.
Travel-पर्यटन

निमित्त विमानप्रवासाचे


मागच्या आठवड्यात विमानाने दिल्लीला जाण्याचा योग आला. खूप वर्षात विमानाने भारतामधे प्रवास केला नव्हता. दिल्लीला तर मागच्या तीस वर्षांत गेल्याचे आठवत नाही. त्यामुळे सगळेच नवीन होते. अगदी पुण्याच्या विमानतळापासून. आमचे विमान सकाळी साडे अकराच्या सुमारास सुटणार होते. माझा जुना अनुभव लक्षात होता. त्या वेळेस पुण्याचा विमानतळ म्हणजे अगदी छोटासा होता. एका वेळी जेमतेम एखादे विमान विमानतळावर येऊन उभे रहात असे आणि तेही इंडियन एअरलाइन्सचे डाकोटा किंवा DC3 विमान. दुसरी कोणतीही विमान सेवा देणारी कंपनीच तेंव्हा नव्हती. विमानतळावर गेल्यावर तिथली गर्दी बघून धक्काच बसला. सात आठशे माणसे तरी कोठेतरी निघालेली होती. आत गेल्यावर लक्षात आले की समोर चार किंवा पाच विमाने थांबलेली आहेत. ती सुद्धा मोठी जेट विमाने. त्यातली तीन विमाने तर दिल्लीलाच निघणार होती. तीन विमान कंपन्यांची दिल्लीला जाणारी विमाने दहा पंधरा मिनिटाच्या फरकाने आता दिल्ली कडे जाणार होती. हे सगळे माझ्या कल्पनेच्या आवाक्याच्या बाहेरचे वाटते होते. मग तिथला एक बोर्ड बघितला. त्या बोर्ड प्रमाणे रोज दिल्लीला जाण्यासाठी 11 विमान सेवा होत्या. म्हणजे 1500 ते 2000 प्रवासी रोज पुण्याहून दिल्लीला जाऊ शकत होते. आमच्या फ्लाईटला असलेली गर्दी बघून एवढी मंडळी रोज दिल्लीला जात असणारच याची खात्रीच पटली.

विमानाचे तिकिट मी जालावरून काढले होते. त्याचे फारसे अप्रूप मला नव्हते कारण परदेश प्रवासाची तिकिटे मी जालावरून काढतोच. परंतु आश्चर्य वाटले ते एका नव्या प्रकारच्या संकेत स्थळांचे किंवा वेब साईट्सचे. सिंगापूर एअरलाईन किंवा सिल्क एअर यासारख्या विमान कंपन्यांच्या संकेतस्थळांवर जाऊन तिकिट काढणे हे माझ्या परिचयाचे होते. पण आता या नवीन संकेतस्थळांवर कोणत्याही विमान कंपनीच्या विमान सेवेचे तिकिट काढता येते. त्यांचे दर आता पूर्वीसारखे फिक्स पण नसतात व ते सारखे बदलत राहतात. शोधाशोध करून स्वस्त फ्लाईट मिळू शकते हा सगळा प्रकार मला नवीनच होता.

1960 किंवा 1970 च्या दशकात केलेले विमान प्रवास मला अजून आठवतात. तिकिट काढण्यासाठी विमान कंपन्यांच्या ऑफिस मधे जाणे मग ती लांबलचक अनेक पाने असलेली तिकिटे, त्याच्या बरोबर एखादे प्लॅस्टिक फोल्डर मिळत असे. ते घ्यायचे. ते तिकिट जपून ठेवायचे कारण ते दाखवल्याशिवाय तुम्हाला चेक इन करता येत नसे. तिकिटावरचे नाव आणि तुमचे नाव हे एक असलेच पाहिजे असे नव्हते कारण तिकिटावर नाव असलेली व्यक्ती खरोखरच प्रवास करते आहे का ही माहिती करून घेण्याची विमान कंपन्यांना जरूरीही नसे व ते महत्वाचे पण नव्हते. अलीकडे तिकीट नसले तर एअरपोर्ट वर छापून मिळते पण तुमचे सरकारी ओळखपत्र नसले तर तुम्हाला विमानात प्रवेश मिळणे मुष्किलच. त्या वेळेला सुरक्षा जांच वगैरे प्रकारही नव्हते. सामानही कोणी तपासत नसे. अलीकडे सामान क्ष किरणांनी तपासल्याशिवाय पुढे जाणेही शक्य नाही. पुण्याचा विमानतळ म्हणून तेंव्हा वायुदलाचा एक हॅन्गर वापरात येत असे. प्रवाशाला पोचवायला आलेला कोणीही अगदी विमानाच्या थोड्या अलीकडे पर्यंत जाऊ शकत असे. मी बंगलुरुला रहात असताना माझे वडील मला एकदा भेटायला आले होते. त्यांच्या अगदी विमानापर्यंत त्यांना पोचवायला गेल्याचे मला आठवते. आता पोचवायला आलेल्या माणसाला इतक्या लांब अंतरावरूनच परत पाठवतात की विमानतळावर निरोप द्यायला जाण्यासारखा मूर्खपणा नसावा.

आमच्या दिल्लीच्या विमानफेरीत हवाई सुंदर्‍या होत्या पण खाणे पिणे वगैरे काही नव्हतेच त्यामुळे त्यांना फारसे काम पण नव्हते.विमानाची साफसफाई करताना त्याच दिसल्या. अगदी पिण्याचे पाणी हवे असले तरी ते अलीकडे विकत घ्यावे लागते. पूर्वी थंडगार तेलकट समोसे. लेमन किंवा चहा कॉफी , लेमनच्या गोळ्या, यूडी कलोन वगैरे सारख्या मिळणार्‍या कोणत्याच गोष्टी आता मिळत नाहीत. विमानसेवेचे तिकिट काढल्यावर विमान कंपनी त्या स्थळावर तुम्हाला पोचवण्याची जबाबदारी घेते. बाकी तुमचे तुम्ही बघायचे. नशीब की आंतर्राष्ट्रीय विमान सेवांच्यात अजून जेवण खाण देतात. नाहीतर दहा बारा तास प्रवास करायचा पण खायला प्यायला विकत घ्यायचे हा प्रकार सुरू झाला नाहीये.

माझ्या एक परिचित महिला आहेत. स्वकष्टाने अगदी साधारण परिस्थितीतून वर आलेल्या. परवा त्या मला म्हणत होत्या की या सुट्टीत शिमला, मनालीची सफर करण्याचा बेत आहे पण मुलगा म्हणतो आहे की दर वेळेस आपण कोठेही जायचे असले की द्वितीय वर्गाने, फार फार तर शयन यान, प्रवास करतो. आता विमानाने जाऊया. मी आश्चर्याने थक्क झालो. पूर्वी विमान जवळून बघितले असलेल्यांची संख्या (आत बसण्याचे सोडूनच द्या.) नगण्य असे. आता सामान्य माणसे सुद्धा विमानाने जाण्याचे बेत करू लागली आहेत. भारत समृद्धीच्या मार्गाने नक्की वाटचाल करतो आहे याची ही एक खूण आहे नक्की. काही वर्षात रेल्वे स्टेशनसारखी गर्दी बहुदा विमानतळांच्यावर होऊ लागेल आणि ती तशी व्हायलाच पाहिजे आहे.

माझी दिल्लीची ट्रिप संपवून मी पुण्याच्या विमानतळावर उतरलो तेंव्हा रात्रीचे पावणे अकरा वाजले होते. विमानतळावर गर्दीचा महापूर होता कारण एका पाठोपाठ विमाने उतरत होती. बाहेर आल्यावर वाहतुक मुरंब्याने सर्व वाहतुक कोलमडली असल्याचे लक्षात आले. याच पुण्यात, रात्रीचे आठ वाजून गेल्यावर रस्त्याने जायला नको वाटे. लोहगावच्या आसपास तर भटकी कुत्री सुद्धा बहुदा फिरकत नसावीत. या भूतकालाची मला आठवण झाली आणि मोठी गंमत वाटली.

कालाय तस्मै नम: हेच खरे.

4 मार्च 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “निमित्त विमानप्रवासाचे

 1. विमानाच कौतुक आता कमी झालय .. वेळ वाचतो जर विमान वेळेत उडाल आणि उतरल तर .. अन्यथा कधी कधी वैताग पण येतो. पण आता विमान प्रवास अनेकांच्या आवाक्यात आलाय ही चांगली बाब आहे .. आणि डेक्कन क्वीनने प्रवास करावा त्या थाटात लोक हल्ली विमानात आपले आपले डबे खातात 🙂

  Posted by aativas | मार्च 4, 2011, 5:24 pm
 2. > नशीब की आंतर्राष्ट्रीय विमान सेवांच्यात अजून जेवण खाण देतात.
  >
  मुम्बई ते दिल्ली/नागपूर या विमान प्रवासात अज़ूनही इडली वा ऑमलेट देतात, आणि ते पदार्थ चविष्ट असतात. थंड-तेलकट असे नाही.

  पण इडली-दोसा-अंडे-पोहे पासून साबुदाणा वडा – मेथी पकोडा – मटका दही हे सगळे पदार्थ चापायचे असतील तर दादरहून सकाळी ७-वाज़ता निघणार्‍या मांडवी एक्सप्रेसनी रत्नागिरी वा मडगावपर्यन्त प्रवास करावा. निव्वळ त्या खाण्यासाठी तो प्रवास करण्यासारखा आहे. (राजाभाऊ काळे हे वाचत असतील अशी आशा करतो.) शिवाय माझ्या डब्यात ज़वळच दादरचे काही लोक इतरांची मराठीत निंदानालस्ती करत होते. मराठी ऐकायला, त्यातूनही तिच्यात परनिन्दा ऐकायला, मला फार आवडते. माझ्या रांगेत एकच शान्त साधुपुरुष होता. किरिस्ताव असावा. त्याची सुंदर बायको, का कोण ज़ाणे, दुसर्‍या डब्यात होती. ती मधूनच येऊन खूप गोड हसत पतिदेवांना फालतू किस्से सांगत होती. फालतू किस्से ऐकायलाही मला फार आवडतात. त्यातून अशा सुन्दर ख्रिश्चन भगिनीकडून? देता अनन्त हस्ते, वगैरे … साधुपुरुष ते किस्से मनोवृत्ती उचंबळू न देता शान्तपणे पण कौतुकाने ऐकत होता. एकूण प्रवास ज़बरदस्त, अति-संस्मरणीय झाला.

  गेल्या दहा वर्षातला एक लक्षणीय फरक म्हणजे मी तेव्हा बाहेर काही खाऊ शकत नसे. सगळे पदार्थ तिखट. मी नेमका तेव्हा तिखट अजिबात न खाण्याचा प्रयोग करत होतो. आता रेल्वे गाडीत (निदान मांडवी मधे) तिखट बेतवार असतं. मी पण आता बिनतिखटाचे पदार्थ खाऊ शकत नाही. तरीही मी तिखट खाणारा असा नाहीच. एकूण बाहेरच्या पदार्थांतलं तिखटाचं प्रमाण नक्कीच कमी झालं आहे. भारतात गेल्या दहा वर्षात झालेल्या २-३ सुधारणांतली ही एक सुधारणा.

  – नानिवडेकर

  Posted by Anonymous | मार्च 5, 2011, 12:54 सकाळी
  • नानिवडेकर
   अगदी खरे आहे तुमचे म्हणणे. पूर्वी साध्या पुणे मुंबई प्रवासात सुद्धा सकाळी डेक्कन क्वीन मधे मिळणार्‍या टोस्ट ऑमलेटची किंवा संध्याकाळी परत येताना मिळणार्‍या फ्राइड फिशची चव अजून माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. त्याच प्रमाणे कर्जत स्टेशनवर उतरून 2 मिनिटात दिकाडकरांच्या स्टॉलवर खरेदी केलेले गरमा गरम बटाटेवडे आठवतात. प्रवास करताना खाणे पिणेच नसेल तर प्रवासाची मजाच जाते. या बजेट विमान कंपन्यांनी खाणे बंद करून प्रवासाची निम्मी मजा घालवली आहे.

   Posted by chandrashekhara | मार्च 5, 2011, 9:06 सकाळी
 3. आपण विमानप्रवासाचे जे लिहिले आहे, ते पटले. हल्ली त्याचे अप्रूप राहिलेले नाही. आम्ही गेल्या वर्षी केरळ ट्रिप केली. मुंबई ते तिरूवनन्तपुरम हा विमानप्रवास अतिशय सुखकर होता. आम्हाला चौदा ते अठरा तासांच्या मुंबई डेट्रोइट या परदेश विमानप्रवासाचा अनुभव असल्यामुळे आम्ही तुलना करत होतो, पण आपण कोणत्याही बाबतीत कमी नाही, हे दिसून आले.

  Posted by mangesh nabar | मार्च 5, 2011, 11:04 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: