.
History इतिहास

ह्युएन त्सांगचा महाराष्ट्र- राजधानीचे शहर- भाग 3


कोकणपूर मधला मुक्काम आटोपून ह्युएन त्सांग व त्याच्या बरोबरचे सहप्रवासी पुढे वायव्य दिशेला प्रवासाला निघाले. या पुढच्या प्रवासाबद्दल ह्युएन त्सांग लिहितो,

“From this going north-west, we enter a great forest wild, where savage beasts and bands of robbers inflict injury on travellers. Going thus 2400 or 2500 li, we come to the country of Mo-ho-la-ch’a (Maharashtra).”

या नंतर वायव्येकडे जात असताना आम्ही एका विशाल व मनुष्य वस्तीचे कोणतेही चिन्ह नसलेल्या अरण्यात शिरलो. या अरण्यात फक्त हिंस्त्र श्वापदे व प्रवाशांना जायबंदी करून लूटमार करणार्‍या ठगांच्या टोळ्या आहेत. 2400 ते 2500 लि अंतर (400 मैल) प्रवास केल्यानंतर आम्ही महाराष्ट्र या देशामध्ये पोचलो.”

महाराष्ट्र देशाच्या राजधानीचे वर्णन करताना ह्युएन त्सांगने खालील महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

1.महाराष्ट्राची राजधानी देशाच्या पश्चिमेला असून ती भारतातल्या एका मोठ्या व प्रमुख नदीच्या काठावर आहे.

2.राजधानीत शंभराहून जास्त संघराम असून 5000 भिख्खू त्यात रहात आहेत. येथे 100 पेक्षा जास्त देवळे, ज्यांच्यात अनेक पंथांचे साधू वस्ती करून आहेत.

3.राजधानीत पाच ठिकाणी सम्राट अशोकाने बांधलेले मोठे स्तूप आहेत. या ठिकाणी चार बुद्ध अवतार येऊन गेल्याच्या स्मरणार्थ हे स्तूप बांधलेले आहेत. या शिवाय शहरात अनेक स्तूप आहेत.

4.शहराच्या दक्षिणेला थोड्या अंतरावर एक संघराम असून तेथे बोधिसत्वांची एक पाषाण मूर्ती आहे. या मूर्तीची प्रार्थना केल्यास ती मनोकामना पूर्ण करते अशी ख्याती आहे.

5.येथून 1000 लि अंतरावर व नर्मदा नदी ओलांडल्यावर आपण भडोचला पोहोचतो.

या यादीतील शेवटचा मुद्दा ह्युएन त्सांगचा शिष्य हुई लि याने अगदी स्पष्टपणे मांडला आहे. तो म्हणतो की या राजधानीपासून सुमारे 1000 लि अंतर वायव्य दिशेला गेले व नर्मदा नदी पार केली की आपण भडोचला पोहोचतो.”

ह्युएन त्सांगने आपल्या या प्रवास वर्णनात अजंठा गुंफांसारख्या एका मोठ्या बुद्ध विहाराचे बारकाईने वर्णन केले आहे परंतु प्रत्यक्षात तो तेथे गेला नसावा असे संशोधक म्हणतात. याच प्रकारे, लंकेचे वर्णन सुद्धा ह्युएन त्सांगने आधी केलेले आहे. परंतु तो तिथे गेला नसल्याचे त्याचा शिष्य हुई लि याने आपल्या पुस्तकात मान्य केलेले आहे. हा बुद्ध विहार राज्याच्या पूर्वेला सीमेवर आहे असे ह्युएन त्सांगने आपल्या वर्णनात नमूद केलेले आहे ते लक्षात घेण्याजोगे आहे.

पुलकेशीच्या या महाराष्ट्राची राजधानी म्हणजे नक्की कोणते स्थान असावे या विषयी काही अंदाज बांधता येतात का? याचा आता आपण विचार करू.

पुलकेशी हा चालुक्य घराण्यातला राजा होता. हे घराणे मूळचे उत्तर कर्नाटकातल्या बागलकोट जिल्ह्यातले. पुलकेशीचा आजा, पुलकेशी 1 (..535-..566) याने आपल्या राज्याची राजधानी ऐहोले येथून बदामीला हलवली होती. या राजाने बदामीला एक किल्ला व गुफा मंदिरे बांधली होती. कर्नाटकात आजही, चालुक्य राजधानी नेहमीच बदामीला होती असे सांगितले जाते.परंतु पुलकेशी राजाच्या कर्तुत्वाची माहिती देणार्‍या ऐहोले येथील शिलालेखात पुलकेशीच्या संदर्भात बदामीचा उल्लेख फक्त एका ठिकाणी येतो.

(V. 32.) While He, Satyashraya, endowed with the powers of energy, mastery and good counsel,–having conquered all the quarters, having dismissed the kings full of honours, having done homage to gods and Brahmans, having entered the city of Vatapi–is ruling, like one city, this earth which has the dark-blue waters of the surging sea for its moat;

” ( कडवे 32) ज्याच्या राज्याभोवती गर्जणार्‍या समुद्राच्या गर्द निळ्या लाटा एखाद्या खंदकाचे काम करतात, ज्याने चारी दिशांना महापराक्रम गाजवून अनेक पराक्रमी राजांना पदच्युत केलेले आहे, ज्याचे शक्ती व राजकौशल्य यावर प्रभुत्व आहे अशा या सत्याश्रय राजाने ईश्वर व ब्रम्हवृंद यांचे आशिर्वाद घेऊन वाटपी (बदामी) मध्ये प्रवेश केला. ” या एका वाक्यावरून कन्नड इतिहासकार पुलकेशीची राजधानी बदामीच होती असे मानतात. पल्लव देशाचा राजा महेन्द्रवर्मन याच्यावरील विजयानंतरचे हे वर्णन आहे.

ह्युएन त्सांगच्या प्रवास कालात पुलकेशीचे साम्राज्य केवढे पसरलेले होते ते आपण बघितलेले आहे. त्या वेळी त्याला प्रबळ असा शत्रू (हर्षवर्धन या राजाबरोबर तह झालेला असल्याने) म्हणजे पल्लव राजा महेन्द्रवर्मन याचा नव्याने गादीवर आलेला मुलगा नृसिंहवर्मन हाच होता. बदामी हे गाव कांचीपुरम पासून तसे म्हटले तर जवळच आहे. त्यामुळे पुलकेशी सारखा कर्तबगार राजा आपल्या साम्राज्याची राजधानी आपल्या सर्वात प्रबळ शत्रूच्या सैन्याच्या टप्प्यात ठेवेल हे मानणे कठिण वाटते. या शिवाय ह्युएन त्सांगच्या भेटीच्या काही वर्षे आधी पुलकेशी आणि हर्षवर्धन यांच्यात मोठे युद्ध झाले होते व या युद्धात हर्षवर्धनाला पराभव पत्करावा लागला होता. हे युद्ध तर महाराष्ट्राच्या उत्तरेस झाले होते. कदाचित या युद्धासाठी पुलकेशीने आपली राजधानी उत्तरेकडे हलवली असावी अशीही शक्यता आहे. या कारणांमुळे ह्युएन त्सांगच्या वर्णनाप्रमाणे ही राजधानी राज्याच्या पश्चिमेला असल्याची नोंद सत्य असावी असे वाटते.

ह्युएन त्सांगने वर्णन केलेली ही महाराष्ट्राची राजधानी कोणती असावी या संबंधीचे काही प्रमुख अंदाज असे आहेत.

M.V.de.St.Martin याने दौलताबाद हे नाव सूचित केले होते. परंतु येथे मोठी नदी नाही. बौद्ध अवशेष मिळत नाहीत व भडोच पासून याचे अंतर बरेच जास्त असल्याने त्याचा विचार करण्याची आवश्यकता दिसत नाही. कनिंगहॅम हा संशोधक कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातले व पश्चिमी चालुक्य राजघराण्याची राजधानी असलेले कल्याणी (सध्याचे बसवकल्याण) हे गाव सूचित करतो. परंतु या गावाजवळूनही कोणतीच मोठी नदी वहात नाही, येथे बौद्ध अवशेष सापड्त नाहीत व हे गाव भडोच पासून 372 मैल अंतरावर आहे. फर्ग्युसन हा संशोधक ही राजधानी, टोक(नेवासा), पुणतांबे किंवा पैठण यापैकी एक गाव असावे असा अंदाज करतो. या तीन गावांपैकी टोक हे गाव अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासे तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी आहे. या गावाचे भडोच पासूनचे अंतर 195 मैल आहे. परंतु हे अगदी साधारण असे खेडेगाव असून येथे कोणत्याही ऐतिहासिक खाणाखुणा सापडत नाहीत. पुणतांबे हे गाव अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यात येते. हे गाव पण गोदावरी नदीच्या काठावर आहे आणि टोक या गावापासून सुमारे 28 मैल अंतरावर असल्याने याचे भडोचपासून अंतर सुद्धा ठीक आहे. परंतु या गावात सुद्धा कोणत्याच ऐतिहासिक खाणाखुणा सापडत नाहीत. फर्ग्युसनने सूचित केलेले तिसरे गाव पैठण हे मात्र एक चांगला उमेदवार वाटते. या गावाजवळून गोदावरी नदी वाहते. ऐतिहासिक दृष्ट्या हे गाव शालीवाहन राजाची राजधानी असल्याने प्रसिद्धच होते या कालात पठणहून राज्य करणारे बौद्ध असल्याने येथे संघराम व बुद्धाची मूर्ती त्या काली असणे शक्य वाटते मात्र या शहराचे भडोच पासूनचे अंतर 220 मैल आहे.


जे.एफ फ्लीट हा एक ब्रिटिश सनदी अधिकारी महाराष्ट्रात पोस्टिंगवर होता. त्याने महाराष्ट्रात अतिशय विस्तृत स्वरूपात प्रवास केलेला असल्याने त्याची मते मला जास्त रोचक वाटली. फ्लीटच्या मताने नाशिक हे शहर पुलकेशीच्या महाराष्ट्राची राजधानी असली पाहिजे. नाशिकच्या पक्षामध्ये काय काय मुद्दे आहेत हे बघितले तर असे लक्षात येते की

1.नाशिक गोदावरी नदीच्या काठावर असल्याने एक मोठी व प्रमुख नदी त्याच्या जवळून वाहते आहे.

2.नाशिक महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे.

3.भडोच, नाशिकच्या वायव्येला 128 मैलावर आहे. परंतु प्रवास करण्यासाठी मनमाड मार्गे जावे लागल्याने हे अंतर थोडे वाढू शकते.

4.नाशिकच्या नैऋत्येला सुमारे सहा मैलावर पांडवलेणी म्हणून प्रसिद्ध बौद्ध गुफा आहेत. या गुंफामध्ये बुद्धाची उभी मूर्ती आहे (संदर्भ Gazettier of the Bombay Presidency Vol 16 pp. 543)

5.शालिवाहन कालापासून नाशिक हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून सुप्रसिद्ध आहे.

6.नाशिकच्या परिसरात कमीत कमी एका बौद्ध स्तूपाचे अवशेष सापडलेले आहेत. (जे.एफ. फ्लीट याच्या मताप्रमाणे) (संदर्भ Gazettier of the Bombay Presidency Vol 16 pp. 539)

7.सुप्रसिद्ध अजंठा गुफा नाशिकच्या पूर्वेला येतात.

वरील सर्व मुद्यांवरून पैठणपेक्षा नाशिक ही पुलकेशीची राजधानी किंवा ह्युएन त्सांगच्या प्रवासाच्या कालात तरी, त्याचे राज्यकारभार पाहण्याचे ठिकाण असले पाहिजे असे वाटते. बदामी पेक्षा नाशिकवरून एवढ्या मोठ्या देशाचा राज्यकारभार पहाणे, नक्कीच सुलभ असावे.


ह्युएन त्सांगच्या वर्णनात, अजंठ्याचा बौद्ध विहार हा देशाच्या पूर्व सीमेवर एका मोठ्या पर्वतराजीमधील एका अंधार्‍या दरीत आहे असा उल्लेख आहे. अजंठ्याचा उल्लेख ह्युएन त्सांग एक सीमेवरचे गाव (Frontier Town)म्हणून करतो. गुगल अर्थ वरचे या भागाचे उपग्रह चित्र बघितले की त्या काळी ह्युएन त्सांग असे का म्हणत असावा हे लगेच लक्षात येते. अजंठ्या जवळच्या पर्वतराजीला सातमाला किंवा चांदोर असे नावे आहे व ही पर्वतराजी पश्चिमेला नांदगाव व चांदवड या गावांजवळून नाशिकच्या वायव्येला सह्याद्री पर्वत राजीला येऊन मिळते. ही पर्वतराजी नांदगाव व मनमाड या मध्ये जरी जमीनसपाट होत असली तरी बाकी भागात खानदेश व महाराष्ट्राचा इतर भाग या मध्ये ती एखाद्या नैसर्गिक सीमेसारखी आहे. या कारणामुळे ह्युएन त्सांगने अजंठ्याचा उल्लेख महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवरील गाव असा करणे स्वाभाविक वाटते.

जगभरात ह्युएन त्सांगच्या प्रवासवर्णनावर जेवढे संशोधन झाले असेल तेवढे दुसर्‍या कोणत्याही पुस्तकावर झाले असेल असे मला वाटत नाही. या प्रवास वर्णनावरून केलेले अनेक नकाशे सुद्धा उपलब्ध आहेत. मात्र कांचीपुरम ते भडोच या प्रवास टप्प्याबाबत इतकी कमी माहिती उपलब्ध आहे की बहुतेक मंडळी तो कांचीपुरमहून महाराष्ट्रातून प्रवास करत भडोचला गेला एवढाच उल्लेख करतात. यामुळे खरे म्हणजे माझा या बाबतीतली उत्सुकता वाढली व मी जालावर या संबंधी शोधाशोध करण्यास उद्युक्त झालो. माझ्या या अभ्यासाचे निष्कर्ष मी या तीन भागांच्यात सादर केलेले आहेत.

11 मे 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: