.
ताज्या घडामोडी Current Affairs

हवेतले मनोरे आणि पूल


पुणे महानगरपालिका, त्या महानगरपालिकेच्या सभागृहावर तुम्ही आम्ही निवडून दिलेले नगरसेवक आणि एकूण कारभार, या सर्वांवर रोज एक लेख लिहावयाचा ठरवला तरी लिहिता येईल असे मला आता वाटू लागले आहे.

काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. मी काही कामानिमित्त सकाळी बाहेर गेलो होतो. परत घरी आल्यावर मला असे दिसले की आमच्या घराच्या कोपर्‍यावर असलेल्या रस्त्यावर काही मंडळी एक खड्डा खोदत होती. हा खड्डा खोदणे रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथावर चालू होते. मी ताबडतोब तेथे जाऊन त्या मंडळींना तुम्ही कोण आहात? व काय करता आहात? अशी पृच्छा एक जागृत नागरिक या नात्याने केली. ही मंडळी पाणी खात्यातली होती व त्यांनी दाखवलेल्या त्यांच्या डायरीतल्या नोंदीप्रमाणे, कोण्या एका सोम्या गोम्या मित्रमंडळाने या चौकात पाणपोई बसवायची आहे, सबब महानगरपालिकेने पाण्याची नळजोडणी करून द्यावी अशी विनंती केल्याने ते तशी नळ जोडणी करण्यासाठी तो खड्डा खोदत होते. हे मंडळ कोठले? त्यांना या चौकात पाणपोई कशासाठी बसवायची होती? वगैरे गोष्टी मला समजू शकल्या नाहीत. परंतु मी जास्त खुलासा मागण्याच्या भानगडीत पडलो नाही कारण ज्या ठिकाणी ही मंडळी हा खड्डा खोदत होती त्या जागेच्या जवळपास सुद्धा कोठूनही पाण्याची लाईन गेलेली नव्हती हे मला पक्के माहीत होते. मी ही बाब त्या मंडळींच्या लक्षात आणली. त्यांनी माझ्या सूचनेवर थोडी चर्चा केली व मला हे कशावरून माहिती आहे अशी पृच्छा केली. मी या भागात माझे आयुष्य घालवले आहे व मला पाण्याची व ड्रेनेजची लाईन कोठून गेली आहे हे नक्की माहीत आहे हे सांगण्याचा मी बराच प्रयत्न केला. परंतु त्यांच्या साहेबांनी त्याच जागेवर खड्डा खोदावा अशी ऑर्डर दिलेली असल्याने ते तिथेच खोदत राहिले.

दुपारपर्यंत चांगला पुरुष खोल खड्डा खणून झाला. अर्थातच पाण्याचा नळ सापडणे शक्यच नव्हते. त्या नंतर त्यांनी तो खड्डा बुजवला व ते परत गेले. या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट मला समजली की महानगरपालिकेच्या पाणी विभागाकडे रस्त्यावरून पाण्याचे नळ कोठून गेलेले आहेत. त्याला जोडण्या कोठे दिलेल्या आहेत याचे कोणत्याही प्रकारचे नकाशे किंवा आराखडे उपलब्ध नाहीत. सर्व काम अंदाजधपक्याने चालते. मानवी बलाचा व वेळेचा या पद्धतीने प्रचंड दुरुपयोग ही संस्था करत असल्यानेच आवश्यक ती कामे होत नाहीत हे उघड आहे.

माझ्या घराजवळच्या चौकात अनेक विजेचे दिवे आहेत. मध्यभागी एक शक्तीशाली 6 किंवा 8 दिवे असलेला एक मोठा खांब बसवलेला आहे. असे असूनही मागच्या आठवड्यापूर्वी आमच्या चौकात नव्या डिझाईनचे आणखी दोन खांब उभारून मोठे दिवे बसवण्यात आले. हे दिवे का बसवत आहेत? असे त्या ठेकेदाराला विचारल्यावर मला एक नवीनच माहिती कळली. रस्त्यावर दिवे लावण्याच्या ठेक्यात काही हितसंबंध गुंतलेले असल्याने, रस्त्यावर गरज असो वा नसो! नवे दिवे लावण्याची टेन्डर्स निघतात, पास होतात व दिवे बसतात देखील. त्या रस्त्यावर दिव्यांची गरज आहे किंवा नाही हे कोणी बघतच नाही. रस्त्यावरच्या दिव्यांची जी गोष्ट तीच रस्ते दुरुस्तीची. अगदी उत्तम स्थितीत असलेल्या रस्त्यांवर डांबराचा एक थर देऊन त्याची उंची वाढवण्याशिवाय दुसरे काहीही साध्य होत नाही. परंतु असे काम केले जातेच. छोट्या गल्ल्यांच्यातून, जिथे फारशी वाहतूकही नसते आणि रस्ताही चांगल्या स्थितीत असतो, तिथे तो चांगला रस्ता उखडून कॉन्क्रीटचा रस्ता करण्याची नवीन टूम निघाली आहे. या असल्या कामांनी नागरिकांचा काय फायदा होत असेल ते देव जाणे! कोणाचा फायदा होतो हे मात्र एकदम स्पष्ट आहे.

या आमच्या नगरपालिकेच्या सभागृहाची एक स्थायी समिती आहे. या समितीचे कार्य म्हणजे तर एक विलक्षण अजब कथा आहे. एखाद्या ठरावाला आज विरोध करणारे उद्या एकदम त्या ठरावाला पाठिंबा देऊ लागतात किंवा एखाद्या चांगल्या कामाचा ठराव विरूद्ध पक्षाच्या लोकांनी आणला आहे म्हणून ते कार्य कितीही लोकहिताचे असले तरी त्याला विरोध केला जातो.

काही आठवड्यांपूर्वी या स्थायी समितीने फक्त पादचार्‍यांसाठी असलेल्या एका उड्डाण मार्गाच्या प्रकल्पाला एकमताने मान्यता दिली. हा पूल मंडई ते थेट स्वारगेट या मार्गावर व दुसर्‍या एका अशाच लांबच्या मार्गावर बांधण्यात येणार होता. या प्रकल्पाला येणारा प्रस्तावित 100 कोटी रुपयांचा खर्च या समितीने लगेच मान्य केला. या नंतर हळू हळू या प्रकल्पाची माहिती बाहेर येऊ लागली. हा पूल 20 फूट उंचीवर बांधण्यात येणार होता म्हणजे या पुलावर जाण्यासाठी म्हातार्‍याकोतार्‍यांना एवढा चढ उतार करणे आवश्यक होणार होते. हे अंतर खरोखर पायी चालत किती लोक जातील या बद्दल माहितीसुद्धा कोणी जमा केलेली नव्हती. मुंबई महानगरपालिकेने असाच एक पूल पण निम्म्या लांबीचाच बांधला आहे. त्या पुलाला 17 कोटी रुपयेच खर्च आला होता. मग हे 100 कोटीचे बजेट कोणत्या आधारावर तयार केले गेले होते? वगैरे प्रश्न लोक विचारू लागले.

या पादचारी पुलाबद्दलची सत्य परिस्थिती एकंदरीत लोकांच्या लक्षात येते आहे हे उमजल्याने आमच्या या स्थायी समितीने घाईघाईने परत एक सभा घेतली व या पुलाचा झालेला ठराव रद्द करून दफ्तरदाखल करून टाकला.

आमच्या घराजवळ लावलेले नवे विजेचे खांब, कॉन्क्रीटचे रस्ते व हा नवा पूल यात फरक असला तर फक्त प्रमाणाचा आहे. खांब आणि रस्ते यांचे ठेके लाखात असतात तर हा ठेका 100 कोटीचा होता.

महानगरपालिकेवर निवडून आलेली मंडळी ही निस्वार्थी व शहराचे हित करण्यासाठी निवडून दिली जातात अशा भ्रामक कल्पनांचे दिवस आता गेले आहेत. सत्य परिस्थिती काय आहे हे सांगण्यासाठी काही फारशा उच्च बुद्धीमत्तेची आवश्यकता आहे असे नाही. जे काय चालले आहे हे स्पष्टच आहे. प्रश्न एवढाच आहे की हे सगळे शेवटी कोठे घेऊन जाणार आहे?

26 मे 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

8 thoughts on “हवेतले मनोरे आणि पूल

 1. आपल्या लेखावरून मला येत असलेला एक दैनंदिन अनुभव सांगावासा वाटतो. मी राहतो, त्या परळ या मुंबईतील काहीशा गजबजलेल्या वस्तीत आमची इमारत तिच्या आजूबाजूच्या प्रशस्त अंगणामुळे स्थानिक राजकीय नेत्यांच्या (परळमध्ये सध्या कुणाचे राज्य चालते,हे सांगायला नकोच.) नजरेत भरली आणि त्यांनी अल्पावधीत आपल्या दादागिरीच्या जोरावर तेथे आपले ” शाखा ” नावाचे दुकान चालू केले. त्यांची ही शाखा म्हणजे एक पक्की बांधलेली बैठी इमारत असून त्यामुळे आमच्या खासगी जीवनात एक कायमचा अडसर निर्माण झाला. येथे दिवसभर आणि कधी रात्रौ त्यांचे ‘कार्य'(!) चाललेले असते. निवडणुकीच्या काळात ते त्यांचे प्रचार कार्यालय होते. मग आमच्या इमारतीच्या तळमजल्याच्या खिडक्यांवर प्लायवूडचे फळे ठोकले जातात. आमच्या जाण्यायेण्याच्या वाटेवर यांच्या कार्यकर्त्यांचे अड्डे कायम असतात. या बेकायदेशीर प्रकारावर कुणीही कारवाई करू शकत नाही, हे दुर्दैव आपल्या लोकशाहीचे आहे.
  कालाय तस्मै नमः I
  मंगेश नाबर.

  Posted by mangesh nabar | मे 26, 2011, 12:37 pm
  • मंगेश –

   आपला अनुभव खरोखरच मनस्वी चीड निर्माण करणारा आहे. आपल्या निरनिराळ्या कार्यक्रमांच्यातून सर्वसाधारण लोकांना किती उपद्रव होतो याची जाणीव या स्थानिक पुढार्‍यांना नसते असे नाही परंतु या कार्यक्रमांच्यातूनच आपण जनतेपुढे येणार आहोत व त्यातून आपली राजकीय प्रगती होणार आहे असे त्यांना विनाकारण वाटत असते.

   Posted by chandrashekhara | मे 26, 2011, 12:58 pm
 2. >>पुणे महानगरपालिका, त्या महानगरपालिकेच्या सभागृहावर तुम्ही आम्ही निवडून दिलेले नगरसेवक आणि एकूण कारभार, या सर्वांवर रोज एक लेख लिहावयाचा ठरवला तरी लिहिता येईल असे मला आता वाटू लागले आहे.>>

  मलाही असच वाटत! अडचण अशी आहे की अस काही दिसल्यावर (आणि पुरेसा वेळ आणि इच्छा असल्यावर) – याबाबत नेमकी कुठ तक्रार करायची ते माहती नसत. शिवाय यात एवढे हितसंबंध गुंतलेले असतात; की त्यातून होणा-या त्रासापेक्षा हा त्रास परवडतो! मग ‘मला काय करायचं’ अशी आपली मनोवृत्ती होत जाते.

  आपापल्या वार्डात, विभागात, सोसायटीत – जागरूक नागरिकांच्या समित्या असण – आणि त्या कृतीशील असण – हा एक उपाय असू शकतो. पण अशा घटनांमध्ये सहमती होण अवघड असत असा माझा अनुभव आहे. म्हणजे ‘हा प्रश्न महत्त्वाचा की दुसरा’ यावर चर्चा सुरु होते आणि बहुतेक वेळा कटुता निर्माण करून काहीही कृती न होता संपते!

  Posted by aativas | मे 26, 2011, 1:16 pm
  • आतिवास –

   अण्णा हजार्‍यांचा लोकपाल नियुक्त झाल्यावर परिस्थितीमधे फरक पडू शकेल का?

   Posted by chandrashekhara | मे 26, 2011, 2:55 pm
 3. ‘लोकपाल’ बाबत सध्या पुष्कळ चर्चा चालू आहे. लोकपाल निवडीची प्रक्रिया आणि लोकपालाचे अधिकार हे मुद्दे आताच्या आपल्या चर्चेत गैरलागू होतात – म्हणून बाजूला ठेवते.

  एखादी व्यक्ती कितीही चांगली असली तरी एकाच व्यक्तीच्या हाती सगळ्या समाजाच्या वतीने बोलण्याच्या, कृतीच्या अधिकाराने (अमर्याद अधिकाराने) नुकसान होते हा धडा आपण इतिहासापासून शिकायला हरकत नाही. ज्यांच जगण आहे त्यांनीच जागरूक होण्याला आणि राहण्याला पर्याय नाही अस मला वाटत! सत्ता, अधिकार, जबाबदारी, फायदे .. हे सगळ ‘फिरत’ राहायला हव, नाहीतर एका किंवा दुस-या मार्गाने अधिकारशाही येते!

  सविता

  Posted by aativas | मे 26, 2011, 3:22 pm
  • सविता-
   प्रस्तावित कल्पनेप्रमाणे लोकपाल ही व्यक्ती नसून एक प्रणाली असणार आहे. या प्रणालीत निरनिराळ्या स्तरावरच्या अनेक व्यक्तींचा समावेश असणार आहे. यामुळे कोना एका व्यक्तीला अमर्याद अधिकार प्राप्त होतील असे वाटत नाही.

   Posted by chandrashekhara | मे 27, 2011, 8:48 सकाळी
 4. yes we are suffring from this kind of problems , and no one is there to answer.

  Posted by arun ramchandra karekar | मे 27, 2011, 12:38 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: