.
ताज्या घडामोडी Current Affairs

आशेचा पहिला किरण


मागच्या वर्षी, माझ्या राहत्या घरात काही सुधारणा करणे आवश्यक बनले होते. या सुधारणा करायच्या तर महानगरपालिकेच्या घरबांधणी खात्याची परवानगी घेणे आवश्यक आहे असे लक्षात आले. अनेक वर्षांनंतर महानगरपालिकेच्या कचेरीत जाण्याचा योग आला, अनेक फेर्‍या माराव्या लागल्या. या फेर्‍यातून एक गोष्ट मनाला चांगलीच उमजली. पंचवीस किंवा तीस वर्षांपूर्वीची महानगरपालिका आज राहिलेली नाही. पूर्वीचा अनुभव असा होता की दोन चार फेर्‍या जास्त मारायला लागल्या तरी नियमानुसार काम होत असे. पण आता असे लक्षात आले की आजची परिस्थिती काही वेगळीच आहे. महानगरपालिका भ्रष्टाचाराच्या विळख्यात पूर्णपणे अडकलेली आहे. मला या पद्धतीने पुढे जाणे अशक्य आहे हे मनाला जाणवले व हा प्रकल्प आपल्याला वैयक्तिक रित्या हाताळणे शक्य नाही हेही चांगलेच समजले. माझा अनुभव महानगरपालिकेपुरता मर्यादित आहे असे मला वाटत नाही. कोणत्याही शासकीय कार्यालयात आता हाच अनुभव येतो.गेल्या पंचवीस तीस वर्षात असे काय घडले आहे? की ज्या योगे कोणत्याही सरकारी कार्यालयात नियमानुसार काम होतच नाही. माझ्यासारख्या सुशिक्षित माणसाला जर असे वैफल्य येऊ शकते आहे आहे तर गोरगरीब, अडाणी यांची किती पिळवणूक होत असेल याची कल्पनाच करता येत नाही.

गेली दहा पंधरा वर्षे भारतीय अर्थव्यवस्था दर वर्षी आठ ते नऊ टक्क्यांनी वाढत राहिली आहे. त्यामुळे अगदी सर्व साधारण माणसापर्यंत सर्वांच्या हातात जास्त पैसा येऊ लागला आहे. पैशाच्या या वाढत्या ओघाचा काही मंडळींनी फायदा करून घेतला नसता तरच नवल होते. या सगळ्या दुष्ट चक्राला खरी सुरवात झाली 1976मध्ये. महाराष्ट्र शासनाने ‘ Urban Land Ceiling Act ‘ अंमलात आणला तेव्हापासून! हा कायदा अंमलात आला आणि शहरांच्यात नवीन घरबांधणीसाठी उपलब्ध अशा जमिनींचा स्त्रोत एकदम आटलाच. ज्या मालकांच्याकडे अशा अतिरिक्त जमिनी होत्या त्यांना त्या विकणे अशक्य झाले. परिणामी ज्या काही थोड्या जमिनी उपलब्ध होऊ शकल्या त्यांचे भाव गगनाला भिडू लागले. या परिस्थितीचा फायदा काही बिल्डर्स व या कायद्याची अंमलबजावणी करणारी शासकीय यंत्रणा यांनी बरोबर उचलला. आपल्याला हवे असलेले भूखंड या कायद्यातील पळवाटांचा मार्ग काढून या बिल्डर्सनी सोडवून घेण्यास सुरवात केली व जमिनी व त्यावर बांधण्यात येणार्‍या इमारती यांचे भाव सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारे कधी झाले हे कोणाला कळलेच नाही.

जमिनी व त्यावरच्या इमारती यांना सोन्याचा भाव येतो आहे हे लक्षात आल्याबरोबर काळा पैसा गुंतवण्यास ही एक चांगली संधी आहे, हे भ्रष्टाचारी व काळा पैसा निर्माण करणारे व्यापारी यांच्या लक्षात आले व यात काळ्या पैशाची गुंतवणूक वाढतच राहिली. वाटेल तेवढा पैसा या क्षेत्रात बिनधास्तपणे गुंतवता येतो आहे हे म्हटल्याबरोबर भ्रष्टाचारी मंडळींना एक कुरणच सापडले. हिमनगाच्या टोकासारखी जी काय दोन चार भ्रष्टाचाराची प्रकरणे आज उघडकीला आली आहेत त्यातल्या प्रत्येकात जमीनजुमल्या मधली गुंतवणूक ही आहेच आहे.

हे सगळे कसे थांबवायचे! हे माझ्या सारख्या सामान्य माणसाला तर कळतच नाही. गेल्या पंधरा वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेने जे कमावले आहे ते आपण या भ्रष्टाचाराच्या विळख्यात गमावून बसणार आहोत का हा खरा प्रश्न आहे.

परवा रात्री भोजन झाल्यावर नेहमीप्रमाणे टीव्ही लावला. अण्णा हजारे एका उघड्या जीपमधून जातानाची चित्रे बघितली. अर्थातच मग बाकी काही न बघता या बातमीवरच लक्ष केंद्रित केले. या माणसाने आतापर्यंत अनेक लढे दिले आहेत. पण आज त्याने जे पाऊल उचलले आहे ते काहीतरी निराळे आहे हे लक्षात आले. राजधानी दिल्लीमधे, सरकारच्या नाकावर टिच्चून महाराष्ट्राच्या खेड्यात राहणार्‍या व कार्य करणार्‍या या अचाट व अफाट माणसाने, युद्धाची एक नवीन आघाडी उघडली आहे हे लक्षात आले. कालच्या दिवसात अण्णांना पाठिंबा देणार्‍यांची संख्या शेकड्यांतून लाखांच्यावर पोचली आहे. अनेक लोकांनी अण्णांच्या आंदोलनाच्या यशाबद्दल शंका व्यक्त केल्या आहेत. ते कुठपर्यंत पुरणार असे त्यांना वाटते आहे.

पण अण्णा अपयशी ठरू शकतच नाहीत. त्यांना या आंदोलनात यशस्वी झालेच पाहिजे आणि ते होतीलच. आपल्याला त्यांच्याशिवाय दुसरा काही मार्गच उरलेला नाहीये. अण्णांच्या या लढाईने काल दिसलेला आशेचा किरण हा पहाटेचा पहिला किरणच असणे आवश्यक आहे तो संध्याकाळचा सूर्य बुडतानाचा शेवटचा किरण असूच शकत नाही. भारतातील लाखो लोकांच्या काल हे लक्षात आले आहे व म्हणूनच अण्णांना दिला जाणारा पाठिंबा वाढतच चालला आहे.

एक सर्वसामान्य भारतीय नागरिक अण्णांना शुभेच्छा देण्याशिवाय दुसरे काय करू शकतो? पण मनाला हे जाणवते आहे की आशेचा एक किरण का होईना! समोर दिसतो आहे.

7 एप्रिल 2011

 

 

 

 

 

 

 


Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “आशेचा पहिला किरण

  1. भ्रष्टाचार नष्ट करायचा असेल तर मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेररचना आवश्यक आहेत. सरकार जेव्हा काही प्रशासकीय सुधारणा करते त्यावेळी त्या सुधारणा मूळ प्रशासकीय साच्यावर थापते. या सुधारणा यशस्वी होण्यासाठी मूळ प्रशासकीय साच्यातून सुधारणांशी विसंगत असलेल्या तरतुदी काढून टाकण्याचा विचार मात्र केला जात नाही. या विसंगतीचा फायदा भ्रष्टाचारी घेत असतात.

    Posted by मनोहर | एप्रिल 7, 2011, 10:46 pm
  2. आशा तर नक्कीच आहे.. बघू जोर कुठे पर्यंत टिकतोय ते.. तरी चांगला बदल अपेक्षित आहे.

    Posted by bolmj | एप्रिल 8, 2011, 2:01 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: