.
People व्यक्ती

कृशांगी


दोन दिवसापूर्वी, सिंगापूरमधल्या जनतेच्या आरोग्याबद्दल, माध्यमांनी प्रसिद्ध केलेले काही आकडे मी वाचले. सिंगापूरमधले 11.3% लोक म्हणे अतिलठ्ठ आहेत व ही अतिशय काळजीची बाब आहे असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. हा आकडा तर इतर देशांच्या मानाने खूपच कमी आहे. अमेरिकेमधे 31% लोक अतिलठ्ठ आहेत. भारतात सुद्धा 17% लोक याच वर्गात मोडतात. या सगळ्या आकड्यांवरून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते आहे की लठ्ठपणा हा आधुनिक जगाचा एक मोठा काळजीचा विषय बनला आहे.

या पार्श्वभूमीवर कमी वजन हा काळजीचा विषय आहे असे सांगितले तर बहुतेक लोक ते हसण्यावारी नेतील. फार तर अर्भकांच्या किंवा लहान मुलांच्या बाबतीत हा एक काळजीचा विषय होऊ शकतो. पण अमेरिकेतील टेक्सास राज्यातल्या ऑस्टिन या गावात राहणार्‍या 21 वर्षाच्या एका तरुणीचे कमी वजन, हा तिच्या डॉक्टरांच्या दृष्टीने एक फारच गंभीर विषय आहे.

या तरुणीचे नाव आहे लिझि व्हेलाक्व्हेझ( Lizzie Velasquez). 5 फूट 2 इंच उंची असलेल्या या तरुणीचे वजन विश्वासच बसणार नाही एवढे कमी म्हणजे फक्त 28 किलो किंवा 62 पौन्ड आहे. हल्ली एखादी व्यक्ती लठ्ठ आहे की नाही ते त्या व्यक्तीचा बॉडी मास इंडेक्स (BMI) किती आहे या वरून ठरवतात. सर्व साधारण व्यक्तींचा हा इंडेक्स 20 ते 25 याच्या दरम्यान असतो. हा इंडेक्स जर 16 च्या खाली असला तर त्या व्यक्तीचे वजन अतिशय कमी असून ती एक गंभीर परिस्थिती आहे असे मानले जाते. लिझिचा BMIफक्त 10.9 एवढाच आहे.


ही कृशांगी लिझि बहुदा जेवत खात नसावीच आणि फक्त नखेच खात असावी असे वाटण्याची शक्यता आहे. पण लिझिचा आहार लठ्ठ मंडळींना पण लाजवेल असा आहे. तिचा रोजचा आहार साधारण असा असतो. ती सकाळी कॉर्न फ्लेक्स व बरिटो खाते. त्यानंतर थोड्या वेळाने फ्राइड चिकन, चिप्स किंवा पिझ्झा खाते. यातल्या कोणत्याही डिशबरोबर तिला खूप सारे वितळलेले चीज लागते. जेवायच्या वेळेपर्यंतच तिने 4000 कॅलरी तरी आहारातून घेतलेल्या असतात. तिचा हा जेवणक्रम दिवसभर चालू राहतो. रात्रीपर्यंत ती निदान 8000 कॅलरींचा तरी आहार घेते. एवढा आहार घेणारी व्यक्ती सुपर जायंट साइझची असली पाहिजे असे वाटणार्‍या मंडळींनी, लिझिला प्रत्यक्ष बघितल्यावर त्यांचा स्वत:च्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. अनेकदा पूर्णपणे अनोळखी मंडळी या अतिशय कृश दिसणार्‍या व डोळ्याला प्रचंड जाड काचेचा चष्मा लावणार्‍या लिझिला बघून तिच्या घरी येतात व तिच्या आईला आपल्या मुलीला ती पुरेसे खायला का देत नाही? अशी विचारणा करताना दिसतात.

लिझिच्या अंगावर शून्य % चरबी आहे. अगदी बॉडी बिल्डर मंडळींच्या अंगावर सुद्धा 6 ते 8% चरबी असतेच. एवढेच नाही तर लिझिच्या अंगावर असलेल्या स्नायूंचे वजनही न्यूनतम आहे. तिच्या अंगावरची कातडी, तिच्या सांगाड्यावर ताणून बसवली आहे की काय असे तिला बघितल्यावर वाटत रहाते. असे असले तरी लिझि काही आजारी किंवा अधु नाही. नेहमीच्या सर्व व्यावहारिक गोष्टी ती करते. जोपर्यंत तिचा आहार व्यवस्थितपणे चालू आहे तोपर्यंत तिच्या तब्येतीला काहीच धोका नाही असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जन्माच्या वेळी लिझिची उंची 16 इंच व वजन फक्त 2 पौन्ड 10 औंस (1.190 क़िलो) एवढेच भरले होते. ती एवढी छोटी होती की ती एखाद्या बुटाच्या खोक्यात पण मावत असे. डॉक्टरांनी ती जगण्याची आशाच सोडली होती कारण तिच्या अंगावर चरबी अशी नव्हतीच. तिच्या रक्तवाहिन्या, कातडीखाली स्पष्ट दिसत असत व तिचे डोके एखाद्या बाहुलीच्या डोक्यासारखे दिसत असे. डॉक्टरांच्या भविष्याप्रमाणे काहीही बरेवाईट न होता ती जगली. कारण फुफ्फुसे, हृदय, आतडी व यकृत यासारखी तिची सर्व अंतर्गत इंद्रिये व्यवस्थित कार्य करत होती व आहेत.

लिझि कधीच चालू शकणार नाही असे डॉक्टरांनी तिच्या आईला सांगितले होते. चार वर्षाची झाल्यावर, लिझिच्या एका डोळ्याला अंधत्व असल्याचे व दुसर्‍या डोळ्याचे कार्य मर्यादित असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. तरीही लिझि चालू लागली, बोलू लागली. तिच्या मेंदूची वाढ अगदी नॉर्मल आहे. तिची उंचीही ती ज्या मेक्सिकन वंशाची आहे त्या वंशातल्या मुलींच्या तुलनेत सर्वसाधारण अशीच आहे. लिझिला अडचण एकच आहे ती म्हणजे तिचे वजन वाढत नाही.

तिच्या आईने तिला एकदा जिमला पाठवले होते. पण तिला व्यायाम करताना इतका घाम येऊ लागला की डीहायड्रेशनच्या भितीने तिला कोणताही व्यायाम करणे शक्यच होत नाही. तिने जर सतत आहार घेतला नाही तर ती थोड्या वेळाने ती प्रचंड दमते. अर्थात तिचे सध्याचे वय असे आहे की नियम तोडणे तिलाही तिच्या वयाच्या इतर मुलींसारखे आवडते. तिला कोक सारखी फसफसणारी पेये, जंक फूड प्रचंड आवडते. सॅलड, फळे यांना तिला हातही लावावसा वाटत नाही. यामुळे वजन वाढण्याचा प्रश्न तिला नसला तरी रक्तातील शर्करा प्रमाण वाढणे यासारखे आजार तिला होतातच. ती सारखी चरत असताना अजिबात दिसत नाही. मात्र इतर मुलींच्या मानाने तिला प्रचंड भूक लवकर लवकर लागते व तिला भूक अजिबात धरवत नाही. तरी सुद्धा मधून मधून तिला हे सारखे खात रहाण्याचा खूप कंटाळा येतो. असे झाले की ती जेवत नाही व त्यामुळे लगेच दमते व अंथरूण धरते. यामुळे तिचे डॉक्टर व आई ती सतत काहीतरी खात राहील याची काळजी घेत असतात. तिला थंडीही फार लवकर वाजू लागते. ती रहात असलेल्या ऑस्टिन गावामधली गरम हवा या दृष्टीने तिच्या फायद्याचीच आहे.

तिच्या जनुकांमधे काय दोष आहे याचा सतत शोध घेऊन सुद्धा कोणत्याही डॉक्टरला अजुन काहीही सापडू शकलेले नाही. अनेक प्रयोगशाळांमधे तिच्या चाचण्या अनेक डॉक्टरांनी केल्या आहेत. स्वत: लिझि मात्र तिच्यातला दोष कोणत्याही डॉक्टरला सापडेल याबाबत फारशी आशादायक नाही. ती तिच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल फारसे दु:ख वगैरे करत नाही. ती स्वत:ला तिच्या वयांच्या इतर सर्वसाधारण मुलींसारखीच समजते. एक गोष्ट मात्र नक्की की जो पर्यंत ती निरोगी जीवन जगते आहे तोपर्यंत ती म्हणजे एक जिवंत चमत्कारच आहे असेच म्हणावे लागते.

2 डिसेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: