.
History इतिहास

ह्युएन त्सांगचा महाराष्ट्र – माहिती थोडी, प्रश्न जास्त! -भाग 1


ह्युएन त्सांग ( शुएनझांग XuenZang ) या प्रसिद्ध चिनी भिख्खूने इ.. 629 ते इ.. 645 या कालामध्ये चीन पासून सुरूवात करून दक्षिण भारतापर्यंत व तेथून परतीचा केलेला खुष्कीच्या मार्गाने प्रवास व त्या प्रवासाचे त्याने लिहून ठेवलेले प्रवासवर्णन हे सर्वश्रुत आहे. आपला परतीचा प्रवास त्याने तमिळनाडू मधील कांचीपुरम पासून सुरू केला होता. कांचीपुरम ते गुजरातमधील भडोच या त्याच्या प्रवासाच्या टप्प्यात त्याचा प्रवास मार्ग महाराष्ट्रातून गेलेला असल्याने मला त्याच्या या प्रवासाबद्दल बरेच कुतुहल होते. त्याच्या या प्रवास वर्णनावरून सातव्या शतकातील महाराष्ट्र कसा होता याची काही कल्पना मिळेल असे मला वाटत होते. ह्युएन त्सांगने लिहून ठेवलेले मूळ प्रवास वर्णन अर्थातच चिनी लिपीत असल्याने, इंग्रजी भाषांतरावरच मला समाधान मानावे लागणार आहे हे उघड होते. सुदैवाने बर्‍याच संशोधकांनी प्रसिद्ध केलेली अशी भाषांतरे उपलब्ध आहेत. 1884 मध्ये प्रसिद्ध झालेले सॅम्युएल बील (Samuel Beal) याचे व 1904 मध्ये प्रसिद्ध झालेले थॉमस वॉटर्स (Thomas Watters) या लेखकाचे, अशा दोन भाषांतरांचा मी मुख्य संदर्भ घेतला आहे. या शिवाय, व्हिन्सेंट ए. स्मिथ(Vincent A. Smith) या संशोधकाच्या ह्युएनत्सांगचा प्रवासमार्ग‘ (The Itinerary of Yuan Chwang) या लेखाचा, तसेच ह्युएन त्सांग या भिख्खूचा एक शिष्य हुई लि (Hwui Li) याने आपल्या गुरूच्या भारत प्रवासाबद्दल लिहिलेले व सॅम्युएल बील यांनीच भाषांतर केलेले, The life of Hiuen-Tsiang, by the shaman Hwui Li. या पुस्तकातील काही भाग व ई. बर्गेस यांच्या एका लेखाचा मी संदर्भ घेतला आहे.

ह्युएन त्सांगने हा महाराष्ट्रातील प्रवास कोठून व कसा केला हे आपण थोडक्यात पाहूया.

1. ह्युएन त्सांग त्या वेळी द्रविड देशातील कांचीपुरम या स्थानी होता. हे स्थान म्हणजे तमिळनाडूमधील कांचीपुरम आहे याबद्दल दुमत असल्याचे काहीच कारण नाही.

2. कांचीपुरम मधून ह्युएन त्सांग उत्तर किंवा वायव्य दिशेने निघाला व साधारण 330 मैल अंतर असलेल्या कोकणपूर किंवा कोंगणपूर या राज्यामध्ये त्याने पुढचा मुक्काम केला. कोकणपूर राज्याचे रहिवासी कृष्णवर्णीय आहेत व त्यांची वागण्याची पद्धत (Manners) रानटी व असभ्य (Fierce and Uncultivated) आहेत असे तो लिहितो.

3. कोकणपूर मधून परत वायव्य दिशेने पदक्रमण करून ह्युएन त्सांग सुमारे 400 मैलावरच्या महाराष्ट्र या देशाच्या राजधानीत पोचला. महाराष्ट्राची राजधानी राज्याच्या पश्चिमेला एका मोठ्या नदीकाठी होती.

4. महाराष्ट्र या देशावर त्यावेळी पुलकेशी हा राजा राज्य करत होता. हा राजा पराक्रमी असून त्याने शिलादित्य राजाला नर्मदेपलीकडे येऊ दिले नव्हते.

5. महाराष्ट्राच्या राजधानीहून ह्युएन त्सांग त्या राज्याच्या पूर्व सीमेवर असलेल्या एका मोठ्या बुद्धविहारापाशी पोचला. हा बुद्ध विहार एका मोठ्या पर्वताच्या एका अंधार्‍या दरीत होता. या ठिकाणी अनेक मजल्यांच्या गुफा होत्या व त्यावर बुद्ध जीवनातील प्रसंग चित्रित केलेले होते. या विहाराचे वर्णन बारकाईने ह्युएन त्सांगने केलेले आहे. त्यावरून ही जागा म्हणजे प्रसिद्ध अजिंठा गुफा आहेत याबद्दल एकमत आहे.

6. अजिंठ्या पासून ह्युएन त्सांग पश्चिम दिशेकडे निघाला व नर्मदा नदी ओलांडून तो सुमारे 200 मैल अंतरावरच्या भडोच या स्थानावर पोचला. भडोच या स्थानाबद्दलही एकमत आहे. (भडोच शहर अजिंठ्यापासून 200 मैल अंतरावरच साधारण आहे.)

ह्येन त्सांग व त्याचा शिष्य शमन हुई लि या दोघांनी केलेली वर्णने वाचल्यावर माझ्या मनात बराच गोंधळ निर्माण झाला. माझ्या मनात आलेले प्रमुख प्रश्न असे आहेत. कोकणपूर हे गाव कोणते असावे? कांचीपुरम पासून 330 मैलावर असलेल्या या राज्यातील रहिवासी, कृष्णवर्णीय व रानवट वागणूकीचे आहेत म्हणजे हे गाव कोठे असावे? महाराष्ट्राची राजधानी कोठे असावी? त्या काळात महाराष्ट्राचा राजा असलेल्या पुलकेशीने सम्राट हर्षवर्धनाचा पराभव केला होता व त्यांच्यात तह होऊन नर्मदा ही दोन्ही राज्यांची सीमा ठरली होती असा इतिहास मी वाचलेला असल्याने ह्युएन त्सांग हर्षवर्धन राजाला शिलादित्य असे का संबोधतो?

या संभ्रमात टाकणार्‍या मुद्यांवर काही प्रकाश टाकता येतो का? हे आपण पुढे बघूया!

6 मे 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “ह्युएन त्सांगचा महाराष्ट्र – माहिती थोडी, प्रश्न जास्त! -भाग 1

  1. आपण एका महत्वाच्या आणि रसपूर्ण विषयाला हात घातला आहे. आपले पुढील लेख वाचण्याची उत्सुकता अर्थातच लागली आहे.

    Posted by mangesh nabar | मे 7, 2011, 7:37 सकाळी
  2. मंगेश – धन्यवाद. मला बर्‍याच दिवसापासून ह्युएन त्सांगच्या प्रवासाबद्दल लिहायचे होते. आता योग आला.

    Posted by chandrashekhara | मे 7, 2011, 9:16 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: