.
Musings-विचार

टोपणनावे


मराठीमधे ब्लॉग्ज ही संकल्पना आता चांगलीच रुळली आहे. पण सर्वसाधारणपणे ब्लॉग्जवरचे लेखन हे वैयक्तिक लेखन असते. त्या व्यक्तीच्या मनातील विचारांचे ते प्रतिबिंब असते असे म्हणता येते. काही जण तर ब्लॉगला अनुदिनी म्हणतात. अनुदिनी या शब्दाचा अर्थ थोडासा रोजनिशी सारखा आहे. पूर्वी पुष्कळ मंडळी अशा प्रकारचे लेखन करत असत. त्यांच्या या लेखनाला क्रॉनिकल्स (Chronicals) असे म्हणत असत. आंतरजालावरचे ब्लॉग्ज किंवा अनुदिनी ही आधुनिक युगातील क्रॉनिकल्सच आहेत असे म्हटले तरी चालेल.

ब्लॉग्जवरचे लेखन वाचताना एक गोष्ट जाणवते की लेखक त्याच्या ब्लॉग्जवरील मजकूराशी प्रामाणिक असतो. अर्थात काही तथाकथित ब्लॉग लेखक, सुप्रसिद्ध कवी किंवा लेखक यांचे लिखाण आपल्या ब्लॉगवर डकवून आपला ब्लॉग लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण त्यांचे ब्लॉग्ज विचारात न घेता आपण सोडून देऊ. ब्लॉग्जवरचा मजकूर हा त्या ब्लॉगच्या लेखकाच्या मनातले विचार असल्याने व हे विचार माझे आहेत हे ब्लॉग लेखक मान्यच करत असल्याने कदाचित ब्लॉग्जवरचे लेखन, वाचकाला पटो वा न पटो, ते अतिशय प्रामाणिक वाटते यात शंकाच नाही.

या ब्लॉग्ज शिवाय, आंतरजालावर लेखन करण्याची आणखी एक नवीन संधी, फोरम किंवा चर्चास्थळ स्वरूपाच्या संकेतस्थळांकडून, आता मराठीतून लिहिण्याची ज्यांना खुमखुमी येते अशांना, उपलब्ध झालेली आहे. या सं.स्थळावर लिहिण्यासाठी तुम्हाला एक सांकेतिक नाव घ्यावे लागते. हे घेतले की त्या चर्चास्थानावर तुम्ही नवीन विषय चर्चेसाठी ठेवू शकता किंवा तिथे दुसर्‍या कोणी व्यक्तीने उपस्थित केलेल्या विषयाबद्दल मनमोकळेपणाने चर्चा करू शकता. या प्रकारच्या सं.स्थळांवर लेखन करणार्‍या व्यक्ती, या सांकेतिक नावाच्या किंवा टोपण नावाच्या बुरख्याच्या आत दडून आपले लेखन करत असल्याने जरा जास्तच मोकळेपणाने लिहित असतात असे दिसते. काहीतरी अतिशय विवादास्पद विषयावर धागा टाकायचा. त्यावर वाटेल तशी टीका टिपण्णी करावयाची व एकूण चर्चा आपल्या फार विरोधात जाते आहे असे लक्षात आले की गायब व्हायचे हा प्रकार करतानाही काही मंडळी आढळतात. अशा सांकेतिक किंवा टोपण नावाने हैदोस घालणे सभ्यतेला धरून कितपत आहे हेच बघण्याचा मी या लेखात प्रयत्न करतो आहे.

टोपण नावाने लेखन करण्याचा प्रकार काही नवीन नाही. 1930 च्या दशकात मालती बेडेकर (पूर्वाश्रमीच्या बाळूताई खरे) यांनी विभावरी शिरूरकर या टोपण नावाने केलेले लेखन सुप्रसिद्ध होते. काळाच्या बर्‍याच पुढे असणार्‍या व स्त्री जीवनाशी संबंधित अशा प्रश्नांवर त्यांनी केलेले ललित लेखन अतिशय गाजलेले होते. पुढे विभावरी शिरूरकर म्हणजे आपणच हे जेंव्हा त्यांनी प्रसिद्ध केले तेंव्हा टोपणनाव घेण्यातला आपला हेतू स्पष्ट केला होता. मराठी साहित्य, साहित्यिक यांच्यावर विनोदाच्या पांघरूणाखाली घणाघाती प्रहार करणारे ठणठणपाळ बर्‍याच जणांना आठवत असतील. सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांनी टीकाकार या भूमिकेतून लेखन करताना हे टोपण नाव घेतले होते.

मराठी कवींनी टोपणणाव घेण्याची तर मागच्या शतकात बहुदा फॅशनच होती. ग्रेस, कुसुमाग्रज, केशवसुत, बालकवी अशी अनेक उदाहरणे आहेत. आचार्य अत्र्यांसारख्या व्यक्तीलाही झेंडूची फुले हा विडंबनात्मक काव्यसंग्रह प्रसिद्ध करताना, केशवकुमार या टोपणनावाचा आधार घ्यावासा वाटला होता. हे सगळे कवी टोपणनावाने का लेखन करत असत? हे कोडे मला तरी उलगडलेले नाही. आपल्या नावाने लेखन करणारे भा.रा.तांबे, यशवंत किंवा ग.दि.माडगुळकर हे कवी किंवा इंदिरा संत, शांता शेळके, सरिता पत्की यासारख्या कवियित्री होत्याच मग नाटके मात्र शिरवाडकर नावाने लिहावयाची व कविता लिहिताना टोपण नाव घ्यायचे असे त्यांनी किंवा अगदी अलीकडच्या आरती प्रभूंसारख्या कवींनी बाकी लेखन करताना मात्र आपले खरे नाव चिं.व्य.खानोलकर का वापरले आहे ते खरोखरच कळत नाही. कदाचित खर्‍या नावाने कविता लेखन केल्यास आपले हृदय कसे फुलाप्रमाणे कोमल आहे यावर वाचकांचा विश्वास बसणार नाही असे त्यांना वाटत असावे.

ब्लॉग लिहिताना काही ब्लॉगर्स टोपण नावाने लिहितात पण ते बहुदा स्वत:चे नाव जगजाहीर करण्यास त्यांना वाटणार्‍या भिडस्तपणामुळे किंवा आपली पत्यक्ष आयुष्यातली ओळख व लेखक म्हणून एक ओळख या भिन्न असव्यात असे वाटत असल्याने तसे करतात असे मला वाटते. परंतु चर्चा संकेतस्थळावर एक किंवा अनेक टोपण नावांनी लेखन करणार्‍या तथाकथित लेखकांची मात्र मला पुष्कळ वेळा कीव कराविशी वाटते. खू.खू., वेडसर वासंती, पोळलेला पंप्या, किंवा सुंदर्‍या या सम नावे काही मंडळी का घेतात या मागचा हेतू बर्‍यापैकी पारदर्शक असतो असे वाटते. काही जणांना यात आपण मोठा विनोद करतो आहोत असे वाटत असते तर काही जणांना अवघड विषयांवर (लैंगिक संबंध) स्वत:च्या नावाने लेखन करणे किंवा सभ्यतेच्या खालच्या पातळीवर गेलेले लिखाण करणे या साठी हे टोपण नाव हवे असते. काही जणांना स्वत:ची खरी ओळख लपवायची असते. विवादास्पद लेखन करण्यासाठी तर अशी टोपणनावे उपयुक्त ठरतात. एखादा प्रश्न एका नावाने उपस्थित करावयाचा व दुसर्‍या नावाने त्या प्रश्नाच्या आधाराने इतर लेखकांवर टीका करावयाची असाही प्रकार काही जण करताना दिसतात. अशी टोपणनावे धारण केलेल्या व्यक्ती एखाद्या अत्यंत अनावश्यक किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या चर्चा धाग्यावर फालतू प्रतिसाद टाकून सं.स्थळावरील चर्चा हायजॅक करतानाही दिसतात.

परंतु हे सगळे प्रकार सौम्य पीडादायक आहेत असे नवीन काही ब्लॉग वाचल्यावर ध्यानात येते. निखालस खोटे, समाजातील आदरणीय किंवा मान्यताप्राप्त व्यक्तींवर अतिशय खालच्या दर्जाची टीका करणारे आणि जातीवर आधारित समाजकारण व ब्राम्हण विरोध हा हेतू असलेले लेखन प्रसिद्ध करणारे काही ब्लॉग्स अलीकडे दिसू लागले आहेत. असे ब्लॉग्स आपण कशी सत्याची कास धरून आहोत याचे सतत प्रतिपादन करताना दिसतात. एखादी नजर जरी या ब्लॉग्सवर टाकली तरी त्यांचे खरे स्वरूप लगेच ध्यानात येते. आंतरजालावर लिखाण करण्यास कोणतीही सेन्सॉरशिप किंवा नियंत्रण नसते त्याचा ही मंडळी प्रचंड गैरफायदा घेताना दिसतात

काही वेळा या टोपणधारी लेखकांचे लिखाण किंवा फोटो जालावरच्या दुसर्‍या कोणी उचलले तर त्यांना काहीच करता येत नाही कारण त्यांच्या टोपणनामुळे, हा आपला कॉपीराईट आहे असे सांगता येत नाही. मग असहाय्यपणे आपल्या लेखाची किंवा चित्राची चोरी झालेली बघत बसावी लागते. तसेच दुसर्‍या कोणी स्वत:बद्दल अपमानस्पद लिखाण केले तर बहुदा आपलेच भांडे फुटेल म्हणून या मंडळींना गप्पच रहावे लागते.

जालावरील मराठी लेखन अभिजात व सशक्त होण्यासाठी हे टोपणनामधारक लिखाण व ब्लॉग्स यांची संख्या कमी झाली पाहिजे असे मला वाटते. असे झाले नाही तर पीत पत्रकारितेच्या दिशेनेच जालावरील मराठी ब्लॉग्स व चर्चा वाटचाल करू लागतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही.

11 जानेवारी 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

9 thoughts on “टोपणनावे

 1. > आपल्या नावाने लेखन करणारे गिरीश, अनिल हे कवी होतेच
  >—–

  ????

  ‘गिरीश’ आणि ‘अनिल’ ही दोन्ही टोपणनावे आहेत.

  Posted by Anonymous | जानेवारी 11, 2011, 12:17 pm
 2. अतिशय उत्तम लेख. टोपणनाव घेणाऱ्यांच्या मानसिकतेवर अगदी योग्य प्रकाश टाकला आहात. टोपणनावाने लिहिणाऱ्या ९९% लोकांच्या हेतूबद्दल मला तरी शंकाच आहे. निरनिराळ्या मराठी संस्थळांवर अशा खोट्या नावांनी काय काय प्रकार चालतात हे पाहिलं म्हणजे अक्षरशः वेड लागायची पाळी येते !

  >> अगदी अलीकडच्या आरती प्रभूंसारख्या कवींनी बाकी लेखन चिं.व्य.खानोलकर या नावानी का केले ते खरोखरच कळत नाही. <<

  इथे थोडी गफलत झाली आहे. त्यांचं मूळ नाव चिंतामणी त्र्यंबक खानोलकर आणि कविता लिहिण्यासाठी त्यांनी आरती प्रभू हे टोपण नाव घेतलं.

  Posted by हेरंब | जानेवारी 11, 2011, 10:28 pm
 3. चिं.त्र्यं. खानोलकर यांनी आरती प्रभू हे टोपण नाव का घेतले, याची सत्यकथा अशी सांगितली जाते, की खानोलकर यांच्या कविता सत्यकथा मासिक स्वीकारत नव्हते. म्हणून त्यांनी या स्त्रीच्या नावाने कविता पाठवून दिल्या आणि सोबतच्या पत्रात आपण एक विधवा महिला असल्याचा उल्लेख केला. ही कविता प्रसिद्ध झाली आणि नंतर खानोलकर त्या नावाने कविता पाठवू लागले, हा इतिहास आहे.

  Posted by Mangesh Nabar | जानेवारी 15, 2011, 10:40 सकाळी
 4. सध्याच्या जालीयविश्वातील ‘टोपणनाव’ हा एक ज्वलंत विषय झाला आहे असे मानावे लागेल. याला कारण म्हणजे टोपणनावे निवडण्यामागील कोणताही आगापिछा नसलेली कारणमीमांसा आणि ‘आहे सुविधा तर वापरा…’ अशी जी एक बेफिकिर वृत्ती ब्लॉगर्स आणि विविध संस्थळावर लेखन करणार्‍यामध्ये फोफावली आहे ती खरे तर मानसशास्त्रीय दृष्टीकोणातून तपासायला हवी आहे असे आजकाल वाटू लागले आहे.

  मी हे जरूर मान्य करतो की मराठी साहित्यक्षेत्रात लिखाणासाठी अशी टोपणनावे घेण्याची पद्धत होती…पण ती प्रामुख्याने होती ती कवितेच्या प्रांतात. हे मान्य करावे लागेल की, १९५० मागील सर्व साहित्यिकांच्यावर इंग्रजी वाङ्मयाची भुरळ पडली होती. कीटस, शेली, बायरन, वर्डस्वर्थ, मिल्टन, एमिली आदी नावेच ‘जादूमय’ वाटत आणि कवितेची अनुभूती घेण्यापूर्वीच त्या काळातील वाचकाचे त्यातील आशयाविषयी एक ‘अनुकूल’ मत बनत जायचे….ही नावे उच्चारायलाही मोहकच होती, नव्हे आजही आहेत. ‘गर्ट्रुयुड हॉब्सन” वा “पिअ‍ॅज्जीनो गारिबिल्डी” नावाच्या कवयित्रीने वा कविने एक सुन्दर प्रेमकविता लिहिली आहे…वाचा” असे जर तुम्हाला किंवा मला ई-मेलने कुणी कळविले तर त्या नावामुळेच ती कविता न वाचताही प्रतिकुल मत तयार होते….[वास्तविक ही अ‍ॅटिट्यूड चुकीची आहे हे कळते….मात्र मनात ‘तसे’ भाव उमटतात हेही तितकेच खरे…]. यामुळे सांप्रत देशीही अशी ‘सुंदर सुंदर…कोकीळकंठी’ वाटावी अशी नावे घेण्याची टूमच निघाली होती असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. तुम्ही जी उदाहरणे वरील लेखात दिली आहेत ती याच भावनेचे द्योतक आहेत. ‘वि.वि.शिरवाडकरांचे नटसम्राट’ असे वाचताना आपण अडखळणार नाही…पण ‘कुसुमाग्रजांची विशाखा’ असे वाचताना जो नाजूक भाव थरकतो, तो नटसम्राटाच्यावेळी उत्पन्न होत नाही.

  “नारायणराव राजहंस यांनी साकारलेली ‘सिंधु’ अजरामर आहे…” हे वाक्य लिहिल्यावर नजरेसमोर काहीच येणार नाही, पण तिथे ‘बालगंधर्व…” असा बदल केला तर आपण हरखून जातो….थोड्याफार फरकाने अशी नावे गुलाबाच्या ताटव्याप्रमाणे आनंद देतात.

  पण जालीय विश्वातील काही नावे….जी इथे टंकायलादेखील नको वाटतात…वाचल्यावर त्यांचे लिखाण/विचार कितीही चांगले असले तरी त्यावर डोळे फिरविण्याची इच्छा होत नाही. वानगीदाखल वाचलेली काही नावे… ‘फू बाई फू…तुझा देव…लई कडू…गोंधळी..मिशीवाला…बाराबोड्या…पांढरा मैदा….घुमणारा…” इ.इ…..काय साध्य होते या टोपणनावाने? आहे एक फुकटची सोय उपलब्ध…आणि घेतले नाव…हल्लीहल्ली तर थोर नेत्यांचीही बदनामी… ‘गांधीपिल्लू… गांधीवादी…नेताजी.. हिटलर…सुभाषबाबू..” आदी….ही पवित्र नावे टंकायचीही ज्यांची योग्यता नाही ती नावे घेऊन त्यावरून लिखाण करायचे आणि मग ते लिखाण वाचून या नावावरून लेखकाची इतरांनी टिंगलटवाळी करायची…हे प्रकार सर्रास चालू आहेत आजकाल.

  तर आता इथे जबाबदारी आहे ती संस्थळ चालविणार्‍या संपादक मंडळाची…ज्यावेळी एखादी व्यक्ती, स्थळाचे सदस्यत्व घेऊ इच्छिते, त्यावेळी त्याचा ‘डेटा’ ठराविक नमुन्यात ज्यावेळी ऑनलाईन भरला जातो, त्याचवेळी सदस्य घेत असलेले नाव हे अभिरूचीपूर्ण टोपणनाव आहे किंवा नाही….राष्ट्रपुरुष, देवसदृष्य नाम घेऊ नये…हे पाहण्याची एक चाळणी हवी….छाननीच्यावेळीही अशी नावे वगळली जातील ही सूचना त्या नूतन सदस्यास दिली आणि नाव बदलण्यास सांगितले तरी या छचोर वृत्तीला काही प्रमाणात आळा बसेल असे वाटते.

  बाकी एका सुंदर लेखाबद्दल आपले मनःपूर्वक आभार !

  इन्द्रा

  Posted by Indraraj Pawar | फेब्रुवारी 9, 2011, 1:00 pm
  • इंद्रराज

   अतिशय विस्तृत व उत्तम अशा प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुम्ही म्हणता तशी छाननी संकेतस्थळांच्या संपादक मंडळाने आवश्यक होत चालले आहे. यात शंकाच नाही.

   Posted by chandrashekhara | फेब्रुवारी 9, 2011, 2:01 pm
 5. श्री नाबर : ‘सर्वोत्तम रवीन्द्र पिंगे’ पुस्तकात ‘आरती प्रभू’ नांवामागच्या २-३ उपपत्ती दिल्या आहेत. खानोलकर लहर लागेल त्याप्रमाणे त्या नांवामागचा वेगळाच इतिहास सांगत.

  .
  > “नारायणराव राजहंस यांनी साकारलेली ‘सिंधु’ अजरामर आहे…” हे वाक्य लिहिल्यावर नजरेसमोर काहीच येणार नाही, पण तिथे ‘बालगंधर्व…” असा बदल केला तर आपण हरखून जातो
  >——
  श्री इन्द्रराज पवार : तुमच्या वरील विधानाला ‘तुमच्या मनाचा एक खेळ’ या पलीकडे काही आधार नाही, असे माझे मत आहे. ‘शिरवाडकर’ या नांवातच ज़ादू आहे. ‘कुसुमाग्रज’ या टोपणामागे ती पुण्याई आहे. एरवी ‘कुसुमाग्रज’ या नांवात मला विशेष काही वाटत नाही. त्याप्रमाणेच गंधर्वांचा उल्लेख ‘नारायणराव’ असा केला तरी काही फरक पडत नाही.

  – नानिवडेकर

  Posted by Anonymous | फेब्रुवारी 9, 2011, 3:28 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention टोपणनावे « अक्षरधूळ -- Topsy.com - जानेवारी 11, 2011

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: