.
Travel-पर्यटन

देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 4


अंगकोर वाट मंदिराच्या पहिल्या पातळीवरून दुसर्‍या पातळीकडे जाण्यासाठी ज्या मूळ दगडी पायर्‍या बनवलेल्या आहेत त्या चढायला कठिण असल्यामुळे त्याच्यावर आता लाकडी पायर्‍या बसवण्यात आलेल्या आहेत. या पायर्‍यांवरून चढत जाणे मला बरेच सुलभ वाटते आहे. जिन्याच्या बाजूला असलेल्या चौकोनी खांबांच्यावर तसेच लिंटेल्सवर सुरेख नक्षीकाम कोरलेले दिसते आहे.

दुसर्‍या पातळीकडे नेणार्‍या पायर्‍या

मधल्या एका जागेवरून बाहेर डोकावून बघता येते आहे. तेथून दुसर्‍या पातळीवरच्या गॅलरीजच्या भिंतीची बाहेरची बाजू मला दिसते आहे. मात्र या भिंतीवर कसलेच कोरीव काम नाही. असे का केले असावे याचा विचार करताना मला या भिंतीवर अनेक बारीक भोके पाडलेली दिसली. कदाचित या संबंध भिंतीवर ब्रॉन्झचा पत्रा लाकडी ठोकळ्यांवर ठोकलेला असावा. हे लाकडी ठोकळे बसवण्यासाठी ही भोके भिंतीवर पाडलेली असावीत. या भोकांचे दुसरे काही प्रयोजन मला तरी सुचत नाही. थोडे आणखी वर गेल्यावर एक प्रवेश द्वार दिसते आहे. यामधून आत गेल्यावर दुसर्‍या पातळीवरच्या गॅलर्‍यांच्या पलीकडे म्हणजे तिसर्‍या पातळीचे मंदिर ज्या पायावर उभे केलेले दिसते आहे तिथपर्यंत मी पोचतो आहे. अर्थातच माझ्या चहूबाजूंना, दुसर्‍या पातळीवरच्या गॅलर्‍यांच्या भिंतींची, तिसर्‍या पातळीच्या समोर येणार्‍या बाजू आल्या आहेत. अर्थातच वर निळेभोर आकाश दिसते आहे. मला दिसणार्‍या चारी बाजूंच्या या भिंतींवर मला अप्सरांची चित्रे कोरलेली दिसत आहेत. काही अप्सरा एकट्याच उभ्या आहेत तर काही जोडीने. चार किंवा पाच अप्सरांचा घोळकाही काही ठिकाणी दिसत आहे. तेच तेच शिल्प परत परत कोरण्यात काय प्रयोजन असावे असा विचार करत मी ही शिल्पे लक्षपूर्वक बघतो. यातली प्रत्येक अप्सरा जरी वरकरणी बघितल्यास एकसारखी दिसत असली तरी प्रत्येक शिल्पात अनेक फरक केलेले दिसत आहेत. अप्सरांनी गळ्यात, कानात घातलेले दागिने, डोक्यावर परिधान केलेले मुगुट, हातात धरलेल्या वस्तू आणि चेहर्‍यावरचे भाव हे सर्व निरनिराळे आहे. म्हणजेच एकच पोझ घेऊन जरी या अप्सरा उभ्या असल्या तरी एकाच प्रकारची वेशभूषा केलेल्या अनेक अप्सरांच्या एका घोळक्याचे शिल्प निर्माण करण्याचा शिल्पकारांचा बहुदा हा प्रयत्न आहे.

अप्सरांचा एक घोळका (दुसरी पातळी)

ख्मेर राजांचे व लोकांचे हे अप्सरा प्रेम कोठून आले असावे? याची बरीच कारणे दिली जातात. आजही अंगकोर मंदिराचे व्यवस्थापन करणारी संस्था स्वत:ला अप्सरा कॉर्पोरेशन म्हणूनच म्हणवून घेते. सियाम रीप मधे अप्सरा हा शब्द नावात असलेली अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व मसाज पार्लर्स आहेत. सियाम रीपच्या एका चौकामधे तर अंगकोरच्या अप्सरेची एक मोठी प्रतिकृती मध्यभागी उभारलेली मी बघितली. ख्मेर लोकांच्या सध्याच्या अप्सरा प्रेमाचे कारण बहुदा व्यापारधंदा वृद्धिंगत करण्यासाठी योजलेली एक युक्ती हेच असावे. परंतु ख्मेर राजांच्या कालातले हे अप्सरा प्रेम, राजा हा ईश्वरी अंश असतो या समजुतीमुळे निर्माण झाले असावे असे मानले जाते. ही संकल्पना मुळात भारतीय उपखंडातली आहे. ती ख्मेर राजांनी आपलीशी केल्याने ख्मेर राजे हे ईश्वरी अंशाचेच आहेत असे मानले जाऊ लागले. देव हे अप्सरांच्या सान्निध्यात असतात ही अशीच एक मुळातून भारतीय असलेली संकल्पनाही ख्मेर लोकांनी उचलली व सर्व मंदिरांच्यावर अप्सरांची शिल्पे बसवणे अनिवार्य बनले. अंगकोर मधल्या कोणत्याही मंदिरात देवांचे कोणतेही शिल्प वरच्या बाजूला एक दोन उडणार्‍या अप्सरा असल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. अंगकोर वाट मंदिराच्या दुसर्‍या पातळीवर राजा व त्याचे वरिष्ठ अधिकारी यांनाच जाता येत होते. राजा हा एक ईश्वरी अंश असल्याने, त्याच्या आवतीभोवती अप्सरांचे सान्निध्य असलेच पाहिजे या कल्पनेने बहुदा या दुसर्‍या पातळीवर कोरलेल्या शिल्पांमधे फक्त अप्सराच आहेत. याशिवाय याच समजुतीमुळे सर्व ख्मेर राजांनी मोठ्या संख्येने अंगवस्त्रे बाळगली होती असेही वाचल्याचे मला स्मरते आहे. अप्सरांची विविध रूपे बघत मी आता पूर्व बाजूला पोचलो आहे. समोर तिसर्‍या पातळीवर जाता यावे म्हणून मुद्दाम बनवलेल्या लाकडी पायर्‍या व लोखंडी कठडे मला दिसतात. माझ्या दृष्टीने ही आनंदाची गोष्ट आहे कारण मूळ दगडी पायर्‍या अतिशय अरूंद व आधार नसलेला बनवलेल्या असल्याने आपण वर कसे जायचे या चिंतेतच मी होतो.

दुसर्‍या पातळीवरून दिसणारा अग्नेय दिशेकडचा मंदिर कळस

दुसर्‍या पातळीवरून दिसणार्‍या तिसर्‍या पातळीच्या गॅलरीज

तिसर्‍या पातळीवर जाण्यासाठी बनवलेला लाकडी जिना

मी आता तिसर्‍या पातळीवरच्या गॅलरीमधे पोचलो आहे. या गॅलरीमधे भिंतींच्यावर कोणतीच शिल्पे नाहीत. काही अप्सरा शिल्पे मला कोपर्‍यांत दिसत आहेत. या पातळीवर ख्मेर राजा व त्याचा धर्मगुरू यांनाच जाण्याची परवानगी असे. त्यामुळे या सर्व भिंतींवर सोन्याचे किंवा चांदीचे पत्रे ठोकलेले असावेत. मध्यवर्ती गाभार्‍याचा कळस या पातळीच्या आणखी 17 मीटर उंच आहे. गाभार्‍यात विष्णूची मूर्ती ज्या स्थानावर उभी असणार तो मध्यवर्ती भाग विटांची भिंत बांधून बंद करण्यात आलेला आहे. या स्थानावर फ्रेंच उत्खनशास्त्रज्ञांनी केलेल्या उत्खननात त्यांना 27 मीटर खोल अशी एक विहिर आढळून आलेली होती व त्या विहिरीच्या तळाशी सूर्यवर्मन राजाच्या वैयक्तिक उपयोगातील अनेक सुवर्ण वस्तू व पात्रे त्यांना सापडली होती. परत कोणी असले उद्योग येथे करू नये म्हणून कदाचित हा भाग बंद केलेला असावा. या भिंतीच्या चारी बाजूंना बुद्धमूर्तींची प्रतिष्ठापना करून त्या मूर्तींची पूजा बुद्ध भिक्कू येथे करत असले पाहिजेत असे दिसते आहे. मी या गॅलरीवरून चारी बाजूंचा देखावा बघतो. ख्मेर राजांच्या डोळ्यांनाच दिसणारे दृष्य़ आता माझ्यासारखा कोणीही सर्वसामान्य बघू शकतो आहे. मी थोडे फोटो काढतो व खाली उतरण्यास सुरवात करतो.

तिसर्‍या पातळीवरच्या मध्यवर्ती गाभार्‍यावरचा कळस

तिसर्‍या पातळीवरून दिसणारे पश्चिम प्रवेश द्वाराचे विहंगम दृष्य

दुसर्‍या पातळीवरच्या गॅलर्‍यांच्या आत, बर्‍याच मोडक्या तोडक्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. तिथे मी क्षणभर विसावतो व नंतर अंगकोर वाट मंदिराचे सर्वात महत्वाचे आकर्षण असलेली पहिल्या पातळीवरच्या चारी बाजूंच्या गॅलर्‍यांमधली भित्तिशिल्पे बघण्यासाठी खाली येतो.

भित्तिशिल्पांची पहिल्या पातळीवरची पश्चिमेकडची गॅलरी

पहिल्या पातळीवरच्या गॅलर्‍या पूर्व पश्चिम या दिशांना 215 मीटर एवढ्या लांब आहेत तर उत्तर व दक्षिण दिशांना त्यांची लांबी 187 मीटर एवढी आहे. प्रत्येक बाजूला मध्यभागी, मंदिराच्या अंतर्गत भागात प्रवेश करण्यासाठी, एक गोपुर बांधलेले आहे. या गोपुरामुळे प्रत्येक गॅलरीचे दोन भाग पडतात. यातल्या प्रत्येक भागावर एका विशिष्ट कथेवर आधारित असे सबंध भित्तिशिल्प कोरलेले आहे. या शिवाय चारी कोपर्‍यांच्यात निराळीच भित्तिशिल्पे आहेत. या कलाकृतीचा एकूण आवाका लक्षात घेतला की मन आश्चर्याने थक्क झाल्याशिवाय रहात नाही. गॅलर्‍यांच्यातली शिल्पे 3 मीटर उंचीची आहेत. म्हणजे प्रत्येक शिल्प अंदाजे 100 मीटर लांब व 3 मीटर उंच आहे. एवढ्या मोठ्या आकारात जरी ही शिल्पे असली तरी त्यातली प्रमाणबद्धता, बारकावे हे इतके अचूक आहेत की कोणत्याही अचूक मोजमापे करणार्‍या उपकरणाशिवाय या लोकांनी एवढ्या मोठ्या आकाराची ही शिल्पे कशी बनवली असतील? असा प्रश्न माझ्या मनाला पडला आहे.

मी पश्चिमेकडच्या भित्तिशिल्पापासून सुरूवात करायची ठरवतो. या भित्तिचित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या शिल्पांतून सांगितली जाणारी कथा डावीकडून उजवीकडे चित्रित केलेली आहे. म्हणजेच कथेचा अंत किंवा परमोच्च बिंदू हा डाव्या कोपर्‍यात येतो. अंगकोर वाट हे मंदिर नसून सूर्यवर्मन राजाची समाधी आहे याचे हे एक कारण म्हणून दिले जाते. पश्चिमेला असलेल्या भित्तिशिल्पात महाभारताचे युद्ध साकारलेले आहे. अगदी खालच्या बाजूला सामान्य योद्धे दाखवलेले आहेत. घोड्यावर किंवा हतीवर बसलेले सेनानी त्यांच्या जरा वर दिसतात तर राजकुमार व महत्वाच्या व्यक्ती सर्वात वर आहेत. सबंध शिल्पात कोरलेले बारकावे इतके प्रभावी आहेत की आपल्या नजरेसमोर एक तुंबळ युद्ध सुरू आहे असा भास झाल्याशिवाय रहात नाही. अगदी डाव्या कोपर्‍यात बाणांच्या शय्येवर पडलेल्या भीष्माचार्यांच्यावर, अर्जून अखेरचा बाण सोडत आहे. या दृष्याने या भित्तीशिल्पाची सांगता होते. उत्तरेकडच्या गॅलरीमधल्या भित्तीशिल्पात, सूर्यवर्मन राजा लढाई करताना दाखवला आहे. या ठिकाणीच त्याचे मृत्यूच्या पश्चात असलेले नाव कोरलेले आहे. त्याच्या पलीकडे असलेली यमराजांची रेड्यावर बसलेली मूर्ती व पापी आत्मांना चित्रगुप्त एका काठीने जमिनीत असलेल्या एका गवाक्षातून पाताळात किंवा नरकात ढकलत आहे अशी शिल्पे आहेत. ही चित्रे त्यांच्या कल्पनाविलामुळे मला फार आवडतात

महाभारतातील तुंबळ युद्ध

शरशय्येवर पहुडलेल्या भीष्मांच्यावर शरसंधान करणारा अर्जुन

रेड्यावर स्वार झालेले यमराज

चित्रगुप्त पापी आत्म्यांना तळातील दरवाजामधून काठीने नरकात लोटत आहे. खालच्या बाजूस रोरव नरक

. पूर्वेकडच्या गॅलरीमधल्या भित्तिशिल्पात, समुद्रमंथनाचा देखावा कोरलेला आहे. परंतु वासुकीच्या विषारी श्वासोच्छवासांना भगवान शंकर कसे सहन करतो आहे एवढेच चित्र मला बघता येते आहे. शंकराच्या अंगाची होणारी दाही मोठ्या कल्पकतेने दाखवली आहे. या बाजूची पुढची शिल्पे, दुरूस्ती कामामुळे मला बघता येत नाहीत.यापुढे दक्षिण बाजूच्या गॅलरीमधे, श्रीकृष्णाचे दानवांबरोबरचे युद्ध आणि राम रावण युद्ध या सारखे प्रसंग माझ्या नजरेसमोर उलगडत जात आहेत.

वासुकीच्या विषारी उश्वासांमुळे थरथर कापणारा शंकर

गरुडाच्या पाठीवर स्वार विष्णूचे दानवांशी युद्ध

राम रावणावर शरसंधान करत आहे. खालील बाजूस द्रोणागिरी हातावर घेतलेला हनुमान

रामाबरोबर युद्ध करणारा रावण

हनुमानाचे इंद्रजित बरोबरचे युद्ध

रथात बसलेला राजा श्रीराम, खालील बाजूस वानरसेना

पहिल्या पातळीवरच्या गॅलर्‍यांची फेरी पूर्ण झाल्यावर मी घड्याळाकडे बघतो. दुपारचा 1 वाजत आला आहे. म्हणजे साडेचार तास तरी मी या मंदिरात अक्षरश: वणवण फिरतो आहे. पायांना थकवा जाणवत असला तरी काहीतरी फार दुर्मिळ असे या डोळ्यांनी बघता आल्याचा आनंदापुढे थकवा केंव्हाच पळून जातो आहे.पश्चिम बाजूच्या पॅसेजवरून मी आता मंदिरातून काढता पाय घेतो. परत जाताना अनेक वेळा मी मागे वळून अंगकोर वाट मंदिराचे एक अखेरचे दर्शन घेतो आहे.

परत फिरताना वळून घेतलेले अंगकोर वाटच्या शिखरांचे छायाचित्र

आज दुपारच्या जेवणासाठी खास ख्मेर पद्धतीचे जेवण घेण्याचे मी ठरवतो. हे जेवण नारळाच्या दुधात शिजवले जाते. चव माझ्या आवडीच्या थाई जेवणासारखीच असल्याने एकूण मजा येते जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून मी साबुदाण्याच्या लापशीसारखा लागणारी एक डिश घेतो.

दक्षिण मध्य एशिया मधे असलेल्या सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवराकडे मी आता निघालो आहे. ‘टोनले सापया नदीच्या पात्रातच हे सरोवर दर वर्षी निर्माण होते. ही नदी नॉम पेन्ह जवळ मेकॉ न्ग या महानदाला जाऊन मिळते. वर्षातले सात आठ महिने, टोनले साप या नदीचे पाणी पुढे मेकॉन्ग मधून वहात जाऊन व्हिएटनामच्या किनार्‍याजवळ साउथ चायना सी ला मिळते. मात्र सप्टेंबर ऑक्टोबर मधे मेकॉन्ग नदीच्या पाण्यात तिबेट मधल्या पर्वतरांगांच्या मधला बर्फ वितळण्याने व मॉंन्सून या दोन्ही कारणांमुळे प्रचंड वाढ होते. प्रवाहात झालेल्या या प्रचंड वाढीमुळे ऑक्टोबर महिन्यात टोनले साप नदीचा प्रवाह काही काळ चक्क स्थिर होतो व नंतर उलटा म्हणजे मेकॉन्गचे पाणी टोनले साप नदी मधे येणे, अशा प्रकारे वाहू लागतो. या आत येणार्‍या पाण्याने टोनले साप नदीच्या पात्रात एक विशाल सरोवर निर्माण होते. या कालात पाण्याची उंची 10 मीटरने वाढते. य़ा प्रकारामुळे मेकॉन्ग नदीतले मासे विपुल संख्येने टोनले साप मधे येतात. कंबोडियाच्या पिढ्या न पिढ्या या मत्स्य अन्नावर पोसल्या गेल्या आहेत. नदीकाठी पोचल्यावर मी एक बोट भाड्याने घेऊन फेरफटका मारण्याचे ठरवतो. या सरोवरावर असलेली तरंगणारी खेडेगावे, शाळा ही बघायला खूप रोचक आहेत हे मात्र खरे. मात्र मला सर्वात गंमतीची गोष्ट वाटते ती म्हणजे पाण्यावर असलेली एक दिशा मार्गाची पाटी. शहरातल्या रस्त्यांवर आपण पहात असलेली ही पाटी सरोवराच्या पाण्यावर बघायला मिळेल असे मला स्वप्नातसुद्धा कधी वाटले नसेल.

टोनले साप वरची तरंगती शाळा

नदीवरची एक दिशा मार्गाची पाटी

टोनले साप वर बोट काय कशालाही म्हणता येते

परतीच्या प्रवासात मी इथल्या सरकारने नवोदित कलाकारांना, कंबोडिया मधले, वैशिष्ट्यपूर्ण पाषाण व लाकूड यावरचे कोरीवकाम, रेशमी वस्त्रांवरची चित्रकला वगैरेसारख्या कलांचे शिक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या एका संस्थेला भेट देतो. आपण आपल्या दिवाणखान्यांच्यात वगैरे ठिकाणी ज्यांना स्थान देतो त्या कलाकुसरीच्या वस्तूंना कारागीर कसा जन्म देतात हे बघायला मोठी मजा वाटते.

स्वत:च्या हातांनी देवांच्या मूर्ती घडवण्याचे शिक्षण देणारी शाळा

संध्याकाळचे भोजन घेण्याआधी मी माझ्या हॉटेलच्या जवळच असणार्‍या एका रेस्टॉरंटमधे, कंबोडियाच्या नृत्यकलेचा एक कार्यक्रम बघायला चाललो आहे. या नृत्य कार्यक्रमात लोकनृत्यांचा जरी समावेश असला तरी हा कार्यक्रम मुख्यत्वे अप्सरा नाच म्हणूनच ओळखला जातो. या अप्सरा नृत्याची परंपरा, ख्मेर राजांच्या कालापासून म्हणजे गेल्या हजार वर्षांची आहे. ख्मेर राजांच्या कालात हे नृत्य फक्त राजा व वरिष्ठ अधिकारी बघू शकत असत. कंबोडिया मधल्या यादवी युद्धात, ही नृत्य परंपरा जवळ जवळ नष्ट झाली होती. आता नॉम पेन्ह मधल्या स्कूल ऑफ फाइन आर्टस या संस्थेत या नृत्याचे परत धडे दिले जातात. या नृत्यप्रकारात 3500 च्या वर एक विशिष्ट अर्थ असलेल्या डान्स मूव्हमेंट्स आहेत. या नृत्यप्रकाराद्वारे सांगितली जाणारी कथा ख्मेर लोकांचे मूळ किंवा ओरिजिन या बद्दल असते. काम्पू नावाचा एक ऋषी व मेरा नावाची एक अप्सरा यांच्या मीलनाची ही कथा असते. या दोघांपासूनच ख्मेर लोकांचा जन्म झाला असे मानले जाते. मला आपल्या पुराणांतल्या विश्वामित्रमेनका या गोष्टीशी या कथेचे असलेले साधर्म्य बघून गंमत वाटल्याशिवाय रहात नाही. जग किती छोटे आहे याची ही आणखी एक चुणूक.

अप्सरा नृत्य

नृत्यातील प्रमुख अप्सरा

नृत्याचा कार्यक्रम तासभर तरी चालला आहे. नर्तिकांनी एक अंगभर उत्तरीय परिधान केल्याची बाब वगळली तर त्यांचे बाकी कपडे, वेशभूषा, दागिने आणि मुगुट हे ख्मेर मंदिरांच्यामधे कोरलेल्या अप्सरांच्या सारखेच आहेत. कोणत्याही अभिजात कलाप्रदर्शनाच्या दर्शनाने मनाला जसा एक हळूवार सुखदपणा जाणवत राहतो तसाच या नृत्यप्रकाराने मला जाणवतो आहे.

आजचा दिवस फारच मोठा होता असे निद्रादेवीची आराधना करताना मला वाटते आहे. उद्या सियाम रीप पासून 30 किमी वर असलेल्या व अंगकोरचे सर्वात सुंदर मंदिर म्हणून ज्याची ख्याती आहे त्या बांते स्राय या मंदिराला भेट द्यायला मला जायचे आहे.

22 नोव्हेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: