.
Travel-पर्यटन

दख्खनच्या पठारावर -2


हंपीमधले सासिवेकालु गणेश मंदिर एका टेकडीच्या पायथ्याशी आहे. या टेकडीचे नाव आहे हेमकूट टेकडी. ही टेकडी तशी छोटेखानीच आहे परंतु या मंदिराच्या बाजूने चढण्याचा प्रयत्न केला तर रस्ता एकदम चढा आहे. त्यामुळे बहुतेक लोक जरा लांबवर असलेला रस्ता पकडतात. सकाळचे दहा, साडेदहाच वाजलेले असले तरी ऊन मात्र चांगलेच जाणवते आहे त्यामुळे मी पण हा लांबचाच रस्ता पकडतो. थोड्या अंतरावर एक प्रवेश वास्तू दिसते आहे. आता या वास्तूचे जोते, दगडी खांब व दगडी स्लॅब्सचे छप्पर फक्त उरले आहे.

कडलेकालु गंणेश मंदिराची प्रवेश वास्तू, डावीकडील मार्ग राजासाठी, उजवीकडचा वरिष्ठ पदाधिकार्‍यांसाठी व मधला जनतेसाठी

या प्रवेश वास्तूला शेजारी शेजारीच असलेली तीन प्रवेशद्वारे दिसतात. ही तीन द्वारे असण्याचे कारण मोठे गमतीदार आहे. राजासाठी एक प्रवेशद्वार, मोठे सेनापती व अधिकारी यांच्यासाठी दुसरे व जनतेसाठी तिसरे द्वार आहे. मात्र या वास्तू मधून पलीकडे गेले की पुढे रस्ता एकच आहे. क्लास पद्धत कशी आपल्या रक्ता मांसात भिनलेली आहे त्याचे हे एक रोचक उदाहरण आहे असे मला वाटते. मी या रस्त्याने आणखी थोडा पुढे जातो. येथे आणखी एक गणेश मंदिर दिसते आहे. सासिवेकालु गणेशापेक्षा हे मंदिर थोडे निराळे आहे. या मंदिरात दोन भाग आहेत. रंग मंडप व गाभारा. रंग मंडपाच्या छताला आधार देण्यासाठी जे खांब उभारलेले आहेत त्या सगळ्यावर शिल्पे कोरलेली आहेत. प्रथम ही शिल्पे जरा क्रूड आहेत असे मला वाटते पण ती तशी का दिसत आहेत याचेही कारणही लक्षात येते. हे सर्व खांब ग्रॅनाईट या दगडा पासून बनवलेले आहेत. हा दगड अतिशय कठिण असल्याने यावर शिल्प कला आणि मुख्यत्वे भिक्तिशिल्पे कोरणे महाकर्मकठीण असले पाहिजे. त्यामुळेच ही शिल्पे अशी दिसत आहेत. जरा बारकाईने बघितल्यावर या शिल्पांचे वेगळेपण लगेच लक्षात येते. अंगाभोवती शेपटी गुंडाळून नमस्कार करणारा हनुमान, शिवलिंग व शिवमूर्ती, चवरी ढाळणारा सेवक, एक धनुर्धर शिकारी स्त्री आणि माकडाचे मुख असलेला सिंह या सारखी अगदीच अनकॉमन शिल्पे येथे दिसत आहेत.

खांबावरील शिल्प, चवरी ढाळणारा सेवक

शिवमूर्ती

शिवलिंग

मर्कटमुखी सिंह

कडालेकालु गणेश, सोंड व पोटाचा भाग तुटला किंवा तोडला आहे.


गाभार्‍यातील गणेश मूर्ती प्रचंड मोठी आहे. उंची निदान 15 फूट तरी असावी. गणपतीच्या पोटाचा व सोंडेचा भाग मात्र तुटलेला आहे. या मूर्तीचे पोट एखादा चणा किंवा फुटाण्यासारखे दिसत होते व म्हणून या मूर्तीला कडालेकालु गणेश (Kadalekalu Ganesha) असे नाव मिळालेले आहे. या कडालेकालु गणेश मंदिराच्या सभामंडपात उभे राहिले की लांबवरचा देखावा मोठा छान दिसतो आहे. समोर हंपीचा बाजार, डावीकडे हेमकूट टेकडी, त्याला लागून दिसणारे विरूपाक्ष मंदिराचे गोपुर व लांबवर दिसणारे व हंपीचा ट्रेडमार्क असलेले रॉकी माऊंटन्स किंवा दगडधोंड्यांचे पर्वत, एकूणच चित्र मोठे मस्त आहे.

हेमकूट टेकडी मंदिरे प्रवेश वास्तू

कडालेकालु गणेश मंदिरातून बाहेर पडून थोडा चढणीचा रस्ता चढून पुढे गेले की समोर एक प्रवेश वास्तू दिसते. या वास्तूवर गोपुर मात्र नाही किंवा ते ढासळलेले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मात्र ही वास्तू अगदी ग्रीक किंवा रोमन धाटणीची वाटते आहे. यावर असलेले कलशाचे कोरलेले शिल्प सुद्धा काही निराळेच आहे. या प्रकारचे शिल्प नंतर मला हंपीत बर्‍याच ठिकाणी बघायला मिळाले व हे काहीतरी शुभ चिन्ह असले पाहिजे हे ध्यानात आले.

राष्ट्रकूट कालातील हेमकूट टेकडीवरची मंदिरे

हेमकूट टेकडी मंदिरे, डाव्या बाजूस होयसला, मधे व राष्ट्रकूट व उजव्या बाजूस चालुक्य कालात बांधलेली आहेत.

हेमकूट टेकडीवरून दिसणारा पश्चिमेचा देखावा सासिवेकालु गणेश मंदिर व त्याच्या पलीकडे कृष्ण मंदिराचे तटबंदी दिसते आहे,

हेमकूट टेकडीवरून दिसणारा पूर्वेचा देखावा, विरूपाक्ष मंदिराचे गोपुर दिसते आहे.


हेमकूट गिरी चा अर्थ सुवर्ण पर्वत असा होतो. हेम या संस्कृत शब्दावरून हेमकूट हा शब्द आला आहे. याबाबत शिव व पंपा यांच्या विवाहाच्या वेळी या टेकडीवर सुवर्ण वृष्टी झाली अशी आख्यायिकाही प्रचलित आहे. प्रत्यक्षात मात्र ही सबंध टेकडी ग्रॅनाईट खडकांनी आच्छादलेली दिसते. टेकडी वर अनेक देवळे दिसतात. या सर्व देवळांचे कळस निरनिराळ्या घाटणीचे आहेत. पायर्‍या पायर्‍यांचे राष्ट्रकूट कालातील कळसही येथे दिसले. प्रवेश वास्तूवर गोपुर का नाही? या कोड्याचेही बहुदा हेच उत्तर असावे. कारण या प्रकारच्या प्रवेश वास्तू सर्व राष्ट्रकूट स्थापत्यात(उदा. वेरूळची लेणी) दिसतात. अर्थातच ही सर्व देवळे विजयनगर साम्राज्याच्या बर्‍याच पूर्व कालातील असली पाहिजेत हे उघड आहे. मी टेकडी चढून माथ्यावर जातो. पलीकडच्या बाजूला सूर्यास्त चांगला दिसतो असे म्हणतात. मला मात्र स्पष्टपणे सासिवेकालु गणेश मंदिर व त्याच्या पलीकडे असलेले कृष्ण मंदिर हेच दिसत आहेत. माथ्यावर एक दुमजली वास्तू दिसते. यात्रेकरूंच्या निवासासाठी ही इमारत होती असे सांगितले जाते. हेमकूट टेकडीच्या सर्व बाजूंना एक तटबंदी होती. त्याचे अवशेष अजूनही दिसतात. टेकडी खाली उतरताना मधेच एका खडकावर कोणीतरी हौशी कलाकाराने रामायणातील प्रसंग कोरलेले एक शिल्प आहे. तसेच एका मंदिरासमोर उभारलेला विजय स्तंभही दिसतो आहे. माथ्यावर असलेल्या एका छोट्या मंदिराशेजारचा पांढरा चाफा इतका छान फुलला आहे की फोटो घेण्याचा मोह मला आवरत नाही.

हेमकूट टेकडीवरचा दुमजली यात्री निवास

पाषाणात कोरलेले शिवलिंग

राष्ट्रकूट कालातील मंदिरांच्या कळसावरचे कोरीव काम

हेमकूट टेकडीवरचा विजयस्तंभ

हेमकूट टेकडीवरची रॉक कार्व्हिंग्ज

हेमकूट टेकडीवरचा पांढरा चाफा किंवा फ्रॅन्जिपनी वृक्ष


हेमकूट टेकडीवरून पूर्वेच्या दिशेला बघितले की एक भव्य गोपुर दिसते हे गोपुर विरुपाक्ष मंदिराच्या प्रवेशद्वारावरचे आहे. विरूपाक्ष मंदिर हे हंपी मधले एकुलते एक असे मंदिर आहे जेथे अजूनही पूजा अर्चा चालते. मी आता हेमकूट टेकडीवरून खाली उतरून विरूपाक्ष मंदिराच्या प्रवेश गोपुरातून आत आलो आहे. समोर आणखी एक प्रवेश द्वार व गोपुर दिसते आहे. दोन्ही बाजूंना ऐंशी ते शंभर खांबांनी आधार दिलेले दोन भव्य कक्ष दिसत आहेत. सर्व खांब व भिंती यांच्यावर सुरेख कोरीव काम केलेले आहे. मूळ विरुपाक्ष मंदिर सातव्या शतकात बांधलेले असले तरी बाहेरची गोपुरे पंधराव्या शतकात कृष्णदेवराय या हंपीच्या राजाने बांधली. आहेत. मी दुसर्‍या प्रवेश द्वारातून आत जातो. समोर मंदिराची वास्तू व अनेक इतर छोटी मंदिरे दिसत आहेत. मुख्य मंदिराच्या रंगमंडपाच्या छतावर रामायणातील प्रसंग चित्रीत केलेले आहेत तर इतरही शिल्पे आहेत. मात्र एकूणच बांधणीत वैशिष्ट्यपूर्ण असे मला काही वाटत नाही. मंदिराच्या मागच्या बाजूस एका अंधार्‍या खोलीत एक बघण्यासारखी मांडणी आहे. समोरच्या भिंतीला एक बारीक झरोका आहे. या झरोक्यातून येणार्‍या प्रकाशात समोरच्या भिंतीवर प्रवेश गोपुराची उलटी छबी दिसते. पिन होल कॅमेर्‍याचे मूळ तत्व त्या काळात येथल्या कारागीरांना ज्ञात होते याची मला गंमत वाटते आहे.

विरूपाक्ष मंदिराची दोन गोपुरे

विरूपाक्ष मंदिरातील शिल्प

राक्षसांशी लढणारी दुर्गा

100 खांबांचा कक्ष, विरूपाक्ष मंदिर

विरूपाक्ष मंदिर, छतावरची चित्रकला

विरूपाक्ष मंदिर, वाली व सुग्रीव युद्ध

हंपी बाजारातून दिसणारे विरूपाक्ष मंदिर गोपुर

विरुपाक्ष मंदिरातून मी बाहेर पडतो समोरच एक भव्य पथ आहे. या पथाच्या दोन्ही बाजूंना जुन्या काळात व्यापार्‍यांचे कक्ष व दुकाने असत. आता हे सगळे कक्ष मोडकळीस आलेल्या स्थितीत पडले आहेत व त्याच्या पुढच्या बाजूसच पर्यटक व भाविकांसाठी पूजा साहित्य, कपडे वगैरेसारखी दुकाने आहेत. मात्र मालाचा दर्जा मात्र अगदीच सुमार आहे व खरेदी करण्यासारखे काहीच न दिसल्यामुळे मी तेथून लगेच बाहेर पडतो आहे. या भागाला हंपी बाजार असेच अजूनही म्हटले जाते.

3 फेब्रुवारी 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “दख्खनच्या पठारावर -2

 1. mast lihita tumhi..
  tumache javalpaas sarv lekh vaachale aahet..
  lihinyachi shaili mast aahe aani var lihita..
  thanks.
  Ajay

  Posted by ajay | फेब्रुवारी 4, 2011, 5:59 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention दख्खनच्या पठारावर -2 « अक्षरधूळ -- Topsy.com - फेब्रुवारी 4, 2011

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: