.
Travel-पर्यटन

दख्खनच्या पठारावर -5


दख्खनच्या पठारावर उदयास आलेले सर्वात जुने साम्राज्य, आंध्र राजघराण्यातल्या गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शालीवाहन या राजाने इ..78 च्या सुमारास प्रस्थापित केले होते. या कालात या राज्याच्या पश्चिमेला असलेल्या म्हणजे मालवा, गुजरात व काठियावाड या भागात शक, पहेलवी व यवन (ग्रीक) या परकीयांच्या राजवटी होत्या. शालीवहनाने या सर्व परकीय शक्तींचा पराभव करून आपले दख्खनचे साम्राज्य प्रस्थापित केले होते व संपूर्ण दख्खनचे पठार एका अंमलाखाली आणले होते. आन्ध्र घराण्यातील राजांची सत्ता दुसर्‍या शतकाच्या अखेरीस संपुष्टात आली होती. सातवाहन साम्राज्याचे अनेक भाग झाले होते. महाराष्ट्रात अभीर, कर्नाटकात कदंब, दक्षिण आणि पूर्वेकडे पल्लव, चोला व इश्वाकू घराण्यातील राजांनी सत्ता काबीज केली होती. मात्र सहाव्या शतकात एक नवीनच राजसत्ता या दख्खनच्या पठारावर उदयास आली. या राजघराण्याचे नाव होते चालुक्य घराणे. हे राजे उत्तर कर्नाट्कमधले होते व थोड्याच कालात त्यांनी आपली सत्ता कावेरी आणि नर्मदा या नद्यांमधल्या प्रदेशात स्थापन करण्यात यश मिळवले. व एक नवीन साम्राज्य निर्माण केले. या राजघराण्यातील सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे दुसरा पुलकेशी, याने सम्राट हर्ष याचा निर्णायक पराभव केल्याने हर्षाचे उत्तरेकडचे साम्राज्य नर्मदा नदीपर्यंतच सीमित राहिले होते. मधला एक 13 वर्षाचा कालखंड सोडला (ज्या वेळेस पल्लव राजांनी चालुक्यांचा पराभव करून त्यांची राजधानी ताब्यात घेतली होती) तर आठव्या शतकाच्या मध्यापर्यंत, चालुक्य साम्राज्य दख्खनच्या पठारावर अबाधित राहिले होते. सुरवातीस या राजांनी आपली राजधानी कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यामधल्या ऐहोले या गावात स्थापली होती. मात्र पहिला पुलकेशी या राजाने ही राजधानी वाटपी (सध्याचे बदामी) येथे हलवली. चालुक्य राजांचा कालखंड हा दख्खनच्या इतिहासातला एक महत्वाचा कालखंड मानला पहिजे.

हंपी हून बदामीला जाणे हे फारसे सोईस्कर नाही. एकतर रस्ता जरी राष्ट्रीय महामार्ग (NH 13)असला तरी सगळीकडे कामे चालू असल्याने सध्या या रस्त्याचे स्वरूप खड्यांच्यामधे शोधा मग सापडेलया प्रकारचे आहे. वाहनाची तब्येत कशी आहे हे जाणून घ्यायचे असले तर या रस्त्याने वाहन जरूर घेऊन जावे. या राष्ट्रीय महामार्गावर अमीनगड म्हणून एक गाव लागते. तेथे बदामीकडे जाण्याचा फाटा लागतो. या फाट्याने मी आता ऐहोले या गावाकडे निघालो आहे.

ऐहोले हे गाव, ज्याचे वर्णन सुद्धा करता येणार नाही असे म्हणजे अतिशय सामान्य व बागलकोट जिल्ह्याच्या एका कोपर्‍यात लपलेले छोटेसे खेडे आहे. गावात कसलीही सोय नाही. साधा चहा सुद्धा मिळणे दुरापास्त आहे. मात्र 1400 वर्षांपूर्वी हेच गाव चालुक्य राजवटीतील राजकीय व सांस्कृतिक घडामोडींचे केन्द्र होते याची इथला आर्किऑलॉजिकल पार्क पाहिल्याशिवाय कल्पनाही येणे दुरापास्त आहे. 1912 साली प्रथम ऐहोले गावातल्या पुरातन वास्तूंचे जतन करण्याचा निर्णय तत्कालीन भारत सरकारने घेतला. त्या वेळेपर्यंत या गावातल्या पुरातन वास्तूंमधे खेडूत चक्क रहात असत. 1914 मधे या गावातल्या 123 वास्तू जतन करण्याचा आदेश भारत सरकारने काढला होता. दुर्दैवाने आज 100 वर्षांनंतरही, काही वास्तूंमधे लोक अजुनही रहातच आहेत. त्यांना तेथून बाहेर काढणे पुरातत्व विभागाला अजुन काही जमलेले नाही. मात्र बहुसंख्य वास्तू आता पूर्णपणे सुरक्षित केल्या गेल्या आहेत ही त्यातल्या त्यात आनंदाची बाब म्हणता येईल.


ऐहोलेच्या आर्किऑलॉजिकल पार्कमधे मी आता शिरतो आहे. हा सर्व परिसर तारेच्या कुंपणाने संरक्षित केलेला आहे व आत तिकिट काढून जावे लागते. आत गेल्यावर समोर जी वास्तू दिसते आहे ती अर्धवट प्रकाशात बघितली तर नवी दिल्लीच्या पार्लमेंट हाऊस सारखी नक्की दिसेल असे मला वाटते. बाह्य बाजूंनी खांब, आतल्या बाजूला भिंत व लंबवर्तुळाकार आकार या मुळे ही वास्तू मोठी उल्लेखनीय वाटते आहे. या वास्तूचे नाव आहे दुर्ग मंदिर. एखाद्या दुर्गासारखा आकार असल्याने हे नाव या वास्तूला मिळाले आहे. मुळात हे देऊळ कोणत्या देवाचे होते हे सांगणे कठिण आहे. परंतु ते विष्णूचे असावे असे काही जण म्हणतात. मंदिराच्या गाभार्‍याच्या प्रवेशद्वाराच्या लिंटेल वर एक अजब शिल्प आहे. एक मुख व त्याच्या आजूबाजूला सर्पासारखे दिसणारे अनेक बाहू दिसतात. मला तर काही हा गरूड असेल असे वाटत नाही. त्यामुळे हे देऊळ विष्णूचे होते की नाही हे सांगणे अवघड आहे. मंदिरावर एक फारसा उंच नसलेला आणि रेखानगर पद्धतीचा (Curvilinear) कळस आहे. या कळसावर एक कमळासारखे दिसणारे मोठे दगडी शिल्प बसवलेले होते. मात्र सध्या ते पडल्यामुळे मंदिराच्या बाजूला ठेवलेले आहे. दुर्ग मंदिर

दुर्ग मंदिराच्या बाह्य बाजूकडील शिल्पकाम केलेले स्तंभ व त्याच्या खालचे कोरीव काम

मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या लिंटेलवरचे शिल्प

आठव्या शतकात (..742) बांधलेल्या या मंदिरात, गाभारा आणि सभामंडप अशी रचना नाही. मंदिरात आत एकच कक्ष आहे व आतल्या बाजूंनी भिंतीवर फारसे काहीच कोरीव काम दिसत नाही. मात्र याची भरपाई बाहेरच्या बाजूला असलेल्या शिल्पकृतींनी भरपूर प्रमाणात होते. बाहेरच्या लंबवर्तुळाकार भिंतीवर शिव, विष्णू, कार्तिकेय, महिषासुरमर्दिनी , वराह अवतार व अर्धनारीनटेश्वर यांच्या अप्रतिम शिल्पकृती आहेत. या सर्व शिल्पाकृती हाय रिलीफप्रकारच्या असल्याने मोठ्या सुंदर दिसत आहेत. या शिल्पांकृतीमधे स्वस्तिकांचे पॅटर्न असलेल्या व दगडातून कोरलेल्या खिडक्यांच्या जाळ्या आहेत. मंदिराच्या भिंतीच्या बाहेरच्या बाजूस जे खांब आहेत त्यांच्यावरची शिल्पकला बघून मी स्तिमित होतो आहे. या बाहेरच्या खांबांच्यावर प्रामुख्याने आहेत प्रेमी युगुले. अनेक विभ्रम दाखवत आपले एकमेकावरचे प्रेम दर्शवत असणारी ही युगुले श्रुंगार रसात न्हालेली वाटत आहेत. एका शिल्पातल्या पुरुषाने स्त्रीसाठी काही अलंकार आणलेला आहे व तो उंच धरून ठेवला आहे. तो त्याने द्यावा म्हणून त्या शिल्पातली स्त्री विनवणी करताना दिसते आहे तर दुसर्‍या एका शिल्पात असा आणलेला अलंकार दोघे मिळून बघत आहेत. एका शिल्पात स्त्री पुरुषाच्या गळ्याभोवती आपले हात टाकून त्याच्याशी संभाषण करताना दिसते तर मदिरा प्राशनाने धुंद झालेले एक युगुल दुसर्‍या एका शिल्पात दिसते आहे. मंदिराच्या बाह्य भागावर ही शिल्पे का कोरली असावीत याचे प्रयोजन मला खरोखर कळत नाहीये. प्रयोजन काहीही असले तरी शिल्पे तर वाखाणण्याजोगी आहेतच परंतु शिल्पे काही कल्पनेतून बनत नाहीत. शिल्पकारांच्या नजरेसमोर असलेले समाज जीवनच त्याच्यात प्रतिबिंबित होते आहे हे नक्की. चालुक्य कालात इथले समाज जीवन किती मोकळे व संरक्षित असले पाहिजे याचा एक आरसाच हे मंदिर मला वाटते आहे.

दुर्ग मंदिरातील स्वस्तिक डिझाइनची खिडकी

विष्णू, तळाच्या बाजूला लक्ष्मी आणि गरूड

शंकर व नंदी

नृसिंह अवतार

कार्तिकेय किंवा मुरुगन, तळाच्या बाजूला त्याचे वाहन मोर्

वराह अवतार

महिषासुर मर्दिनी

दुर्ग मंदिरातील एका शिल्पामधे हाय रिलिफ पद्धतीने कोरलेला मानवी चेहरा

मदिरा प्राशनाने धुंद झालेले एक युगुल, बाजूला मद्य देणारी सेविका

या शिल्पातील पुरुषाला बहुदा “काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात” असेच म्हणायचे असावे

नवीन अलंकार बघणारे एक प्रेमी युगुल

आणलेला अलंकार पुरुषाने उंच धरला आहे. तो द्यावा म्हणून बहुदा स्त्री त्याची मनधरणी करते आहे.


दुर्ग मंदिराच्या बाजूला एक रिकामे झोपडी सारखे दिसणारे मंदिर आहे. पण त्यात बघण्यासारखे काहीच नसल्याने मी पुढच्या म्हणजे लाडखानमंदिराकडे जातो. प्रत्यक्षात हे मंदिर शिव मंदिर आहे. शंकराची पिंड व नंदी अजुनही दिसतो आहे. या मंदिरात लाडखान नावाची कोणी व्यक्ती वास्तव्य करून होती. त्यामुळे या मंदिराला लाडखान मंदिर असेच म्हणतात. हे मंदिर ऐहोले मधल्या सर्वात जुन्या मंदिरांच्या पैकी एक आहे. पाचव्या शतकात (..450) च्या आसपास बांधलेल्या या देवळाची रचना एखाद्या घरासारखी आहे. समोर पडवी व मागे सभामंडप आहे. गाभारा, सभामंडपाच्या मध्यभागीच बांधलेला आहे. या मंदिरावर कळस नाही व सपाट छप्पर दिसते आहे. छपरावर लाकडी वासे असावेत त्या आकारचे दगडी वासे किरणाकृती आकारात (Radial) कोरलेले दिसत आहेत. या मंदिरात एक शीर्षासन करणारा योगी व चालुक्य राजांची राजमुद्रा बघायला मिळते आहे. या राजमुद्रेत वराह, आरसा, सूर्य व खड्ग अशा आकृती दिसत आहेत. विजयनगरची राजमुद्रा या राजमुद्रेवरूनच बनवली होती असे म्हणतात. लाडखान मंदिराच्या बाह्य स्तंभांवर प्रेमी युगुल शिल्पे आहेतच. यातल्या एका शिल्पातल्या स्त्रीच्या चेहर्‍यावरचे लज्जादर्शक भाव मला अतिशय सुंदर वाटतात. लाडखान मंदिराच्या बाह्य भिंतीवर खिडक्यांच्या जाळ्या आहेत. पाषाणात इतके सुंदर डिझाइन असलेल्या जाळ्या 1500 वर्षांपूर्वी येथे कोरल्या असतील यावर विश्वास ठेवणेही मला जड जाते आहे.

लाडखान मंदिर

लाडखान मंदिरातील कोरलेली जाळी

लाडखान मंदिरातील आणखी एका जाळीचे डिझाइन

शीर्षासन करणारा योगी, लाडखान मंदिर

लाडखान मंदिरामधील विष्णू, चेहर्‍यावरचे हास्य बघण्यासारखे आहे

वराह, दर्पण, सूर्य व खड्ग असलेली चालुक्य राजमुद्रा

लाडखान मंदिरातील प्रेमी युगुले

 


लाडखान मंदिराच्या बाजूला, रेखानगर प्रकारचा कळस असलेले सातव्या किंवा आठव्या शतकात बांधलेले सूर्यनारायण मंदिर आहे. या मंदिरातल्या खांबांच्यावर गरूड, गंगा व यमुना यांची शिल्पे आहेत. गाभार्‍यात असलेल्या सूर्यनारायणाच्या मूर्तीच्या बाजूला सूर्याची ऋग्वेदातील दोन रूपे उषा व निशा यांच्या मूर्ती दिसत आहेत.

सूर्यनारायण मंदिराचा रेखा-नगर पद्धतीचा कळस

सूर्यनारायण मूर्ती तळाच्या बाजूस उषा व निशा

सूर्यनारायण मंदिराच्या बाजूला असलेल्या एका मंदिराचा कळस मला राष्ट्रकूट पद्धतीचा दिसतो आहे. हे मंदिर 9व्या शतकात बांधलेले होते. मुळात सूर्यनारायणाचे मंदिर असलेल्या या कळसावर एका शिल्प आहे व ते सूर्यनारायणाचे दिसते आहे. मात्र नंतर हे मंदिर ब्रम्हाचे मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.आता या मंदिराला बडिगेरा मंदिर असे संबोधले जाते.

बडिगेरा मंदिर, राष्ट्रकूट पद्धतीच्या कळसावर सूर्यनारायणाचे शिल्प दिसते आहे

ऐहोले आर्किऑलॉजिकल कॉम्लेक्समधे शिरल्याला दोन तासाहून अधिक वेळ लोटला आहे. येथे कसलीच सोय नसल्याने जास्ती वेळ घालवणे शक्य नाही. त्यामुळे आर्किऑलॉजिकल मुझियमला एक धावती भेट देऊन मी काढता पाय घेतो आहे. आता माझा पुढचा थांबा आहे पट्टडकल.

14 फेब्रुवारी 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: