.
अनुभव Experiences

परतीचे वेध


सिंगापूरला आल्याला तीन, साडेतीन महिने होऊन गेले. आता परतीचे वेध लागले आहेत. पुढच्या दोन चार दिवसात परत पुण्याला जायला निघणार. सिंगापूरहून लिहिलेले हे ब्लॉगपोस्ट बहुदा या फेरीतले शेवटचेच. जाण्याची तारीख जवळ येऊ लागली की परतीचे वेध लागतात. गेले काही महिने एकदाही आठवण न आलेली पुण्यातली कामे आता एकदम निकडीची वाटू लागली आहेत. पुण्यातल्या नातवंडाना भेटणार म्हणून जसा आनंद होतो आहे तेवढेच दु:ख इथल्या नातवंडांना सोडून जायचे म्हणून होते आहे. तीन महिन्यापूर्वी परिस्थिती याच्या उलट होती. पण पुनर्भेटीचा आनंद किंवा विरहाचे दु:ख हे थोड्या अलिप्तपणेच स्वीकारावा लागते. मला आता त्याची तशी बरीच सवय झाली आहे.

गेले काही दिवस सिंगापूरची हवाही मोठी विचित्र झाली आहे. रोज दुपारी किंवा संध्याकाळी अक्षरश: बदाबद पाऊस पडतो आहे. आता त्यात असाधारण काय? असे कोणीही विचारेल व ते खरेही आहे कारण सिंगापूरला असा दुपारचा पाऊस नेहमीच पडतो. त्या पावसाचे काही नाही पण त्या नंतर हवा एकदम थंडगार होऊन जाते आहे. रात्री चक्क थंड असते. गेले काही दिवस एसी, पंखा यापैकी काहीही न वापरता मी झोपू शकतो आहे. काल तर मी खिडकी बंद करून झोपलो होतो. आज सकाळी फिरायला गेलो होतो तेंव्हा विश्वास बसणार नाही पण थंडी वाजत होती. पुण्याला अजुन तरी थंडी सुरू झाली नाही म्हणतात. पण आता ती पडेलच काही दिवसात.

मी गेले 9, 10 वर्षे तरी या देशाला नियमितपणे येतो आहे. या वेळेस मला जाणवलेला एक प्रमुख फरक म्हणजे बहुतेक सगळ्या पदार्थांच्या प्रचंड वाढलेल्या किंमती. परवा काही किरकोळ खरेदी करायची म्हणून मुस्ताफा या प्रसिद्ध दुकानात गेलो होतो. जातोच आहेस तर एक तूर डाळीचे पाकिट आण! म्हणून नेहमीप्रमाणे एक काम डोक्यावर बसलेच.मग काय? तूर डाळीचे एक पाकिट आणले. 1 किलोच्या पाकिटाला 3.90 सिंगापूर डॉलर म्हणजे 140 रुपये द्यावे लागले. पुण्याला आता तूर डाळीचा भाव काय आहे? याची कल्पना नाही परंतु हा सिंगापूरमधला दर मला बराच जास्त वाटला. येथे रोजच्या वापरातल्या सर्व गोष्टी अशाच खूप महाग झाल्यासारख्या वाटत आहेत. काही वर्षांपूर्वी अमेरिकेला जाताना आपल्याला पुढचे 6 महिने काय लागेल त्याचा विचार करून मी त्या सर्व वस्तू जाताना घेऊन जात असे. तीच वेळ आता सिंगापूरच्या बाबतीतही येऊ लागली आहे.

सिंगापूरचे अर्थशास्त्र काही निराळेच आहे. या देशाचे स्वत:चे असे काही उत्पादन नाही. मुख्य भर असतो तो दुसर्‍या देशांच्याकडून आयात करून परत तो माल निर्यात करण्याचा. व्यापारावर हा देश श्रीमंत होत असल्याने, स्वत:चे चलन महाग आहे की स्वस्त याला फारसे महत्व उरत नाही. त्यामुळे स्वस्त झालेले अमेरिकन डॉलर्स बाहेरून आपल्या देशात येऊन महागाई वाढू नये म्हणून सिंगापूर सरकारने आपले चलन, जास्त जास्त मजबूत केले आहे. पूर्वी 1.43 सिंगापूर डॉलर म्हणजे 1 अमेरिकन डॉलर असे समीकरण होते ते आता 1.29 सिंगापूर डॉलर म्हणजे 1 अमेरिकन डॉलर असे झाले आहे. सिंगापूर मधल्या मंडळींच्या दृष्टीने कदाचित या चलन दर वाढीचा त्यांच्या आयुष्यावर चांगलाच परिणाम होणार असेल. मी रुपयात विचार करत असल्याने मला मात्र इथल्या पदार्थांच्या किंमती अवाच्या सव्वा वाटत आहेत हे नक्की.सिंगापूरमधली खरेदी हा एक पूर्वी सुखद वाटणारा अनुभव या नवीन दरवाढीमुळे फारसा सुखकारक उरलेलाच नाही.

हा देश एवढा छोटा आहे की जरा बाहेर पडावे असा विचार कोणी केला की परदेश वारी करणे त्या व्यक्तीला आवश्यक ठरते.यामुळे म्हणा किंवा एकूणच पर्यटनाची आवड आहे म्हणा, ट्रॅव्हल एजंट मंडळी येथे खूपच दिसतात. अगदी प्रत्येक उपनगरांमधून ते डाऊनटाऊन पर्यंत, सगळीकडे या मंडळींची कार्यालये दिसतात. कोठेतरी सुट्टी घालवायला जायचे याचे प्लॅनिंग करायला सिंगापूर एकदम आयडियल देश आहे. इथल्या सरकारी पुस्तकालयांच्यात सुद्धा ट्रॅव्हल या विषयावरची विविध आणि मोठा चॉईस असलेली पुस्तके मिळतात. पुढचे प्रवासाचे बेत आखायला मला काही अगदी नवीन अशी पर्यटन स्थाने सापडली आहेत. पुढच्या कालात जमेल तसा या स्थानांना भेट द्यायचा विचार मी नक्की करणार आहे.

खरे तर पुण्याला परतायला मला जरा उशीरच झाला आहे. परंतु नातवंडांच्या शाळांमधून, क्लासेस मधून वर्षातून एकदा त्यांचे खास असे कार्यक्रम होतात, ते मी बघावे अशी त्यांची इच्छा असल्याने ते कार्यक्रम बघण्यासाठी मी थांबलो आहे.

मी हा लेख लिहायला सुरवात केली होती तेंव्हा बाहेर कडक ऊन होते. आता आकाश काळवंडलेले दिसायला लागले आहे. जोराचा वाराही सुटला आहे. म्हणजे परत जोरात पाऊस येणार अशीच चिन्हे दिसू लागली आहेत. येथे कितीही जोरात पाऊस पडला तरी रस्त्यांच्यावर पाणी साठणे वगैरे प्रकार कधीच होत नाहीत. सिंगापूर सरकारने स्टॉर्म वॉटर ड्रेन व स्पिलवे कॅनॉल्स यांची इतकी सुंदर आखणी केली आहे की 15/20 मिनिटात पावसाचे पाणी पूर्ण वाहून जाते. इथल्यासारखा पाऊस जर पुण्यात पडला तर रस्त्याने होड्यांमधून जा ये करावी बहुदा लागेल. माझ्या सकाळच्या फेरफटक्यात काही सिनियर मंडळींशी माझ्या रोज थोड्याफार गप्पा चालू असतात. संबंध आयुष्य सिंगापूरमधे काढलेली ही मंडळी सांगतात की पूर्वी असे नव्हते. पाऊस पडला की भरपूर पाणी रस्त्यांच्यावर, खड्यांच्यात साठायचे बुकिट टिमाह सारख्या भागात तर पूर येत असे. पण आता इतकी परिस्थिती बदलली आहे की हाच भाग आता एक अत्यंत पॉश भाग म्हणून समजला जातो आहे.

मी राहतो त्या भागाजवळ सेम्बावांग या नावाचे एक छोटे बंदर आहे. या बंदराबद्दल फारशी माहिती कोणाला नसते. परवा या बंदराबद्दलची मोठी रोचक माहिती माझ्या वाचनात आली. सिंगापूर ज्या वेळी ब्रिटिश सरकारच्या ताब्यात होते त्या वेळी हे बंदर ब्रिटिश सरकारच्या रॉयल नेव्हीचे दक्षिण मध्य एशिया मधले प्रमुख केंद्र होते. दुसर्‍या महायुद्धात या नौदलाच्या येथे ज्या काही मोहिमा झाल्या त्यांची आखणी आणि कार्यवाही या बंदरावरूनच झाली होती. एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स आणि रिपल्स या दोन नौका इथल्या नौदलाची शक्तीस्थाने म्हणून ओळखली जात असत. 1941मधे या दोन्ही नौका या सेम्बावांग बंदरावरूनच एका अज्ञात मोहिमेवर निघाल्या होत्या. त्या कधीच परत आल्या नाहीत. दुसर्‍या महायुद्धातील एक महत्वाची नौदल लढाई म्हणून गणल्या गेलेल्या एका लढाईत जपानी नौदलाने या दोन्ही नौका बुडवल्या व जपानच्या सिंगापूरवरच्या हल्ल्याचा मार्ग सुकर केला होता. या ठिकाणी या नौकांचे एक स्मारकही म्हणे आहे. या बंदराला लागूनच सेंबावांग पार्क म्हणून एक मोठे छान उद्यान आहे तिथून हे बंदर छान दिसते. पण या बंदराला एवढा मोठा इतिहास आहे याची मला कल्पनाच नव्हती. सिंगापूरला अशा छोट्या छोट्या जागा खूप दिसतात. इथले सरकार या जागांना सिंगापूरची रत्ने म्हणते. एका दृष्टीने ते खरेही आहे.

वायफळ गप्पा खूप झाल्या. आता पुढचे ब्लॉगपोस्ट पुण्यनगरीतून. परत एकदा रोजच्या आयुष्यातल्या वीज, पाणी या नेहमीच्याच समस्यांचा पाठपुरावा सुरू करायचा आहे. गेले काही महिने नाही म्हटले तरी पुण्याला काय चालले आहे? याची कल्पना नाहीच. आता भेटूच परत! पण पुण्यातून.

3 डिसेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “परतीचे वेध

 1. अमेरिकन-ब्रिटिश गुप्तहेरसंस्था खरोखर फसल्या आहेत कि त्यानी फसल्याचा देखावा केला आहे?

  Posted by मनोहर | डिसेंबर 8, 2010, 10:49 pm
  • मनोहर

   लन्डनमधील टाइम्स किंवा न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रातील या संबंधीचे रिपोर्ट्स वाचल्यावर अमेरिकन व ब्रिटिश गुप्त हेर संस्थांनी फसल्याचा देखावा केला असेल असे वाटत नाही.

   Posted by chandrashekhara | डिसेंबर 9, 2010, 9:03 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: