.
Travel-पर्यटन, Uncategorized

लडाख डायरी- भाग 1


बुधवार

नवी दिल्ली मधील इंदिरा गांधी आंतर्राष्ट्रीय विमानतळापाशी माझी टॅक्सी थांबत असताना माझे घड्याळाकडे लक्ष जाते. पहाटेचे पाच वाजायला आले आहेत. विमानतळावर उड्डाणाच्या निदान दोन तास तरी आधी पोचायचे हा माझा निश्चय सुरवातीसच मोडला आहे. परंतु हॉटेलच्या लोकांनी मोठी व्हॅन पाहिजे हे सांगितले असताना सुद्धा आयत्या वेळेस एक छोटी गाडी उपलब्ध करून देणे, त्यावर आमची आगपाखड, मग आयत्या वेळेस दुसरी टॅक्सी आणणे, वगैरे प्रकरणे लक्षात घेतली तर उड्डाणाच्या वेळेच्या दीड तास आधी पोचणे ही सुद्धा माझी एक अचिव्हमेंटच मला वाटते आहे. या विमानतळावर नव्यानेच बांधलेले टर्मिनल क्रमांक 3 मात्र एकदम चकाचक वाटते आहे. सिंगापूरच्या चांगी विमानतळाची मला राहून राहून आठवण येते आहे. मात्र सामान घेऊन मी चेकइन काऊंटर्स पाशी येतो व तिथला गोंधळ बघितल्यावर आपण नक्कीच सिंगापूरला नसून दिल्लीलाच आहोत या बाबतीत माझी खात्रीच पटते. एक दोन विमान कंपनीचे कर्मचारी दिसतात. त्यांनाही लेहला जाणार्‍या विमानाच्या उतारूंची रांग कोणती आहे हे नीटसे माहीत दिसत नाहीये. मी त्यांनी दर्शवलेल्या दिशेने जाऊन फारसा काहीच पत्ता न लागल्याने शेवटी आपल्या भारतीय पद्धतीने चौकशा सुरू करतो व पाच मिनिटात प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे ते मला बरोबर समजते. सर्व विमान प्रवाशांचे आरक्षण, त्यांना बोर्डिंग पासेस इशू करणे व त्यांच्या सामानाच्या बॅगेज स्लिप्स बनवणे वगैरे कामे जी संगणक प्रणाली करत असते तिने मान टाकलेली असल्याने, विमान कर्मचारी ही कामे हाताने करून देत आहेत. लेहला ज्या खाजगी विमान कंपनीच्या विमानाने मी जाणार आहे त्यांचीच एका पाठोपाठ एक अशी दोन उड्डाणे आहेत व त्यातून जाणार्‍या प्रवाशांनी आपले योग्य ते उड्डाणच घ्यावे या साठी त्यांना बरीच खबरदारी घ्यावी लागते आहे.

या गोंधळाच्या वातावरणात, विमान कर्मचार्‍यांनी मात्र अतिशय कार्यकुशलतेने आपले काम योग्य रित्या केलेले असल्याने बोर्डिंग कार्डस वगैरे माझ्या हातात उशीराने का होईन पण वेळेतच येतात. मी सुरक्षा कवचाचे सर्व सोपस्कार पार पाडतो व आता एक कप चहा स्वस्थपणे प्यावा असे ठरवतो. परंतु विमाने योग्य वेळी निघतील हे बघणारा कर्मचारी वर्ग व बाहेरचा चेकइन काऊंटर वरचा कर्मचारी वर्ग यांचा एकमेकाशी काही संबंधच नसावा अशा पद्धतीने, विमानतळाच्या आतील भागातील कर्मचार्‍यांकडून, केला गेलेला माझ्या उड्डाणासाठीचा लास्ट आणि फायनल कॉलचा पुकारा झालेला मी ऐकतो व चहा पिणे वगैरेसारख्या बाकी सर्व कल्पना डोक्यातून काढून टाकून विमानाच्या दिशेने भराभर चालायला सुरूवात करतो.

विमानात आपली जागा पटकावणे वगैरे सोपस्कार होतात. हवाई सुंदर्‍या त्यांच्या औपचारिक घोषणा करतात पण नंतर बराच वेळ गेला तरी पुढे काहीच घडत नाही. आमचे विमान बसल्या जागीच राहते. जरा वेळाने कंटाळा येऊन मी एका हवाई सुंदरीला उशीराचे कारण विचारतो. लेह वरच्या एअर ट्रॅफिक कन्ट्रोलरने आमच्या उड्डाणाला अजून हिरवा कंदिल न दिल्याने आम्ही स्वस्थ आहोत हे कारण समजते. आता स्वस्थ बसून राहण्याशिवाय पर्यायच नसतो. अखेरीस आम्हाला लेहहून परवानगी मिळते व आमचे विमान उड्डाण करते तेंव्हा नियोजित वेळेहून एक तास उशीर झालेला आहे हे माझ्या लक्षात येते.

विमान स्थिरस्थावर झाल्यावर आम्हाला गरम गरम ब्रेकफास्ट दिला जातो. सकाळपासून साधा चहाचा कप सुद्धा पोटात गेलेला नसल्याने, विमानात दिला गेलेला ब्रेकफास्ट मी अगदी शेवटच्या कणापर्यंत संपवतो, चहाचा शेवटचा घोट घेतो आणि माझे लक्ष सहजच खिडकीतून बाहेर दिसणार्‍या दृष्याकडे जाते.

विमानाच्या पंखाखाली दिसणार्‍या हिमालयाच्या पर्वतराजी

पूर्वी पुण्याला चतुश्रुंगीच्या जत्रेत, स्वत:ला जादूगार म्हणवून घेणारा एक माणूस ”रंगीत चित्रपट दोन आणे ” म्हणून ओरडत त्याच्या समोरच्या यंत्रावरून रंगीत चित्रे दाखवत असे. ड्रम सारख्या दिसणार्‍या त्याच्या यंत्राला, पुढच्या बाजूला तीन गवाक्षे ठेवलेली असत. त्याच्या पुढे ठेवलेल्या छोट्या स्टुलावर बसून त्या गवाक्षातून आत बघितले की ताज महाल, गोल घुमट, हिमालय पर्वत वगैरे सारखी रंगीत चित्रे आत दिसत असत. विमानाच्या माझ्या शेजारी असलेल्या खिडकीतून दिसणारे दृष्य असाच कोणीतरी जादुगार मला दाखवतो आहे असा भास मला क्षणभर तरी होतो. माझ्या खिडकीतून मला विमानाच्या पंखाचे टोक स्थिर दिसते आहे. मात्र या पंखाखाली एक सतत बदलत जाणारा देखावा मला दिसतो आहे. हिमालयाच्या बर्फाच्छादित रांगा माझ्या या खिडकीतून एका पाठोपाठ उलगडताना मला समोर दिसत आहेत. मला जर या विमानाच्या खिडकीतून हात बाहेर काढता आला तर हिमालयाच्या या शिखरांना सहजपणे स्पर्श करता येईल असे राहूनराहून मला वाटते आहे. आमचे विमान आणखी थोडे पुढे जाते. आता एखादे बटण दाबून देखावा बदलावा तसे चित्र बदलले आहे. धवलशुभ्र दिसणार्‍या हिमालयांच्या जागी आता अचानक उघडे बोडके पर्वत दिसू लागले आहेत. मात्र सह्याद्रीवरून जात असताना जसे पर्वत शिखरांवर काळे बॅसॉल्ट दगडाचे मोठमोठे खडक दिसतात तसे येथे दिसत नाहीत. हे सर्व पर्वत मातकट किरमिजी रंगाचे आहेत. हिवाळ्यात हे पर्वत बर्फाच्छादित असणार हे त्या पर्वतांच्या उतारावरून स्पष्ट कळते आहे. दर वर्षी पडलेला बर्फ उन्हाळ्यात खाली वितळून जात असल्याने या पर्वतांचे उतार खडबडीत न दिसता अगदी सपाट गुळगुळीत दिसू लागतात. बर्फाबरोबर प्रचंड रेती पण दरवर्षी खाली वाहत जाते. सध्या या पिवळट मातकट रंगाच्या रेतीने फक्त हे पर्वत उतार आच्छादलेले आहेत.

पर्वतांचे हे बदललेले रूप बघितल्या क्षणी हे लक्षात येते आहे की आपण लडाखला पोचलो आहोत. विमान खाली उतरत असल्याची घोषणा होते. मात्र विमान सरळ खाली येत धावपट्टीवर उतरत नाही. विमान हळूहळू खाली उतरत, धावपट्टी भोवती गोल चकरा मारते आहे. दोन किंवा तीन चकरा मारल्यानंतर आमचे विमान आजूबाजूला असलेल्या महाविशाल पर्वतांच्या शिखरांच्या उंचीहून बरेच खाली आले आहे. आता आणखी एक गोल रिंगण घेऊन विमान अखेरीस धावपट्टीवर चाके टेकते. मी लेहला पोचलो आहे.

लेहला जाण्याचे ठरवल्यापासून, मला ओळखीच्या अनेक व्यक्तींनी, लेहच्या विरळ हवेमुळे होणार्‍या त्रासापासून सावधानतेचे इतके इशारे दिले आहेत की माझ्या मनात आता या त्रासाबद्दल एक भितीच निर्माण झाली आहे. त्यामुळे विमान जमीनीवर उतरल्यावर दारे उघडली असली तरी बाहेर पडण्यास मी जरा साशंकच आहे. अखेरीस मी माझे सामान जमा करतो, एक दीर्घ श्वास घेतो व लडाखच्या भूमीवर पाऊल ठेवतो.

लेहचा विमानतळ बराच मोठा वाटतो आहे असे असले तरी विमानतळावर विमाने मात्र अजिबात दिसत नाहीत. फक्त आमचे विमान तेवढे दिसते आहे. हवा स्वच्छ आणि मोकळी वाटते आहे सकाळचे 9 वाजलेले असल्याने अर्थातच हवा आल्हाददायक आणि थंड आहे. लेहच्या विरळ हवेबद्दल माझ्या मनातली भिती कमी कमी होऊ लागली आहे. मी माझे सामान ताब्यात घेतो व विमानतळाच्या बाहेर पडतो. समोर माझ्या नावाची पाटी घेऊन टॅक्सी चालक उभा आहे. त्याला बघूनच मला या परक्या ठिकाणी मनातून बरे वाटते आहे. मी सामान गाडीत ठेवतो व टॅक्सी आमच्या हॉटेलवर जायला निघते.

लेहमधले आमचे हॉटेल

हॉटेलवर पोचल्यावर माझे स्वागत गरमगरम व वाफाळलेल्या चहाच्या कपाने होते. खोली ताब्यात मिळाल्यावर आता संध्याकाळपर्यंत सक्तीची विश्रांती घ्यायची आहे. अंथरूणावर आडवे पडण्याआधी मी खिडकीचा पडदा सारून एक क्षण तरी बाहेर डोकावतोच. बाहेर जे दृष्य दिसते आहे ते कल्पनेच्या बाहेर सुंदर व विलोभनीय आहे. बाहेर दिसणार्‍या दृष्याची संपूर्ण पार्श्वभूमी एका अजस्त्र व महाविशाल पर्वत रांगेने व्यापलेली आहे. या पर्वतांचा रंगही काहीतरी जरा पिवळट किंवा लालसर छटा असणारा पण प्रामुख्याने करड्या रंगाचाच म्हणावा लागेल. या पार्श्वभूमीवर हिरवी गार दिसणारी पॉपलर व विलो या वृक्षांची झाडे मोठी खुलून दिसत आहेत. खालची जमीन हिरव्यागार लुसलुशीत गवताने माखलेली आहे. नाईलाजाने हे दृष्य मनात साठवत मी अंथरूणावर आडवा पडतो व स्वस्थपणे पडून राहतो.

खिडकीतून दिसणारा  विलोभनीय देखावा

दुपारी दोनच्या सुमारास हॉटेलच्या डायनिंग रूममधे खाना तयार असल्याची सूचना मिळते. जेवण भारतीय पद्धतीचे व साधे असले तरी चविष्ट आहे. जेवण झाल्यावर परत थोडी वामकुक्षी करावी या विचाराने मी माझ्या खोलीकडे वळतो. सकाळी वाटत असलेली थंडी आता पार पळाली आहे. ऊन कडक वाटते आहे मात्र अधून मधून आकाशात ढगांचे सावट आले की हवा परत एकदा गार झाल्यासारखी होते आहे. लडाखची विरळ हवा व त्यामुळे आपल्याला त्रास होईल की काय? ही माझ्या मनात असलेली भिती मात्र आता संपूर्ण नाहीशी झाल्यासारखी वाटते आहे. लडाखच्या भटकंतीसाठी मी आता शरीराने व मनाने पूर्ण तयार आहे.

लडाखच्या विमानतळावर उतरल्याबरोबर नेहमीच्या सवईप्रमाणे मी माझा मोबाइल फोन चालू केला होता. पण माझे सर्व्हिस प्रोव्हायडर व्होडाफोन, यांची सेवा येथे उपलब्ध नसल्याची माहिती मला मिळाली होती. ही एक मोठीच अडचण मला वाटत होती. माझा ट्रॅव्हल एजंट मला आता भेटायला आला आहे व त्याला माझी ही अडचण सांगितल्याबरोबर, त्याने लडाख मधे चालेल असे सिम कार्ड माझ्या हातात ठेवून माझ्या अडचणीचे निराकरण सहजपणे केले आहे. लडाख मध्ये फक्त बीएसएनएल ची कार्डे चालतात आणि या कार्डवरून सुद्धा फक्त बीएसएनएल च्या क्रमांकांशी संबंध साधता येतो ही माहिती मला आधी मिळाली असती तर फार बरे झाले असते असे मला वाटत राहिले.

बरोबर 4 वाजता मी ठरवलेली गाडी व पुढचे 8 दिवस आम्हाला लडाखचा फेरफटका घडवून आणणार असलेल्या त्या गाडीच्या चालकाचे आगमन झाल्याची सूचना मला मिळते. प्रथम दर्शनी तरी या वाहन चालकाबद्दल माझे मत काही फार चांगले झाल्यासारखे वाटत नाही. त्याची बोलण्याची पद्धत जरा उद्धट वाटते आहे. हाच चालक आमच्या वाटाड्याचेही काम करणार आहे त्यामुळे त्याने मनमोकळेपणे बोलत राहिले पाहिजे असे मला वाटते. पण हा चालक अबोल व अगदी कामापुरते बोलणारा वाटतो आहे. पण त्याच्या बद्दल झालेला माझा प्रथमदर्शी ग्रह मनातच ठेऊन मी बाहेर पडतो. आमचा पहिला थांबा आमच्या हॉटेलपासून एखाद्या किलोमीटर अंतरावर असलेल्या चांगस्पा या टेकडीवर असलेला ‘शांती स्तूप’ हा आहे.ही चांगस्पा टेकडी लेह विमानतळाच्या पातळीपासून निदान एक हजार फूट तरी जास्त उंचीवर आहे. परंतु एक उत्तम परिस्थितीत असलेला डांबरी रस्ता वरपर्यंत जातो आहे हे बघून मला हुश्श झाले आहे. मात्र गाडी वरपर्यंत गेली तरी शेवटची शे दोनशे फूट उंची व त्याच्यावर असलेला दुमजली स्तूप हे मात्र वर चढूनच जावे लागणार आहे. एका जपानी बुद्ध धर्मियांच्या संस्थेने हा स्तूप 1983 मध्ये आदरणीय Nichidatsu Fujii Guruji, या जपानी बौद्ध धर्मगुरूच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि जपानी व लडाखी लोक यांच्यामधील यांच्यामधे असलेल्या धार्मिक सौहार्दपूर्ण संबंधाचे एक प्रतीक म्हणून बांधलेला आहे. आदरणीय Nichidatsu Fujii Gurujiया धर्मगुरूने 1914 साली Nipponzan Myohoji या एका पंथाची स्थापना केली होती. 1931 मध्ये हा धर्मगुरू महात्मा गांधींच्या विचारसरणीचा अभ्यास करण्यासाठी भारतात आला होती. बौद्ध धर्माच्या माध्यमातून आंतर्राष्ट्रीय शांती व सामंजस्य याचा प्रचार हा धर्मगुरू करत असे. 1978 मध्ये आंतराष्ट्रीय सामंजस्य या बद्दलचे जवाहरलाल नेहरू पारितोषिक या धर्मगुरूला भारत सरकारने 1978 मध्ये दिले होते.

शांती स्तूप

स्तूपावरील बुद्ध मूर्ती

स्तूपाच्या बाजूला असलेली कोरीव शिल्पे

स्तूपावरील अष्टकोनी चक्र

गाडीतून खाली उतरून शेवटचा चढ चढत असताना, परत एकदा माझ्या मनात लडाखची विरळ हवा रूंजी घालते आहे. परंतु आता मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो व नेहमीपेक्षा जरा संथ गतीने, स्तूपावरच्या गोल बाल्कनी पर्यंत चढून जातो. स्तूपाच्या वरच्या बाजूस एक पांढरा शुभ्र दिसणारा घुमट आहे व त्यावर एक अष्टकोनी चक्र बांधलेले आहे. स्तूपाच्या चारी बाजूंनी, बुद्धाच्या जीवनातील प्रसंगांची चित्रे कोरलेली आहेत व दर्शनी बाजूला भगवान बुद्धांची एक आसनस्थ मूर्ती कोरलेली आहे. ही सर्वच शिल्पे इथल्या पद्धतीने सोनेरी व इतर भडक रंगांनी रंगवलेली आहेत.

शांती स्तूप टेकडीवरून दिसणारे हिरवेगार लेह शहर

स्तूपाला लागून असलेल्या बाल्कनीमधून, हजार फूट खाली असलेले व हिरवे गार दिसणारे लेह गाव व त्याच्या पलीकडे असलेले सिंधू नदीचे खोरे स्पष्ट दिसते आहे. सिंधू दर्शन हे सुद्धा माझ्या लडाख भेटीचे एक प्रमुख कारण असल्याने, मी त्या खोर्‍याकडे अनिमिष नजरेने थोड्या वेळ पहात उभा रहातो. त्या वेळेस या नदीच्या खोर्‍याच्या पैलतीलावर असलेल्या उंच पर्वतराजीकडे व या पर्वतराजीच्या पलीकडे हिमाच्छादित दिसणार्‍या काही हिमशिखरांच्याकडे माझे प्रथम लक्ष जाते. झान्स्कर पर्वतराजी म्हणून हे पर्वत ओळखले जातात व यामधील स्टोक कांगरी (6130 मीटर), माथो कांगरी (6010 मीटर) व गो-लेब कांगरी (6120 मीटर) ही पर्वत शिखरे माझे लक्ष वेधून घेत आहेत. ढग जरा बाजूला झाले की मधूनच डोकावणार्‍या संध्याकाळच्या सूर्य प्रकाशात, ही बर्फाच्छादित शिखरे नुसती झळाळताना दिसत आहेत. शांती स्तूपाच्या गॅलरीतून सिंधू नदी किंवा ही पर्वत शिखरे यांच्याकडे बघताना एक आंतरिक समाधान वाटते आहे हे मात्र खरे. आता याचे कारण काय आहे हे सांगणे मात्र मला कठिण आहे. शांती स्तूप हे लेहमधले सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे असे म्हणतात. माझ्या आजूबाजूला असलेले पर्यटक, लहान मुले, तरुण -तरुणी यांच्या एकूण संख्येवरून या स्थळाच्या लोकप्रियतेबद्दल कोणाचीही खात्री नक्कीच पटेल.

शांती स्तूपावरून दिसणारे सिंधू नदीचे खोरे

शांती स्तूपावरून दिसणारी स्टोक कांगरी व इतर शिखरे

मोठ्या नाईलाजाने मी मागे फिरतो व खाली येऊन परत गाडीत बसतो. वाटेत येताना एक अवलोकितेश्वराचे देऊळ लागते. त्यातील स्वच्छता व सोनेरी रंग दिलेली अवलोकितेश्वराची मूर्ती मात्र नक्कीच प्रेक्षणीय आहे. गाडी आता उतारावरून परत लेह शहरात आली आहे. या पुढचा माझा थांबा लेह चा राजवाडा आहे. या राजवाड्याचे बांधकाम 17 व्या शतकात राजा सेंगे नामग्याल याच्या राज्यकालात पूर्ण झाले होते. मात्र याचे बांधकाम सुरू झाले होते बरेच आधी म्हणजे 1533 मधे. ल्हासा मधल्या सुप्रसिद्ध पोटाला राजवाड्याचे एक मिनी स्वरूप असे या राजवाड्याला म्हटले जाते. मूळात 9 मजले असलेला हा राजवाडा लेह शहराच्या मधे असलेल्या एका टेकडीवर आहे. मात्र आता यापैकी दोनच मजले शिल्लक राहिलेले आहेत व त्यांचीही मोठ्या प्रमाणात डागडुगी चालू आहे. या राजवाड्यात जाण्यासाठी माझी गाडी शहराच्या अत्यंत गजबजलेल्या अशा बाजारातून जाते आहे. शांती स्तूपा प्रमाणेच वर जाण्यासाठी सुरेख बांधलेला रस्ता आहे. मात्र शेवटचे काही अंतर चालतच जावे लागते. गाडी थांबते तेथून बर्‍याच उंचीवर असलेला एक बौद्ध मठ किंवा गोम्पा मला दिसतो. परंतु तेथपर्यंत चढून जाण्याचे धाडस आज तरी माझ्या अंगात नाही.

लेह राजवाडा

लेह राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळच्या पायर्‍या

राजवाडा प्रवेशद्वार

लेह राजवाड्याच्या पायर्‍या चढून मी प्रवेश द्वारापाशी पोचतो. प्रवेश द्वाराच्या बाजूंना व वर महिरपीसारखे लाकडी नक्षीकाम केलेले आहे. आत परत आणखी पायर्‍या आहेत. मात्र राजवाड्याची एकूण स्थिती आता त्याचा काहीच वापर काही शतके नसल्याने, अंधार, कोळिष्टके , धूळ यांनी भरलेली अशीच आहे. या दुसर्‍या पायर्‍या चढून आत गेल्यावर, एक प्रशस्त बाल्कनी दिसते. या मधून सूर्यास्ताचा देखावा व खाली असलेला जुन्या लेह शहराचा भाग मात्र मोठा प्रेक्षणीय दिसतो आहे. या बाल्कनीतून या राजवाड्याचे बांधकाम, जुने लाकूडकाम याची कल्पना येते. लडाखची हवा अतिशय कोरडी असल्याने येथे लाकूड काम बराच काळ चांगले टिकते. त्यामुळे 300 वर्षांपूर्वी बनवलेल्या खिडक्या, दरवाजांच्या फ्रेम्स अजुनही बर्‍याच सुस्थितीत दिसत आहेत.

लेह गावाचा राजवाड्याच्या गच्चीवरून दिसणारा देखावा

राजवाड्याच्या मागे असलेला बौद्ध मठ

या बाल्कनीत उभे असतानाच, सूर्य पश्चिमेला असलेल्या टेकड्यांच्या मागे गेला आहे हे माझ्या लक्षात येते व मी परतीचा मार्ग धरतो. या दिवसात (जुलै) लेह मधे अगदी रात्रीचे आठ साडेआठ वाजेपर्यंत उजेड असतो. परंतु लेहच्या राजवाड्यात मात्र त्या मानाने जरा लवकरच सावल्या दाटून आल्याने तिन्हीसांजा झाल्यासारख्या वाटताहेत. मी आता माझ्या हॉटेलकडे परत चाललो आहे. आज लवकर जेवणखाण आटोपून झोपायचे असा बेत आहे कारण उद्या लामायूरू बौद्ध मठाकडे जायला निघायचे आहे. हा प्रवास सिंधू नदीच्या काठाकाठाने करायचा आहे याची पण एक थोडी एक्साइटमेंट माझ्या मनात आहे.

मी हॉटेलवर परत येतो तेंव्हा वीज गायब आहे हे लक्षात येते. लडाख मधे थोडी फार वीज जल प्रवाहावरील प्रकल्पांतून तयार होते. या शिवाय कच्च्या तेलावर चालणारे काही औष्णिक प्रकल्प आहेत. पण एकूण पहाता, लेह सोडले तर बाकी ठिकाणी विजेची एकूण वानवाच आहे. सुदैवाने आमच्या हॉतेलमधे जनरेटर बसवलेला आहे. त्यामुळे आज जेवण खाण करण्यास तरी अडचण येत नाही. मात्र रात्री बेरात्री वीज गेली तर बाकी दुसरी काहीच सोय नसते त्यामुळे प्रत्येक पर्यटकाने एक उत्तम टॉर्च बरोबर नेणे अत्यंत आवश्यक आहे.

लेहमधला पहिला दिवस तर छान गेला. आता उद्यापासून खरी भटकंती सुरू होणार आहे.

(क्रमश:)

18 जुलै 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

11 thoughts on “लडाख डायरी- भाग 1

 1. छान आता रोज लडाख डायरी वाचयला मिळणार.
  लडाख फिरून आल्या सारखे वाटेल

  Posted by prasannakulkarni | जुलै 18, 2011, 7:02 pm
 2. तुमचे प्रवासवर्णन माहितीपर असते तसंच रंजकही. पुढील भागांची उत्सुकतेने वाट पाहत आहे.

  Posted by Nandan | जुलै 19, 2011, 5:36 सकाळी
  • नंदन आणि प्रसन्न –

   तुमच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद. लडाखचे वर्णन तुम्हाला वाचायला मिळेलच.

   Posted by chandrashekhara | जुलै 19, 2011, 9:41 सकाळी
 3. great sir, like history your prwasvarnan writing is vrey fluent , i read your each blog.
  I am waiting for next blog.
  take care sir at Leh Ladakh.

  Posted by anil | जुलै 19, 2011, 10:10 सकाळी
 4. चंद्रशेखर, तुम्ही उपक्रमावर बहिष्कार घातला आहे का? आहात कुठे? मी वरील पोस्ट अद्याप वाचली नाही पण इंटरेस्टिंग दिसते तेव्हा नक्की वाचेन परंतु उपक्रमावर येत चला.

  – प्रियाली

  Posted by प्रियाली | जुलै 20, 2011, 1:10 सकाळी
  • प्रियाली –

   तुमची मेल बघितली आणि लक्षात आले की आपण बर्‍याच दिवसात उपक्रमवर गेलोच नाही. गेले काही दिवस बराच व्यस्त होतो. त्यामुळे जमले नाही. बाकी काही विशेष कारण नाही.
   मी सध्या सातवाहन राजवंशाबद्दल लेख लिहिण्याच्या प्रयत्नात आहे. यापैकी नाणेघाटा संबंधीच्या लेखाचे 3 भाग मराठी व इंग्रजी मधील माझ्या ब्लॉग्सवर तुम्हाला बघायला मिळतील. याच्या पुढच्या भागासाठी वेळ लागेल असे दिसते. मध्यंतरी लडाखला जाऊन आलो. सध्या त्यावर लिहितो आहे. आठवणीने मेल पठवल्याबद्दल धन्यवाद
   चंद्रशेखर्

   Posted by chandrashekhara | जुलै 20, 2011, 9:24 सकाळी
 5. आपण सध्या इतके वैविध्यपूर्ण लिहित आहात, म्हणून आपल्याला पुण्याविषयी, विशेषतः पानशेत पुरापूर्वीच्या, आपण विस्तृत रूपाने लिहिणार होता, याची आठवण करून द्यायला योग्य वाटत नाही. कारण सध्या लडाख भ्रमंतीवरील आपली रंगतदार मालिका सुरू झाली आहे. त्याशिवाय सातवाहन राजांच्या काळाविषयी आपण अभ्यास करत आहात, असे आपण नमूद केल्याचे दिसले . असेच लिहित रहा. दररोज सकाळी नऊच्या सुमारास मी आपल्या नवीन लेखाची वाट पाहात असतो.
  मंगेश नाबर.

  Posted by mangesh nabar | जुलै 21, 2011, 7:36 सकाळी
 6. Dear Athwale
  It was pleasant surprise to see your site. Just I was serching ref of Pengong lake. I visited this lake in this June and experienced nature’s wonder. Best wishes for your venture
  Wesanekar, P.R

  Posted by p.r.wesanekar | जून 24, 2012, 8:19 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: