.
Musings-विचार

जाणार्‍याला जाऊ दे!


हे ब्लॉगपोस्ट लिहित असताना मनाला सारखी जाणीव होते आहे की या वर्षातले हे माझे शेवटचे ब्लॉगपोस्ट आहे. आणखी थोड्या तासांनीच आपण या जुन्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करणार आहोत. ज्याला चिरकालीन श्रेष्ठ इंग्लिश कवी म्हणून संबोधले जाते त्या टेनिसनने या निरोप समारंभाचे वर्णन मोठ्या छान शब्दात केलेले आहे. तो म्हणतो की जाणार्‍या वर्षाला घंटानाद करून निरोप देतानाच. येणार्‍या वर्षाचे स्वागतही घंटानाद करूनच करा. जाणार्‍या वर्षाला जाऊदे कारण आता तो भूतकाल आहे. नवीन वर्षच वर्तमानकाल असल्याने खरे सत्य आहे. सर्व तरूण वर्ग नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बेत आखतो आहे. कोणी क्लब्स मधे एकत्र भेटणार आहेत तर कोणी फार्म हाऊस मधे. काही जण मित्रांच्या सहवासात या वर्षाचे रेंगाळणारे क्षण उपभोगण्यासाठी कोणाच्या तरी घरी जमणार आहेत.

खरे म्हणजे नववर्षाचे स्वागत करायची ही आपली पारंपारिक पद्धत नाही. ( दिवस निराळा असेल पण नववर्षाचा जोष व उत्साह तोच असतो.) आपण नववर्षाला सामोरे जातो ते भल्या पहाटे, सूर्य उगवण्याच्या आधी. पहाटे उठून सुस्नात अवस्थेत ऋग्वेदामधल्या उषाया देवतेचे स्वागत करून नववर्ष साजरे करायचे ही आपली पारंपारिक पद्धत. नववर्षाचे स्वागत करण्याचा क्षण हा वैदिक विचारांप्रमाणे एक पवित्र उत्सव, तो करण्यासाठी पहाटेची मंगल वेळच पाहिजे. मध्यरात्रीच्या अशुभ वेळी जल्लोश करून नववर्षाचे स्वागत करण्याची पद्धत भारतीय नाहीच. तरी सुद्धा आधुनिक भारतीय आधुनिक जगाबरोबर नववर्षाचे स्वागत मध्यरात्री करायला शिकले आहेत व त्याच्यात आनंद मानू लागले आहेत. आनंद व्यक्त करणे हे मुख्य व महत्वाचे आहे. तो कसा व्यक्त करायचा? केंव्हा व्यक्त करायचा? हे प्रश्न खरे म्हणजे गौणच म्हटले पाहिजेत.

आपल्याला नववर्ष एवढे महत्वाचे का वाटते? याचे कारण म्हटले तर अगदी सोपे आहे. एका नवीन निसर्गचक्राची ती सुरुवात आहे. परत एकदा वसंत येणार आहे. ग्रीष्माने धरणी त्रस्त होणार आहे व नंतर जीवनदायी वर्षा परत एकदा बरसणार आहे. त्याबरोबरच निसर्ग दोन्ही करांनी उधळत असलेली संपत्ती परत धनधान्याच्या स्वरूपात आपल्या पदरात येणार आहे. निसर्गाचे ऋण ओळखण्यासाठी, जाणण्यासाठी, नववर्षदिन साजरा करायचा असतो. शेतकर्‍यांसाठी तर हा या निसर्गचक्रातला सर्वात महत्वाचा क्षण आहे.

आपण बाहेरून कितीही सोंग आणले तरी आपण पूर्वी या निसर्गचक्रावर जेवढे अवलंबून होतो तेवढेच आजही आहोत व पुढेही रहाणार आहोत या गोष्टीचे विस्मरण आधुनिकतेचा बुरखा घेतलेल्या मानवाला होत असते. तरीही एखाद्या प्रेमळ आजीआजोबांसारखा, निसर्ग आपल्या सर्व खोड्या पदरात घालत असतो. मात्र फारच झाले तर तो आपल्याला अशी एक चपराक ठेवून देतो की डोळ्यासमोर काजवेच चमकावे.

मागच्या वर्षी अशा बर्‍याच चपराकी आपण खाल्या आहेत. आईसलॅन्ड, सुमात्रा, जावा येथले ज्वालामुखी उद्रेक, पाकिस्तान, चीन व थायलॅन्ड मधले पूर किंवा हे वर्ष संपत आलेले असताना युरोपात पसरलेली कडाक्याची थंडी या सारख्या थपडा निसर्गाने आपल्या श्रीमुखावर ठेवून दिल्याच आहेत. पण तरीही आपण निसर्ग आपल्याला जे सांगू पाहतो आहे त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या जुन्याच खोड्याळ स्वभावाप्रमाणे वागत आहोत.

माझा वैयक्तिक विचार करायचा तर हे जाणारे वर्ष माझासाठी खूप छान होते. कंबोडिया मधल्या अंगकोर वाट मंदिराला दिलेली भेट हा या वर्षामधला माझा सर्वोत्कृष्ट क्षण म्हणता येईल. ते तीन दिवस मी कधीही विसरणे शक्य नाही. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मी सिंगापूरला काही महिने नातवंडांच्या बरोबर केलेली मजा हा असाच दुसरा आनंद काल. त्यांच्या किंवा पुण्यामधल्या नातवंडांच्या बरोबर केलेल्या छोट्या छोट्या सहली माझ्या दृष्टीने जाणार्‍या वर्षाचे सोनेरी क्षणच आहेत. गेली दोन वर्षे माझ्या घरामधे चालू असलेले बांधकाम अखेरीस संपल्यामुळे आता पुढचा काळ तरी शांततेत व्यतीत करता येईल असे वाटते आहे.

हे सगळे असले तरी मागचे वर्ष माझ्या स्मरणात राहील ते माझ्या हातून झालेल्या लेखनामुळे. माझे तिन्ही ब्लॉग्स व इतर काही सं. स्थळे यावर मी भरपूर लेखन करू शकलो. 1962 मधल्या चीन, भारत युद्धाबद्दल मला खूप दिवसांपासून लिहायचे होते ते लिहिता आले. इराण मधल्या पारसा शहरासंबंधी किंवा बोलन पास, काराकोरम पास या संबंधींचे लेख लिहिताना खूप माहिती जमा करता आली व आतिशय मानसिक समाधान मिळाले. एक रुखरुख मात्र जाण्वते आहे. मराठी ब्लॉग्सना मी फारच झुकते माप दिले आहे. निदान पुढच्या वर्षी तरी इंग्रजी लेखन तेवढेच करायला पाहिजे आहे हे नक्की.

वैयक्तिक रित्या बघायचे तर मागच्या वर्षी मी माझ्या एका अगदी जवळच्या मित्राला व एका नातेसंबंधांतील व्यक्तीला गमावले आहे. हा घाव काही वेळा अगदी जिव्हारी लागल्यासारखा वाटतो खरा, पण तुमचे वय वाढत जाते तशी आघात पचवण्याची तुमची शक्तीही वाढत असावी. तुम्ही किती जगता हे महत्वाचे नसतेच मुळी. तुम्ही कसे जगता यालाच खरे तर सर्व महत्व आहे.

परंतु या नववर्षाच्या सायंकाळी आनंदोत्सव न करता हे दुख:द विचार कशासाठी काढायचे. काही तासांसाठी तरी हे सगळे विचार मनातून फेकून देऊन टेनिसनच्या शब्दांतूनच नववर्षाला सामोरे गेले पाहिजे.

Ring out the old, ring in the new,

Ring, happy bells, across the snow;

The year is going, let him go;

Ring out the false, ring in the true.”

 

माझ्या सर्व वाचकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नववर्षात भेटूच परत!

31 डिसेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “जाणार्‍याला जाऊ दे!

 1. प्रिय चंद्रशेखर,
  तुमच्या ब्लॉगने आणि लेखनाने माझ्यासारख्या वाचकांना अनेक आनंदाचे क्षण दिले आहेत. त्याबद्दल धन्यवाद.
  येणारे वर्ष तुम्हाला, तुमच्या आप्तांना आणि सुहृदांना सर्वार्थाने सुखासमाधानाचे जावो, हीच हार्दिक शुभेच्छा.
  धम्मक

  Posted by धम्मकलाडू | डिसेंबर 31, 2010, 8:47 pm
 2. hi,
  it is said that if we do not have memory we are children and you have memory if you have past
  as such we have to have memories of last decade which is just become past

  Posted by ashok patwardhan | जानेवारी 1, 2011, 4:33 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: