.
Musings-विचार

गळचेपी का अनुशासन?


वैश्विक जालावर संचारणार्‍या मंडळीपैकी, जे स्वत:ची अनुदिनी अथवा ब्लॉग चालवतात किंवा एखाद्या संकेतस्थळाचे मालक किंवा संपादक असतात, त्यांना दिसणारा त्यांच्या ब्लॉगचा किंवा संकेतस्थळाचा व्ह्यू, हा इतर वाचकांना दिसणार्‍या व्ह्यू पेक्षा बराच निराळा असतो. आंतरजालाच्या परिभाषेत याला डॅशबोर्डअसे नाव आहे. य डॅशबोर्डवर ब्लॉगची माहिती, किती पाहुणे आले आणि नवीन ब्लॉगपोस्ट लिहिण्यासाठीच्या किंवा आधी लिहिलेल्या ब्लॉगपोस्टमधे बदल करण्याच्या सुविधा असतात. कोणताही ब्लॉग वैश्विक जालावर वाचकांना उपलब्ध करून ठेवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म गरजेचा असतो. असा प्लॅटफॉर्म, जालावर अनेक कंपन्या उपलब्ध करून देताना आढळतात. वर्डप्रेस आणि ब्लॉगर हे यापैकीच प्रमुख व अतिशय लोकप्रिय असे दोन प्लॅटफॉर्म सध्या तरी उपलब्ध आहेत. माझा अक्षरधूळ व Sandprints हे दोन्ही ब्लॉग सध्या वर्डप्रेस या प्लॅटफॉर्मवर असल्याने या ब्लॉग्जचा डॅशबोर्ड बर्‍याच वेळा माझ्या नजरेसमोर असतो.

वर्डप्रेसचे संपादक या डॅशबोर्डवर सध्या नवीन कोणते ब्लॉग प्रसिद्ध झाले आहेत? किंवा कोणते ब्लॉग सध्या जास्त वाचक वाचत आहेत? ही माहिती सतत अपडेट करून पुरवत असतात. याचा एक असा फायदा होतो की नवीन ब्लॉगर कोण आले आहेत? त्यांच्या ब्लॉगचे काय स्वरूप आहे? याची कल्पना काहीही प्रयत्न न करता मला मिळत राहते.

गेले काही महिने वर्डप्रेसवर असलेल्या या सुविधेमुळे, जालावर आलेल्या काही नवीन ब्लॉग्जकडे माझे लक्ष वेधले आहे. यातले बहुतेक ब्लॉग आपण सत्याची कशी कास धरून चालतो? याचे गर्वाने प्रतिपादन करताना दिसत असले तरी. प्रत्यक्षात मात्र हे ब्लॉग कोणत्या तरी राजकीय विचारसरणीचा प्रचार करणे, ज्ञात इतिहासाचे विडंबन करणे व हा विडंबन केलेला इतिहास कसा अचूक आहे असा प्रचार करणे, अत्यंत नीच पातळीवर जाऊन जातींमधे विद्वेष पसरवणे यासारखे उद्योगही करताना दिसतात. या पद्धतीचे लिखाण, वृत्तपत्रे, मासिके यासारख्या माध्यमातून करणे हे या माध्यमांवर असलेली नियंत्रणे किंवा आचारसंहिता यामुळे कधीच शक्य नसते. वैश्विक जालावर सध्यातरी कोणतेच नियंत्रण किंवा आचारसंहिता भारतात लागू नाही. त्याचा गैरफायदा हे ब्लॉगर्स भरपूर रित्या घेताना दिसतात.

पीत पत्रकारितेचे ब्रीद घेतलेल्या या ब्लॉग्जची आठवण आज मला होण्याचे कारण, आज वाचनात आलेली एक बातमी आहे.

सध्या वैश्विक जालावर जे काय चालते आहे त्यापैकी भारतातून उगम पावलेले कार्य, अवैध आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी कोणतीच प्रभावी शासकीय् यंत्रणा नाही. पोलिसदलाचा एक विभाग बहुदा हे काम करतो. त्यांना ज्या अधिनियमांतर्गत कार्य करावे लागते तेही फारसे प्रभावी नाहीत. 2008 साली माहिती तंत्रज्ञान कायदा भारतात लागू केला गेला. परंतु त्याची प्रभावी कार्यवाही होताना दिसत नाही, हे सरकारच्या लक्षात आल्याने, या नियमांत काही प्रस्तावित बदल क्ररण्याचे शासनाने योजले आहे असे दिसते. या प्रस्तावित बदलांमध्ये ब्लॉगर्स किंवा अनुदिनी लेखक यांची केलेली व्याख्या व त्यांची प्रस्तावित वर्गवारी हा वैश्विक जालावर वावरणार्‍या व प्रामुख्याने कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लेखन करणार्‍या, आपणा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे व ते स्वाभाविकच आहे. प्रस्तावित बदलाप्रमाणे अनुदिनी लेखक किंवा ब्लॉगर यांना एक माध्यम उपलब्ध करून देणारी व्यक्ती‘ (Intermediary) असे समजण्यात येणार आहे.

ही माध्यम उपलब्ध करून देणारी व्यक्ती म्हणजे काय? किंवा या व्यक्तीची वर्गवारी काय? असे प्रश्न लगेच नजरेसमोर येतात. आपल्याला मोबाइल फोन सेवा उपलब्ध करून देणार्‍या व्होडाफोन किंवा आय़डिया सारख्या कंपन्या, वेब होस्टिंग करणारे व इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स, गूगल किंवा याहू सारखी सर्च इंजिन्स, पेपाल किंवा ईबे सारख्या पैसे हस्तांतरित करणार्‍या किंवा लिलाव करणार्‍या संस्था आणि आपल्या कोपर्‍यावर असलेला सायबर कॅफे हे सगळे या कायद्याप्रमाणे एक माध्यम उपलब्ध करून देणारी व्यक्ती‘ (Intermediary) आहेत. आता या सगळ्या बड्या बड्या धेंडांच्या पंगतीला एक संगणक हातात आहे म्हणून त्यावर चार शब्द लिहिणारा कोणी उत्साही लेखक सुद्धा बसवला जाणार आहे. ही अशी वर्गवारी करण्याचे कारण या कायद्यात असे दिलेले आहे की अनुदिनी लेखक किंवा ब्लॉगर हा त्याच्या लेखावर येणारे प्रतिसाद व त्यावरून घडणार्‍या चर्चा या घडवून आणणार्‍या एखाद्या माध्यमाचे कार्य, त्याच्या लेखनामुळे करत असतो आणि तो किंवा ती ही सगळी चर्चा व प्रतिसाद आपल्या ब्लॉगवर संग्रहित करून ठेवतो.

नव्या कायद्याप्रमाणे ब्लॉगर ही व्यक्ती माध्यमाचे कार्य करत असल्याने. त्याच्या ब्लॉगवर आलेल्या प्रत्येक प्रतिसादाला तो संपूर्णपणे जबाबदार रहाणार आहे. त्यामुळे धमक्या देणारा, शिवराळ, कोणाच्या प्रतिमेला किंवा प्रसिद्धीला धक्का पोचवणारा, अश्लील, जातिवाचक आणि ज्यांच्याविरूद्ध ऑब्जेक्शन घेता येईल अशा सर्व प्रतिसादांना ब्लॉगर ही व्यक्ती संपूर्णपणे जबाबदार राहणार आहे.

ज्या कारणासाठी शासन प्रस्तावित बदल करू इच्छित आहे ते या बदलाने साध्य होतील का? किंवा कितपत साध्य होतील? हा खरा प्रश्न आहे. सध्या नवीन ब्लॉग चालू करताना कोणत्याही पद्धतीचे ओळखपत्र ब्लॉग प्लॅटफॉर्मस मागत नाहीत. तुम्ही सांगाल ते नाव व ईमेल पत्ता एवढे दिले की पुरेसे होते. अशा परिस्थितीत तो ब्लॉगर प्रत्यक्षात कोण आहे? तो कोणत्या देशाचा रहिवासी आहे हे काहीच नक्की सांगता येत नाही. फार तर त्या पोस्टच्या वेळी तो कोठे होता? हे सांगणे नवीन तंत्रज्ञानाने शक्य होईल. कोणताही जबाबदार ब्लॉगर (वर उल्लेख केलेले पीत ब्लॉगर सोडून) त्याच्या व ब्लॉगच्या पतिमेला जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो की केंव्हाही मला माझ्या ब्लॉगला आलेला एखादा प्रतिसाद सभ्यतेच्या मर्यादा सोडून जातो आहे असे लक्षात येते तेंव्हा मी तो प्रतिसाद लगेच वगळून टाकतो.

अशा परिस्थितीत हा प्रस्तावित नियम बदल करून काय साध्य होईल ते सांगणे कठिण आहे. फक्त या नियमांचा आधार घेऊन सर्वसाधारण ब्लॉगर्सना निष्कारण सरकारी चौकशांना तोंड द्यावे लागेल अशीही एक शक्यता वाटते. माझ्या मताने एक अतिशय साधा व महत्वाचा बदल जरी सरकारने घडवून आणला तरी वैश्विक जालावरच्या या दुष्ट प्रवृत्तींना बर्‍यापैकी आळा बसू शकेल. प्रत्येक ब्लॉगरने त्याचा ब्लॉग रजिस्टर करताना, आपल्या ईमेल पत्याबरोबर आपली वैयक्तिक ओळख देणारा पुरावा (अमेरिकेतील सोशल सिक्युरिटी नंबर, भारतातला पॅन नंबर किंवा नवीन येणारा युनिक आयडी नंबर) देणे ब्लॉग्ज प्लॅटफॉर्म्सनी अनिवार्य करावे. म्हणजे कोणत्याही कायदेशीर कारवाईचे वेळी त्या ब्लॉगरची खरी ओळख पोलिसांसारख्या संस्थांना मिळू शकेल.

प्रत्येक ब्लॉगरने वैयक्तिक पातळीवर आपल्या ब्लॉगला येणारे प्रतिसाद कायद्याच्या , नीतिनियमांच्या व सभ्यतेच्या मर्यादेच्या आत आहेत हे तपासून बघणे आवश्यकच आहे व या प्रस्तावित नियम बदलात केलेला या बाबतचा विचार योग्यच आहे. ब्लॉग प्लॅटफॉर्म्सनी तशा पद्धतीचे नियम बदल करण्याची आवश्यकता आहे.

मात्र ब्लॉगरला एक माध्यम उपलब्ध करून देणारी व्यक्ती‘ (Intermediary) असे मानणे व त्याच्यावर बंधने लादणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची उघड गळचेपी आहे यात शंकाच नाही व सर्व ब्लॉगर्सनी याचा विरोध करणे आवश्यक आहे.

11 मार्च 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: