.
Musings-विचार

आणखी एक संभाजी नगर!


काल दूरचित्रवाणीवर औरंगाबाद या शहराचे नाव संभाजी नगर करावे असा ठराव तिथल्या नगरपालिकेने केल्याचे बघितले व आठ दहा वर्षांपूर्वी पुण्यामधे केल्या गेलेल्या एका अशाच प्रयत्नाची आठवण झाली. पुण्याच्या पश्चिम भागात डेक्कन जिमखाना म्हणून एक क्लब आहे. क्रिकेट, बास्केटबॉल, टेनिस या सारख्या अनेक खेळांचे प्रशिक्षण व स्पर्धा या क्लबमधे नियमित रित्या आयोजित केल्या जातात. हा क्लब तसा जुना व प्रसिद्ध असल्याने या क्लबच्या आजूबाजूच्या भागाला डेक्कन जिमखाना असेच नाव गेल्या कित्येक दशकांपासून किंवा कदाचित शतकाहून अधिक कालापासून रूढ झालेले आहे. आठ दहा वर्षांपूर्वी कोणत्या तरी राजकारणी व्यक्तीच्या डोक्यात अशी भन्नाट कल्पना आली की हे आंग्लाळलेले नाव बदलून या भागाला संभाजी नगर असे नाव द्यावे. लगेच चक्रे फिरली व एक दिवस सकाळी या महोदयांच्या हस्ते एक पाटी एका कोपर्‍यात बसवण्यात आली व शहराचा डेक्कन जिमखाना हा भाग संभाजी नगर बनला.

या पुढे काय झाले ते मोठे रोचक आहे. या भागात राहणार्‍या सर्व नागरिकांनी हे नवे नाव मान्य करण्याचे पूर्णपणे नाकारले व ते वापरात कधी आलेच नाही. रिक्षावाल्याला डेक्कनवर घेअसेच सांगितले जाते. “संभाजीनगरला घेअसे सांगितले तर त्या रिक्षावाल्याला बहुदा समजणारच नाही. लोकांनीच नाव मान्य करण्याचे नाकारल्याने म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे रेकॉर्ड आता या भागाला काय म्हणते ते मला माहीत नाही. पण या भागात राहणारी कोणीच व्यक्ती मी पुण्यातल्या संभाजीनगर मधे राहतो असे सांगताना मी तरी ऐकलेली नाही. आता औरंगाबादचे संभाजीनगर झाले म्हणजे कोणाला संभाजी नगरला जायचे असले तर आधी हा प्रश्न विचारावा लागेल की पुण्यातल्या संभाजी नगरला जायचे आहे की पुण्याबाहेरच्या.

नावे कशासाठी बदलायची? हे मला कधीही न सुटलेले एक कोडे आहे. मुंबईला फोर्ट भागात फ्लोरा फाऊंटनम्हणून एक प्रसिद्ध चौक आहे. 1960 च्या दशकात त्याचे नाव हुतात्मा चौक असे करण्यात आले. पण जर या भागात ऑफिस असलेल्या कोणाला विचारले की तुमचे ऑफिस कुठे आहे हो?” तर हमखास उत्तर येते फाऊंटनजवळ ” . कोणीच माझे ऑफिस हुतात्मा कौकाजवळ आहे म्हणून सांगणार नाही हे नक्की. मुंबईला शिवाजी पार्क जवळून जाणारा रस्ता कॅडेल रोड म्हणून प्रसिद्ध होता. या रस्त्याचे नाव पुढे पेडर रोड असे होते. मुंबई नगरपालिकेने असेच कधीतरी या रस्त्यांची नावे बदलून नवी नावे ठेवली. पण हे रस्ते ओळखले जातात अजून जुन्या नावांनी. मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले या मागची भावना मी समजू शकतो. पण मुंबईचे मुख्य रेल्वे स्टेशन जे व्हीटी या नावाने सुपरिचित आहे, त्याचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस आहे म्हणून ते बदलून त्याला छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणण्याने काय साधते हे कळणे कठीण आहे.

नावे बदलणारी मंडळी मोठ्या आवेशाने सांगत असतात की आम्हाला गुलामगिरीच्या खुणा पुसून टाकायच्या आहेत. पण औरंगाबादचे नाव बदलल्यामुळे औरंगजेबाने या शहराच्या जवळच आपल्या आयुष्याचा अखेरीचा काळ मराठ्यांचा निर्णायक पराभव न करता आल्यामुळे हाय हाय करत घालवला होता हा इतिहास बदलणे शक्य नाही. जर इतिहास हे सांगत असला तर या शहराचे औरंगजेबाने ठेवलेले नाव बदलून तो बदलला जाणार थोडाच आहे? आणि औरंगाबाद हे नाव बदलले तरी नव्या दिल्लीतल्या एका प्रमुख रस्त्याचे नाव औरंगजेब रस्ता आहे व ते नाव या मंडळींना थोडेच बदलता येणार आहे.

शहराचा विकास होत असताना नवे रस्ते बांधले जातात. नवीन चौक निर्माण होतात त्याला नवीन नावे दिली तर त्या मागची भूमिका समजू शकते. परंतु जो रस्ता एका विशिष्ट नावाने सर्वांना परिचित आहे ते नाव केवळ मुघल आहे किंवा आंग्लाळलेले आहे म्हणून बदलायचे या मागची तर्क संगती मला तरी कधीच समजलेली नाही. अशी नावे बदलल्याने फक्त गोंधळ निर्माण होतो, बाकी काही नाही.

या बाबतीत सिंगापूरचे उदाहरण मला आवडते. पूर्वी हे शहर एक ब्रिटिश कॉलनी होते. यातल्या जुन्या काही रस्त्यांची नावे इंग्रजी आहेत तर काही मलै. आता सिंगापूर मधे बहुसंख्य चिनी वंशाचे लोक रहातात. परंतु कोणत्याही रस्त्याचे नाव बदलून मिस्टर. ली क्वान यू किंवा त्यांच्यासारख्या दुसर्‍या कोणी महत्वाच्या नेत्याचे नाव त्या रस्त्याला ठेवले गेल्याचे मला तरी माहीत नाही. उलट आपल्या शहरातल्या रस्त्यांची जुनी नावे ही एक शहराची परंपरा आहे व ती जपून ठेवली पाहिजे अशीच भावना तिथे दिसते.

संभाजी नगरला पाहण्यासारखे काय आहे? असा प्रश्न विचारला तर प्रेक्षणीय स्थळांची जी यादी सांगितली जाईल त्यात बिबीका मकबरा पूर्वीसारखाच प्रामुख्याने असणार आहे. तो औरंगजेबाने बांधला हा इतिहास चालू शकतो. फक्त त्याच औरंगजेबाने ठेवलेले औरंगाबाद चालू शकत नाही या मागचे लॉजिक समजणे अवघड आहे.

अलेक्झांडर हा जग जिंकायला निघालेला योद्धा, जिंकलेल्या प्रत्येक देशात एका तरी शहराला अलेक्झांड्रिया म्हणून नवीन नाव देत असे. या अशा नवीन नामाकरण झालेल्या अनेक अलेक्झांड्रियापैकी फक्त इजिप्तमधले अलेक्झांड्रिया कालौघात टिकून राहिले आहे बाकीच्या शहरांच्यापैकी जी अजून अस्तित्वात आहेत ती दुसर्‍याच नावाने परिचित आहेत.

नाव बदलल्याने गोंधळ निर्मिती शिवाय काय निर्माण होते ते मला तरी कळत नाही. जी कोणी मंडळी हिरिरीने या नामांतरात भाग घेत असतात तेच कदाचित खुलासा करू शकतील.

5 जानेवारी 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “आणखी एक संभाजी नगर!

 1. काका ,
  शनिवारवाडा हि जरी पुण्याच्या अभिमानाची गोष्ट असली तरी बिविका मकबरा हि औरंगाबाद्कारांच्या अभिमानाची गोष्ट नाही .औरंगजेबाने हालहाल करून ज्या संभाजी राजांना मारले त्याच औरंग्याच्या वंशज म्हनाविनार्यानी हिंदुंवर औरंगाबादेत आतोनात अत्याचार केले .त्यामुळे मागचे संभाजीनगर हे नाव जास्त योग्य वाटते .

  Posted by pratal | जानेवारी 5, 2011, 8:36 pm
  • Pratal
   एकदम मान्य की बिबीका मकबरा ही औरंगाबादकरांचा अभिमानाचा विषय नाही. शनिवारवाड्यावर 1817 मधे युनियन जॅक फडकला हे पुणेकरांनाही अतिशय लाजिरवाणे वाटते. पण हा सगळा इतिहास आहे आणि तो आपण बदलू शकत नाही. औरंगाबाद म्हणा किंवा संभाजीनगर म्हणा कटू इतिहास तोच रहाणार आहे. नावे बदलून काय साध्य होणार आहे? इतिहास लक्षात ठेवणे म्हणूनच गरजेचे असते म्हणजे त्याच चुका आपण परत करत नाही. म्हणूनच इतिहासात सत्य सांगणे गरजेचे असते ते कितीही अप्रिय असले तरी. औरंगाबादला संभाजीनगर म्हटले तर पुण्याच्या डेक्कन जिमखान्याच्या संभाजीनगर या नामांतराचे काय करायचे? हा प्रश्न आहेच.

   Posted by chandrashekhara | जानेवारी 5, 2011, 9:07 pm
 2. लेखात व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत आहे. ’प्रिन्स ऑफ वेल्स’ म्युझियमचेही छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय असं नामकरण करण्यात आलं आहे. दक्षिण मुंबईत अनेक रस्त्यांची नावं तिथे वाढणार्‍या झाडांच्या नावाने आहेत. उदा. मणीभवनजवळच्या एका रस्त्यावर अनेक जुनी बहाव्याची/अमलताशाची झाडं आहेत; म्हणून ’लॅबर्नम रोड’ असं रसिकतेनं ठेवलेलं त्याचं नाव महानगरपालिकेतील काही सदस्यांना कुणा इंग्रजाचं नाव वाटल्यामुळे ते बदलायचा बेत होता. सुदैवाने स्थानिकांच्या विरोधाने तो रद्द झाला. तरी फोर्टमधल्या एका जुन्या गल्लीच्या कपाळी ’टॅमरिंड लेन’ हे जुनं नाव जाऊन ’मुदण्णा शेट्टी मार्ग’ असं नवीन नाव आलं आहे.

  Posted by नंदन | जानेवारी 6, 2011, 8:04 सकाळी
 3. > औरंगाबाद हे नाव बदलले तरी नव्या दिल्लीतल्या एका प्रमुख रस्त्याचे नाव औरंगजेब रस्ता आहे व ते नाव या मंडळींना थोडेच बदलता येणार आहे.
  >—-

  दिल्लीतल्या ‘औरंगज़ेब रोड’-चे नाव बदलायला हवे, असे मला नेहमीच वाटत आले आहे. कोणी सांगावे, तसा बदल पुढेमागे करता येईलही. ज़ुनी नावे बदलण्याचा अतिरेक होऊ शकतो, नवी नावे देताना शिवाजी-गांधीजी-अण्णा दुराई-सावरकर-आम्बेडकर यांचा मक्ता घेतल्याचा आव आणणारे आपलेच नाणे पुढे सरकवू पाहतात, या बाबी खर्‍या असल्या तरी आपल्या संस्कृतीशी संबंध असलेली नावे वापरणे ही प्रेरणा नैसर्गिक आहे. इंग्रज़ांनी ‘न्यू अ‍ॅमस्टरडॅम’ बदलून ‘न्यू यॉर्क’ नामकरण केले. कम्युनिस्टांनी सेंट पीटर्सबर्गचे लेनिनग्राड केले, आणि त्यांची हकालपट्टी झाल्यावर ज़ुने नाव परत आणले गेले. तसे बदल आपल्या इथे झाले तरी नवल वाटायला नको.

  > आता औरंगाबादचे संभाजीनगर झाले म्हणजे कोणाला संभाजी नगरला जायचे असले तर आधी हा प्रश्न विचारावा लागेल की पुण्यातल्या संभाजी नगरला जायचे आहे की पुण्याबाहेरच्या.
  >—-

  संदर्भावरून असल्या गोष्टी आपोआप स्पष्ट होतात. कॅनडात लंडन गाव आहे, म्हणून असा किती गोंधळ होतो? दिल्ली-हैद्राबाद तिकीट काढताना तिकीटवाला ‘आंध्रमधलं हैद्राबाद की सिंधमधलं’ असे प्रश्न विचारत नाही. मात्र प्रत्येक बदल हा शिवाजी-संभाजी यांच्याच नावानी केला तर त्याचा अतिरेक नक्कीच होऊ शकतो.

  – नानिवडेकर

  Posted by Anonymous | जानेवारी 11, 2011, 12:15 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: