.
अनुभव Experiences

आजी-आजोबा दिन


पाच सहा दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. माझी नात हातात एक कागद घेऊन मोठ्या उल्हासाने माझ्याकडे आली. कागद माझ्या नजरेसमोर फडफडवत आम्हाला म्हणजे अर्थातच मला आणि तिच्या आजीला बुधवारी तिच्या शाळेत बोलावले आहे असे तिने मला सांगितले. मी जरा आश्चर्यानेच तो कागद वाचला. खरोखरच बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता आम्हा दोघांना तिच्या शाळेत येण्याचे आग्रहाचे निमंत्रण होते. त्या दिवशी तिच्या शाळेत आजीआजोबा दिनसाजरा केला जाणार होता व आमच्या सारख्या अनेक आजीआजोबांसमोर त्यांच्या शाळेत शिकणार्‍या नातवंडांचे कार्यक्रम सादर होणार होते.

त्यानंतर मागच्या तीन चार दिवसात आम्हाला अनेक सूचना नातीकडून मिळाल्या. बरोबर सव्वानऊ पर्यंतच स्थानापन्न व्हा. येताना निमंत्रण पत्रिका बरोबर आणा. एका पत्रिकेवर दोघांनाच प्रवेश मिळणार आहे वगैरे वगैरे.

मी शाळेत असताना असले दिन वगैरे काही नसतच. आजी-आजोबा तर दूरच राहिले पण शाळेत पालकांना सुद्धा बोलावले जायचे फक्त पोरगे दंगेखोर असले किंवा अभ्यासात फार ढ असले तरच. अशा वेळी पालकांना अभ्यास करून घ्या, शिस्त लावा नाहीतर शाळेतून काढून टाकू.” वगैरे सारखा दम देण्यासाठी फक्त बोलावले जायचे. माझ्या पहिली ते अकरावी या प्रवासात माझे आईवडील फक्त एकदा शाळेत आलेले मला आठवतात. ते सुद्धा मी घरी प्रचंड कटकट केल्याने. आमच्या वेळी एक नवीनच स्कीम शाळा खात्याने सुरू केली होती. आठवी नंतर ज्या मुलांना ऐच्छिक तांत्रिक विषय शालेय अभ्यासक्रमामध्ये घ्यायचे असतील त्यांना तशी मुभा देण्यात आली होती. व या बदलात इतिहास भूगोल व संस्कृत या सारखे विषय सोडून दिले तरी चालणार होते. मला काही ही स्कीम आवडली नाही व मी त्या बद्दल घरी काही सांगितलेच नाही. कसे कोण जाणे? माझ्या आईला या स्कीमचा पत्ता लागला व नंतर अत्यंत अनिच्छेने मी तांत्रिक विषयांच्या तासांसाठी शासकीय तंत्र निकेतन नावाच्या एका शासकीय शाळेत आठवड्याचे काही दिवस जाऊ लागलो. येथपर्यंत सर्व ठीक होते. नंतर माझ्या शाळेच्या प्रमुखांच्या डोक्यात फट आली. मी तसा बर्‍यापैकी विद्यार्थी असल्याने प्रथम पासूनच तुकडीत शिकत असे. आमच्या शाळेने एकदम ठरवले की ज्या विद्यार्थ्यांनी तांत्रिक विषय घेतले आहेत त्यांना तुकडीत घालायचे. माझे सर्व मित्र तुकडीत पण मला मात्र तुकडीत बसावे लागते हे मला सहनच होईना. त्या तुकडीत असलेल्या व प्रत्येक इयत्तेत अनेक वर्षे घालवलेल्या मुलांच्या सहवासात माझे मन काही रमेना. मी आईवडीलांशी खूप कटकट केली व परिणामी ते शाळेत आमच्या मुख्याध्यापकांना भेटायला आले. अर्थात त्या भेटीचा काही उपयोग झाला नाही व अकरावी इयत्ता उत्तीर्ण होईपर्यंत हा माझा वर्गमित्र आहे असे अभिमानाने सांगावे असा कोणी मित्रच मला लाभला नाही. एका एवढ्या छोट्याशा प्रसंगाने माझे पुढचे शालेय आयुष्य पूर्णपणे नासूनच गेले.

आमची शाळा तशी जरा विचित्रच होती. खरे म्हणजे शाळेचे मैदान खूप मोठे होते. एक खुला रंगमंच बांधलेला होता. परंतु दर वर्षी होणार्‍या गॅदरिंगच्या वेळेस सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना काही शाळा बोलावत नसे. ज्या मुलांना बक्षिसे असत त्यांच्या पालकानाच फक्त बोलावणे येई. प्रत्येक इयत्तेत आठ दहा असे बक्षीस मिळवलेले विद्यार्थी असत. म्हणजे जास्तीत जास्त ऐंशी ते शंभर पालकांना बोलावणे केले जाई. बाकीच्या पालकांना आपल्या मुलाची शाळा कशी आहे? तिथे काय सुविधा आहेत? मुलांची कशी प्रगती होते आहे वगैरे एक रिझल्टचे कार्ड सोडले तर बाकी काही कळत नसे.

आज नातीच्या शाळेतल्या आजीआजोबा दिनावरून या जुन्या आठवणी बाहेर आल्या. शाळेशी जे मुलांचे नाते जमलेले असते ते माझे कधी या तुकडी बदलाच्या प्रसंगानंतर जुळलेच नाही. शाळा हा विषय माझ्या दृष्टीने नेहमीच एक अप्रिय व न बोलण्यासारखा त्याज्य विषय राहिला. .माझ्या तुकडीतील बहुतेक वर्गमित्रांनी अकरावी नंतर शाळाच सोडून दिली व पुढे आयुष्यात त्यांच्यापैकी फारसे कोणी कधीच भेटले नाहीत. मुलांची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी शाळा व पालक यांच्यात संपर्क असणे किती आवश्यक आहे याबद्दल आपण नेहमी ऐकत असतो. पण आमची शाळा या सगळ्यांना बहुदा अपवाद असावी.

आज सकाळी शाळेत जाताना नात सांगायला आली की कार्यक्रमाला नक्की या म्हणून. तिला सहज विचारले की एवढे मला बोलावते आहेस तू काही करणार आहेस का कार्यक्रमात? तिचे उत्तर मला अगदीच अनपेक्षित होते. तिच्या म्हणण्याप्रमाणे, शाळेतील प्रत्येक विद्यार्थी, स्टेजवरच्या कोणत्या न कोणत्या कार्यक्रमात भाग हा घेणारच होता. मला परत पूर्वीची आमच्या शाळेची आठवण झाली. त्या वेळी काही विशिष्ट विद्यार्थ्यांनाच (त्यांच्या अंगात असलेल्या कलागुणांमुळे) अशा कार्यक्रमात घेत असत. कार्यक्रम कशाला? खेळांच्यातही तोच प्रकार असे. शाळेतील सर्व मुलांच्या अंगात काही कला किंवा खेळातील अंगभूत प्राविण्य नसते. अशा मुलांना जर शाळेने संधीच प्राप्त करून दिली नाही तर या गुणांचा विकास तरी कसा होणार? पण मुलांचा सर्वांगीण विकास वगैरे कल्पना तेंव्हा नसाव्यातच. मला लहानपणापासून वक्तृत्वाची कला थोडीफार अवगत होती. आंतरशालेय स्पर्धांत मला शाळा पाठवत असे कारण मला ही कला आधीपासूनच अवगत होती. मी खेळांच्यात मात्र मागे होतो. त्यामुळे शाळेने खेळांच्यातला माझा भाग कसा जास्त होईल हे खरे म्हणजे बघणे आवश्यक होते. पण तसे काही झाले नाही व मी खेळांच्यात नेहमीच मागे राहिलो.

मी नातीच्या शाळेत पोचलो व तेथील सगळे वातावरण बघून खुश झालो. आलेल्या पाहुण्या आजीआजोबांना कोठे जायचे वगैरे सर्व माहिती थोड्या वरच्या इयत्तेतील मुले मुली देत होती. सगळीकडे आजीआजोबांच्या स्वागताचे फलक झळकत होते. मुलांना आजीआजोबांचे महत्व किती वाटते हे सांगणारे फलक बघून मला माझा कंठ थोडासा दाटून आल्यासारखे वाटले हे नक्की. बाहेर पादत्राणे काढून ठेवून शिस्तीने सर्व आजीआजोबा हॉलमधे येऊन बसले. दोन अडीच तास चालणारा एक विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम आमच्या सर्वांच्या नातवंडांनी सादर केला. आजीआजोबांना आधीच नातवंडांचे कौतुक त्यात असा सुखद कार्यक्रम, मग प्रत्येक नाच, नाटुकले किंवा गाणे यानंतर कडाडून टाळ्या पडल्या नसत्या तरच नवल होते.

कार्यक्रम संपल्यावर परत एकदा शिस्तीने आजीआजोबा बाहेर पडले. जाताना सर्व आजीआजोबांनी सरबत घेऊनच जायचे आहे अशी घोषणाही आम्ही ऐकली. जिना उतरताना समोर नजर टाकली तर माझी वाट बघत असलेली माझी नात मला दिसली. तिला हात हलवूनच कार्यक्रम मस्त झाल्याचे सांगितले. तिच्या डोळ्यात उतरणारे आनंदाचे भाव बघून माझे भान, क्षणभर तरी का होईना, मी हरपून बसलो. नातवंड म्हणजे दुधावरची साय म्हणतात ते काही उगीच नाही हे मनोमन पटले.

19 जानेवारी 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “आजी-आजोबा दिन

 1. आजी-आजोबा दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या वेळच्या शाळेच्या आठवणी जागवल्या आहेत. त्या आवडल्या. पण आपल्या ‘त्या’ शाळेचे नाव सांगितलेले नाही. ते सांगावे, ही विनंती. सहज कुतूहल म्हणून विचारत आहे.

  मंगेश नाबर

  Posted by Mangesh Nabar | जानेवारी 20, 2011, 10:49 सकाळी
  • मंगेश

   अप्रिय गोष्टी झाकून ठेवलेल्या बर्‍या असतात. माझ्या आयुष्यातील फक्त शाळा हा एक अप्रिय विषय आहे. तो झाकून ठेवलेलाच बरा नाही का? पुढचे कॉलेज किंवा उच्च शिक्षणाची संस्था यांच्याबद्दल माझ्या मनात अतिशय सुखद आठवणींचा खजिना आहे. माझ्या काही आठवणी या लेखात आहेत बघा तुम्हाला आवडतात का?

   Posted by chandrashekhara | जानेवारी 20, 2011, 4:01 pm
 2. शाळा हा विषय म्हणजे आमच्या आठवणींचा खजिना. जिवलग मित्र, आपली तुकडी यांचे जबरदस्त घट्ट नाते असते. आमच्या आईच्या चेहऱ्यावर या दुधावरच्या सायीचा आनंद आम्ही नेहमी अनुभवता असतो. 🙂 छान वाटलं वाचून.

  Posted by आर्य चाणक्य | जानेवारी 20, 2011, 3:26 pm
 3. aaji ajobanche tumchya jivnatil mahatva sangu shakal ka?

  Posted by Ganesh M Sapkal | डिसेंबर 7, 2011, 7:22 pm
  • गणेश सपकाळ –

   तुम्हाला काय म्हणायचे आहे ते नीटसे समजले नाही. माझ्या आजी-आजोबांचे माझ्या आयुष्यातील महत्व या बद्दल तुम्हाला वाचायचे आहे की आजोबा झाल्यानंतर या नात्याचे मला वाटलेले महत्व याबद्दल तुम्हाला वाचायचे आहे?

   Posted by chandrashekhara | डिसेंबर 8, 2011, 8:48 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: