.
ताज्या घडामोडी Current Affairs

विनाधार आधार


कोणत्याही एखाद्या चांगल्या कल्पनेचा विचका आणि पचका करायचा असला तर ती एखाद्या सरकारी किंवा तत्सम यंत्रणेला कार्यान्वित करण्यासाठी द्यावी. थोड्याच कालावधीत ती स्कीम बारगळलीच पाहिजे म्हणून समजा.

मागच्या वर्षी बरेच ढोल ताशे वाजवत भारत सरकारने आपण प्रत्येक नागरिकाला त्याच्या शरीर वैशिष्ट्यांशी निगडित असलेला एक बारा आकडी एकमेवाद्वितीय क्रमांक देण्यात येणार असल्याची घोषणा केली. हा क्रमांक देण्यासाठीची यंत्रणा व सॉफ्टवेअर पूर्ण सज्ज आहे असेही सांगण्यात आले. ही बातमी वृत्तपत्रात वाचल्यावर मी असा विचार केला की आपणही हा क्रमांक घ्यावा. खरे पाहता मला या क्रमांकाचा सध्या तरी तसा काहीच उपयोग नव्हता. पण सरकारने ही नवीन स्कीम चालू केली आहे तेंव्हा बघूया तरी! अशा उद्देशाने मी हा क्रमांक कोठे जाऊन घ्यायचा याचा शोध घेण्यास सुरूवात केली.

दोन तीन महिने शोध घेऊन सुद्धा मला हा क्रमांक देणार्‍या पुण्यातल्या केंद्राचा काही शोध लागला नाही. परवा अचानक अशी बातमी समजली की पुणे महानगरपालिकेच्या कोणत्या तरी वॉर्ड कचेरीत हे क्रमांक मिळतात म्हणून. मी लगेच इंटरनेटवर शोधाशोध केली व या साठी आवश्यक अर्ज मिळतो आहे का हे बघितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा अर्ज उतरवून घेण्याजोग्या स्वरूपात मला सापडला. लगेच मी तो उतरवून घेतला व त्याच्या दोन प्रती छापून घेतल्या. या क्रमांकाला दिलेले आधार हे नाव मला मोठे सयुक्तिक वाटले.

हे अर्ज व बाकी आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊन मी या केंद्राच्या शोधात बाहेर पडलो. हे केंद्र तर मला सापडले. तेथे बर्‍याच रांगा लागलेल्या दिसल्या. प्रथम जन्ममृत्यू नोंदणी, मग मालमत्ता कर अशा रांगात थोडावेळ उभे राहून घेतले व नंतर ती रांग चुकीची असल्याचे लक्षात आल्याने परत नव्या रांगेचा शोध सुरू केला अखेरीस चार चौघांना विचारल्यावर आधारची रांग सापडली. रांगेत 100 ते 125 लोक उभे दिसले. माझा उत्साह जरा मावळल्यासारखाच झाला. तरी नेटाने मी त्या केंद्राची पाहणी करायला पुढे सरकलो. एका 10 बाय 12 च्या खणात काही मंडळी संगणकासमोर बसलेली दिसली.

रांगेत जी मंडळी उभी होती त्यांच्या हातात मोठे छापील अर्ज दिसत होते. हे अर्ज कोठे मिळतात अशी विचारणा केल्यावर एका बोर्ड कडे लोकांनी माझे लक्ष वेधले. या बोर्डावर ठळक अक्षरात लिहिलेले होते की आधारचे फक्त 150 फॉर्म सकाळी 9-30 वाजता येथे मिळतील. त्या नंतर चौकशी करू नये. तसेच रांगेत उभ्या असलेल्या एका व्यक्तीला एकच फॉर्म मिळणार होता. मी घड्याळाकडे बघितले सकाळचे सव्वादहा वाजले होते. म्हणजे आता हे फॉर्म मिळण्याची शक्यता नव्हतीच. इंटरनेटवरून उतरवून घेतलेले फॉर्म चालतील का? म्हणून विचारणा केल्यावर ते चालणार नाहीत असे समजले. इंटरनेटवरचे फॉर्म जर चालणार नसले तर ते इंटरनेटवर कशासाठी ठेवण्यात आलेले आहेत? हे कळणे माझ्या अल्प बुद्धीच्या क्षमतेच्या बाहेरचे असल्याने त्याचा विचार मी सोडून दिला.

एवीतेवी माझा हा फेरफटका वायफळच ठरणार होता. त्यामुळे जरा चांभारचौकश्या केल्या. तिथल्या रखवालदाराने तत्परतेने माहिती पुरवली. सकाळी 9-30 वाजता 150 फॉर्म्सच फक्त मिळणार म्हणजे निदान सात साडेसात वाजता येऊन तिथे रांग लावणे आवश्यक होते. या रांगेत उभे राहणार्‍यांना कोणतीच सुविधा अर्थातच नव्हती. मला व पत्नीला दोघांना फॉर्म मिळवण्यासाठी दीड ते दोन तास रांगेत उभे राहून फॉर्म घ्यायची कल्पना मला फारशी सुखद वाटली नाही. हे फॉर्म मिळाल्यावर परत एका दुसर्‍या रांगेत उभे राहणे आवश्यक होते. या रांगेत अर्थातच 150 मंडळी असणार होती. प्रत्येक माणसाला 10 मिनिटे तरी त्याच्या बोटाचे ठसे, डोळ्यातील बाहुलीचा आकार व फोटो या साठी आवश्यक होती. आत तीन संगणक सेट्स दिसत होते म्हणजे प्रत्येक सेटवर दिवसभरात 50 अर्जदारांचे काम होऊ शकत होते. म्हञे शेवटच्या माणसाचे काम व्हायला त्याला 500 मिनिटे किंवा 8 तासाहून जास्त काल या रांगेत उभे राहणे आवश्यक होणार होते. जर माझा नंबर मागे असला तर माझे ठसे वगैरे घेण्यासाठी 6 ते 8 तास सुद्धा लागतील हे लक्षात आल्यावर हा क्रमांक घेण्याचा माझा उरलासुरला उत्साह पण साहजिकच बारगळला. सकाळी सात वाजता येऊन संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कधीतरी माझे काम होण्याची शक्यता होती.

मी एक साधा हिशोब केला. पुण्यात अशी किती केंद्रे आहेत याची मला कल्पना नाही. परंतु 50 केंद्रे आहेत असे धरले तर दिवसभरात 7500 लोकांना हे क्रमांक दिले जातील. या गतीने वर्षभरात 200 दिवस या मंडळींनी जर क्रमांक देण्याचे हे काम केले तर वर्षभरात 15,00,000 किंवा 15 लाख लोकांना हे क्रमांक एक दिवस या कार्यालयात उभे राहण्याची शिक्षा भोगल्यावर मिळू शकतील. म्हणजेच पुण्याच्या सबंध लोकसंख्येला हे क्रमांक देण्यासाठी किमान 3 वर्षे तरी लागतील. धडधाकट मंडळींना आपली एका दिवसाची कमाई बुडवून हा क्रमांक घेण्यासाठी या कार्यालयात 10/11 तास उभे राहणे कदाचित शक्य असेल पण म्हातार्‍या कोतार्‍यांना, लहान मुलांना, आजार्‍यांना या पद्धतीने हे क्रमांक घेणे शक्य तरी आहे का? चौघांच्या कुटुंबाला हे फॉर्म घेण्यासाठी सुद्धा सर्वांना येणे आवश्यक असल्याने, पूर्ण दिवस येथे घालवणे कसे शक्य आहे?

त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट मला त्या कार्यालयातून परत येताना समजली. हा क्रमांक घेणे सध्या तरी ऐच्छिक आहे म्हणे. हा आधार क्रमांक घेण्याचा माझा विचार तूर्तास तरी मी सोडून दिला आहे.

18 मे 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

13 thoughts on “विनाधार आधार

 1. तुम्ही निदान त्या केंद्रापर्यंत जाण्याचा उत्साह दाखवलात म्हणून इतकी तरी माहिती मिळाली. म्हणून बरेचदा कोणतीही गोष्ट सक्तीची केल्याविना माणस त्याकड पाहत नाहीत .. आणि एखादी गोष्ट सक्तीची केली की त्यातून कशी सुटका करून घ्यायची हे ‘हेल्मेट’ च्या अनुभावातून पुणेकर शिकले आहेतच!

  Posted by aativas | मे 18, 2011, 1:14 pm
  • आतिवास – या पद्धतीने ही स्कीम चालवली तर फक्त गरीब जनता ज्यांना सरकारी नादारी योजनांतून लाभ होत असतो ती सोडली तर बाकी कोणी या फंदात पडेल असे वाटत नाही.

   Posted by chandrashekhara | मे 18, 2011, 3:33 pm
 2. Kharokhar he eichhik aahe ka? Mi ajach ranget ubha rohilo hoto. Tethehi asach gondhal ahe.

  Posted by vvs | मे 18, 2011, 4:10 pm
  • VVS –
   मला समजलेल्या माहितीप्रमाणे सध्या तरी ऐच्छिक आहे असे दिसते. सरकारी योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांना कदाचित या कार्डामार्फत पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार असतील. बाकीच्या लोकांनी हे कार्ड घेण्याची घाई करण्यात फारसा अर्थ मला दिसत नाही. पुढे बघू असे मी ठरवले आहे.

   Posted by chandrashekhara | मे 18, 2011, 5:20 pm
 3. hi, I am from nashik , i registered my self for this aadhar card on 19th march 2011, still waitng for getting hard copy. also in nashik there are few centers for registration same like pune 😦

  Posted by prasanna | मे 18, 2011, 4:17 pm
 4. आधार कार्ड देण्याची प्रक्रिया निश्र्चित करण्यासाठी ही चाचणी घेतली जात असावी.

  Posted by मनोहर | मे 22, 2011, 4:44 pm
  • मनोहर –

   पुण्यामध्ये चालू असलेली कार्ड देण्याची प्रक्रिया ही निश्चितच चाचणी नाही. मैसूर जिल्ह्यात ही चाचणी गेले काही महिने घेण्यात आली होती व ती आता पूर्ण होणार असल्याचे नुकतेच वाचले. तिथे ही प्रक्रिया कशी केली गेली याची माहिती उपलब्ध नाही. परंतु माझ्या अनुभवांसारखेच अनुभव निदान पुण्यात तरी अनेक नागरिकांना आले असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांत आता येऊ लागल्या आहेत. त्यावरून बदल न केल्यास कार्ड देण्याची प्रक्रिया फार पुढे जाऊ शकेल असे वाटत नाही.

   Posted by chandrashekhara | मे 23, 2011, 9:35 सकाळी
 5. aadhar card kadhnyasathi kuthe jave lagate? aamhi andheri east rahato.

  Posted by Rutuja Ghadi. | मार्च 12, 2012, 7:08 pm
  • ऋतुजा –

   माझ्या कल्पनेप्रमाणे सध्या आधार कार्डाचे काम स्थगित करण्यात आलेले आहे. ते मे महिन्यात परत सुरू होईल असे वाटते.

   Posted by chandrashekhara | मार्च 13, 2012, 9:40 सकाळी
 6. adhar card chi nondni kothe chalu aahe mumbaimadhe mala nondani karayachi aahe.

  Posted by sawant vaijayanti | मार्च 29, 2012, 11:06 सकाळी
  • वैजयंती सावंत –

   माझ्या कल्पनेप्रमाणे सध्या आधार कार्डाचे काम स्थगित करण्यात आलेले आहे. ते मे महिन्यात परत सुरू होईल असे वाटते.

   Posted by chandrashekhara | मार्च 30, 2012, 6:41 सकाळी
 7. mala ahdar kadaych ahe

  Posted by vishal ashok kadam | मार्च 11, 2013, 1:46 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: