.
ताज्या घडामोडी Current Affairs

तोतया


1761 या साली पानिपतच्या युद्धभूमीवर, पेशव्यांच्या मराठी साम्राज्याची फौज व अहमदशहा अबदाली याची फौज यांच्यामधे झालेल्या लढाईत, मराठी सैन्याचा दारूण पराभव झाला होता. या सैन्याचे सेनापती सदाशिवराव भाऊ हे सुद्धा या रणधुमाळीत मृत्युमुखी पडले होते. सदाशिवराव भाऊ हे थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी आप्पा यांचे चिरंजीव. पानिपत मधला मराठी फौजांचा पराभव एवढा भयानक होता की संबंध मराठी साम्राज्य मुळापासून हादरून निघाले होते. या पराभवाच्या परिणामांतून मराठी साम्राज्य परत स्थिरस्थावर करण्याचे बरेचसे श्रेय थोरले माधवराव पेशवे व नाना फडणविस यांना जाते. थोड्याच कालानंतर, थोरले माधवराव पेशवे यांचा अकाली मृत्यू झाला व मराठी साम्राज्याला आणखी एक मोठा धक्का बसला. यानंतर नारायणराव पेशवे यांचा खून वगैरे सारख्या अनेक दुर्दैवी घटना घडल्या. या सर्व अतिशय अस्थिर कालात, मराठी साम्राज्य राखण्याची महत्वाची कामगिरी नाना फडणवीस व इतर काही मुत्सद्दी यांनी पार पाडली. नाना होते तोपर्यंत त्यांनी इंग्रजांची डाळ पुण्यात अजिबात शिजू दिली नाही हे एक ऐतिहासिक सत्य आहे.

परंतु याच नाना फडणविसांना एका मोठ्या विचित्र प्रसंगाला याच कालखंडात तोंड द्यावे लागले होते. सदाशिवराव भाऊ यांचे निधन 20 जानेवारी 1761 मधे कुरूक्षेत्र येथे झाल्याचे व तेथेच त्यांच्यावर अग्निसंस्कार केल्याचे इतिहास नमूद करतो. परंतु सदाशिवराव भाऊ यांची द्वितीय पत्नी पार्वतीबाई यांचा सदाशिवरावभाऊ यांचे निधन झाले यावर कधीच विश्वास बसला नाही. पार्वतीबाई व इतर काही सरदार मंडळींच्या या समजूतीचा फायदा घेऊन पेशव्यांचे राज्य लाटण्याचा प्रयत्न, सदाशिवराव भाऊ यांच्याप्रमाणेच दिसणारी एक व्यक्ती व तिच्या मागचे काही कारस्थानी यांच्या कडून केला गेला होता. ही घटना, तोतयाचे बंड या नावाने प्रसिद्ध आहे. ही तोतया व्यक्ती खुद्द सदाशिवराव भाऊच आहे असे मानणारे बरेच मराठी सरदार या तोतयाला जाऊन मिळाले होते व हे तोतयाचे बंड वाढतच चालले होते. अखेरीस महादजी शिंदे यांनी मोलाची कामगिरी करून या तोतयाला पकडले व त्याची जन्मठेपेच्या शिक्षेवर रवानगी करण्यात आली.

हे कसे घडले याची खूप शहानिशा इतिहासकारांनी केलेली आहे. त्यातले मला वाटलेले एक दोन महत्वाचे मुद्दे म्हणजे त्या काळात छायाचित्रे वगैरे काढण्याची शक्यता नसल्याने, एखाद्या माणसाला ओळखायचे कसे? हे इतर चार चौघे काय सांगतात यावरच अवलंबून असे. महत्वाच्या व्यक्तींची चित्रे काढली जात असत. परंतु त्यावरून तशीच दिसणारी एखादी व्यक्ती खरी तीच आहे की तोतया हे सांगणे शक्य होत नसावे. सदाशिवराव भाऊ यांना जवळून पाहिलेल्या त्यांची पत्नी पार्वतीबाई, यांच्याशिवाय इतर कोणी फारशा व्यक्ती, या तोतयाच्या बंडाच्या वेळी जिवंतच नव्हत्या. पार्वतीबाई या मनोरुग्ण होत्या व त्यांचा जबाब विश्वसनीय नाही असे आढळून आले होते. या सगळ्या परिस्थितीचा फायदा या तोतयाने घेतला होता. नाना फडणविस व महादजी शिंदे या दोघांनी या विचित्र अडचणीतून सवाई माधवराव पेशव्यांची अखेर सुटका केली होती हे सत्य नाकारता येत नाही.

या तोतयाच्या गोष्टीला आता अडीचशेच्या आसपास वर्षे होऊन गेली आहेत. छायाचित्रे व इतर ओळख पटवण्यास उपयुक्त ठरतील अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे. तेंव्हा आजच्या कालात जर असा कोणी तोतया राजकारणात येऊ म्हणेल तर त्याचे पितळ लगेच उघडे पडेल असे म्हणणे नक्कीच वावगे ठरू नये. परंतु 2 आठवड्यांपूर्वी, अशाच एका नव्या तोतयाचे प्रकरण उघडकीस आले आहे. या तोतयाने, ब्रिटनची अतिशय वरिष्ठ दर्जाची समजली जाणारी MI6ही गुप्त हेर संस्था, अमेरिकन व अफगाणिस्तानचे वरिष्ठ अधिकारी, या सर्वांना गेले सहा महिने तरी व्यवस्थितपणे मूर्ख बनवून त्यांच्याकडून बरीच मोठी रक्कम उकळली आहे व आता तो गायब झाला आहे. ब्रिटन, अमेरिका व अफगाणिस्तान या सर्वांनी या तोतयाच्या भरवशावर मोठे मनसुबे आखले होते. ते सर्व मनसुबे तर आता शून्यातच जमा झाल्यासारखे आहेत.

वर निर्देश केल्याप्रमाणे, सदाशिवराव भाऊ यांचा तोतया खरा कशावरून नाही हे सिद्ध करताना चार सहा मंडळी काय सांगतात यावरच सर्व काही अवलंबून होते. त्या काळात त्या व्यक्तीची उंची, बांधा, ठेवण डोळ्यांचा रंग किंवा चेहरा या सारख्या कोणत्याच माहितीची कोठेच अचूक नोंद नसल्याने या पद्धतीची फसवणूक करणे एखाद्या कारस्थानी गटाला सहज शक्य होते. परंतु आज 21व्या शतकात, एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी इतके प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असताना, हा तोतया निर्माण होऊ शकतो व तो जगातील बड्या गुप्त हेर संघटनांचीही पूर्ण फसगत करू शकतो हे मला तरी अतिशय रोचक वाटले आहे.

या वर्षीच्या जानेवारी महिन्यात, लंडनमधे अफगाणिस्तान मधल्या एकूण परिस्थिती बद्दल एक आंतर्राष्ट्रीय कॉन्फरन्स आयोजित केली गेली होती. या सभेमधे अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हमिद करझाई, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिन्टन, ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री आणि संयुक्त राष्ट्रसभेचे मुख्य सचिव यांच्यासारखे बडेबडे नेते उपस्थित होते. या सभेत तशा अनेक गोष्टी चर्चिल्या गेल्या. यापैकी भारताच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला व भारताला अजिबातच पसंत नसलेला एक मुद्दा असा होता की अफगाणिस्तानमधली मूलवादी कट्टर इस्लामिक संघटना तालिबान बरोबर अफगाण सरकारने अधिकृत चर्चा सुरू करावी व शांती प्रस्थापित करण्यासाठी ठोस पावले उचलावी. अशा प्रकारच्या आंतर्राष्ट्रीय सभांमधे या प्रकारचे मुद्दे जेंव्हा उपस्थित केले जातात तेंव्हा त्या दिशेने काहीतरी पावले आधीच उचलली गेलेली असतात. त्यामुळे अशी अपेक्षा करणे स्वाभाविक होते की तालिबान बरोबर चर्चा आधीच सुरू झालेली असणार आहे. या अपेक्षेप्रमाणे, एका तालिबान नेत्याबरोबर चर्चा सुरू झाली होती. मात्र हा नेता किंवा दुसरे या सभेमधे भाग घेत असलेले इतर तालिबानी नेते यांचे नावे कधीच जाहीर केली गेली नाहीत. या गुप्ततेसाठी हे कारण दिले गेले होते की या नेत्याचे नाव समजल्यास त्याच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.

आता बाहेर आलेल्या माहितीप्रमाणे, हा नेता म्हणजे तालिबान संघटनेमधे, संघटना प्रमुख, मुल्ला मोहम्मद उमर, याच्या खालोखाल असलेला एक अतिशय वरिष्ठ तालिबान सेनापती, मुल्ला अख्तर मोहम्मद मन्सूर हा आहे असे मानले जात होते. हा नेता तालिबानच्या पद मालिकेत दोन नंबरच्या स्थानावर असल्याचे ब्रिटिश, अमेरिकन व अफगाणी वरिष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे होते. गेल्या आठ दहा महिन्यात या मन्सूर बरोबर या अधिकार्‍यांनी तीन किंवा चार वेळा चर्चेच्या बैठका घेतल्या होत्या. MI6 च्या अधिकार्‍यांनी या मन्सूरला पाकिस्तान मधल्या क्वेट्टा शहरामधून C130 या सैनिकी विमानाने काबूलला नेले होते. त्याची अफगाणिस्तान चे राष्ट्राध्यक्ष हमिद करझाई यांच्याशी बैठक सुद्धा घडवून आणली होती. तालिबानने चर्चेस तयार व्हावे म्हणून या अधिकार्‍यांनी या मन्सूरला बरीच मोठी रक्कम (एका अंदाजाप्रमाणे 5 लाख पौंड) सुद्धा दिली होती.

मुल्ला अख्तर मोहम्मद मन्सूर

परंतु मुल्ला अख्तर मोहम्मद मन्सूर म्हणून मानली गेलेली ही व्यक्ती प्रत्यक्षात एक तोतया असल्याचे आता उघडकीस आले आहे. शेवटच्या बैठकीच्या वेळी, मुल्ला मन्सूर याला प्रत्यक्ष बघितलेल्या एका व्यक्तीने ही तोतयेगिरी उघडकीस आणली. आता अमेरिकन, ब्रिटिश व अफगाणी अधिकारी आपण मूर्ख बनवलो गेल्याचे मान्य करत आहेत. ही व्यक्ती तोतया आहे हे कशाच्या आधारावर सिद्ध झाले आहे हे मात्र कोणीच सांगण्यास तयार नाही. हा तोतया मन्सूर एक पाकिस्तानी असून क्वेट्टा या शहरात रहाणारा एक संधी साधू आहे असे आता सांगितले जाते आहे.

परंतु एवढी मोठी बनवेगिरी एक व्यक्ती कशी करू शकेल? असा खरा प्रश्न आहे. एका मताप्रमाणे तालिबाननेच या तोतयाला अमेरिकन व ब्रिटिश अधिकार्‍यांना उल्लू बनवण्यासाठी पाठवले असावे असे मानले जात आहे तर दुसर्‍या एका मताप्रमाणे पाकिस्तानी ISI संघटनेने याला चर्चा करण्यासाठी पाठवून नेहमीप्रमाणे अमेरिकन लोकांचा दुहेरी विश्वासघात केला असावा असे मानले जाते आहे. ही व्यक्ती कोणीही असेल पण तालिबान बरोबर चर्चा सुरू करण्याच्या कल्पनेचा मात्र सध्या तरी बोजवारा उडला आहे हे नक्की.

तालिबान बरोबर चर्चा करून त्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याची कल्पना भारताच्या राष्ट्रहिताच्या अतिशय विरूद्ध असल्याचे भारताचे मत आहे व त्यांचा या कल्पनेला प्रथम पासूनच विरोध राहिलेला आहे. त्यामुळे हे तोतया प्रकरण उघड झाल्यावर भारतीय परराष्ट्रखात्यातील अधिकारी बरी ब्याद गेली!” या जाणीवेने नकीच सुखावलेले असणार आहेत.

या फजितवड्याचा दोष दुसर्‍यावर कसा टाकता येईल याच्या मागे ब्रिटिश, अमेरिकन व अफगाणी अधिकारी आहेत. याच्याशिवाय दुसरे काहीच करणे सध्याच्या परिस्थितीत शक्य दिसत नाही.

8 डिसेंबर 2010

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “तोतया

  1. काका पुन्हा एकदा सुंदर लेख
    एकदम हटके विषय निवडलात

    Posted by sagar | डिसेंबर 9, 2010, 1:53 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: