.
ताज्या घडामोडी Current Affairs

अमेरिकन लढाऊ विमानांना भारताची नकारघंटा


गेले वर्षभर निरनिराळ्या वृत्तवाहिन्यांना खाद्य पुरवणार्‍या एका विषयावरची चर्चा आता संपत आल्याचे संकेत काल मिळाले. एका वर्षापूर्वी भारताने नवीन व आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी 126 लढाऊ विमाने खरेदी करण्याचा मनसुबा जाहीर केला व अशी विमाने बनवणार्‍या अनेक देशातील कंपन्यांना, 10 बिलियन अमेरिकन डॉलर्सच्या या प्रस्तावित व्यवहाराने साहजिकच भुरळ घातली. आंतर्राष्ट्रीय संरक्षण सल्लागार, एअरॉनॉटिक्स मधले तज्ञ यांना तर काय लिहू आणि काय नको? असे गेले वर्षभर झाले होते. भारताने कोणती विमाने घ्यावी? हा सल्ला देणारे हजारो लेख प्रसिद्ध झाले व यातले कितीतरी जालावर उपलब्ध आहेत.

भारताला हवी असलेली विमाने जगातील थोड्याच विमान कंपन्या बनवू शकत असल्याने अर्थातच निवड करण्यासाठी 6 पर्याय उपलब्ध होते. यात स्वीडनचे ग्रिपेन, रशियाचे मिग 35 , फ्रान्सचे राफेल, ब्रिटन, जर्मनी यांनी बनवलेले टायफून व अमेरिकेतील एफ -16 व एफ -18 ही विमाने भारताला मिळू शकत होती. या सहा विमानांपैकी राफेल व टायफून यांनी अंतिम फेरीपर्यंत बाजी मारली आहे. अर्थातच बाकी विमानांना भारत सरकारने नकारघंटा दाखवली आहे. भारतापुढे जरी 6 पर्याय असले तरी वृत्त वाहिन्या अशा बातम्या देत होत्या की दर्शकांना मुख्य प्रश्न, अमेरिकन विमाने खरेदी करायची की नाही एवढाच आहे असे सतत वाटत राहिले.

प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते. भारताच्या सांगण्यावरून या सहाही कंपन्यांनी आपली विमाने भारतात आणली. अतिशय कठिण अशा तांत्रिक व उड्डाणविषयक चाचण्यांतून या सहाही विमानांची परिक्षा घेतली गेली. भारतीय वैमानिकांनी ही सर्व विमाने उडवून बघितली. अत्यंत विषम असे हवामान असलेल्या जैसलमेर व लेह या दोन ठिकाणी व बंगलुरू येथे या सर्वंकष चाचण्या घेण्यात आल्या.व वायुसेनेने आपल्याला कोणती विमाने त्यांच्या कामास सर्वात लायक आहेत याबद्दलचा अहवाल सरकारकडे सादर केला. या सगळ्या प्रक्रियेमधे कोणते मुद्दे विचारात घेतले गेले? या सहाही देशांचे प्रमुख मागच्या वर्षात भारतात का येऊन गेले? आंतर्राष्ट्रीय राजकारणाचा यात किती भाग आहे? वगैरे बातम्या जरा बारकाईने बघितल्या तर लगेच अनेक अंतस्थ बारकावे लक्षात येतात. अमेरिकन विमानांना सरकारने नकारघंटा का दाखवली? याच्या कारणांचा हा एका आढावा.

या प्रक्रियेमधे सर्वात महत्वाची बाब होती ती म्हणजे लेहमधे घेतलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष. अतिशय उंचीवर असलेल्या या विमानतळावरून, नीच तपमानात उड्डाण करण्याची सर्वोत्तम कुवत या सहा विमानांपैकी फक्त राफेल व टायफून या विमानांनी दाखवली. त्यांच्या खालोखाल ग्रिपेन व एफ-18 ही विमाने होती व मिग-35 आणि एफ-16 या विमानांनी शेवटचे 2 क्रमांक पटकावले.

खरेतर लेह मधल्या चाचण्यांनंतर, दोन्ही अमेरिकन उमेदवारांचे भविष्य अनिश्चित आहे याची सूचना मिळाली होती. तरीही अमेरिकन कंपन्या व सरकार हा धंदा मिळण्याबाबत बरेच आशादायी होते. अमेरिकन कंपन्यांच्या विक्री प्रक्रियेची एकूण पारदर्शकता , शेवटी आपले पारडे जड करेल असे त्यांना वाटत होते. गेल्या काही दशकातील बोफोर्स तोफा, एचडीडब्ल्यू पाणबुड्या या संरक्षण सामुग्रीच्या खरेदी व्यवहारांमधे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता व ही सर्व उत्पादने युरोपियन उत्पादकांची असल्याने त्यांना परत प्राधान्य दिले जाणार नाही असे अमेरिकन कंपन्यांना वाटत होते. प्रत्यक्षात हे भ्रष्टाचार व नुकतेच उघडकीस आलेले कॉमनवेल्थ खेळातील घड्याळे प्रकरण व 2 जी स्पेक्ट्रम प्रकरण यामुळे सरकार व मंत्री यांची, तांत्रिक चाचण्या व तज्ञ यांचे मत डावलून, राजकीय निर्णय घेण्याची क्षमता जवळजवळ संपुष्टात आल्यासारखीच आहे. त्यामुळे तांत्रिक चाचण्यांत जे विमान सरस ठरेल ते सरकारला घेणे भाग पडणार आहे हे दिसत होते व त्याप्रमाणेच घडले आहे.

अमेरिकेकडून संरक्षण सामुग्रीच्या खरेदीचा भारत सरकारचा पूर्वानुभव काही फारसा उल्हासजनक नाही. अमेरिकन सरकार तंत्रज्ञान पुरवण्यास नाखुष असते. ती सामुग्री भारत कुठे व कशी वापरणार? या बाबत अनेक जाचक अटी अमेरिकन सरकार घालत असते. याच्या उलट राफेल व टायफून उत्पादकांनी अतिशय आनंदाने या विमानांची भारतात जुळणी करण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे. या शिवाय सर्वात महत्वाचे असलेले एक कारण म्हणजे अमेरिकेने हीच विमाने पाकिस्तानलाही विकलेली आहेत. अमेरिका व भारत यांच्यात जरी सध्या सलोख्याचे वातावरण असले तरी बुश अध्यक्ष असताना जो जिव्हाळा या देशांतील संबंधात निर्माण झाला होता तो ओबामा यांच्या कारकिर्दीत राहिलेला नाही हे सत्य आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन सरकारवर बसलेला पूर्वीपासून बसलेला बेभरवशाचा पुरवठादार हा छप्पा पुसला जाणे कठिणच होते.

या कारणांशिवाय आणखी काही कारणे युरोपियन उत्पादकांना प्राधान्य का दिले गेले असावे यासाठी तज्ञ देत आहेत. सध्या भारताकडे असलेली विमाने रशियन व फ्रेंच असल्याने त्यांच्यासाठी लागणार्‍या पायाभूत सोई त्याप्रमाणे बनवलेल्या आहेत. अमेरिकन विमानांना त्या चालण्यासारख्या नाहीत. राफेल व टायफून ही दोन्ही विमाने एफ-16 व एफ-18 या जुन्या विमांनाच्यापेक्षा जास्त आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहेत. मी वाचलेल्या एका वर्णनाप्रमाणे राफेल व टायफूय यांना अनेक सेन्सॉर्सकडून मिळणारे संदेश एकत्रित करून चालकाच्या समोरच्या पडद्यावर एकत्रित स्वरूपात दाखवण्याची जी सोय आहे ती अमेरिकन विमानात नाही. या विमानांत चालकाला अनेक संदेश प्रणालींकडे लक्ष द्यावे लागते.

भारताच्या निर्णयामुळे अमेरिकन सरकारी वर्तुळांच्यात साहजिकच असंतोष आहे. भारताने त्यांची जळजळ कमी करण्यासाठी सी-17 या माल व सैनिक वाहतुक विमानांची 4 बिलियन डॉलर्स किंमतीची ऑर्डर अमेरिकन सरकारला देण्याचे ठरवले आहे.

घरेलू राजकारणात भारत सरकारला हा निर्णय बराच फायदेशीर ठरावा. मागच्या वर्षीच्या अमेरिकेबरोबरच्या आण्विक करारामुळे सरकार गडगडण्याची वेळ आली होती. त्या पार्श्वभूमीवर सरकार अमेरिका धार्जिणे असल्याबद्दलची टीका बोथट होऊ शकते.

लिबिया मध्ये सध्या राफेल व टायफून ही दोन्ही विमाने वापरली जात आहेत. भारताचा निर्णय कितपत योग्य आहे यासाठी हे एक आयते चाचणी स्थळ उपलब्ध झाले आहे. त्याकडे भारतीय विमान तज्ञांचे लक्ष असेलच.

भारतीय संरक्षण सामुग्री खरेदीच्या इतिहासात, कदाचित ही विमानांची खरेदी, व्यवहारातील पारदर्शकतेमुळे एक नवीन पायंडा घालून देईल सुद्धा! निदान तशी आशा करायला तरी वाव आहे.

30 एप्रिल 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “अमेरिकन लढाऊ विमानांना भारताची नकारघंटा

 1. सर अमेरिकन विमानांचा अजुन एक लोच्या आहे ते म्हणजे त्यांच्या कॅनपी ऑफ़ कॉकपिट ची उंची, भारतात कुठला ही फ़ायटर पायलट हा फ़क्त फ़क्त राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ने कंडीशनिंग करुन एयर फ़ोर्स अकॅडमी (दुंडीगल, हैद्राबाद) मधे ट्रेन केलेला असतो, बाकी सी.डी.एस मधुन आलेले लोक ट्रांस्पोर्ट, हेलीकॉप्टर पायलट्स वगैरे असतात (अर्थात ते ही कमी नाही म्हणा),मुळात आपली विमाने रशियन वा फ़्रेंच बनावटीची असल्यामुळे त्यांच्यात बसण्यासाठी लेग लेंग्थ (फ़िमर म्हणजे मांडीच्या हाडाची) अशी मोजुन ती जर ३० से.मी च्या आसपास असेल तरच पायल्ट ऍप्टीट्युड बॅटरी टेस्ट ला उमेदवाराला घेतल्याजाते, अमेरिकन लोकांची कॉकपिट्स ह्याच्या पेक्षा जवळपास अजुन ३.४ इंच (अमेरिकन मोजमापांप्रमाणे) उंच असतात म्हणजे जवळजवळ पाव फ़ुट, अश्या वेळी जेव्हा विमान स्वप्नातीत वेगाने उडत असतात त्यावेळी पायलट्स होरायझन व्ह्यु सहीत साईड व्ह्यु पण कॉंप्रोमाईज होतो, परीणामी, ह्याचा असर हा ऍम्युनिशन कॉंपॅटीबिलिटी वर पण होतो, शिवाय पायलट ने “बकेट सीट” मधुन उठुन बघावे आजुबाजुला ही अपेक्षाच मुळात अव्यवहार्य आहे. so thats it, american planes hence disqualify on a plain fact that average Indian height is less than average american heights

  Posted by Gurunath | एप्रिल 30, 2011, 8:33 pm
  • गुरुनाथ – तुम्ही मांडलेला मुद्दा अगदी नवीन व दुसरीकडे कुठेच वाचनात न आलेला आहे. अभिनंदन. कॉकपिट मधे बसलेल्या चालकाला युद्धात भाग घ्यायचा म्हणजे बसण्याचे स्थान आरामशीर असेल असे असणे आवश्यकच आहे.

   Posted by chandrashekhara | मे 1, 2011, 9:11 सकाळी
 2. अमेरिकन विमाने ही बारताला हवी तशी ४थ्या पिढीची विमाने नसून 3rd genaretionची सुधारित विमाने आहेत. तेव्हा हा निर्णय अपेक्षित होताच.

  Posted by मनोहर | एप्रिल 30, 2011, 11:00 pm
 3. I heard, American aircraft has capability, which they sold to another country.
  They can disable the navigation system of aircraft at any point, as GPS system used by whole world is owned by Americans, and they have precise control over GPS system and receivers fitted inside aircraft.

  Pritam

  Posted by Pritam | मे 16, 2011, 10:45 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: