडी फिरवून, ही यक्षभूमी कशी काय झाली बुवा? असे आश्चर्य माझ्या मनात दाटलेले असतानाच गाडी आणखी एक वळण घेते व आमचा वाहन चालक एकदम घोषणा करतो की डावीकडे सिंधू नदी बघा म्हणून. त्या उजाड पिवळट दर्‍या खोर्‍यांमधे डावीकडे आता दिसतो आहे एक मोठा नदी प्रवाह. नदीचे पाणी मात्र काठावरच्या जमिनीसारखेच, पिवळट मळकट पांढरे आहे. पाण्यावर लाटा दिसत आहेत व ते वाहताना दिसते आहे म्हणून नदी म्हणायची! नाहीतर काठावरची जमीन व पाणी यांच्या रंगात काही मोठी तफावत आहे असे भासत नाही.

मी चालकाला रस्त्याच्या कडेला गाडी थांबवायला सांगतो व खाली उतरतो. हा रस्ता नदीच्या पात्रापासून निदान चाळीस ते पन्नास फूट उंचीवर असावा. नदीचे पात्र अगदी स्पष्ट दिसते आहे. नदीकडे अनिमिष नेत्रांनी बघत रस्त्याच्या कडेला मी स्तब्ध उभा राहतो. माझ्या मनात भावनांचा कल्लोळ उठला आहे. प्रथम मला स्मरत आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांनी भारत देश व या सिंधू नदीचे नाते, मराठी माणसांच्या मनात इतके दृढ केलेले आहे की त्यांचे स्मरण मला प्रथम होणे साहजिकच आहे. या सिंधू नदीमुळे आपल्या धर्माला हिंदू धर्म हे नाव मिळाले आहे तर देशाचे हिंदुस्थान हे नाव सुद्धा या नदीमुळेच आपल्याला मिळाले आहे. असे असूनही या नदीचे साधे दर्शन घेण्यासाठी सुद्धा माझ्यासारख्या एका सामान्य भारतीयाला, हजारो मैल अंतरावर असलेल्या भारताच्या एका कोपर्‍यात यावे लागते आहे या बद्दलचा विषाद माझ्या मनात साठतो आहे. सिंधू नदीच्या काठावर तसे स्तब्ध उभे राहिलेले असताना, माझे मन, कदाचित नऊ किंवा दहा हजार वर्षांपूर्वी, इराणअफगाणिस्तानचा वाळवंटी प्रदेश व नंतर क़्वेट्टा शहराजवळची बोलन खिंड पार करून, सिंधू नदीच्या पात्रापाशी पोचलेल्या, माझ्या कोणा एका पूर्वजाच्या मनाशी सांधले गेले आहे. आज माझ्या मनात येणार्‍या भावना त्या माझ्या पूर्वजाच्या मनातील भावनांपेक्षा काही फारशा निराळ्या नाहीत असे मला वाटत राह्ते.

सिंधू व झान्स्कर नद्यांचा संगम 

गाडी पुढे निघते. आजूबाजूला दिसणारे दृश्य सतत इतके बदलते आहे की त्याचे वर्णन करायला माझ्याजवळ शब्द नाहीत याची जाणीव मला होते आहे. कोणत्याही छायाचित्रात किंव चलतचित्रात हे दृश्य साठवून ठेवणे जवळपास अशक्य आहे. या पर्वतांच्याकडे बघत असताना माझ्या लक्षात येते की जरी या सगळ्या डोंगरांचा रंग पिवळट ग्रे असला तरी जवळपास प्रत्येक डोंगराला एक निराळीच रंगछटा आहे. काही डोंगर हिरवट दिसतात तर काही पिवळट. काही डोंगरांना नारिंगी किंवा लालसर छटा दिसते तर काहींना जांभळट छटा. मात्र या रंगछटांमधे कोणतीच व्यवस्था नाहीये. एक डोंगर बघताना पुढच्या डोंगराची रंगछटा कोणती असेल हे सांगणे केवळ अशक्य आहे. कॉलेजात असताना शिकलेले रसायनशास्त्र मला एकदम आठवते. या डोंगरांना या रंगछटा दिसत आहेत कारण त्या डोंगरामधल्या खडकांच्यात क्रोमियम, लोह, या सारख्या धातूंच्या क्षारांचे प्रमाण जास्त आहे. पण या ज्ञानाने समोरचे विलोभनीय दृश्य बघताना माझ्या मनात एखाद्या लहान मुलासारखे जे आश्चर्य उफाळून येते आहे त्याची तीव्रता काही कमी होत नाहीये.

गाडी आता एका चढावर चढते आहे. चढ चढून गेल्यावर गाडी रस्त्याच्या कडेला थांबते व चालक महाशय घोषणा करतात की सिंधू व झान्स्कर नद्यांचा संगम पहा म्हणून. मी काळजीपूर्वक त्या टेकडीच्या काठापर्यंत जातो व खाली बघतो. दोनशे किंवा तीनशे फूट खाली, मला या संगमाचे जे दृश्य दिसते आहे ते माझ्या स्मृतीतून कधीही पुसले जाणे शक्य नाही. माझ्या डाव्या बाजूकडून वहात असणार्‍या सिंधू नदीला झान्स्कर ही तेवढीच मोठी नदी येऊन मिळते आहे. या दोन्ही नद्यांचा मिळून बनलेला एक विशाल प्रवाह हे सर्व पाणी पुढे नेतो आहे. या ठिकाणी या दर्‍याखोर्‍यांच्या प्रदेशात या पाण्याचा फारसा काहीच उपयोग नाही. हे सर्व पाणी वहात चालले आहे पाकिस्तानकडे! तिथल्या लाखो शेतकर्‍यांना, सुबत्तेचे व सौख्याचे दिवस दाखवण्यासाठी.

आम्ही आता निमो या खेड्याजवळ पोहोचलो आहोत. चहा व नाष्टा करण्यासाठी येथे आम्ही थांबतो. भारतातल्या कोणत्याही भागातल्या राजमार्गावर जे दृश्य दिसते आहे तेच येथेही दिसते आहे. धुळीने माखलेले दणकट टाटा ट्रक्स, डिझेल व तेलाचा वास, दाढीचे खुंट वाढलेले ड्रायव्हर्स आणि रस्त्याच्या कडेला चहा व खाद्यपदार्थ विकणारे स्टॉल्स, सगळे तसेच आहेत. खूप साखर, दूध घातलेला व अनेकदा उकळलेला अमृततुल्य चहा व त्याच्याबरोबर मी लेह मधल्या हॉटेलमधून आणलेली चीज सॅन्डविचेस यावर मी माझा नाष्टा उरकतो. या चहा बरोबर ही सॅन्डविचेस का कोण जाणे मोठी स्वादिष्ट लागतात.

सिंधू मधले रॅपिड्स

नदीकाठच्या पुढच्या प्रवासात आम्हाला अनेक छोटी मोठी गावे लागतात. शेजारी वाहणारी नदी आपली रूपे सतत बदलताना दिसते. कधी ती पृष्ठभागावर लाटा सुद्धा न उमटू देता वाहते, तेंव्हा एखाद्या पुरंध्री सारखी शांत व धीर गंभीर दिसते तर दुसर्‍याच क्षणाला वेडीवाकडी वळणे व उतार यावरून ती खळळखळाट करत वाहताना दिसते. या अशा ठिकाणी ही नदी एखाद्या अवखळ व अल्लड तरूणी सारखी गडबड गोंधळ करताना दिसते. पाण्यावर निर्माण झालेले भोवरे आणि लाटा यामुळे नदीचे मळके पांढरट पाणी काठावर आदळते व पांढरा शुभ्र फेस तयार होतो. हा फेस पाण्याच्या खळखळाटाबरोबर उड्या मारत वाहत जातो. या अशा स्थानांना रॅपिड्स असे म्हटले जाते व रबरी तराफ्यांवर बसून अशा रॅपिड्समधून जलप्रवास करू इच्छिणार्‍यांसाठी, ही नदी म्हणजे एक सुवर्णसंधी असली पाहिजे हे रबरी तराफे डोक्यावर घेऊन आमच्या समोरून जाणार्‍या बर्‍याच स्टेशन वॅगन गाड्या बघिल्यामुळे माझ्या लक्षात येते आहे. नदीच्या काठी असलेली व हिरव्यागार शेतांनी सजलेली अनेक गावे आम्ही पार करतो आहोत. या गावांमध्ये उभारलेले मोठमोठे गोम्पा किंवा मंदिरे व त्यांच्या शेजारी उभारलेल्या बुद्ध मूर्तीही मधून मधून दिसतात.

आता आम्ही खालत्से गावाजवळ आले आहोत. सिंधू नदीच्या काठाकाठाने जाणार्‍या जुन्या लेहकारगिल रस्त्याला सोडून आम्ही आता सैन्याने उभारलेल्या एका कामचलाऊ लोखंडी पुलावरून सिंधू नदी पार करून लामायुरूच्या रस्त्याला लागलो आहोत. इतका वेळ एका बाजूला सतत आमची साथसंगत करणारे सिंधू नदीचे पात्र, दुसरीकडे गेल्याने आताचा परिसर मात्र पूर्ण वाळवंटी तरीसुद्धा अतिशय विलोभनीय आहे. एका क्षणाला आमची गाडी पाणी नसलेल्या एखाद्या ओढ्याशेजारून जाते आहे तर काही क्षणानंतर आम्ही आता एखाद्या कड्याच्या टोकावरून चाललो आहोत व इथला रस्ता, खडक फोडून बनवलेला असल्याने, आमच्या डोक्यावर खडकाचे एक भले थोरले छत्र अगदी भितीदायक रित्या पसरते आहे. एखाद्या भल्या थोरल्या रोलर कोस्टर मधे बसावे तसेच काहीसे मला वाटते आहे. सगळीकडे रस्ता दुरुस्ती व रूंदी वाढवणे व नूतनीकरण याची कामे चालू आहेत

लामायुरूचा रस्ता 

समोर थोड्या अंतरावर एक मोठे जीसीबी रस्ता खोदाई यंत्र, कण्हत खोकत घुळीचा एक मोठा लोट पसरवताना दिसते आहे. आमच्या सुदैवाने आज सुरूंग लावून खडक फोडण्याचे काम कोठेही चालू नाही. हे काम चालू असले की रस्ता तीन चार तास सुद्धा बंद राहू शकतो. तसे झाले तर लामायुरू मधला पूजा समारंभ पहाण्याची आमची आजची कल्पना हवेतच विरून गेल्यासारखी होती.

मून लॅन्ड 

लामायुरू घळीचे दृष्य 

आता आमची गाडी एका अरूंद घळीत उतरते आहे. दोन्ही बाजूंना आता विशाल असे डोंगर उतार दिसत आहेत. मात्र या उतारांच्यावरचे खडक व जमीन ही गंधकाच्या पिवळट रंगाची दिसते आहे. बाजूचे खडक व जमीन यांना मोठमोठी विवरे दिसत आहेत. जमिनीचा प्रुष्ठभाग सुद्धा सपाट न दिसता त्यावर लाटा यावा तसा दिसतो आहे. चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्थेने प्रसिद्ध केले होते. त्या चित्रात दिसणार्‍या चांद्रीय पृष्ठभागासारखाच हा भाग दिसतो आहे व त्यामुळेच याला मूनलॅन्ड असेच नाव मिळाले आहे. समोर दूरवर मला या घळीच्या एका बाजूच्या डोंगर उतारावर एक खेडेगाव दिसते आहे. घळीच्या तळाला असलेल्या सपाट भागात हिरवीगार शेते व त्यात मधून मधून पिवळी जर्द फुले आलेली मोहरीची शेते दिसत आहेत व खेडेगावाच्या वर, अगदी डोंगरमाथ्यावर असलेल्या एका मोठ्या खडकावर बांधलेला एक मठ मला दिसतो आहे. आम्ही लामायुरूला पोचलो आहोत.

लामायुरू मधले आमचे हॉटेल

लामायुरू मधल्या मूनलॅन्ड हॉटेलवर आता आम्ही पोचलो आहोत. परिसरात मिसळून जातील अशा एक दोन इमारती म्हणजे आमचे हॉटेल आहे. मात्र जिन्याचे कठडे वगैरे सुरक्षा साधने कोठे दिसत नाहीत. एका बैठ्या इमारतीवर भोजन गृह अशी पाटी आहे. त्याच्या शेजारी हिरवळीचा एक तुकडा आहे व खुर्च्या मांडलेल्या आहेत. मी तेथे स्थानापन्न होतो व तिथल्या कर्मचार्‍यांनी आणून दिलेल्या गरम गरम चहाचा आस्वाद घेतो. त्या वेळात माझ्या खोलीचा ताबा मला मिळतो. खोली तशी आरामदायी दिसते आहे. वीज फक्त रात्री 7 ते 11 व सकाळी दोन तास मिळणार आहे. पण बाथरूम मधे पाणी गरम करण्याचा विजेवरचा बॉयलर आहे व एकूण स्वच्छता गृह चांगले आहे. हॉतेल मून लॅन्डच्या एकूण व्यवस्थेवर मी खुष आहे.

मी जरा आवराआवर करतो माझा कॅमेरा घेतो व गाडीकडे प्रयाण करतो. लामायुरू मठ जरी बर्‍याच उंचीवर असला तरी वर गाडी जाऊ शकेल असा रस्ता आहे. त्यामुळे या मठाजवळ असलेल्या गाडीतळाशी मला गाडी सोडते. यापुढची चढण पायी चढायची आहे. लामायुरूचा हा मठ लडाख मधील सर्वात जुना मठ मानला जातो. लडाखमधे बौद्ध धर्माचा प्रसार होण्याआधीपासूनच ही जागा एक पवित्र स्थळ म्हणून मानली जात होती. लडाखमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार, दहाव्या किंवा अकराव्या शतकाच्या आसपास झाला. तिबेटचा राजा स्रॉनत्सानगामपो ( Sron-tsan-gam-po) याने रिनचेन झांगपो या एका विद्वानाला, भारतीय बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास करून नंतर त्याचा प्रसार व प्रचार पश्चिम तिबेट (लडाख) मध्ये करण्यासाठी पाठवले होते. या रिनचेन झांगपो याने लामायुरू मठाची स्थापना केली होती असे मानले जाते. गौतम बुद्धांच्या महानिर्वाणानंतर बराच काल उलटून गेल्यावर गौतम बुद्धांचा बौद्ध धर्म महायान व हीनयान या दोन पंथात विभागला गेला होता. लडाख मध्ये महायान पंथ हा जास्त प्रमाणात प्रचलित आहे. हा पंथ पुढे आणखी चार पंथांच्यात विभागला गेली. यापैकी ड्रिकुंगपा (Drikung-pa) या पंथाचे अनुसरण लामायुरू मठातील बौद्ध भिख्खू करत असतात. एक भारतीय विद्वान तिलोप(Tilopa) आणि त्याचा शिष्य नारोप (Naropa) यांच्या शिकवणीवर हा पंथ आधारलेला आहे. कदाचित त्यामुळे या पंथाच्या आचारविचारांवर मूळच्या तिबेटी तत्वज्ञानावर भारतीय विचारांचा ठसा उमटलेला आढळतो.

माझी गाडी ठेवली आहे त्या गाडीतळापासून एक अरूंद पायवाट मठाकडे जाते आहे. या पायवाटेच्या एका अंगाला बौद्ध भिख्खू व लामा यांची रहाण्याची व्यवस्था असलेली इमारत आहे. तेथून पुढे गेल्यावर दहा ते पंधरा दगडी पायर्‍या चढून मी जातो. या पायर्‍यांना लागूनच आत जाण्यासाठी असलेले मठाचे अरूंद असे प्रवेशद्वार आहे. मठाच्या मुख्य इमारतीत मध्यभागी एक खुले अंगण आहे. या अंगणाच्या एका बाजूला प्रवेशद्वार व दुसर्‍या बाजूला लाकडी खांब असलेला एक व्हरांडा आहे. या व्हरांड्याच्या मागच्या बाजूस मुख्य प्रार्थना कक्ष किंवा दुखांग आहे. व्हरांड्याच्या भिंतीच्यावर गडद रंगातील चित्रे आहेत. यातील काही चित्रे मी ओळखू शकतो. यात आपल्या दिकपाल या संकल्पनेसमान असलेले चारी दिशांचे संरक्षक राजे, धृतराष्ट्र, विरुद्धक, विरूपाक्ष व वैश्रवण यांची व बौद्ध धर्मतत्वांमधली जीवन चक्र व चार समविचारी मित्र ही चित्रे आहेत.

जीवन चक्र

चार समविचारी मित्र 

दक्षिणेचा संरक्षक राजा -विरुधक

उत्तरेचा संरक्षक राजा वैश्रवण

पूर्वेचा संरक्षक राजा धृतराष्ट्र 

पश्चिमेचा संरक्षक राजा विरुपाक्ष

मुख्य प्रार्थना कक्षातील एका भिंतीजवळ, एका काचेच्या कपाटात धर्म, कायदा व आचरणाचे नियम या संबंधीचे बौद्ध ग्रंथ अतिशय नीटनेटकेपणे मांडून ठेवलेले आहेत. या कपाटाला समांतर अशा तीन बैठ्या टेबलांच्या रांगा या प्रार्थना कक्षात मांडून ठेवलेल्या आहेत. या टेबलांवर पूजेचे साहित्य व त्या वेळी परिधान करण्याची वस्त्रे व शिरस्त्राणे मांडून ठेवलेली दिसत आहेत. या शिवाय तुतारी सारखी वाद्ये व डुंगडुंग हे ढोलकासारखे वाद्य ही पण मांडलेली दिसत आहेत. या टेबलांच्या रांगांच्या मधल्या जागेत जाजमे घालून लामा व भिख्खू यांची बैठक व्यवस्था केलेली आहे. या मठात वैरोचन किंवा अंतर्दृष्टी प्रदान करणारा या बुद्धावताराची उपासना केली जाते. या वैरोचनाची सिंहासनावर बसलेली मूर्ती येथे आहे. बाजूच्या एका भिंतीवर 11 मस्तके असलेल्या अवलोकितेश्वर या बुद्धावताराचे एक सुंदर भिंती चित्र आहे. प्रार्थना कक्षाच्या आतील बाजूस एक गाभार्‍यासारखी खोली आहे. या खोलीत स्त्रीरूपी बुद्ध किंवा तारा हिची मूर्ती आहे. तसेच या मठातील काही महत्वाच्या लामांच्या येथे मूर्ती आहेत.तारा या स्त्रीरूपी बुद्धाची उपासना केल्यास दीर्घायुष्य, संपत्ती व संतती प्राप्त होते अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे.

हरित तारा व शुभ्र तारा यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण चित्र  रंगवलेला एक बॅनर

मुख्य प्रार्थना कक्षातून मी बाहेर येतो व बाजूला असलेला एक जिना चढून गच्चीवर येतो. येथेच बाजूला एक लहान प्रार्थना कक्ष आहे त्यात काही अतिशय सुंदर चित्रे असलेले बॅनर व चांदीचे तीन छोटे स्तूप मांडलेले आहेत. ही ग़च्ची म्हणजे लामायुरू घळीतला सर्वात उंचावर असलेला भाग असल्याने, येथून गाव, संपूर्ण घळ आणि तिला सर्व बाजूंनी वेढणार्‍या लडाखच्या पर्वतराजी यांचे मोठे सुंदर दृष्य दिसते आहे.

पूजा कधी चालू होणार आहे? या माझ्या प्रश्नाला नक्की उत्तर कोणाकडूनच मिळत नाही. पण साधारण मतप्रवाह असा दिसतो आहे की पूजा दुपारचे 12 ते 1 या दरम्यान कधीतरी चालू होईल. माझ्या घड्याळाकडे मी बघतो व माख्या लक्षात येते की पूजा सुरू होण्यास निदान 1 तास तरी अजून आहे. गच्चीवरून मठाच्या छपराभोवती प्रदक्षिणा घालणे शक्य आहे. कडेने लावलेली प्रार्थना चक्रे फिरवीत मी एक प्रदक्षिणा घालतो व खाली उतरतो. खाली एक वृद्ध लडाखी मला हातातले प्रार्थनाचक्र फिरवताना दिसतो. फोटो काढू का? म्हणून विचारल्यावर तो तयार होतो. मी त्याचा फोटो काढतो व एक छान फोटो मिळाल्याबद्दल त्याच्या हातात एक दोन नोटा ठेवतो. वेळ कसा घालवावा हे खरे म्हणजे मला सुचत नाहीये. मठाच्या बाजूला असलेल्या उतारावर जुने लामायुरू गाव मला दिसते. तेथे थोडे खाली उतरून काही पडीक इमारतींचे फोटो काढल्यावर मठाच्या बाजूलाच असलेला एक कॅफेटरिया मला दिसतो. मला हुश्श होते मी आत शिरतो व ब्लॅक चहाची ऑर्डर देतो व स्वस्थ चित्ताने पूजा विधीची वाट बघत राहतो.

प्रार्थना चक्र हातात घेतलेला एक खेडूत

एक लडाखी शिशू

जवळ जवळ तासाभराने लामायुरू मठाची दुसरी चक्कर काटायला मी तयार होतो. आता मठाची इमारत आजूबाजूचे खेडूत व माझ्यासारखे काही पर्यटक यांनी पूर्ण भरून गेली आहे. मुख्य पूजा गच्चीवर होणार असे तिथल्या तयारीवरून दिसते आहे. मी परत गच्चीवर जातो व एक चांगली जागा पकडून पूजा सुरू होण्याची वाट बघत राहतो. गच्चीच्या मध्यभागी एक टेबल मांडलेले आहे. त्यावर पूजा पात्रे , पाण्याच्या सुरया, लोणी व तेल या वस्तू ठेवलेल्या आहेत. टेबलाशेजारी जमिनीवर मेणापासून बनवलेल्या काही वस्तू चारच्या गटात मांडून ठेवलेल्या आहेत.

प्रथम वाद्यवादकांची एक तुकडी गच्चीवर प्रवेश करते आहे. त्यांच्या हातातील पिपाणीसारखी वाद्ये वाजवत हे वादक गच्चीवर येतात व एका बाजूला उभे राहतात. त्यांच्या शिरावर अतिशय रोचक दिसणारी लाल रंगाची शिरस्त्राणे आहेत. यानंतर काळ्या हॅट्स घातलेले काही लामा येतात व गच्चीवरील टेबलासमोर एका रांगेत उभे रहातात. या काळ्या हॅट्सवर मानवी कवटी सारखे दिसणारे चेहरे बसवलेले आहेत. हे लामा त्यांच्या हातातल्या पोथ्यांमधून काही मंत्र म्हणू लागतात. उंच लाल रंगाची शिरस्त्राणे घातलेले चार लामा आता टेबलाच्या चारी दिशांना उभे राहतात. काही मंत्र झाल्यावर ते स्वत:भोवती गिरकी घेत टेबलाला प्रदक्षिणा घालतात असे बराच वेळा केले जाते. माझ्या समजुतीप्रमाणे हे लामा, जमिनीवर ठेवलेल्या मेणाच्या वस्तू चारी दिशांच्या संरक्षक राजांना अर्पण करून सर्व दुष्ट शक्तींपासून सर्वांचे संरक्षण करण्याची विनंती करत असावेत कारण प्रदक्षिणा घातल्यावर या वस्तू त्या चार दिशांना फेकून दिल्या जातात.

पूजा पाहण्यासाठी जमलेले खेडूत व पर्यटक

वाद्यवादक तुकडीचे आगमन 

काळ्या हॅट घातलेल्या लामांची रांग

पूजा विधीची सुरुवात

पूजा विधी समाप्त होतो व मी माझ्या हॉटेलकडे परत येतो. हॉटेलच्या भोजन कक्षामध्ये बफे पद्धतीचे भोजन उपलब्ध आहे. भारतीय पद्धतीचे साधे जेवण असले तरी ते अतिशय रुचकर खासच आहे.

संध्याकाळी मी लामायुरु गाव ज्या घळीत वसलेले आहे त्या घळीच्या टोकापर्यंत, म्हणजे मठाच्या एकदम विरुद्ध दिशेला, चालत जाण्याचे ठरवतो. या जागेवरून लामायुरू घळीचा मोठा नयनमनोहर देखावा दिसतो आहे. माझ्या समोरच्या बाजूस हिरव्या गार शेतांनी व पॉपलरच्या झाडांनी सजलेली लामायुरूची घळ दिसते आहे तर माझ्या मागच्या बाजूस लडाखचे गगनाला भिडणारे झान्स्कर पर्वतराजीमधले पर्वत आहेत. हे उंच पर्वत थिटेच वाटावे असे त्यांच्याहूनही उंच असलेले व बर्फाच्छादित शिखरे असलेले पर्वत त्यांच्या मागे आहेत. दोन्ही बाजूच्या पर्वत उतारांवर विचित्र आणि कथा कादंबर्‍यात शोभतील अशा आकारांच्या दगडांच्या ओळी उभ्या आहेत.

लामायुरू घळीचे आनखी एक दृष्य 

रोल कॉल साठी रेडी असलेले पाषाण

मी शांत उभा राहून आजूबाजूच्या सृष्टीवैभवाचे निरिक्षण करताना कोणीतरी एकदम हॅलोम्हटल्याचे मी ऐकतो. मला जरा दचकायला झाल्यासारखे होते परंतु ती व्यक्ती तिथलीच कोणी स्थानिक व्यक्ती आहे व तिला मोडकेतोडके का होईना इंग्रजी येते आहे हे लक्षात आल्याने मी संभाषण चालू करतो. आम्ही बर्‍याच विषयांवर बोलतो. लामायुरू गावातले एकूण जीवन, शेती, हवामान वगैरे. मला लडाख आवडले का? हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न अर्थातच मला विचारला जातो. मी त्या व्यक्तीला या भूभागाच्या उत्तरेला असलेल्या बाल्टीस्तान या भागाविषयी विचारतो. (हा भाग सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे.) बाल्टीस्तान मधले लोक इकडे येतात का? म्हणून विचारल्यावर फारसे कोणी येत नाहीत. क्वचित कोणी येतात पण इथल्या लोकांचे त्यांच्याशी पटत नाही म्हणून उत्तर मिळते. आमचे संभाषण आटोपते आल्यावर ती व्यक्ती मला सहजपणे सांगून टाकते. ” मी आज जरा जास्तच बोलतो आहे नाही का? कारण मी आज जरा थोडी जास्तच छांग (मद्यार्क असलेले स्थानिक पेय) घेतली आहे. ” मला काय प्रतिसाद द्यावा हे खरोखरच कळत नाही. मी नुसते स्मित करतो. नंतर हॉटेलवर मला दोन जर्मन महिला भेटतात. त्यांनी भारतात व इतरत्र बराच प्रवास केलेला असल्याने आम्हाला बोलायला बरेच विषय आहेत. आम्ही भारताशिवाय कंबोडिया आणि त्यांच्या जर्मनीतल्या गावाबद्दल बोलतो.

झाला तेवढा जनसंपर्क खूप झाला असे वाटून मी परत भोजनगृहाकडे रात्रीचे जेवण घेण्यासाठी वळतो. जेवणात चिनी, कॉन्टिनेन्टल व भारतीय पदार्थांची सरमिसळ आहे. हॉटेलमधे इतर परदेशी पर्यटक असल्याने कदाचित तसे असावे.

लेहच्या मानाने इथली रात्रीची हवा बरीच जास्त थंड वाटते आहे. पण माझी खोली छान उबदार आहे आणि मुख्य म्हणजे माझ्या कॅमेर्‍याच्या बॅटर्‍या चार्ज करण्यासाठी विद्युतप्रवाह उपलब्ध आहे. मोठ्या आनंदाने मी अंथरूणात शिरतो.

( क्रमश🙂

25 जुलै 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “लडाख डायरी- भाग -2

 1. apratim sir,sundar warnan kele ahe. Photographs and video mulle zast changla effect sadhat ahe.
  Sundar sir, take care.

  Posted by anil | जुलै 25, 2011, 5:30 pm
 2. चंद्रशेखरजी
  तुमचा लडाख डायरी भाग – २ लेख छान आहे . वाचून मस्त वाटलं . लडाख चे फोटो दिले असल्यामूळे लेखात जिवंतपणा आला . फोटो पाहून मन प्रसन्न झालं , काय निसर्ग सौंदर्य आहे तिकडे . तिकडचे लोक कीती नॅचरल जिवन जगतात . आपल्या प्रमाणे यंत्र तंत्राच्या अधिन झालेले ते दिसत नाहीत . सिंधू नदी तर फक्त पुस्तकात वाचलेली होती तुमच्या मूळे आज दर्शन ही घडलं . जिकडे पाहावं तिकडे डोंगर दर्‍या अन खूप शांतता . तुम्हला लडाखच्या प्रसावात कुणी अध्यात्मिक योगी तिबेटी लामा भेटले होते का ? मी हिमालयाच्या प्रवास वर्णनात त्यांच्या बद्दल वाचले आहे . हिमालयाचा ही बराचसा भाग म्हणा किंवा सान्निध्य म्हणा लडाखला लाभलेल असल्यामूळे तुमची कदाचित एखाद्या प्रज्ञावान योग्याशी ही भेट झाली असेल . तिकडची भाषा आपल्याला येत नसल्यामूळे तिथल्या लोकांशी संवाद कसा साधला जातो ( कदाचित दुभाष्या मार्फत ) त्यांच्या लोकजिवना बद्दल आणि रीतीरिवाजाबद्दल लिहिलं तर वाचकांना अजून जास्त माहीती मिळेल .

  Posted by sandeep deokar | जुलै 26, 2011, 1:58 pm
  • संदीप –

   लडाख हा भारतातल्या इतर भागांच्या सारखाच व 100 टक्के भारतीय असलेला प्रदेश आहे. तिथले लोक तुमच्या आमच्या सारखेच आहेत. फक्त तिबेटी बौद्ध धर्म पालन करत असल्याने त्यांच्या धर्माबद्दल थोडी गूढता आपल्याला वाटते इतकेच. आणि माझ्या 9 किंवा 10 दिवसांच्या मला कोणी अध्यात्मिक तिबेटी लामा भेटतील अशी अपेक्षा मी तरी ठेवली नव्हती. डॆस्किटच्या मठात एका लामांबरोबर मी अर्धा एक तास चर्चा केली होती पण ती बौद्ध धर्माचे स्वरूप समजावून घेण्याइतपतच होती. या चर्चेबद्दल पुढच्या भागात जरूर लिहीन.

   Posted by chandrashekhara | जुलै 28, 2011, 8:41 सकाळी
 3. लडाखचे रूपांतर पर्यटन स्थळात कसे झाले याचा मागोवा घेतल्यास या वर्णनाला अधिक रंजकता मिळेल.

  Posted by मनोहर | जुलै 26, 2011, 10:51 pm
  • मनोहर –

   लडाखचे पर्यट्न स्थळात कसे रूपांतर होते आहे व आणखी विस्तृत प्रमाणात होणे कसे आवश्य्क आहे या बद्दल मी पुढच्या भागात लिहिणार आहे. तोपर्यंत प्रतिक्षा करा.

   Posted by chandrashekhara | जुलै 28, 2011, 8:43 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: