.
Musings-विचार

आम्हाघरी धन शब्दांचीच रत्ने


आमच्या शाळेच्या मुख्य दरवाज्यातून आत शिरले ही एक वर्तुळाकार कक्ष लागत असे. या कक्षात समोरच लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व विष्णूशास्त्री चिपळूणकर या शाला संस्थापकांचे अर्धपुतळे भिंतीच्या कडेला बसवलेले दिसत असत. डाव्या हाताला एक मोठा सूचना फलक असे. या सगळ्यातच कुठेतरी दोन चार सुभाषिते लिहिलेले फलकही अडकवलेले असत. ती सुभाषिते कोणती होती हे आता काही नीटसे आठवत नाही. परंतु क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.” असे शब्द लिहिलेला व छान पॉलिश केलेला एक लाकडी फलक, नोटिस बोर्डाच्या बाजूला लावलेला होता हे मात्र चांगले स्मरते आहे. शाळेत ये जा करताना किंवा सूचना फलकावर दृष्टीक्षेप टाकताना ही क्रियेवीण वाचाळताआम्ही मुले रोज बघत असू. पण या वाक्यातून काही शिकण्यासारखे आहे किंवा बोध घेण्यासारखे आहे असे कधीच वाटले नाही व आताही वाटत नाही.

मागच्या वर्षी पुणेकरांच्या ध्यानी मनी फक्त एकच विषय होता. रस्त्यावरची घाण, पाणी पुरवठ्याची अनियमितता, गर्दी, धूळ सगळेच मागे पडले होते. सर्व नेतेमंडळी मोठ्या हिरिरीने स्वत:ची या विषयावरची मते मांडत होते. नागरिकांच्या चर्चा झडत होत्या. काही विचारू नका!. हा विषय होता अर्थातच पुण्यामधे मेट्रो आणावी का नाही? ती मेट्रो उड्डाण पुलांवरून न्यावी का भूमिगत असावी? तिचे थांबे कुठे असावे? इतके चर्वितचर्वण झाले की सर्व पुणेकरांना वाटू लागले की मेट्रो आता येणार व आपले शहरांतर्गत प्रवासाचे हाल कमी होणार. पुणे महानगरपालिकेने मोठ्या वादविवादानंतर हा प्रकल्प मंजूर केला. या गोष्टीनंतर आता सहा महिन्याहून अधिक काळ लोटला. मेट्रो प्रकल्पाची फाईल नोकरशाहीच्या यंत्रणेने बहुदा गिळून टाकली. आता जर कोणा पुणेकराला मेट्रोबद्दल विचारले तर कसली मेट्रो?” असे उत्तर मिळेल अशी मला खात्री वाटते.

दोन वर्षांपूर्वी या मेट्रो संबंधितच एक विषय पुणेकरांच्या चर्चेसाठी आला होता. तेंव्हा एक रुळाची आगगाडी बसवावी असे काही नगरसेवकांच्या मनात आले. झाले त्यावर चर्चा सुरू. काही म्हणत एक रुळाची गाडी नको ती धोकादायक असते. दुसर्‍यांच्या मते ही एक रुळाची गाडी हा पुण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. चर्चा झाल्या. वृत्तपत्रांना मथळे मिळाले. आता मुंबईमधे ही एक रुळाची मोनोरेल सुरू पण झाली असे ऐकले. पुण्याच्या मोनोरेलची बहुदा फाईलच कधी बनली नसावी. मग ती नोकरशाही यंत्रणेने गिळली असा दोषारोप करणेही शक्य नाही.

मागच्या वर्षीच्या अंदाजपत्रकात पुणे महानगरपालिका या वर्षात काहीतरी पंधरा वीस उड्डाण पुलांचे काम चालू करणार अशा बातमी वाचली. माझ्या घराजवळ असलेल्या नळ स्टॉपचौकाचेही नाव त्यात वाचले. मनाला जरा बरे वाटले की आपल्या घराजवळच्या वाहतुकीत आता जरा थोडी सुधारणा होणार. आता पुढचे म्हणजे या वर्षीचे अंदाजपत्रक सादर झाले तरी मागच्या वर्षभरात कोणत्याच उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन झाल्याचेही ऐकिवात नाही. कदाचित मंडईत नारळांची टंचाई झाल्यामुळे असे झाले असावे. हरकत नाही. काम सुरू झाले नाही तरी हे उड्डाण पूल कसे चांगले? व कसे हानीकारक? या विषयावर चर्चा तरी झाली की नाही? मग झाले.

माझ्या घराजवळ एक प्रशस्त रस्ता आहे कर्वे रस्ता म्हणून. या रस्त्याला बहुदा गिनीज किंवा लिमका बूक ऑफ रेकॉर्ड्स मधे स्थान मिळेल असे वाटते. या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम गेली सहा सात वर्षे तरी सुरू आहे. इतक्या कालात दोन गांवांच्यामधे एखादा एक्सप्रेस हायवे सुद्धा बांधून झाला असता पण आमच्या कर्वे रस्त्याच्या कामाला अडचणीच फार. अजुनही या रस्त्याच्या बाजूचे पदपथ तयार नाहीतच. आणि गंमतीची गोष्ट म्हणजे या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे दुसर्‍या एका चर्चेच्या संबंधाने नुकतेच ऐकले. आमच्या घराजवळच्या भागात विजेचा नेहमीच लपंडाव चालू असतो. परवा विद्युत मंडलाच्या एका अधिकार्‍याने या अडचणीचे खरे कारण सांगितले. तो म्हणला की काय करणार? अहो कर्वे रस्ता खणता येत नाही ना आता! त्या मुळे केबल बदलता येत नाही.” मी त्याला माझ्या अल्प ज्ञानाप्रमाणे विचारून घेतले की कर्वे रस्त्यावर व्हायाडक्ट का काहीतरी बनवले होते ना केबल्स नेण्यासाठी, त्याचे काय झाले? त्या अधिकार्‍याला त्या संबंधात फारशी माहिती असल्याचे किंवा माहिती असल्याचे दर्शविण्याचा त्याचा अनुत्साह, माझ्या निदर्शनास आल्याने आता यापुढे आपल्याला वीज मधून मधूनच मिळणार एवढे मात्र नक्की समजले.

पुणेकरांच्या पुढे सध्या चर्चेसाठी दोन ज्वलंत विषय आलेले आहेत. 27 मार्गांच्यावर BRT किंवा जलद बस सेवा चालू करायची की नाही हा पहिला विषय. या विषयावर अर्थातच नेहमीप्रमाणे दोन तट आहेत. ” ती स्वार गेटकात्रज सेवा आधी नीट करा आणि मग बाकीच्या रस्त्यांकडे वळा.” किंवा रस्ते अरूंद त्यात बसेस साठी स्पेशल लेन म्हणजे अपघाताला निमंत्रणच की!” वगैरे सारख्या चर्चा सुरू झाल्या आहेत आता कुठे पूर्वरंग सुरू झाला आहे. चर्चा संपेस्तोवर वर्ष संपेलच.

दुसरा महत्वाचा विषय म्हणजे अर्थातच दादोजी कोंडदेव. पुणे शहरापुढची सर्वात महत्वाची अडचण, दादोजी कोंडदेवांचा पुतळा हीच तर होती. लाल महालात या 400 वर्षांपूर्वीच्या व्यक्तीचा असलेला पुतळा ही पुण्याची सर्वात मोठी समस्या होती म्हणे! त्याचे आता निराकरण झाल्याने बाकीचे प्रश्न म्हणजे BRT, मेट्रो वगैरे चुटकीसरशे सुटतील या बद्दल माझ्या मनात तरी शंका नाही. या दादोजी व त्याच्या अनुषंगाने आलेल्या संत रामदासांच्या प्रकरणाने बरीच नवीन माहिती मला कळली. दादोजी या व्यक्तीचे आडनाव कुलकर्णी होते हे मला व माझ्यासारख्या अनेक लोकांना नव्याने कळले. महाराष्ट्रात होऊन गेलेल्या मोठ्या सत्पुरुषांपैकी एक, ही संत रामदासांसंबंधीची माझी माहिती बहुदा चुकीची असावी आणि त्यांनी लिहिलेले दासबोध, मनाचे श्लोक वगैरेसारखे ग्रंथ विचारात घेण्याची बहुदा काही जरूरी नसावी आता दिसते आहे. आम्हाला इतके दिवस वाटत होते की शिवाजी महाराजांना त्यांनी लिहिलेले उपदेशपर पत्र म्हणजे मराठी साहित्याचा एक अमोल ठेवा आहे. शिवाजी किंवा रामदासांच्या कालापासून ते आजपर्यंत हयात असलेल्या काही मंडळींनी म्हणे सांगितले आहे की संत रामदास, शिवाजी महाराजांना कधी भेटलेलेच नाहीत. समकालीन नसावेत बहुदा! हे सगळे नूतन संशोधन कोणी व का केले? या मागचे इंगित रामदासांच्या आडनावात आहे. दादोजींचे आड्नाव कुलकर्णी असल्याने ते जसे Persona non grata झाले, तसेच रामदासांचे, ठोसर हे आडनाव बहुदा त्यांचा 400 वर्षांनंतर छळ करणार असे दिसते आहे. असो!

थोडक्यात काय पुणेकरांना चर्चेसाठी विषय असला म्हणजे झाले. रस्त्यांवरची गर्दी दिवसेदिवस वाढते आहे. प्रत्येक चौकात पोलिस सुद्धा वाहतुकीवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. हे सगळे किरकोळ प्रॉब्लेम्स आहेत हो! महत्वाचे काय की कोणत्या तरी विषयावर चर्चा सुरू पाहिजे.

संत तुकारामांच्या (हे तरी नक्की राहणार असे दिसते आहे बरंका!) शब्दात सांगायचे तर पुणेकरांना आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने !” महत्वाची आहेत. बाकी आम्हाला काही गरजच नाही. कारण शेवटी पुणे तिथे काय उणे?

15 जानेवारी 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “आम्हाघरी धन शब्दांचीच रत्ने

 1. kharokhar pune tithe kay une ka sarvach une
  ganitamadhe 2 minus mhanje ek plus hote pan punyat ase hoat nahi punekar maths che rules suddha manat rather jumanat nahit

  Posted by ashok patwardhan | जानेवारी 17, 2011, 12:39 pm
 2. आपण पुण्यातील रस्त्यांच्या दुर्दशेचे आणि पर्यायाने लोकांच्या उदासीन मानसिकतेचे एक प्रकारे दर्शन घडवले. पण हे आमच्या मुंबईतही होत असते. गर्दी आणि घाण हा रस्त्याचा घटक बनलेला आहे. यासाठी आपल्या नागरिकांना काय शिकवावे म्हणजे ते सुधारतील ? नगरपालिका या नगर सुधारणांच्या ऐवजी राजकारणाचे अड्डे झाले आहेत.

  Posted by Mangesh Nabar | जानेवारी 18, 2011, 8:20 सकाळी
  • मंगेश
   मी माझ्या लेखात रस्त्यांची दुर्दशा किंवा आणखी एखाद्या विशिष्ट अडचणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो असे नाही. शहरात सुधारणा होणे अत्यंत गरजेचे असताना सर्वच राजकीय पक्ष फक्त राजकारण साधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. परिणामी फक्त चर्चा होत राहते काम सुरूच होत नाही ही पुण्याची खरी अडचण आहे.

   Posted by chandrashekhara | जानेवारी 18, 2011, 6:07 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention आम्हाघरी धन शब्दांचीच रत्ने « अक्षरधूळ -- Topsy.com - जानेवारी 15, 2011

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: