.
Travel-पर्यटन

दख्खनच्या पठारावर – 8


गेले काही दिवस चालुक्य राजांच्या कालात रमलेले माझे मन परत वर्तमानात यावे म्हणून दख्खनमधली दोन अतिशय रम्य ठिकाणे आज बघायची ठरली आहेत. गेले काही दिवस मंदिरांचा नाही म्हटले तरी ओव्हरडोस झाला आहे हे नक्की. इंग्रजीमध्ये याला ‘Templed out’ अशी एक फ्रेज रूढ होते आहे . मराठीत त्याला समांतर शब्द मला तरी सुचत नाहीये. गेले काही दिवस ज्या मलप्रभा नदीच्या परिसरात मी फिरतो आहे. ही नदी कृष्णा नदीला कुडाळ या ठिकाणी जाऊन मिळते. या संगमस्थानाकडे मी आता चाललो आहे.

कृष्णा, मलप्रभा नद्यांचा कुडाळ येथील संगम

पात्रामधे बांधलेल्या शिवलिंगाच्या भोवतीच्या विहिरीत जाण्यासाठी बांधलेला पूल

शिवलिंगाच्या भोवतीच्या विहिरीत खाली जाण्यासाठी बांधलेला जिना व शिवलिंगावरची कॅनपी

विहिरीत उतरण्यासाठी बांधलेला वर्तुळाकार जिना

मलप्रभा नदीचे पात्र

कृष्णा नदीचे पात्र या ठिकाणी खूपच रूंद आहे. त्या मानाने मलप्रभा नदी अगदीच लहानशी दिसते आहे. मात्र हे संगम स्थान अतिशय रम्य आहे यात शंकाच नाही. निळेशार पाणी, कडेला असलेले हिरवेगार काठ व वर तसेच निळेशार आकाश, सर्व आसमंत या निळाईत बुडूनच गेल्यासारखा वाटतो आहे. संगमस्थानावर पात्रामध्ये आधी एक शिवलिंग होते. कृष्णा नदीवर बांधलेल्या धरणामुळे या ठिकाणी नदीच्या पात्राची ऊंची खूप वाढली व शिवलिंग पाण्यात गेले. या भागात लिंगायत लोकांची प्रामुख्याने वस्ती आहे. त्यांना हे चालले नाही. त्यामुळे आता शासनाने त्या शिवलिंगाभोवती एक वर्तुळाकार विहिरच बांधून घेतली आहे. या विहीरीच्या तळाशी हे शिवलिंग आहे व काठापासून या विहीरीत उतरण्यासाठी एक पूल व वर्तुळाकार जिना बनवला आहे. या विहीरीच्या तोंडावर नदीच्या भर पात्रात उभे राहिले की इतके प्रसन्न वाटते आहे की शब्दात वर्णन करणे मला तरी शक्य नाही.

विशाल अलमाट्टी धरण

अलमाट्टी धरणावर जाण्यासाठीचे प्रवेशद्वार

कुडाळ संगम बघून मी आता उत्तरेच्या दिशेने निघालो आहे. वाटेत एक अतिविशाल धरण लागते आहे. हेच ते अलमाट्टी धरण, ज्याच्या ऊंचीवरून महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यात वाद चालू आहे. या धरणाचे बॅक वॉटर पार सांगली पर्यंत पोचते आहे. आता याची ऊंची अधिक वाढली तर पाणी किती गावांच्यात घुसेल यावरूनच वाद चालू आहे. अलमाट्टी धरणाने बागलकोट व विजापूर जिल्ह्यांचा मात्र कायापालट केला आहे. सगळीकडे सुजलाम सुफलाम धरती दिसते आहे. विजापूर जिल्हा खरे म्हणजे दुष्काळीच. परंतु आता याच दुष्काळी भागाचा कायापालट होतो आहे. या आधी आम्ही इरकल गावामधे थोडा वेळ थांबलो होतो. इरकली साड्यांसाठी हे गाव प्रसिद्धच आहे. मी तिथून इथल्या वैशिष्ट्यपूर्ण ब्याडगी मिरच्यांची पूड खरेदी केली. ही मिरची तितकीशी तिखट नाही पण पदार्थाला मस्त लालभडक रंग आणते. रस्त्याच्या कडांना वाळलेल्या लाल मिरच्यांचे ढीग सतत बघितल्यामुळे बहुदा ही खरेदी मी केली असावी.

कृष्णा गार्डनचे प्रवेशद्वार

कृष्णा गार्डन अलमाट्टी

अलमाट्टी धरणाच्या कडेला एक सुंदर बाग शासनाने विकसित केली आहे. अतिशय छान परिसर, पशू, पक्षांचे सुंदर पुतळे यांनी बाग सजवली आहे. खूप शाळकरी मुले मजा करायला येताना दिसत आहेत. मला मात्र येथे थांबणे शक्य नाही कारण मला गाठायचे आहे विजापूर.

हसन गन्गू बहमनी याने दख्खनच्या पठारावर 1347 मधे स्थापन केलेले बहमनी साम्राज्य, 1480 च्या सुमारास लयाला गेले व या राज्याचे पाच तुकडे झाले. बेरारची इमादशाही, बिदरची बरीदशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निझामशाही व विजापूरची अदिलशाही अशा पाच नवीन राजवटी निर्माण झाल्या. या शिवाय विजयनगरचे साम्राज्य आपली ताकद राखून होतेच. 1565 मधे या सर्व शाह्या एकत्र झाल्या व त्यांनी बनीहट्टी या ठिकाणी विजयनगरच्या फौजांचा पराभव केला. यानंतर विजयनगरचे साम्राज्य नष्ट झाले परंतु नंतरच्या कालात या सर्व सुलतानांची, आपापसात व दिल्लीचे मुघल यांच्याबरोबर, सतत युद्धे होत राहिली व एक एक एक करून ही राज्ये नष्ट होत गेली. 1636 मधे निझामशाही नष्ट झाली व उत्तरेला मुघल व दख्खनमधे विजापूरची अदिलशाही एवढी दोनच शक्तीमान राज्ये उरली.

1489 ते 1686 एवढ्या प्रदीर्घ कालखंडात अदिल शाही राजघराण्याने विजापूर या राजधानीतून, मराठ्यांचे स्वराज्य सोडले तर कमी जास्त प्रमाणात दख्खनवर, निरंकुश सत्ता गाजवली. 1686 मधे मुघल सम्राट औरंगजेब याने विजापूर जिंकून घेतले व अदिलशाहीचा अंत झाला. या मधल्या कालखंडात, विजापूर ही एका मोठ्या राज्याची राजधानी असल्याने, साहजिकच या कालखंडाच्या खाणाखुणा विजापूरच्या अंगाखांद्यावर दिसतात. माझ्या दख्खनच्या पठारावरच्या या भटकंतीत म्हणूनच विजापूर हा थांबा अगदी आवश्यकच आहे.

विजापूर शहरात कोणत्याही दिशेने आत शिरले तरी प्रथम उठून दिसते ते गोल घुमटहे अप्रतिम स्थापत्य. त्यामुळेच माझा विजापूरचा फेरफटका या गोल घुमटापासूनच मी सुरू करतो आहे. सकाळी लवकर उठून सूर्योदयाच्या वेळी मी गोल घुमटासमोर उभा आहे. आवारात शिरताना समोर एक दर्शनी (Facade)  इमारत समोर दिसते आहे तिचे नाव आहे नक्करखाना. या इमारतीत आता संग्रहालय आहे. या गोल घुमटाच्या आवारातच पूर्वीची जैन मंदिरे होती असा शोध नुकताच लागला आहे कारण त्या मंदिरांचे काही खांब आता उत्खननात सापडले आहेत. मी उभा आहे त्या ठिकाणापासून या नक्करखाना इमारतीच्या मागे, गोल घुमटाचे मुख्य स्थापत्य लपूनच गेले आहे. फक्त घुमट व मिनार यांचा वरचा भाग दिसतो आहे. मुख्य इमारतीची भव्यता दर्शकाच्या मनावर ठसवण्यासाठी या प्रकारच्या इमारती पूर्वी बांधल्या जात असत. हा नक्करखाना व मुख्य गोल घुमटाचे स्थापत्य यांच्या मधे आणखी एक प्रवेश इमारत आहे. या इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी उभा राहून मी पुढे चालत जातो आहे. या प्रवेश वास्तूच्या द्वारामधून गोल घुमटाची मुख्य इमारत दिसते आहे खरी पण या वास्तूचा प्रवेश दरवाजा असा काही बनवलेला आहे की पुढे चालत जात असताना समोरचा गोल घुमट आकाशात चंद्र उगवावा तसा त्या खालच्या स्थापत्याच्या डोक्यावरून वर वर येताना दिसतो आहे.

सूर्योदयाच्या वेळी दिसणारा गोल घुमट, समोर नक्करखाना ही इमारत

गोल गुमटाच्या परिसरातील उत्खननात मिळालेले जैन मंदिराचे स्तंभ

सकाळच्या उन्हात इब्राहिम आदिल शहा त्याची बेगम व कुटुंबीय यांच्या चमकणार्‍या कबरी

छताला आधार देणारी ब्रॅकेट्स, बाजूला पूर्वेकडचा मिनार

छताच्या कठड्याचे खांब

घुमटाजवळची व्हिस्परिंग गॅलरी

गोल घुमट इमारतीच्या पायापाशी पोचले की त्या इमारतीच्या भव्यतेची खरी कल्पना येते. बाजूच्या एका छोट्या दरवाजाने मी आत शिरतो. समोर मोहम्मद अदिल शहा, त्याची बेगम वगैरे मंडळींच्या कबरी आहेत. परंतु माझे लक्ष मात्र बाजूंच्या छोट्या झरोक्यांच्यावर खिळले आहे. त्या झरोक्यांच्यातून सकाळच्या उगवत्या सूर्याचे किरण त्या कबरींच्या वर पडत आहेत व त्या सर्व कबरी खूप फ्लडलाईट लावावे तशा प्रकाशमान झाल्या आहेत. हे अदिल शाही राजे गादीवर आल्यावर प्रथम काय करत असत तर स्वत:चे थडगे बांधायला सुरूवात करत असत कारण त्या वेळच्या अनिश्चिततेच्या कालात तो राजा किती जगेल? हे सांगणे कठिणच होते व अशा वेळी थडगे तयार नसले तर त्या राजाचे महत्व कसे पुढे उरणार? असा एक सोपा विचार त्या मागे असावा असे मला वाटते. या गोल घुमटाच्या स्थापत्याच्या चारी बाजूंना चार मिनार आहेत. या मिनारांना असलेल्या जिन्याने सात मजले चढून मी आता घुमटाच्या आतील बाजूपाशी पोचलो आहे. या ठिकाणी, घुमटाच्या आतील बाजूस, ध्वनीच्या अनेक परावर्तनांमुळे निर्माण होणारे अनेक आश्चर्यजनक ध्वनी परिणाम ऐकता येत आहेत. घुमटाच्या समोरच्या बाजूस केलेला कागद चुरगळल्याचा आवाज किंवा कुजबुज ही 38 मीटर अंतरावर मी उभा आहे येथे इतकी स्पष्ट ऐकू येते आहे की या गॅलरीला कुजबुज गॅलरी का म्हणतात ते लगेच स्पष्टच होते आहे. हे स्थापत्य ज्या कोणी बांधले आहे त्यांच्या कारागिरीला दाद द्यावीशी मला वाटते आहे. गोल घुमटाचा हॉल 205 फूट लांबी, रूंदीचा आहे. हा हॉलचे छत 100 फूट ऊंचीवर आहे व 38 मीटर(120 फूट) व्यासाचा घुमट या छताच्या वर बांधलेला आहे. ही इमारत बांधण्यासाठी 30 वर्षे लागली होती.

Majestic Gol Gumbaj

गोल घुमटाची विस्मयजनक इमारत बघून आता मी बुरुज, तट वगैरे असलेल्या एका किल्याच्या भागाजवळ पोचलो आहे. विजापूरच्या मूळ किल्याचाच हा भाग आहे. हा बुरुज मी चढून जातो. येथे प्रसिद्ध मलिकमैदान ही तोफ ठेवलेली आहे. रणांगणाचा राजा असे या तोफेला म्हणत असत. जवळ जवळ 5 फूट व्यासाच्या व 14 फूट लांबीच्या या अगडबंब तोफेचे वजन 55 टन आहे. एकसंध ओतलेली ही जगातील सर्वात मोठी तोफ आहे असे म्हणतात. अहमदनगर मधे, गन मेटल वापरून ओतलेली ही तोफ, फक्त एकदाच, म्हणजे विजयनगर बरोबरच्या बनीहट्टी येथील लढाईत, 1565 मधे वापरली गेली होती. तोफेवर हत्ती दाताखाली चिरडणार्‍या एका ड्रॅगनच्या चित्राचे कोरीव काम आहे. औरंगजेबाने विजापूर जिंकून घेतले त्या वेळी मोठ्या अभिमानाने त्याने एक शिलालेख या बुरुजावर बसवला होता. त्या लेखात औरंगजेब म्हणतो की मी विजापूर जिंकलेच आहे पन मलिकमैदान तोफ पण जिंकली आहे.” ही तोफ बघायला कितीही भितीदायक असली तरी तिचा व्यास व लांबी यांचे प्रमाण बघता ती फारशी प्रभावी किंवा अचूक नसावी असे मला वाटते आहे.

मलिक-ए-मैदान तोफ

मलिक-ए-मैदान तोफेवरचे कोरीव काम

विजापूर आणि मलिक-ए-मैदान जिंकल्यानंतर लिहिलेला औरंगजेबाचा शिलालेख

मलिकमैदान तोफेच्या जवळच असलेल्या इब्राहिम रोजाया प्रसिद्ध इमारतीपाशी मी आता पोचलो आहे. प्रत्यक्षात येथे दोन वास्तू दिसत आहेत आजूबाजूला हिरवळ व फुले लावलेले एक मोठे विस्तीर्ण आवारही दिसते आहे. ही वास्तू इबाहिम आदिल शाह याने स्वत:ची भावी कबर म्हणून बांधली होती. या वास्तूच्या समोरच त्याने एक मशीदही बांधलेली आहे. इब्राहिम रोजाची ही वास्तू इतकी सुंदर व नाजुक रित्या बांधलेली आहे की या इमारतीचा घुमट व मिनार हे ताज महल बांधताना शहाजहानच्या डोळ्यासमोर होते असे म्हटले जाते. या वास्तूमध्ये इब्राहिम आदिल शाह, त्याची बेगमताज सुलताना व इतर कुटुंबीय यांच्या कबरी आहेत.

इब्राहिम रोजाची सुंदर वास्तू

इब्राहिम अदिल शाह याची कबर , इब्राहिम रोजा

मशीद, इब्राहिम रोजा

बेगम ताज सुलतानाच्या कानातील इअरिंगच्या डिझाइनसारखी बनवलेली लोखंडी साखळी

मशिदीच्या इमारतीवर एक नक्षीदार साखळी अडकवलेली आहे. असे म्हणतात की ताज सुलतानाच्या कानातल्या इअरिंगच्या नमुन्यादाखल ही साखळी बनवलेली आहे. वास्तूच्या भिंतीवरच्या कलाकुसरीमध्ये अनेक गमतीदार पॅनेल्स बघायला मिळत आहेत. या इमारतीचा नकाशा किंवा तळघराची बांधणी याची सर्व माहिती येथे आहे. ही संपूर्ण इमारत पाया खोदल्याशिवाय बांधलेली आहे. जमिनीवर एकमेकावर बांधलेल्या अनेक उलट सुलट कमानींच्या आधारावर ही इमारत उभी आहे. खाली तळघरात गेले की ही गोष्ट लगेच लक्षात येते आहे.

यानंतर मी जातो आहे जोड गुंबज या इमारतीकडे. औरंगजेबाने जेंव्हा विजापूरवर स्वारी केली तेंव्हा सिकंदर आदिल शाह गादीवर होता. त्याचा वजीर खवास खान आणि धर्म गुरू अबदुल काद्री यांच्या या कबरी आहेत. खवास खान प्रत्यक्षात औरंगजेबाला फितूर झाला होता. यामुळे त्याच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्याची कबर म्हणून या इमारती बांधल्या. परंतु या इमारतीला पर्यटक भेट देतात ते निराळ्याच कारणासाठी. आपल्याकडे जागृत देवस्थान म्हणून जो काही एक प्रकार चालतो तशाच या कबरीही म्हणे जागृत आहेत असे समजले जाते. अनेक हिंदू, मुसलमान या कबरींवर गंडेदोरे चढवताना दिसतात. असे केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात असे समजले जाते. मला या विषयात एकूणच फारसा रस नसल्याने मी येथून काढता पाय घेतो आहे.

जोड घुमट

थोड्याच अंतरावर पहिला अली अदिल शहा याने बांधलेली जमिया मशीद आहे. येथे मी आता पोचलो आहे. 1,16000 चोरस फूट आकाराच्या क्षेत्रफळावर बांधलेली ही मशीद इस्लामिक स्थापत्याचा एक अप्रतिम नमुना म्हणता येईल. अफझलखानासारख्या 2250 आडदांड व्यक्ती येथे नमाज पढू शकतील अशा पद्धतीने ही मशीद बांधलेली आहे. इमारतीचे छत अनेक कमानींच्यावर आधारलेले आहे. इमारतीच्या पश्चिम भिंतीच्या मध्यभागी अनेक सुप्रसिद्ध प्रार्थना स्थळांची चित्रे व कुराणातील वचने हे सुवर्ण रंगात रंगवलेले आहेत. या जागेला मेहरब असे म्हटले जाते. इमारतीचे स्थापत्य इतके वैशिष्ट्यपूर्ण आहे की या मेहरबीजवळ उभे राहून प्रवचन करणार्‍या मुला मौलवीचा आवाज कोणताही ध्वनीवर्धक न वापरता नमाज पढणार्‍या अगदी कोपर्‍यातल्या व्यक्तीला सुद्धा स्पष्टपणे ऐकू जाईल.

जामिया मशीदीतल्या कमानी व छताचा भाग

मेहरब, जामिया मशीद

ही इमारत बांधण्यास अनेक लोकांनी हातभार लावलेला आहे. मोहम्मद अदिल शहा, औरंगजेब आणि सातार्‍याचे महाराज या सर्वांनी ही मशीद बांधण्यास मदत केलेली आहे.

विजापूरच्या वैभवाच्या काळात हे शहर किती दिमाखदार व वैभवशाली असले पाहिजे याची उत्तम कल्पना मला या वास्तू बघून येते आहे. मात्र कर्नाटक राज्याच्या एका टोकाला असलेले हे शहर आता जरा दुर्लक्षित आहे हे शहराच्या परिस्थितीवरून कोणाच्याही लक्षात यावे. येथे विमानतळ, चांगले रस्ते या सारख्या सोई जर निर्माण केल्या तर हे शहर महाराष्ट्रातल्या औरंगाबाद सारखे विकसित करणे पूर्ण शक्य आहे असे मला वाटत राहते आहे.

विजापूरच्या या फेरफटक्याबरोबरच दख्खनच्या पठारावरची माझी ही भटकंती आता संपली आहे. इतके दिवस माझ्या मनात, दख्खन किंवा दख्खनचे पठार हे शब्द फक्त शिवाजीच्या इतिहासाशीच जोडलेले होते. आता मात्र शिवाजी बरोबरच, चालुक्य राजे, विजयनगर आणि निरनिराळ्या शाह्या हे सर्व या दख्खनच्या इतिहासातले किती महत्वाचे साक्षीदार आहेत हे मला चांगलेच उमजले आहे. सबंध उत्तर हिंदुस्थान मुघल अंमलाखाली असताना दख्खनचे पठार पारतंत्र्यातून मुक्तता करून घेण्याची स्वप्ने का सतत बघत राहिले याचे कारण दख्खनच्या या इतिहासात सापडते असे मला राहून राहून वाटते आहे.

22 फेब्रुवारी 2011

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

7 thoughts on “दख्खनच्या पठारावर – 8

 1. “दख्खनच्या पठारावर” ही आठ भागातील वाचकाची उत्कंठा वाढवणारी आपली भ्रमंती कथामाला आवडली. विशेष म्हणजे उत्तम छायाचित्रांची रेलचेल, थोडक्यात पण उचित स्थलवर्णन आणि दख्खनच्या इतिहासाशी निरनिराळ्या राजघराण्यांचे जोडलेले नातेसंबंध यांची परत एकदा व्यवस्थित उजळणी यामुळे तुमच्या भ्रमणकथनाला कोणीही कंटाळवाणे म्हणणार नाही. मी ही सारी कथा संग्रहित करून ठेवणार आहे. आम्हाला तेथे जाणे झाले तर खूप उपयोग होईल, हे नक्की. धन्यवाद. पुनः भेटूया असेच वरचेवर.
  मंगेश नाबर.

  Posted by mangesh nabar | फेब्रुवारी 22, 2011, 3:30 pm
 2. atishay uttam zali ahe lekhmala…apalya najretun sthale baghayla maja yete he nakkich!

  Posted by Nikhil | फेब्रुवारी 22, 2011, 4:46 pm
 3. औरंगजेबाच्या काळात तोफांचा मारा अचूक होत नसल्यामुळे circuler probable error चे तत्त्व उपयोगात आणण्यासाठी महाकाय तोफांचा विकास केला गेला असावा.

  Posted by मनोहर | फेब्रुवारी 22, 2011, 10:13 pm
 4. अप्रतिम माहिती अन छान फोटोग्राफ्स ..

  Posted by BinaryBandya™ | फेब्रुवारी 23, 2011, 11:33 सकाळी
 5. sundar mahiti ani sundar photo , yamule dakhkhan bhramantee karun alyasarakh vatat

  Posted by harshadsamant | फेब्रुवारी 26, 2011, 4:02 सकाळी
 6. APRATIM AHE SARV

  Posted by SHANAKAR GODASE | मार्च 17, 2012, 12:46 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

वाचकांचा प्रतिसाद

 पुणे 1790-95 — अक्ष… च्यावर  पुणे 1790-95
aroundindiaghansham च्यावर  पुणे 1790-95
chandrashekhara च्यावर  पुणे 1790-95
मिलींद कोलटकर च्यावर  पुणे 1790-95

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 392 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

%d bloggers like this: