.
Travel-पर्यटन

दख्खनच्या पठारावर -3


हंपीमधल्या विरूपाक्ष मंदिराच्या प्रवेश द्वारासमोर असलेल्या हंपी बाजारापासून, हेमकूट टेकडीला वळसा घालून, दक्षिणेकडे जाणार्‍या एका रस्त्याने मी आता बाळकृष्ण मंदिराकडे निघालो आहे. हे कृष्ण मंदिर कृष्णदेवराय या हंपीच्या राजाने इ..1513 मधे उत्कल (ओरिसा) देशाबरोबरच्या युद्धात आपल्याला मिळालेल्या विजया प्रीत्यर्थ बांधले होते. मंदिराचे प्रवेश द्वार व गोपुर मजबूत दगडी बांधणीचे आहे व संपूर्ण मंदिर परिसराभोवती एक मजबूत तट बांधलेला आहे. या प्रवेशद्वाराजवळ उभे राहून समोर नजर टाकली की समोर एक मोठा रिकामा जलाशय दिसतो. विजयनगर कालात येथे एक मोठी पुष्करिणी होती. या जलाशयाच्या दोन्ही बाजूंना दगडांनी बांधलेल्या दुकानांच्या रांगा अजुनही दिसत आहेत. या भागाचा संपूर्ण परिसरआराखडा किंवा लॅन्डस्केपिंग इतके सुंदर रित्या बनवलेले आहे की त्या काळात हा संपूर्ण परिसर किती नयनरम्य दिसत असेल याची सहज कल्पना करता येते. पुष्करिणी शेजारची सर्व दुकाने फक्त स्त्रियांना खरेदी करण्यास आनंद वाटेल अशा गोष्टींची म्हणजे वस्त्र आणि अलंकार यांचीच फक्त होती. या भागाला कृष्ण बाजार याच नावाने अजुनही संबोधले जाते. कृष्ण मंदिराच्या प्रवेश गोपुरावर काही वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे बघता येतात. पायात घुसलेला काटा काढून घेणारी एक धनुर्धर स्त्री व ध्यान लावलेला एक साधू यांची शिल्पे तर येथे आहेतच पण सगळीकडे दिसणारे अप्सरा शिल्पही येथे आहे. राजाला युद्धात मिळालेला विजय व मंदिर बांधणीबद्दलची माहिती देणारा शिलालेखही येथे दिसतो आहे.

कृष्ण मंदिराचे प्रवेशद्वार

पायात रुतलेला काटा काढून घेणारी धनुर्धर स्त्री

ध्यान लावून बसलेला साधू

अप्सरा

प्रवेश गोपुरातून आत शिरल्यावर मागे वळून बघितले की गोपुराच्या शिखरावर कृष्णदेवराय राजा व त्याच्या तीन राण्या (दोन अधिकृत) यांची शिल्पे दिसत आहेत. मंदिराचा रंगमंडप चांगला प्रशस्त व मोठा वाटतो आहे. रंगमंडपात प्रवेश करण्यासाठी ज्या पायर्‍या बनवलेल्या आहेत त्याच्या दोन्ही बाजूंना हत्तींची छान शिल्पे आहेत तर खांबावर यालीया सिंहासारख्या दिसणार्‍या एका काल्पनिक प्राण्याची शिल्पे दिसत आहेत. कृष्ण मंदिराच्या गोपुरावर असलेल्या मूर्तीचे चित्र कॅमेर्‍यात घेण्याचा माझा प्रयत्न दोन तीनदा अयशस्वी होतो पण शेवटी पूर्ण झूम वापरून ते छायाचित्र मला मिळते. माझ्या पूर्व कल्पनेपेक्षा बराच जास्त उशीर मला या मंदिरात होतो आहे हे लक्षात आल्याने जरा नाईलाजानेच मी मंदिरातून काढता पाय घेतो आहे.

कृष्ण मंदिर रंगमंडप

कृष्ण मंदिराच्या गोपुरावर कोरलेली कृष्णदेवराय व त्याच्या 3 राण्यांची शिल्पे

कृष्ण मंदिराचा कळस

गोपुराच्या शिखरावर असलेली शिल्पाकृती

कृष्ण मंदिराच्या पूर्वेलाच दोन छोटी मंदिरे आहेत. एकात मोठे शिवलिंग आहे या मंदिराचे नाव बडाविलिंग असेच आहे. सर्वसामान्य जनतेला चटकन प्रवेश मिळावा या साठी हे मंदिर बांधलेले असल्याने ते रस्त्याच्या अगदी कडेला आहे. बडाविलिंग मंदिराच्या शेजारीच नृसिंहाचे उग्र रूप दर्शवणारी एक मूर्ती आहे. मला तरी ही मूर्ती लहान मुलांचे एक कार्टून कॅरॅक्टर श्रेक यासारखीच दिसते आहे पण माझ्या मनातले विचार मी अर्थातच बाजूला सारतो. या मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार, पुराणवस्तू खात्याने प्रथम केला होता. परंतु नंतर केलेले नवीन बांधकाम परत पाडून टाकण्यात आले व मंदिर जसे आधी एक भग्न अवशेष या स्वरूपात होते तसेच परत ठेवले गेले आहे. रस्त्याच्या कडेला दोन हातगाडीवाले उभे आहेत. त्याच्यापैकी एकाच्या हातगाडीवर शहाळ्यांचा ढीग दिसतो आहे. कडक उन्हात नारळाचे पाणी पिण्याचा मोह मला होतोच. ते पाणी पिताना शेजारच्या हातगाडीकडे माझे लक्ष जाते. या गाडीवर कोरीव काम केलेल्या दगडाच्या छोट्या मूर्ती विक्रीला आहेत. मात्र हातगाडीवर असल्या तरी या वस्तूंच्या किंमती एखाद्या भव्य शोरूम सारख्याच आहेत हे लक्षात आल्याने मी खरेदीचा नाद सोडून देतो व पुढे जायला निघतो.

बडाविलिंग शिव लिंग

उग्र नृसिंह

हातगाडीवर विक्रीला ठेवलेल्या कोरीव वस्तू

विजयनगरची देवळे, परिसराच्या ज्या भागात एकवटलेली आहेत तो धार्मिक भाग सोडून मी आता मुख्य राजधानीकडे निघालो आहे. राजा व राण्या यांची निवासस्थाने वगैरे सर्व याच भागात आहेत. या भागातल्या रस्त्याने जात असताना प्रथम एक चौकोनी आकाराची बैठी इमारत मला दिसते. इमारतीचे प्रवेशद्वार व बाजूला असलेल्या छोट्या गवाक्षांवरच्या कमानी, इस्लामी पद्धतीच्या आहेत. शेजारच्या पाटीवर या इमारतीचे नाव राणीचे स्नानगृहअसे दिलेले आहे. इमारत बघितल्यावर मात्र हे नाव थोडेसे फसवे आहे हे लक्षात येते. बाहेरून साधीसुधी दिसणारी ही इमारत, राणीचे स्नानगृह नसून राजा व राण्या यांचे एक मोठे आलीशान जलक्रीडा केंद्र असले पाहीजे हे लक्षात येते. चारी बाजूंनी छत असलेला व्हरांडा व मध्यभागी खुले आकाश वर दिसेल असा एक मोठा हौद आहे. त्यातून खालच्या बाजूने पाणी बाहेर वाहून जाण्याची व कडेने असलेल्या तोट्यांमधून आत ताजे पाणी येत राहील याची व्यवस्था दिसते आहे. या पाण्यात सुवासिक पुष्पे व अत्तर टाकण्यात येत असे. बाजूच्या व्हरांड्याच्या छतावर स्त्री सैनिक उभे असत व कोणी आगंतुकपणे आत येण्याचा प्रयत्न केला तर त्याला या इमारतीच्या बाजूला असलेल्या खंदकात फेकून देत असत. इमारती मधल्या जलक्रीडा हौदाच्या बाजूंच्या भिंतींच्यावर आणि बाल्कनींच्यावर अगदी बारीक नक्षीकाम केलेले प्लास्टर दिसते आहे. विजयनगरच्या वैभवकालात या इमारतीला आतून मोठे रेशमी पडदे लावलेले असत व राजा किंवा राण्या आत असल्या तर वर एक निशाण फडकत असे. त्या कालात ही इमारत मोठी सुंदर दिसत असली पाहिजे हे सहज लक्षात येते आहे.

Queen’s Bath

राणीचा बाथ टब

भिंतीवरच्या प्लॅस्टरमधले नक्षीकाम

राणीचे स्नानगृह बघून बाहेर आल्यावर आपल्याला जबरदस्त भूक लागली आहे हे लक्षात येते व जवळच्याच एका खाद्यगृहाकडे मी मोर्चा वळवतो. व्यवस्थित पोटपूजा झाल्यावर तिथे असलेल्या वेताच्या आरामखुर्चीत टेकल्यावर, समोरच्या माळरानावरून दुपारचे कडक ऊन असले तरी गार वारा येतो आहे हे माझ्या लक्षात येते व माझे डोळे कधी मिटतात ते मला कळतच नाही. एक डुलकी काढल्यावर मी फ्रेश होऊन परत एकदा हंपीच्या राज निवासाकडे जाण्यासाठी तयार होतो

जुळ्या बहिणी.

जाताना रस्त्याच्या कडेला दोन विशाल पाषाण एकमेकाची गळाभेट घेत आहेत असे पडलेले दिसत आहेत. या पाषाणांना अक्का टांगी गुंडूकिंवा जुळ्या बहिणी असे नाव दिलेले आहे.

राज निवासाची संरक्षक भिंत

दगडी दरवाजा

थोडे अंतर पुढे गेल्यावर समोर एक पाषाणांची भली भक्कम भिंत दिसते आहे. या भिंतीतील पाषाण एकमेकावर इतके बेमालूम रचलेले आहेत की कोठेही चुन्याच्या दरजा भरलेल्या सुद्धा दिसत नाहीत. ही भिंत तळाजवळ 12 ते 15 फूट रूंद आहे व उंची 36 फुटापर्यंत तरी काही ठिकाणी आहे. उत्खननशास्त्री सांगतात की विजयनगर भोवती अशा 7 संरक्षक भिंती होत्या. राजनिवासाजवळची ही भिंत सर्वात जास्त मजबूत साहजिकपणेच बांधलेली होती. या भिंतीला असलेला मुख्य दरवाजा पाषाणातून कोरलेला आहे व तो सध्या बाजूलाच ठेवलेला दिसतो आहे. हा दरवाजा फक्त हत्ती वापरून बंद करता येत असे. अशी भक्कम संरक्षण व्यवस्था असल्यानेच विजयनगरचे साम्राज्य त्या काळातल्या इस्लामिक आक्रमणांना 200 वर्षे यशस्वी रित्या तोंड देऊ शकले हे निर्विवाद आहे. मुख्य दरवाजामधून मी आत निघालो आहे. समोर दिसणारे दृष्य खूपसे माझ्या परिचयाचे वाटते आहे. एका मोठ्या परिसरात अनेक इमारतींची फक्त दगडी जोती दिसत आहेत. पुण्याच्या शनिवारवाड्यात असेच दृश्य दिसते हे माझ्या एकदम लक्षात येते. मात्र इथे एक फरक आहे या जोत्यांवर कोणत्या इमारती उभ्या होत्या याच्या पाट्या सगळीकडे दिसत आहेत. कृष्णदेव राय राजाचे चंदनाच्या लाकडाचे बांधलेले निवासस्थान, 100 खांबांचा दरबार, हे सगळे जमीनदोस्त झालेले असले तरी जमिनी खाली असलेला खलबतखाना मात्र अजून सुस्थितीत आहे. नियमाला अपवाद म्हणून एक मोठा चौथरा मात्र अजून टिकला आहे. या चौथर्‍याला महानवमी डिब्बाअसे नाव आहे.

महानवमी डिब्बा

महानवमी डिब्ब्यावरील कोरीव काम

महानवमी डिब्बा, राजा कृष्णदेवराय व त्याचे मंत्री

महानवमी डिब्बा पायर्‍यांजवळचे हत्ती

महानवमी डिब्बा घरात उभी असलेली एक स्त्री

स्त्रियांची शिल्पे असलेले एक पॅनेल उजव्या बाजूला एक गर्भवती स्त्री

24 किंवा 25 फूट उंचीचा हा चौथरा, विजयनगरच्या प्रत्येक उत्सवाचा साक्षीदार मानला जातो. या चौथर्‍याची बांधणी पायर्‍या पायर्‍यांची आहे व समोर व दोन्ही बाजूंना असलेल्या पायर्‍यांवर अप्रतिम कोरीव काम केलेल्या हिरव्या ग्रॅनाईट दगडाची पॅनेल्स बसवलेली दिसत आहेत. या पॅनेल्सवर, राजाचा दरबार, विजयनगर मधल्या लोकांचे जीवन, हत्ती, घोडे यांची सुंदर मिनिएचर शिल्पे आहेत. एक बाजू फक्त स्त्री योद्धे किंवा शिकारी यांच्या शिल्पांनीच भरलेली आहे. महानवमी डिब्बा बघायला प्रवेशमूल्य काहीच नाही. परंतु मला मात्र हा चौथरा बघून इथे येण्याचे कष्ट सार्थकी लागल्यासारखे वाटते आहे. महानवमी डिब्बा हा सैनिकी संचलन, खेळ व दसरा महोत्सवासाठी वापरला जात असे. राजा या चौथर्‍यावर बसून या सर्व समारंभांच्यात भाग घेत असे. हा चौथरा चढून जाण्यासाठी समोरच्या बाजूला असलेल्या पायर्‍या बर्‍याच जड वाटल्या मात्र मागील बाजूला असलेल्या उतरण्याच्या पायर्‍या त्या मानाने सोप्या आहेत. या स्पर्धांच्यात एक भोजन भाऊ स्पर्धा पण असे. या स्पर्धेत भाग घेणार्‍यांसाठी बनवलेल्या खास दगडी थाळ्या बघून मात्र मोठी गंमत वाटते आहे.

पायर्‍यांचा तलाव

पाणी खेळवण्यासाठी बनवलेला दगडी चॅनेल

भोजन भाऊंसाठीची दगडी थाळी

राज निवासाच्या भिंतीच्या आत असलेल्या सर्व इमारतींना दगडी यू आकाराच्या चॅनेल्समधून पाणी पुरवले जात होते तसेच मध्यभागी एक पायर्‍या पायर्‍यांचा सुंदर जलाशय आहे.

हे सगळे राज वैभव बघून आता मी एका उत्तरेला तटाच्या जवळ असलेल्या एका मंदिराजवळ पोचलो आहे.या मंदिराचे नाव आहे हजारीराम मंदिर. या नावाचे कारण अगदी सोपे आहे कारण आत रामाच्या हजार मूर्ती आहेत. मंदिरावरच्या शिल्पांकडे नजर टाकताना एक गोष्ट लगेच लक्षात येते आहे की आतापर्यंत मी बघितलेल्या विजयनगरमधल्या सर्व साईट्समधली सर्वोत्कृष्ट शिल्पकला जर कोठे असली तर ती या मंदिरातच आहे. मंदिराच्या बाहेरच्या भिंतीपासून ते रंगमंडप या सर्व ठिकाणी, रामायण व कृष्ण चरित्र यातील प्रसंग व दृष्य़े अतिशय सुंदर रित्या मिनिएचर स्वरूपात कोरलेली आहेत. मंदिरात दिव्यांची रोषणाई करण्यासाठी बनवलेले कोरीव दिवे तर मला अतिशय आवडले आहेत. अनेक देव किंवा योद्धे बसलेली एक ट्रॅम, किंवा लोणी चोरून खाणारा बाळकृष्ण ही शिल्पे असामान्यच आहेत.

हजारीराम मंदिर गोपुर

सिंहाचे शरीर, सुसरीचे तोंड व सशाचे कान असलेला एक काल्पनिक प्राणी

युद्धप्रसंग

लव, कुश आणि श्रीराम भेट

दगडाला बांधून ठेवलेला रांगता बाळकृष्ण

जनक राजासमोर रामाने केलेला शिवधनुष्यभंग

माखनचोर कृष्ण

शूर्पणखा वध

कालियामर्दन

देवांसाठीची ट्रॅम

हजारीराम मंदिरातील भित्तीशिल्पे

A Lamp Holder

सुवर्णमृग किंवा मरिच राक्षसाचा वध


मी घड्याळाकडे बघतो.संध्याकाळचे 5 वाजायला आले आहेत. म्हणजेच मी विजयनगरमधे कडक उन्हात गेले 5ते 6 तास वणवण फिरतो आहे. परंतु जे बघायला मिळाले आहे ते सहसा कोठे मिळणे शक्यच नाही. त्यामुळे शरिराला आलेला शीण असा फारसा जाणवत नाहीये. एक बदल म्हणून आजची संध्याकाळ तुंगभद्रा नदीच्या धरणाशेजारी असलेल्या बागेत घालवायची मी ठरवतो. पण तिथे गेल्यावर धरणाकडे जाणारी बस सध्या बंद आहे असे कळते व नाईलाज म्हणून तो उभा चढ चढण्यास सुरवात करतो. धरण बघून परत खाली येणे क्रमप्राप्तच आहे. खालच्या बागेत म्हैसूर जवळच्या वृंदावन बागेची जवळपास प्रतिकृतीच केलेली आहे. तशीच रंगीत कारंजी आहेत. एक संगीताच्या तालावर नाचणारे कारंजे आहे. डिअर पार्क पण आहे. जे आहे ते मोठे सुरेख आहे व मनाला खूपच आल्हादकारक वाटते आहे यात शंकाच नाही.

तुंगभद्रा धरणाजवळच्या बागेतील कारंजी


रात्री झोपताना आपण आज केवढे अंतर चाललो आहोत याची प्रचिती पाय देतच आहेत. मात्र उद्या विजयनगरचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे विठ्ठल मंदिरबघायला सकाळी जायचे आहे याची उत्सुकता मनात आहेच.

6 फेब्रुवारी 2011

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

1 thoughts on “दख्खनच्या पठारावर -3

  1. lai bhari!! shabda nahit dusre…vijaynagar rocks!!

    Posted by Nikhil | फेब्रुवारी 7, 2011, 2:47 pm

यावर आपले मत नोंदवा

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 396 other subscribers
MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात