.
Travel-पर्यटन

देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 5


मी अंगकोर मधल्या प्रसिद्ध, बांते स्राय(Banteay Srei) या मंदिराला भेट देण्यासाठी निघालो आहे. हे मंदिर अंगकोर आर्किऑलॉजिकल पार्क मधल्या मंदिरांच्या पैकी एक गणले जात नाही. ते सियाम रीप पासून अंदाजे 25 ते 30 किमी अंतरावर तरी आहे. अंगकोर मधल्या कोणत्याही मंदिराला जरी भेट द्यायची असली तरी प्रथम सियाम रीप जवळच उभारलेल्या एका चेकनाक्यावर जाऊन तुमचा पास दाखवल्यावर पुढे जाता येते. कंबोडिया मधल्या या देवळांची सर्व व्यवस्था, सुरक्षा व निगराणी अप्सरा कॉर्पोरशन ही एक स्वायत्त संस्था करते. या संस्थेनेच हा चेकनाका उभारलेला आहे. हा नाका चुकवून जर एखादे वाहन पळाले तर वायरलेस मेसेज लगेच पाठवला जातो व त्या वाहनाला पुढे कोठेतरी थांबवून त्यातील प्रवाशांकडून प्रत्येकी 200 अमेरिकन डॉलर व चालकाकडून 100 डॉलर दंड वसूल केला जातो. या मुळे मंदिरांना भेट देण्याची परवानगी देणारा पास घेतल्याशिवाय या मंदिरांना भेट द्यायचा प्रयत्न कोणी पर्यटक करताना दिसत नाहीत. माझी गाडी या चेकनाक्यावर थांबते मी माझा पास दाखवतो व आम्ही पुढे निघतो. वाटेल एक मोठे सरोवर मला दिसते. परत येताना इथे थांबले पाहिजे असे मी मनात ठरवतो. या रस्त्यावरून जाताना मला दक्षिण भारतातल्या रस्त्यांची आठवण येते आहे. दोन्ही बाजूंना नजर पोचू शकेल तिथपर्यंत भातशेती दिसते आहे. या भागाला ईस्ट बराये (East Baray)या नावाने ओळखतात. हे नाव याच ठिकाणी ख्मेर राजांनी बांधलेल्या एका विस्तीर्ण जलाशयाच्या नावामुळे रूढ झाले आहे. आम्ही जातो आहोत त्या भागातच हे जलाशय होते व त्या जलाशयाच्या पाण्यावर आजूबाजूचे शेतकरी वर्षाला तीन पिके घेत असत. आज इथली जमीन जरी अत्यंत सुपीक असली तरी फक्त मॉन्सूनच्या कालातच शेतीला पाणी पुरवणे शक्य होते. या शिवाय चांगल्या प्रतीच्या बीबियाणांची व खतांची असलेली अनुपलब्धतता हे ही कारण आहेच. या सर्व कारणांमुळे आता या भागातले शेतकरी वर्षाला फक्त एकच भाताचे पीक घेतात व पिकवला जाणारा तांदूळही फारसा उच्च प्रतीचा नसतो. असे असले तरी रस्त्याने जाताना, बाजूला दिसणारी खेडेगावे मात्र सधन वाटत होती. याचे प्रमुख कारण या भागाला भेट देणारे पर्यटक आहेत. विश्वास बसणार नाही पण सियाम रीपला दरवर्षी 20 लाख पर्यटक भेट देतात व त्यातले 90 % तरी मी चाललो आहे त्या बांते स्राय मंदिराला भेट देतातच. माझी गाडी आता एका वळणावर डावीकडे वळते आहे. थोड्याच वेळात एका छान विकसित केलेल्या गाडीतळावर आम्ही थांबतो. समोरच मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. हा परिसर पर्यटकांना मदत होईल अशा तर्‍हेने विकसित केलेला दिसतो आहे. पर्यटकांना विश्रांती घेण्यासाठी जागा, स्वच्छता गृहे वगैरे सर्व आंतर्राष्ट्रीय दर्जाचे आहे. परत एकदा माझा पास मी दाखवतो व मंदिराकडे जाण्यासाठी पुढे निघतो.

बांते स्राय म्हणजे स्त्रियांची गढी ( Citadel of Women). बांते या शब्दाचा अर्थ गढी असा होतो. स्स्राय हा शब्द अर्थातच संस्कृत स्त्री या शब्दापासून आलेला असणार आहे. आता या ठिकाणाला हे नाव का पडले असावे हे कळत नाही. कदाचित या मंदिराला असलेल्या 3 तटबंद्या, याला गढी असे म्हणण्याचे कारण असू शकते. तसेच या मंदिरावरील नाजूक कलाकुसर बघून याला स्त्रियांचे असे नाव मिळाले असावे. या मंदिराचे मूळ नाव त्रिभुवनमहेश्वर होते. तसेच हा भाग ईश्वरपूर या नावाने ओळखला जात असे. या नावांचे बांते स्राय कधी झाले हे कोणालाच सांगता येत नाही. हे मंदिर जरी राजेन्द्रवर्मन (944-968) व पाचवा जयवर्मन (969-1001) या ख्मेर राजांच्या कालात बांधले गेले असले तरी ते कोणत्याच राजाने बांधलेले नाही. हे मंदिर या राजाच्या यज्ञवराह या नावाच्या एका ब्राम्हण प्रधानाने बांधलेले आहे. हा यज्ञवराह ब्राम्हण असला तरी राजाच्या वंशातीलच होता असेही मी एका पुस्तकात वाचले.

बांते स्राय मंदिर, समोर पूर्वेचे मुख्य प्रवेशद्वार दिसते आहे.

मी या मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याने पुढे निघालो आहे. एक वळण घेतल्यावर मंदिर समोर दिसते आहे. मंदिराचे प्रथम दर्शन, बायॉन व अंगकोर वाट बघून आलेल्या माझ्या डोळ्यांना, कुठे रस्ता तर चुकलो नाहीना? असे भासते आहे. बांते स्रायचे देऊळ एकदम छोटेखानी आहे. आपल्याकडे जशी देवळे असतात साधारण त्याच मोजमापाचे. सर्व देऊळ एकाच पातळीवर आहे व मागच्या बाजूला असलेले देवळाचे 3 कळस पाहून हे मंदिर दक्षिण भारतात कोठेतरी असावे असा भास मला होतो आहे. मंदिराला हे छोटेखानी स्वरूप कदाचित मुद्दाम दिलेले असावे. हे मंदिर राजाने बांधलेले नसल्याने त्याचा आकार जर राजाने बांधलेल्या मंदिराच्या आकारापेक्षा मोठा असला तर तो त्याचा अपमान झाल्यासारखा होईल म्हणून हे मंदिर छोटेखानी बांधलेले असावे. मी मंदिरात प्रवेश करताना प्रथम एका छोट्या गोपुरातून जातो. याला गोपुर म्हणणे धाडसाचेच आहे कारण सध्या याच्या दरवाजाचा फक्त सांगाडा उभा आहे. यातून पुढे जाण्यासाठी एक पॅसेज आहे व त्याच्या दोन्ही बाजूंना छतांची मोडतोड झालेल्या काही इमारती दिसत आहेत. या इमारतींपाशी येथे भेट देण्यासारखे काहीतरी आहे असे निदर्शनास आणून देणार्‍या पाट्या आहेत पण परत येताना त्या इमारतींना भेट द्यायची असे ठरवून मी पुढे जातो. पुढे मंदिरात प्रवेश करण्याचे मुख्य गोपुर व त्याच्या दोन्ही बाजूंना गुलाबी लाल रंगाच्या दगडातून बनवलेली तटबंदी दिसते आहे. या तटबंदीच्या भोवती असलेल्या खंदकात थोडेफार पाणी अजुनही दिसते आहे. गोपुराच्या वर असलेल्या दर्शनीय त्रिकोणी पॅनेलकडे (Fronton) माझे लक्ष जाते व आश्चर्याने स्तिमित होऊन मी जागेवरच क्षणभर स्तब्ध होतो. या संपूर्ण पॅनेलवर अनेक देवता, पशुपक्षी, फुले व वेलबुट्टी असलेले अत्यंत सुंदर, नाजूक व बारीक कोरीवकाम केलेले आहे. बांते स्राय या मंदिराला अंगकोरचे सर्वात सुंदर मंदिर का म्हणतात? हे क्षणार्धात माझ्या लक्षात येते आहे. मी या गोपुरातून पुढे जातो समोर एक नंदीचे एक भग्न शिल्प आहे. त्याचे खूर व शरीराचा थोडाच भाग आता राहिला आहे. मी आणखी थोडा पुढे जातो. गुलाबी, लालसर रंगाचा एक समुद्रच माझ्या नजरेसमोर आहे असा भास मला क्षणभर होतो. बांते स्राय मंदिर संपूर्णपणे या गुलाबी लालसर दिसणार्‍या एका सॅण्ड स्टोन या दगडामधून बांधलेले असल्याने त्याचा रंग असा लोभसवाणा दिसतो आहे. असे म्हणतात की या दगडाला चंदनासारखा सुवास देखिल येतो. या दगडाचे दुसरे वैशिष्ट्य असे आहे की यावर कारागिराची हत्यारे लाकडावर चालावी तशी चालतात. इथल्या भित्तिशिल्पांचा दर्जा इतका उच्च का आहे याचे हेही एक कारण आहे.

मुख्य प्रवेशद्वार

पश्चिमेच्या बाजूस असलेले तीन मुख्य गाभारे, कोरलेली खोटी द्वारे दिसत आहेत

देवळाच्या तटाच्या आत असणार्‍या भागात, कडेने चार किंवा पाच, छोट्या व अरूंद अशा हॉलवजा इमारती मला दिसत आहेत. परंतु या इमारतींची छते केंव्हाच नष्ट झाली आहेत व फक्त त्यांच्या भिंती आज अस्तित्वात आहेत. भग्न इमारतींच्या आतल्या बाजूस आणखी एक तट आहे व देवळाचा अंतर्भाग या तटाच्या आत आहे. हा तट ओलांडून पलीकडे जाण्यास पर्यटकांना परवानगी नाही. परंतु हा तट काही फूटच फक्त उंच असल्याने व देवळाचा अंतर्भाग तसा छोटेखानीच असल्याने. आतील सर्व बारकावे सहजपणे बघणे शक्य आहे. आत पश्चिमेच्या बाजूस तीन चौकोनी गाभारे आहेत. यातील मधला गाभारा (शिव मंदिराचा) आयताकृती आहे. बाजूच्या दोन गाभार्‍यांच्या पूर्वेच्या बाजूस आणखी दोन छोट्या खोल्या आहेत. त्यांना लायब्ररी असे म्हटले जाते. या खोल्यांना बहुदा दुसरे काहीच नाव देता आल्याने हे नाव दिले गेले असावे. या सर्व गाभार्‍यांच्या बाहेरील बाजूस प्राण्यांची मुखे असलेल्या मानवी मूर्ती रक्षक म्हणून बसवलेल्या आहेत. या मूळ मूर्ती आता नॉम पेन्हच्या वस्तु संग्रहालयात सुरक्षित ठेवल्या गेल्या असून येथे बसवलेल्या मूर्ती बनावट आहेत असे मला समजले. सर्व गाभारे व खोल्या यांच्या चारी बाजूंना खिडक्या किंवा दरवाजे यांच्या आकाराचे कोरीवकाम केलेले आहे. खरे दरवाजे फक्त पूर्व दिशेकडेच आहेत व काही खिडक्याच खर्‍या आहेत. हे सर्व खरेखोटे दरवाजे किंवा खिडक्या या सर्वांच्यावर असलेल्या लिंटेल्सवर अप्रतिम भित्तिशिपे कोरलेली आहेत. ही भित्तिशिल्पे बघताना माझे मन खरोखरच आश्चर्याने भरून गेले आहे. या आधी बायॉन व अंगकोर वाटच्या मंदिरातील भव्य भित्तिशिल्पे मी बघितली आहेत. त्या भित्तिशिल्पामधे दगडात कोरीव काम करून एक चित्र आपल्या नजरेसमोर उभे केले आहे असे जाणवते. अंगकोर वाट मधे कोरीव कामाची खोली 3 किंवा 4 पायर्‍यात करून थोडा फार त्रिमितीचा भास देण्याचा प्रयत्नही दिसतो.या ठिकाणी मात्र सलग त्रिमितीमधली शिल्पकला आहे. फुले, शंखासारखे आकार तर बाहेर तयार करून दगडावर चिकटवले आहेत असे वाटू लागते. मी अशा प्रकारची त्रिमिती भित्तिशिल्पे कधी बघितल्याचे मला आठवत नाही. एका ठिकाणी शंकर पार्वती बसलेले हिमालयाचे एक पर्वत शिखर, रावण आपल्या सामर्थ्याने हलवतो आहे तर दुसर्‍या एका शिल्पात कृष्ण आपला मामा कंस याच्याशी त्याच्याच प्रासादात कुस्ती खेळताना दाखवला आहे. ऐरवतावर आरूढ झालेला इंद्र, एका शिल्पात मानव, पशुपक्षी यांच्या अंगावर दैवी पावसाचा वर्षाव करताना दिसतो. या शिल्पात पावसाचे किरण तिरप्या रेषांनी अतिशय सुंदर रित्या दाखवले आहेत. मला सगळ्यात आवडलेले शिल्प शंकरावर मदन किंवा कामदेव फुलांचे बाण सोडतो आहे व पलीकडे पार्वती बसलेली आहे हे आहे. यात शंकराचा तिसरा डोळा इतक्या बारकाईने दाखवलेला आहे की या कलाकारांच्या कौशल्याची कमाल वाटते. या शिवाय सर्व गाभार्‍यांच्या द्वाराजवळ असलेल्या अप्सरांची शिल्पे इतक्या बारकाव्यांसह कोरलेली आहेत की हे देऊळ बघतच बघावे असे वाटत राहते.

विष्णू

वेलबुट्टी

त्रिमिती

खंदकाच्या पाण्यातले देवळाचे प्रतिबिंब

मी मग मंदिराच्या तटाच्या बाहेरील बाजूस असलेल्या खंदकाच्या बाजूने एक चक्कर मारतो. एक दोन ठिकाणी मंदिराचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब सुरेख दिसते आहे. परतताना बाजूच्या भग्न हॉल्समधे एक दृष्टीक्षेप टाकायला मी विसरत नाही. या ठिकाणी नृसिंह हिरण्यकश्यपूची छाती फोडतानाचे एक सुंदर पॅनेल मला बघायला मिळते. बांते स्राय्च्या अप्रतिम भित्तिशिल्पांमुळे या मंदिरातील मूर्ती व शिल्पे लुटण्याचे सर्वात जास्त प्रकार झालेले आहेत. Andre Malraux या प्रसिद्ध फ्रेंच लेखकाने इथल्या चार देवतांच्या मूर्ती चोरण्याचा प्रयत्न केला होता व त्या बद्दल त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. या मंदिरातील शिल्पांचा दर्जा एवढा श्रेष्ठ आहे की मूळ शिल्प संग्रहालयात ठेवून त्या जागी ठेवलेली बनावट शिल्पे सुद्धा चोरण्याचेही प्रयत्न होताना दिसतात. मंदिराच्या बाजूला, या मंदिराचा शोध व बाजूचे उत्खनन, याबद्दल माहिती देणारे एक छोटे प्रदर्शन आहे ते मी बघतो व थोड्याशा अनिच्छेनेच परतीचा रस्ता धरतो आहे.

अंकावर पार्वती बसलेल्या शंकराला रावण गदागदा हलवत आहे.

कृष्ण व कंस यांची कुस्ती

नृसिंह अवतार, खालच्या बाजूस हिरण्यकश्यपू

ऐरावतावर आरूढ इंद्र दैवी पावसाचा वर्षाव मानव, पशू, पक्षी यांच्यावर करत आहे.

वाली आणि सुग्रीव यांच्यातील युद्ध डाव्या बाजूस बाण सोडण्याच्या तयारीत राम

उजव्या बाजूला असलेल्या पार्वतीकडे शंकराने बघावे म्हणून त्याच्यावर आपला फुलाचा बाण सोडण्याच्या तयारीत असलेला कामदेव

परतीच्या मार्गावर असलेल्या प्रेह रूप (Preah Rup)या देवळाजवळ गाडी थांबते. हे मंदिर दुसरा राजेंद्रवर्मन (944-968)या राजाने बांधले होते. माझ्या कार्यक्रमात मी बघत असलेले हे सर्वात जुने देऊळ असल्याने मला त्यात खास रुची आहे. अंगकोर वाटच्या 175 वर्षे आधी हे मंदिर बनवले गेले होते. या देवळाचा आराखडा अंगकोर वाट प्रमाणेच, तीन पातळ्यांचा मंदिरपर्वत असाच आहे. किंवा असे म्हणता येते की या मंदिरावरून अंगकोर वाट चा मूळ आराखडा केला असावा. सर्वात वरच्या पातळीवर तीन गाभारे आहेत. या गाभार्‍यांचे सर्व बांधकाम एका नैसर्गिक डिंकाच्या सहाय्याने चिकटवलेल्या विटांचे आहे. हजार वर्षांनंतरही हे वीटकाम अजून टिकून आहे हे एक आश्चर्यच म्हणायचे. मंदिर चढायला मात्र बरेच कष्टप्रद वाटते आहे. वर गेल्यावर काही सुंदर लिंटेल्स बघायला मिळाली. अर्थात ही शिल्पकला अंगकोर वाट पेक्षा आणखी 200 वर्षे जुनी आहे हे ही शिल्पे बघताना जाणवते आहे.

प्रेह रुप मंदिर, गाभारे वीटकाम करून बांधलेले आहेत

प्रेह रुप मधले लिंटेल. 10व्या शतकातले कोरीवकाम

प्रेह रूप वरून खाली उतरल्यावर आता थोड्याफार विश्रांतीची गरज आहे हे जाणवू लागले आहे. एव्हांना माझी गाडी जाताना लागलेल्या मोठ्या सरोवराजवळ पोचलेली आहे. या सरोवराच्या काठावर ख्मेर पद्धतीचे भोजन देणारी बरीच रेस्टॉरंट्स मला दिसतात. मी येथेच थांबून भोजन घ्यायचे व थोडी विश्रांती घ्यायची असे ठरवतो.

25 नोव्हेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 5

 1. काका पोस्त उत्तम झाली आहे.फोटो सुद्धा खूप चांगले आले आहेत.आवडले. मी फेसबुक वर मराठी ब्लॉगर्स नावाने पेज सुरु केले आहे.नवीन प्रयत्न आहे सांभाळून घ्या…पेज चे नाव आहे ” मराठी ब्लॉगर्स” तुमच्या पोस्ट ची लिंक तिथे सुद्धा शेअर करा

  Posted by sagar | नोव्हेंबर 27, 2010, 5:23 pm
  • सागर

   मी फेसबूकचा सभासद नसल्यामुळे मला काही करता येणे शक्य नाही. तुम्हाला माझ्या ब्लॉगची लिंक टाकायची असेल तर तुम्ही तसे जरूर करा. माझी काहीच हरकत नाही.

   Posted by chandrashekhara | नोव्हेंबर 28, 2010, 7:51 सकाळी
 2. मस्त !
  आपण एकटेच गेला होतात की कुठल्या ट्रॅव्हल्स बरोबर ? आपणच जर ही ट्रीप प्लॅन केली असेल तर, ती कशी करायची ? मी पण जाईन म्हणतो. सेफ आहे का ?

  आअपला,
  जयंत

  Posted by जयंत | नोव्हेंबर 27, 2010, 6:38 pm
  • जयंत

   मी सहसा ट्रॅव्हल कंपनीच्या टूर्स घेत नाही. काय बघायचे?, काय जेवायचे? यावरच्या आपल्या स्वातंत्र्यावर फार बंधने येतात. वर्षाला 20 लाख पर्यटक येथे येतात. एकदम सुरक्षित आहे. भारतातून जायला बॅन्कॉक वरून सगळ्यात जवळ पडेल. बॅ न्कॉक- सियाम रीप अशा 3 फ्लाइट्स रोज असतात.

   Posted by chandrashekhara | नोव्हेंबर 28, 2010, 7:49 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: