.
Travel-पर्यटन

दख्खनच्या पठारावर – 7


बदामी गावाच्या परिसरात शिरत असताना प्रथम मला कसली आठवण होते आहे ती म्हणजे अमेरिकेतील ऍरिझोना राज्यामधील सिडोनाच्या भव्य खडकांची(Sedona). बदामी गावाला लागून सिडोनासारखेच लाल रंगाचे ऊंच दगडी डोंगर उभे आहेत. मात्र सिडोना मधले रॉक्स नुसते उभे आहेत. फार तर काही हौशी मंडळी त्यावर आपली रॉक क्लाइंबिंगची हौस पुरवत असताना आढळतात. बदामीची गोष्टच निराळी आहे. चालुक्य राजघराण्यातला विख्यात राजा दुसरा पुलकेशी याने आपली राजधानी ऐहोले वरून बदामीला सहाव्या शतकात आणल्यानंतर, बदामीच्या लाल दगडी डोंगरावर चालुक्य राजांनी गुंफा मंदिरे बांधली व त्यावर काही अप्रतिम भित्तिशिल्पे निर्माण करून घेतली.

मी बदामी गावात उतरल्यावर प्रथम पेटपूजेच्या मागे लागलो आहे. गेले काही दिवस सतत दाक्षिणात्य चवीचे भोजन घेतल्यावर आज बदामीला मिळणारे मराठी ढंगाचे जेवण खरे सांगायचे तर चवीला एकंदरीत बरे लागते आहे हे मात्र नक्की. पोट भरल्यानंतर तिथल्याच एका आराम खुर्चीत आराम करणे आवश्यकच आहे कारण बदामीच्या डोंगरावर भर दुपारी चढण्यात काही अर्थ नाही.

पुराणकाळातील बदामीचे जुने नाव वाटपी असे होते. चालुक्य राजांच्या आधीच्या कालखंडातच कधीतरी हे नाव बदामी असे झाले असावे. ग्रीक भूगोलकार टॉलेमी याने दुसर्‍या शतकात लिहिलेल्या आपल्या पुस्तकात बदामीचा उल्लेख केलेला आढळतो. त्या कालापासूनच हे व्यापाराचे एक प्रमुख केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. सध्या हे गाव तालुक्याचे गाव व एक व्यापार केन्द्र आहे. चालुक्य कालात बदामीला, राजधानी असल्याने, प्रचंड सांस्कृतिक व राजकीय महत्व प्राप्त झाले होते. विख्यात चिनी बौद्ध भिक्षू झुएन त्झांग (Xuanzang) याने दुसरा पुलकेशी याच्या कारकिर्दीत बदामीला भेट दिली होती. अगदी अलीकडच्या कालात म्हणजे अठराव्या शतकात, पेशव्यांच्या सैन्यापासून या भागाचे संरक्षण करण्यासाठी टिपू सुलतानाने बदामीच्या डोंगरावर एक किल्ला व शेजारच्या डोंगरावर राजकोष बांधले होते व त्याचे अवशेष अजूनही बघता येतात.

बदामीचा किल्ला व शैव किंवा पहिली गुंफा

दुपारचे चार वाजले आहेत व बदामीच्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत बस आम्हाला घेऊन चालली आहे. डोंगराच्या अगदी पायथ्यापाशी बस उभी राहते आहे. समोरच बदामीचा लाल रंगाचा डोंगर व त्याच्या डोक्यावर असलेला बदामीचा किल्ला स्पष्ट दिसतो आहे. बदामीची पहिली गुंफा ही शैव गुंफा म्हणून ओळखली जाते. ही गुंफा जमिनीपासून तीस पस्तीस पायर्‍यांवरच आहे त्यामुळे या गुंफेच्या दारापर्यंत सुरेख हिरवळ व फुलझाडे लावलेली दिसत आहेत. बदामीच्या सर्व गुंफांची खोदाई एकाच पद्धतीची आहे. प्रत्येक गुंफेच्या समोर सपाट मोकळी जागा खडक तोडून केलेली दिसते. त्या सपाट जागेपासून पाच ते सात पायर्‍या चढून गेले की मुख मंडप म्हणून ओळखला जाणारा कक्ष लागतो. या कक्षाला आधार देण्यासाठी दगडी खांब उभारलेले आहेत. मुख कक्षाच्या दोन्ही टोकांना व बाजूंना हाय रिलिफ प्रकारची शिल्पे कोरलेली आहेत. मुख मंडपातून आत गेले की सभा मंडप लागतो. यालाही आधार स्तंभ उभारलेले आहेतच. सभा मंडपाच्या भिंतीवर शिल्पे शिल्पे कोरलेली दिसत नाहीत. मात्र सभा मंडप व मुख मंडप यांत उभारलेले आधार स्तंभ जिथे छताला टेकतात त्या ठिकाणी असलेल्या ब्रॅकेट्सवर सुंदर शिल्पे साकारलेली दिसतात. सभा मंडपाच्या आतल्या बाजूस गाभार्‍याची गुंफा असते. या गाभारा गुंफेत एक त्या मंदिराची देवता सोडली तर इतर फारसे कोरीव काम दिसत नाही.

शैव गुंफेचा मुख मंडप

81 नृत्य मुद्रा दर्शविणारा 18 हातांचा नटराज

शैव द्वारपाल

महिषासुरमर्दिनी, म्हशीचे पारडू, महिषासुर म्हणून दाखवलेले आहे

अर्धनारीनटेश्वर, डाव्या बाजूस निम्मी पार्वती व उजव्या बाजूचा निम्मा शंकर

हरिहर

नंदीवर बसलेला शंकर मागे त्याला धरून व एकीकडे पाय टाकून बसलेली पिलियन रायडर पार्वती

शैव किंवा पहिली गुंफा ही इ.. 543 मधे चालुक्य राजा पहिला पुलकेशी याच्या कालात खोदली गेली होती. मी पायर्‍या चढून मुख मंडपात प्रवेश करतो. उजव्या बाजूला 18 हात असलेल्या नटराजाचे एक सुरेख शिल्प आहे. या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यातल्या कोणत्याही दोन हाताची जोडी एक नृत्य मुद्रा दाखवते. म्हणजेच एकूण 81 नृत्य मुद्रा हा नटराज दाखवतो. या नटराजाच्या बरोबर समोरच्या बाजूस हातात त्रिशूळ घेतलेल्या द्वारपालाची मूर्ती दिसते. मुख मंडपांच्या भिंतीवर महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे. यात म्हशीचे एक पारडू महिषासुर म्हणून दाखवले आहे. याच्या बाजूला अर्धनारी नटेश्वर म्हणून शिल्प आहे. यातील देवतेची निम्मी व डावी बाजू पार्वती व निम्मी उजवी बाजू शंकर दाखवला आहे. याच्याच धर्तीवर निम्मा शंकर व निम्मा विष्णू दाखवलेले हरिहराचे शिल्प आहे. बाजूलाच असलेले एक शिल्प मला जरा वैशिष्ट्य[पूर्ण वाटते आहे. यात नंदीवर शंकर व त्याच्या मागे पिलियन रायडर म्हणून पार्वती बसलेली आहे. मात्र अलीकडे स्त्रिया स्कूटरवर जशा एका बाजूला दोन्ही पाय टाकून बसतात तशीच पार्वती नंदीवर बसलेली बघून गंमत वाटते आहे. मी सभा मंडपात प्रवेश करतो. आता फारसा उजेड नाही. परंतु आत फारसे काहीच बघण्यासारखे नाही हे लक्षात आल्यामुळे गाभार्‍याकडे एक दृष्टीक्षेप टाकून मी बाहेर येतो व परत पुढच्या पायर्‍या चढण्यास सुरवात करतो. सुमारे साठ पायर्‍या चढून गेल्यावर विष्णू किंवा दुसरी गुंफा समोर येते.

विष्णू त्रिविक्रम किंवा वामन अवतार

इंग्लिश न्याधीशांसारखे शिरस्त्राण घातलेले वाद्य वादक

स्वस्तिक वापरून केलेले एक बारीक डिझाइन

वराह अवतार, हातातल्या कमलावर भूदेवी उभी आहे.

विष्णू गुंफेत दोन महत्वाची शिल्पे आहेत एक म्हणजे भूदेवीची सुटका करणारा विष्णूचा वराह अवतार. यात दाखवलेली भूदेवता वराहाच्या हातातील कमलावर उभी आहे व तिने वराहाच्या मुखावर हात ठेवून त्याचा आधार घेतलेला आहे. इथले दुसरे महत्वाचे शिल्प म्हणजे बळी राजाने दान दिल्यामुळे तिन्ही लोक पादांक्रित करणारा वामन अवतार. यालाच त्रिविक्रम या नावानेही ओळखले जाते. या विष्णू त्रिविक्रम शिल्पाच्या खालच्या बाजूस काही वाद्यवादकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत या वादकांच्या डोक्यावर इंग्लंड मधील न्यायाधीश ज्या प्रकारचे एक शिरस्त्राण घालतात तसलेच दाखवलेले आहे.

हिरण्यकश्यपूचा वध केल्याने हास्य करणारा नृसिंह

हरिहर

दुसर्‍या गुंफेपासून परत साठ पासष्ठ पायर्‍या चढून गेले की महाविष्णू किंवा तिसरी गुंफा लागते. ही गुंफा इ.. 598 मधे पहिला किर्तीवर्मा या चालुक्य राजाच्या स्मरणार्थ त्याचा भाऊ मंगलेश याने खोदून घेतली होती. या गुंफेतील प्रमुख शिल्पे म्हणजे हिरण्यकश्यपूचा नाश केल्यावर विकट हास्य करणारा नृसिंह, महाविष्णू व हरिहर यांची आहेत.

महाविष्णू किंवा तिसरी गुंफा

झाडाखाली उभे असलेले प्रेमी युगुल. पुरुष स्त्रीच्या पायाचे मर्दन करतो आहे

ऐहोले व पट्टडकल येथे दिसणारी प्रेमी युगुले या महाविष्णू गुंफेत आपल्याला परत एकदा वरच्यादर्शन देताना दिसत आहेत. या ठिकाणी ही युगुले आधारस्तंभांच्या वरच्या बाजूच्या ब्रॅकेट्सवर कोरलेली आहेत. पुरुषाकडून पायाचे मर्दन करून घेणारी एक स्त्री किंवा आंब्याच्या झाडाखाली उभे असलेले प्रेमी युगुल ही मोठी रोचक वाटतात. काही यक्ष युगुलेही दिसत आहेत. या गुंफेच्या गाभार्‍यात महाविष्णूची मूर्ती दिसते आहे. आणखी तीस पायर्‍या चढल्यावर जैन गुंफा लागते आहे. या गुंफेत पार्श्वनाथ, गोमटेश्वर किंवा बाहुबली व महावीर यांची शिल्पे आहेत.

वारुळात तप करणारा गोमटेश्वर किंवा बाहुबली

जैन गुंफा बघून मी बाहेर येतो आहे. समोरच्या मोकळ्या जागेत उभा राहून गुंफेच्या विरूद्ध दिशेला बघितल्यावर समोर एक अतिशय रम्य असे तळे दिसते आहे. या तळ्याचे नाव आहे अगस्ती तीर्थ. याच्या एका कडेला एक छान बांधलेले मंदिर दिसते आहे. या मंदिराला भूतनाथ मंदिर म्हणतात.

अगस्त्य तीर्थ

भूतनाथ मंदिर

बदामीचा हा भाग इतका रम्य आहे की चालुक्य राजांनी आपली राजधानी म्हणून हे स्थान का निवडले असावे हे लगेच लक्षात येते आहे.

माझी चालुक्य कालातील महत्वाची ठिकाणे आता बघून झाली असल्याने मला परतीचे वेध लागले आहेत. मात्र दख्खनच्या इतिहासाच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचे ठिकाण माझे बघायचे अजून राहिलेच आहे. मात्र त्यासाठी मला परत आठशे वर्षांचा काल ओलांडून, विजयनगरच्या अखेरच्या काळाकडे जायला हवे. पण हे सगळे विचार मी उद्यावर ढकलतो कारण आता हवी आहे मला फक्त विश्रांती.

21 फेब्रुवारी 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “दख्खनच्या पठारावर – 7

  1. excellent, inspiring activity

    Posted by Nayan Naik | जुलै 9, 2012, 8:46 सकाळी

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention दख्खनच्या पठारावर – 7 « अक्षरधूळ -- Topsy.com - फेब्रुवारी 21, 2011

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: