.
ताज्या घडामोडी Current Affairs

सामर्थ्य प्रदर्शनाची गरज


मागच्या शुक्रवारी म्हणजे 11 मार्चला भारताच्या पश्चिम किनार्‍यापासून सुमारे 600 किमी अंतरावर, खुल्या समुद्रात एक मोठी नाट्यमय घटना घडली. भारतीय नौदलाचे एक डॉर्नियर विमान त्या दिवशी या भागात टेहळणी करत होते. या विमानाला अचानक आम्ही धोक्यात आहोत, आम्हाला वाचवा!” असा संदेश मिळू लागला. हा संदेश एक मालवाहू जहाज एमव्ही व्हॅन्क्यूव्हर ब्रिज (MV Vancouver Bridge) या मालवाहू जहाजावरून पाठवण्यात येत होता. विमानाने त्या संदेशाला उत्तर दिले व काय झाले आहे? अशी पृच्छा केली. त्या वेळेस असे समजले की या जहाजावर समुद्री चाचे किंवा डाकू हल्ला करण्याच्या तयारीत होते. नौदलाच्या डॉर्नियर विमानाने साहजिकच ही बोट जिथे होती तिथे आपला मोर्चा हलवला. तिथे गेल्यावर वैमानिकांना असे दिसले की या बोटीच्या बरोबरीने, काही अंतरावर मासेमारी करणारी एक दुसरी बोट चाललेली होती व त्या बोटीवरून शस्त्रसज्ज चाचे, अतिशय वेगवान अशा दुसर्‍या दोन छोट्या बोटींच्यावर उतरून हल्ला करण्याच्या तयारीत होते. वर आकाशात नौदलाचे विमान आले आहे हे लक्षात आल्याबरोबर त्या चाच्यांची गडबड उडाली व घाईघाईने त्यांनी आपल्या छोट्या वेगवान बोटी परत मुख्य मासेमारी बोटीला बांधून टाकल्या व ते परत आपल्या मासेमारी बोटीवर चढून गेले व एमव्ही व्हॅन्क्यूव्हर ब्रिज या बोटीवर हल्ला करण्याचा आपला डाव त्यांनी सोडून दिला.

हे सर्व दृष्य बघत असतानाच, डॉर्नियर विमानाच्या वैमानिकाच्या हे लक्षात आले की ही मासेमारी बोट म्हणजे मोझंबिक देशाचा ध्वज फडकवणारी व्हेगा 5 (Vega 5) हीच बोट आहे. या बोटीचे, 28 डिसेंबर 2010 रोजी समुद्री चाच्यांनी अपहरण केले होते व त्यानंतर ही बोट आपल्या समुद्री डाकुगिरी करण्याच्या कामात चाचे मुख्य बोट म्हणून वापरत होते. या बोटीवरून त्यांना सोमालियाच्या किनार्‍यापासून दूर अंतरावर चाचेगिरी करण्यासाठी सहज रित्या जाणे शक्य होत होते. वैमानिकाने साहजिकच आपले निरिक्षण ताबडतोब नौदलाच्या नियंत्रण कक्षाला कळवले.

हा संदेश मिळाल्याबरोबर नियंत्रण कक्षाने समुद्राच्या त्या भागात गस्त घालणार्‍या भारतीय नौदलाच्याआयएनएस खुकरी‘ (क्षेपणास्त्रवाहक कॉर्व्हेट पद्धतीची बोट) (INS Khukri, a missile corvette) आणि आयएनएस कल्पिनी‘ ( वेगवान हल्ला चढवू शकणारी बोट) (INS Kalpeni, a fast attack craft ) या बोटींना त्वरेने व्हेगा 5 या बोटीच्या स्थानाकडे प्रयाण करण्याची आज्ञा दिली. रविवारी म्हणजे 13 मार्चच्या रात्री या बोटींनी, व्हेगा 5 बोटीला कोची बंदरापासून पश्चिमेला सुमारे 700 किमी अंतरावर गाठले व समुद्रात थांबण्याची आज्ञा दिली. या आज्ञेचे पालन न करता बोटीवरील चाच्यांनी अंधाराचा फायदा घेऊन निसटून जाण्यासाठी आपल्या जवळच्या दोन छोट्या वेगवान बोटी समुद्रात उतरवल्या व सर्व शस्त्रसज्ज चाचे त्यावर उतरले व पळून जाताना त्यांनी नौदलाच्या बोटींवर गोळाबारी केली. ही गोळाबारी सुरू झाल्याबरोबर नौदलाच्या बोटींनी त्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले व त्यात या दोन्ही छोट्या वेगवान बोटी समुद्रात बुडाल्या व त्याच्यावरील चाच्यांनी समुद्रात उड्या मारल्या. व्हेगा 5 च्या डेकवर चाच्यांनी समुद्रात दूरवर जाता यावे म्हणून इंधनाची बरीच पिंपे साठवली होती ती या हल्यात पेटली व व्हेगा 5 बोटीला आग लागली. यानंतर नौदलांच्या बोटींनी थोड्याच कालावधीत समुद्रात उड्या मारलेल्या सर्व 61 सोमाली चाच्यांना अटक केली व व्हेगा 5 वरच्या 13 खलाशांची सुटका केली. या सर्व चाचांना आता नौदलाच्या बोटीवर हल्ला केल्याच्या आरोपावरून कायदेशीर कारवाई करण्यासाठी मुंबईला आणण्यात येत. आहे. नौदलाच्या सैनिकांना या चाच्यांच्या जवळ 80 ते 90 लहान रायफली व काही रॉकेट प्रॉपेल्ड ग्रेनेड्स यासारखी हत्यारे सापडली.

नौदलाच्या बोटींनी व सैनिकांनी 2011 सालात ( फक्त 3 महिने) समुद्री चाच्यांविरूद्ध केलेली ही तिसरी कारवाई आहे. या अगोदर मागच्या महिन्यात(फेब्रुवारी 2011) 28 सोमाली चाच्यांना तर जानेवारी महिन्यात 15 सोमाली चाच्यांना नौदलाने पकडले होते.

मागच्या आठवड्यातील ही घटना म्हणजे भारताच्या किनार्‍याला लागून असलेल्या समुद्रामध्ये, भारतीय व इतर देशाच्या व्यापारी वाहतुक करणार्‍या जहाजांना, चाचेगिरीचा केवढा गंभीर धोका निर्माण झाला आहे याचेच द्योतक आहे. भारताचा 90% व्यापार हा या समुद्रमार्गे होत असतो तसेच भारताची उर्जा सुरक्षितता ही मध्यपूर्वेतील तेलाच्या पुरवठ्यावर अवलंबून असल्याने या तेलाच्या पुरवठ्यात चाचेगिरीने कोणताही खंड पडला तरी त्याचे मोठे गंभीर परिणाम भारताला सहन करावे लागतील हे स्पष्ट दिसत आहे. एडनच्या आखातामधे चाचेगिरीला प्रतिबंध करण्यासाठी भारतीय नौदल, नोव्हेंबर 2008 पासून आंतर्राष्ट्रीय मान्यता प्राप्त समुद्रमार्गांवर (Internationally Recommended Transit Corridor (IRTC) ) गस्त घालत आहे. परंतु सोमालियातील समुद्री चाच्यांनी, चाचेगिरी करण्याचे क्षेत्र आता बरेच व्यापक केले आहे. त्यामुळे लक्षद्वीप बेटाजवळील अरबी समुद्राच्या भागातही भारतीय नौदलाने गस्त घालण्यास नोव्हेंबर 2010 पासून सुरू केले आहे. या कालात भारतीय नौदलाने चाच्यांच्या 3 मोठ्या बोटी बुडवल्या आहेत. 50च्या वर चाच्यांना पकडले आहे व 300 भारतीय निशाण फडकवणारी जहाजे धरून एकंदर 1500 जहाजांना सुरक्षित रित्या या भागातून प्रवास करणे शक्य केले आहे. हे आकडे जरी इम्प्रेसिव्ह असले तरी चाचेगिरीची गंभीरता लक्षात घेतली तर ही कारवाई अगदी किरकोळ स्वरूपाची आहे असेच म्हणावे लागते. . आंतर्राष्ट्रीय समुद्री व्यापार ब्यूरो ( International Maritime Bureau) या संस्थेने प्रसिद्ध केलेले या बाबतीतले काही आकडे मोठे बोलके आहेत.

Figures for piracy and armed robbery incidents

as reported to the IMB Piracy Reporting Center in 2011.

(Updated on 28 February 2011)

Incidents Reported for Somalia: , सोमालिया मधील घटनांचे आकडे

Total Incidents: 61 , एकूण घटना – 61

Total Hijackings:13, जहाजे जबरदस्तीने ताब्यात घेतल्याच्या घटना – 13

Total Hostages: 243, चाच्यांच्या बंदीत असलेले एकूण ओलिस – 243

Total Killed: 7, मृत्यूमुखी पडलेले कर्मचारी – 7

Current vessels held by Somali pirates: सोमाली चाच्यांच्या ताब्यात असलेली एकूण जहाजे व ओलिस

Vessels: 33, जहाजे– 33

Hostages: 711 , एकूण बंदीवान ओलिस – 711

या 711 बंदींपैकी तब्बल 136 व्यक्ती या भारतीय वंशाच्या आहेत व यापैकी काही जण 11 महिन्यांपेक्षा जास्त काल कैदेत आहेत. यांना मिळणारी वागणूक अतिशय खराब आहे व त्यांना दोन ते तीन दिवसांनंतर भोजन देण्यात येते. साहजिकच या बंदीवानांच्या भारतात असलेल्या नातेवाईकांकडून भारत सरकारकडे सारख्या तक्रारी केल्या जात आहेत. या नातेवाईकांना स्वाभाविक रित्या असे वाटते आहे की भारत सरकार या प्रश्नाकडे अजिबात गंभीरपणे बघत नसून या बंदींची सुटका करण्याबाबत सरकार काहीच हालचाल करत नाहीये.

गेल्या काही दिवसांतील घडामोडी बघता असे म्हणता येते की व्यापारी नौदलच्या अधिकार्‍यांच्या समितीने या बाबतीत सरकारवर जो दबाव आणला आहे त्यामुळे भारत सरकार झोपेतून बहुदा जागे झाले आहे व काहीतरी कार्यवाही करण्याच्या मागे आहे. भारतीय नौदल सरकारकडे बरेच दिवस मागणी करत होते की संयुक्त राष्ट्र सभेने समुद्राच्या आंतर्राष्ट्रीय वापरासाठी जे नियम आखून दिले आहेत त्या नियमाच्या अंतर्गत आणि इतर देशांच्या नौदलांच्या मदतीने गल्फ ऑफ एडन व सोमालियाची किनारपट्टी येथे योग्य ती कारवाई करण्याची परवानगी द्यावी. भारत सरकारच्या एका अधिकार्‍याच्या निवेदनाप्रमाणे नौदलाला अशी परवानगी आता देण्यात आली आहे. या प्रवक्त्याने सांगितले की

भारतीय नौदल गरज आणि परिस्थितीचे गांभीर्य याला अनुसरून गस्त घालत असताना योग्य ती कारवाई करेल. चांच्यांविरूद्ध कारवाई करताना व ओलिसांच्या सुटकेचे प्रयत्न करताना उद्‌भवू शकेल अशा सर्व प्रकारच्या परिस्थितीत काय कार्यवाही करायची याच्या स्पष्ट सूचना व परवानगी नौदलाला आता दिली गेली आहे. “

या अतिरिक्त आणखी काही निर्णय घेतले जातील असे दिसते आहे. विमानात सुरक्षेसाठी जसे स्काय मार्शल्स तैनात केले जातात त्याच पद्धतीने भारतीय निशाण फडकवणार्‍या प्रत्येक जहाजावर शस्त्रधारी व्यक्ती तैनात केल्या जाणार आहेत. तसेच उपग्रह संदेश यंत्रणा बसवलेली एक सुरक्षित खोली किंवा खोल्या प्रत्येक जहाजावर तयार ठेवणे जहाजांना बंधनकारक राहणार आहे. चाच्यांच्या हल्ल्यात किंवा त्यांनी जहाज ताब्यात घेतल्यास या कक्षातून जहाजाचे कर्मचारी नौदलाशी संपर्क साधू शकतील.

मागच्या आठवड्यातील घटनाक्रमावरून नौदलाला कारवाईचे स्वातंत्र्य खरोखरच देण्यात आलेले आहे. असे दिसते. परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ही कारवाई पुरेशी ठरणार नाही अशी आशंका वाटते.

सोमालियन चाचे आता इतके धीट झाले आहेत की भारताला धमक्या देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. बिले हुसेन हे नाव सांगणार्‍या व स्वत: समुद्री चाचा असल्याचे सांगणार्‍या एका सोमालियन व्यक्तीने, रविवारच्या कारवाईबद्दल बोलताना, ” भारत स्वत:ची जहाजे व खलाशी यांना संकटात लोटत आहे” अशी धमकी दिली. तो म्हणाला की

आपले किती लोक समुद्रावर कार्यरत आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी (भारतीयांनी) पकडलेल्या सोमाली लोकांना (चाच्यांना) त्वरित सोडून द्यावे नाहीतर आम्ही पकडलेल्या सर्व भारतीयांना तुरुंगात टाकू. आम्ही भारतीयांना धोक्याची सूचना म्हणून हा संदेश प्रथम पाठवत आहेत. त्यांनी आमच्या मित्रांना त्वरित सोडून द्यावे नाहीत भारतीय नागरिकांना भविष्यात चांगली वागणूक आमच्याकडून दिली जाणार नाही. “

सोमाली चाच्यांची ही हिंमत लक्षात घेतल्यावर भारत सरकारने कडक कारवाई करण्याची व आपले सामर्थ्य दाखविण्याची किती गरज आहे हे लक्षात येते. ओलिस असलेल्या भारतीयांची सुटका करणे हे जरी प्राधान्य असले तरी पुढच्या काळात अशा घटना घडण्यास प्रतिबंध बसावा म्हणून सरकारने काही पाऊले उचलणे गरजेचे वाटते. इराक युद्धाआधी त्या देशावरच्या आकाशाच्या काही भागात संपूर्ण उड्डाणबंदी करण्यात आली होती. त्याच पद्धतीने सोमालियाच्या किनारपटीजवळचा 100 किंवा 200 किमी पट्टा कोणत्याही जहाज वाहतुकीस बंद केला पाहिजे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीकडे जाऊन भारताने अशी मागणी करणे गरजेचे वाटते.

या पद्धतीने उचललेली कडक पाऊले व भारतीय नौदलाचा प्रभावी उपयोग यामुळेच सोमालियाची किनारपट्टी व लक्षद्वीप, मॉरिशस व सैचेल्स या बेटांजवळील समुद्रात दिवसे दिवस वाढत जाणारा हा धोका टाळणे शक्य होणार आहे. अन्यथा रॉबर्ट लुइ स्टीव्हनसन याने आपल्या ट्रेझर आयलंड या सुप्रसिद्ध कादंबरीमधे, सोळाव्या किंवा सतराव्या शतकातील समुद्री चाचेगिरीची वर्णने केली होती ती प्रत्यक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत अशी सयुक्तिक भिती वाटते.

17 मार्च 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “सामर्थ्य प्रदर्शनाची गरज

  1. इतक्यातच नौदल- कोस्ट गार्ड ह्यांच्या संयुक्त हल्ल्यात प्रांतालय-११ ही बोट बुडवली गेली व प्रांतालय चौदा मुक्त करण्यात आली आहे बहुतेक, प्रांतालय हे थाईलॅंड चे मासेमारी ब्रॅंड आहे, त्या रेड मधे ब~याच थाई बंधुंची सुटका करण्यात भारत यशस्वी झाल्याचे पण वाचण्यात आले!!!

    Posted by गुरुनाथ | मार्च 17, 2011, 3:23 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: