.
History इतिहास

चिरेबॉन किनार्‍याजवळचा खजिना


चिरेबॉन(Cirebon) हे इंडोनेशिया मधल्या जावा बेटावर असलेले एक मध्यम आकाराचे शहर आहे. सुमारे 3 लाख लोकसंख्या असलेल्या या शहराचे महत्व इतकेच आहे की पूर्वी येथे एका सुलतानाचे राज्य होते. ..1705 मधे हा सुलतान डच वसाहतवाद्यांच्या हाताखालचा मांडलिक बनला व त्याचे स्वतंत्र अस्तित्व संपले. इंडोनेशियाला स्वातंत्र मिळाल्यावर हे शहर इंडोनेशियाचा एक भाग बनले. या शहराचे स्थान मात्र अगदी मोक्याचे आहे. या शहराच्या किनार्‍या जवळून व्यापारी जहाजे सतत ये जा करत असत. प्राचीन कालात मध्य पूर्व, भारत, जावा, सुमात्रा व चीन यांच्या मधल्या आंतर्राष्ट्रीय व्यापाराचे हे शहर एक प्रमुख स्थान होते.


दहा वर्षांपूर्वी या शहराच्या जवळ असलेल्या समुद्रावर मच्छीमारी करणार्‍या काही कोळ्यांना या ठिकाणी एक बुडलेले खूप जुने जहाज आहे असे आढळून आले. त्यांनी ही गोष्ट सरकारी अधिकार्‍यांना सांगितली परंतु पुढे शोध घेण्याची काहीच यंत्रणा इंडोनेशियन सरकारकडे नसल्याने ते काहीच करू शकले नाहीत. या जहाजाची माहिती अशा बुडलेल्या जहाजांचा शोध घेणारा एक पाणबुड्या ल्युक हेमन्स (Luc Heymans) याला समजली. ल्युकची कंपनी Cosmix Underwater Research Ltd. आणि त्यांचे इंडोनेशिया मधले भागीदार Paradigma Putra Sejathera PT, या दोन्ही कंपन्यांनी मिळून इंडोनेशियन सरकारला आपण या बुडलेल्या जहाजाचा शोध घेऊन त्यातील वस्तू बाहेर काढण्याची तयारी दर्शवली. इंडोनेशियन सरकारने त्यांच्याबरोबर एक करार केला. या करारान्वये या जहाजातून जर काही किमती वस्तू मिळाल्या तर त्यापैकी इंडोनेशियाची राष्ट्रीय परंपरा म्हणून ज्या असतील त्या इंडोनेशियन सरकार ठेवून घेईल व बाकीच्या वस्तू विकून त्यातून मिळणारी 50% रक्कम सरकार जमा करून उर्वरित रक्कम ल्युक हेमन्सची कंपनी फायदा म्हणून घेऊ शकेल असे ठरले. या ठिकाणी समुद्रतळाचे बारकाईने सर्वेक्षण करणे व उत्खनन करून सापडलेल्या वस्तू बाहेर काढणे या साठीचे आवश्यक परवाने इंडोनेशियन सरकारने ल्युक हेमन्सच्या कंपन्यांना दिले.


ल्युक हेमन्सने या शोधासाठी आपल्या गुंतवणूकदारांकडून 1 कोटी अमेरिकन डॉलर्स उभे केले व जहाज बुडले होते त्या ठिकाणी शोध घेण्यास सुरवात केली. जहाजाचे अवशेष 40 मीटर लांब व 40 मीटर रूंद एवढ्या आकाराच्या समुद्रतळावर 45 मीटर खोलीवर विखुरलेले होते. ल्युक हेमन्स म्हणतो की काम सुरू केल्यावर जहाज बुडलेल्या जागेवर प्रत्यक्ष जहाजाचा कोणताही अवशेष आम्हाला दिसला नाही. फक्त फुटलेल्या चिनी मातीच्या वस्तूंचा एक पर्वत आम्हाला तिथे आढळून आला.” Daniel Visnikar हा फ्रेंच पाणबुड्या म्हणतो की शोधाच्या दुसर्‍या दिवशी एक फूट उंचीच्या चिनी मातीच्या फुटक्या तुकड्यांखाली मला एक सोन्याची बनवलेली खंजिराची मूठ सापडली.” यानंतर फेब्रुवारी 2004 ते ऑक्टोबर 2005 या कालात लुक हेमन्स व त्याच्या (3 ऑस्ट्रेलियन, 2 ब्रिटिश, 3 फ्रेंच, 3 बेल्जियन व 2 जर्मन पाणबुडे असलेल्या) टीमला विश्वास बसणार नाही एवढ्या संख्येने म्हणजे दोन लाख पन्नास हजार, अतिशय दुर्मिळ अशी दहाव्या शतकातली चिनी मातीची भांडी, रत्ने व इतर बहूमूल्य वस्तू सापडल्या. या साठी या टीमने 22000 ते 24000 बुड्या पाण्याखाली मारल्या. या वस्तू बनवल्या गेल्या तो काल दहाव्या शतकातला असल्याने एक गोष्ट सिद्ध झाली की हे बुडलेले जहाज दहाव्या शतकामधे बुडलेले होते. चीन, जावा, सुमात्रा, मध्य पूर्व व इजिप्त यांच्यामधील व्यापार समुद्र मार्गाने केती प्राचीन कालापासून सुरू होता हे पुरातत्व शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. एक हजार वर्षे हे जहाज त्यातल्या वस्तूंसकट पाण्याखाली असल्याने त्या जहाजाच्या बनावटीत जे लाकूड वापरले गेले होते त्याचा एक कणही आता उरला नव्हता, फक्त जहाजातील चिनी मातीच्या व ब्रॉंन्झ किंवा सोने या सारख्या धातूंच्या बनवलेल्या वस्तूच फक्त आता उरल्या होत्या.


समुद्रातून बाहेर काढलेल्या वस्तूंमध्ये, चीनमधील लियाओ राजघराणे (907- 1125) किंवा Five Dynasties (907-960) या कालातील अनमोल चिनी मातीच्या वस्तू होत्या. या चिनी मातीच्या भांड्यांमधे ड्रॅगन व पक्षांची चित्रे असलेल्या बशा. गुळगुळीत कडा असलेली व कमळाची चित्रे असलेल्या चहादाण्या, हिरवट चकाकी (celadon) असलेल्या बशा, चीनच्या लियाओ राजघराण्याच्या कालखंडातली एक मोठी फुलदाणी, इजिप्तमधले क्वार्ट्झ आणि इराणी काचसामान या वस्तूंचा समावेश होता.याशिवाय सुमारे 11000 मोती, 4000 माणके, 400 गडद लाल रंगाचे सफायर आणि 2200 गार्नेट्स ही रत्ने या ठिकाणी सापडली. ही सर्व अनमोल संपत्ती ल्युक हेमेन्स व त्याचे सहकारी यांनी प्रत्येक वस्तूवर क्रमांक घालून व ती जहाजाच्या कोणत्या भागात सापडली याच्या माहितीसह ठेवली आहे. प्रत्येक आठवड्याला ते या सर्व वस्तूंची छायाचित्रे असलेली डीव्हीडी इंडोनेशियन अधिकार्‍यांना देत आलेले आहेत.


या वस्तू सागरतळावरून बाहेर काढणे हे सर्वात सोपे काम होते असे ल्युक हेमेन्स यांना आता वाटू लागले आहे. त्यांच्या मताने, या कामातला सर्वात कठिण भाग यानंतरच सुरू झाला आहे. समुद्राखाली हे सगळे धन सापडते आहे हे कळल्यावर दुसर्‍याच एका कंपनीचे लोक हे बुडलेले धन बाहेर काढण्यासाठी समुद्रावरील त्या ठिकाणी एकदम अवतीर्ण झाले. त्यांना थांबवून पोलिसांना बोलावून आणण्याचे काम खूपच कठिण गेले. त्याच प्रमाणे सर्व परवाने हातात असून सुद्धा इंडोनेशिअयन नौदलाने हेमेन्स यांच्या बोटीला प्रतिबंध केला व त्यांच्या 2 पाणबुड्यांना अटक करून तुरूंगात टाकले.


हेमेन्स यांच्याशी केलेल्या कराराप्रमाणे या सापडलेल्या वस्तूंचा लिलाव व नंतर निर्यात करता येईल यासाठी आवश्यक असे गुप्त धन संशोधन व निर्यात या संबंधीचे कायदेच इंडोनेशियामधे नाहीत हे इंडोनेशियन सरकारच्या नंतर लक्षात आले. 2005 सालापासून तो आजतागायत, कोर्ट कचेर्‍या व सरकारी नियम तयार करण्यास लागत असलेला उशीर यामुळे या सर्व वस्तू गोदामात पडून राहिलेल्या आहेत.


अखेरीस 2010च्या मध्यास या वस्तूंचा लिलाव जाहीर करण्यात आला. इंडोनेशियन सरकारला या वस्तूंची किंमत निदान 8 कोटी डॉलर्स तरी मिळावी असे वाटते आहे. त्यामुळे या लिलावात भाग घेणार्‍यांसाठी 1.6 कोटी डॉलर्सची सुरक्षा ठेव आवश्यक होती. परंतु लिलावाच्या दिवशी कोणी बोलीदारच आले नाहीत. व लिलावाचा सर्व बेत पूर्ण फसला.


ल्युक हेमेन्स आणि त्यांचे पाठीराखे गुंतवणूकदार हे स्वत:चे पैसे तर गुंतवून बसलेच आहेत. पुढच्या वेळी तरी लिलावाच्या वेळी कुठले तरी आंतर्राष्ट्रीय संग्रहालय किंवा इतर कोणी तरी बोलीदार बोली लावेल हीच त्यांना आता आशा आहे.

9 जानेवारी 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “चिरेबॉन किनार्‍याजवळचा खजिना

 1. baap re!
  btw,
  I must say your blog is AWESOME! it is indeed a welcome diversion from routine blogs – pure information, nothing else. I like blogs like this a lot.

  Posted by Nikhil | जानेवारी 9, 2011, 5:03 pm
 2. माहिती आवडली छान आहे.

  Posted by vaibhav sadakal | जानेवारी 9, 2011, 5:31 pm
 3. Jabardasta!!!

  Posted by सुदर्शन | जानेवारी 10, 2011, 9:06 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: