.
Travel-पर्यटन

देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 3


लिफ्ट मधून हॉटेल लॉबीकडे जाण्यासाठी उतरत असताना हातावरच्या घड्याळाकडे माझे सहज लक्ष जाते. घड्याळ पहाटेचे 5 वाजल्याचे दाखवत आहे. लॉबीमधे श्री. बुनला माझी वाटच बघत आहेत. मी गाडीत बसतो व अंगकोर वाट च्या दिशेने गाडी भरधाव निघते. एवढ्या पहाटे घाईघाईने निघण्याचे कारण अर्थातच अंगकोर वाट देवळाच्या मागून उगवत असलेला सूर्य बघणे हेच आहे. ख्मेर भाषेमधला वाट हा शब्द थाई भाषेतून आला आहे व त्याचा अर्थ देऊळ असा आहे. गाडीतून जात असताना हे दोन्ही शब्द संस्कृतमधील वाटिका या शब्दावरून आले असले पाहिजेत हे माझ्या लक्षात येते. ‘अंगकोर वाटमंदिर, ख्मेर राजा दुसरा सूर्यवर्मन याच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे 1113 ते 1130 या वर्षांत बांधलेले आहे. हे मंदिर बांधायला 30 वर्षे लागली होती. म्हणजेच हे मंदिर सूर्यवर्मनच्या पश्चातच पूर्ण केले गेले होते. ‘परमविष्णूलोकया सूर्यवर्मनच्या मृत्यूनंतरच्या नावाचा उल्लेख, देवळाच्या पहिल्या मजल्यावरील भित्तिशिल्पातील एका छोट्या शिलालेखात सापडल्याने या गोष्टीचा स्पष्ट पुरावा मिळतो. असे म्हणतात की या मंदिराचा आराखडा सूर्यवर्मनचा एक ब्राम्हण मंत्री दिवाकर पंडित याने बनवला होता. या दिवाकर पंडिताला दैवी शक्ती प्राप्त होती अशी आख्यायिका आहे. मात्र सर्वसाधारण ख्मेर लोक असेच मानतात की हे मंदिर देवांचा स्थापत्य विशारद विश्वकर्मायानेच बांधले आहे. अंगकोर वाट हे विष्णूचे देऊळ म्हणून बांधले गेले की सूर्यवर्मन राजाची समाधी म्हणून ही वास्तू बांधली गेली याबद्दल सुद्धा तज्ञांच्या मतात एकमत नाही.या गोष्टी तज्ञांवरच सोडलेल्या बर्‍या! असा सूज्ञ विचार करून मी मनातील विचारांना बाजूला सारतो.

चहूबाजूंनी असलेल्या काळ्या कुट्ट अंधारातच माझी गाडी एकदम थांबते. सर्व बाजूंना अंधाराचे साम्राज्य असले तरी मागून सतत येणार्‍या गाड्यांच्या दिव्यांचे प्रकाशझोत मात्र मला माझ्या मागे पुढे दिसत आहेत. त्या प्रकाश झोतांच्या उजेडात मी खाली उतरतो. समोर एक मोठा चौथरा दिसतो आहे. त्याच्या पायर्‍या चढून मी जातो आणि मी बरोबर आणलेल्या बॅटरीच्या प्रकाशात व इतर लोक जात आहेत त्यांच्या पाठोपाठ जाण्याचा प्रयत्न करतो. सुरक्षा रक्षकांची एक साखळी आम्हाला अडवते व मंदिर परिसरात 5.30 नंतरच जाणे शक्य होईल हे आमच्या निदर्शनास आणते. आहे तिथेच उभे राहून समोर अंधारात बघण्याशिवाय काहीही करणे मला शक्य नाही. माझ्या हे लक्षात येते आहे की मी उभा असलेला चौथरा, हळूहळू लोकांनी भरत चालला आहे व त्या सर्वांच्या हातात जगभरच्या नामांकित उत्पादकांनी बनवलेले अतिशय महागडे असे कॅमेरे आहेत. मी माझा साधासुधा कॅमेरा शक्य तितक्या माझ्या हातात लपवितो व समोर बघत राहतो. बरोबर 5.30 वाजता सुरक्षा रक्षकांची साखळी तुटते व लोक पुढे जायला सुरुवात करतात. भोवतीच्या अंधुक प्रकाशात, हे लोक एका मोठ्या पुलावरून पुढे जात आहेत हे मला दिसते. पुलाखाली अतिशय रुंद असा व पाण्याने पूर्ण भरलेला एक खंदक मला दिसतो आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतके लोक आजूबाजूला असून सुद्धा मला फक्त इंजिनवर चालणार्‍या एका पंपाच्या आवाजाखेरीज दुसरा कसलाही आवाज ऐकू येत नाही.भारतात जरा चार लोक जमले की त्यांचा गोंगाट लगेच सुरू होतो हे मला आठवल्याशिवाय रहात नाही. मी पुढे जाण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही कारण या चौथर्‍यावरूनच सूर्योदय छान दिसतो असे मला कोणीतरी सांगितलेले स्मरते आहे.

अंगकोर वाटचे पहाटेचे पहिले दर्शन

आणखी 15 मिनिटे जातात. समोरचे काळेभोर दिसणारे आकाश आता किंचित जांभळट झाल्यासारखे वाटते आहे व माझ्या नजरेसमोर अस्पष्ट अशा आडव्या काळसर रेषा दिसत आहेत. आणखी काही मिनिटे जातात. आकाशाचा रंग गडद निळा झाल्यासारखा वाटतो आहे. माझ्या समोर असलेला पूल व पाण्याने भरलेला खंदक मला आता दिसू लागला आहे. हा खंदक 200 मीटर (625 फूट) रूंद आहे व याचा परिघ 5.5 किमी तरी आहे असे वाचल्याचे मला स्मरते. खंदकावरचा पूल 12 मीटर (39 फूट) रूंद आहे व तो 250 मीटरपर्यंत पुढे जातो आहे. मी उभा आहे त्या चोथर्‍याच्या दोन्ही बाजूंना असलेले दगडी सिंह आता मला स्पष्ट दिसू लागले आहेत आणि समोर पूल संपतो आहे तिथे एक डोळ्यांच्या दोन्ही कोपर्‍यापर्यंत लांबलेली एक बैठी व्हरांडावजा गॅलरी मला दिसते आहे. या गॅलरीच्या छताच्या आधारासाठी बसवलेल्या चौकोनी दगडी खांबांची एक ओळ आता दिसते आहे. या गॅलरीच्या मध्यभागी असलेले एक व दोन बाजूंना काही अंतरावर असलेली दोन अशी मिळून एकंदर 3 गोपुरे मला दिसू लागली आहेत. या गोपुरांच्या कळसांची मात्र पडझड झालेली दिसते आहे. प्रकाश जसजसा वाढतो तसतसे हे लक्षात येते आहे की समोर दिसणारे स्थापत्य हे मंदिर नसून बाहेरची तटबंदी ओलांडून मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यासाठी व मंदिराचे दृष्य समोरून अतिशय भव्य वाटावे यासाठी उभारलेल्या एका प्रवेशवास्तूचा (Facade)भाग आहे.पूर्व दिशेचे क्षितिज आणखी उजाळते. आता मला या प्रवेशवास्तूच्या खूपच मागे आणि लांबवर 5 उंच शिखरे दिसत आहेत. ही शिखरे अंगकोर वाट मंदिराचे कळस आहेत. मला समोर दिसणार्‍या दृष्यातल्या, डाव्या व उजव्या बाजूंमधला सारखेपणा, एकूणच आकारबद्धता , सर्व वास्तूंची एकमेकाशी असलेली प्रमाणबद्धता व सुसंगती हे सर्व अवर्णनीयच वाटत आहेत. अगदी सत्य सांगायचे तर हे वर्णन करण्यासाठी लागणारे शब्दच माझ्याजवळ नाहीत. अंगकोर वाट मंदिराला मी महाशिल्प एवढेच नाव देऊ शकतो. या मंदिराचे दृष्य बघत असताना मला फक्त ताज महाल बघितल्यावर जसे वाटले होते त्याचीच आठवण फक्त होते आहे. बाकी कशाचीही या मंदिराची तुलना करणे सुद्धा शक्य नाही.

उष:कालचे अंगकोर वाट दर्शन

मी हातातल्या घड्याळाकडे बघतो. घड्याळात तर 6 वाजलेले आहेत. सूर्योदय 5.54 ला होणार होता ना! मग या सूर्यमहाराजांनी दगा कसा दिला? मग माझ्या लक्षात येते की पूर्व क्षितिज काळ्या जांभळ्या मेघांनी गच्च भरलेले आहे. सूर्य महाराज दिसणार कोठून? नाही म्हणायला एका कोपर्‍यात थोडीशी गुलाबी, नारिंगी छटा तेवढी मला दिसते आहे. सूर्योदय बघण्याची सर्व आशा मी सोडून देतो व गाडीत बसून हॉटेलवर परत येतो. आजचा दिवस बराच कष्टप्रद असणार आहे या जाणिवेने मजबूत ब्रेकफास्ट करतो व परत एकदा अंगकोर वाटचा रस्ता धरतो. या वेळी सकाळचे 8 वाजले आहेत.

प्रसिद्ध इंग्लिश लेखक सॉमरसेट मॉम याने 1959 साली अंगकोर वाट ला भेट दिली होती. या भेटीनंतर झालेल्या एका सभेत, थरथरत्या ओठांनी केलेले त्याचे एक वाक्य मी वाचले व ते मला फार भावले आहे. त्याच्याच शब्दात सांगायचे तर तो म्हणतो की कोणीही! म्हणजे अगदी कोणीही, अंगकोरचे मंदिर बघितल्याशिवाय मरणाचा विचार सुद्धा करू नये.” या लेखकाचे हे उद्गार वाचल्यावर या मंदिराचे दृष्य, दर्शकाच्या मनावर केवढा मोठा परिणाम करते याची कोणालाही सहज कल्पना यावी. अंगकोर वाट चा आराखडा हिंदू पुराणांमधे केलेल्या जगाच्या वर्णनाचे सांकेतिक प्रतिनिधित्व करतो असे म्हणता येते. मध्यभागी असलेली 5 शिखरे ही मेरू पर्वताची शिखरे मानली तर अगदी बाहेर असलेली तटबंदी ही जगाच्या अंताला असलेली पर्वत शिखरे असे मानता येते. त्या पलीकडे असलेला खंदक व त्यातील पाणी हे जगाच्या बाहेर असलेले काळेभोर, खोली मोजता न येणारे व अज्ञात असे जल मानता येते.

माझी गाडी पुन्हा एकदा मला अंगकोर वाट मंदिरासमोर सोडते. मी खंदकावरचा पूल पार करून दुसर्‍या बाजूला असलेल्या प्रवेशवास्तूमधील द्वारामधून आत शिरतो आहे. काही पायर्‍या चढल्यावर गोपुराच्या अंतर्भागात मी शिरतो माझ्या समोर दुसरा एक पूल मला दिसतो आहे. या पुलाची उंची काही फार नाही मात्र त्याची रुंदी अंदाजे 9 फूट तरी असावी. हा पूल सुमारे 350 मीटर तरी लांब असावा. या पुलाच्या पलीकडच्या टोकाला मला आता अंगकोर वाटचे मंदिर स्पष्ट दिसते आहे. त्याची भव्यता शब्दात सांगणे मला तरी शक्य नाही. मी मंदिराकडे न जाता उजवीकडे वळतो व प्रवेशवास्तूमधे असलेल्या पॅसेजमधून पुढे जातो. पुढे मला भगवान बुद्धाची एक मूर्ती दिसते आहे. जवळून बघितल्यावर या मूर्तीला 8 हात आहेत हे लक्षात येते आहे तसेच मूर्तीचे मस्तकही प्रमाणशीर वाटत नाही. ही मूर्ती आधी विष्णूची होती. नंतर त्याला बुद्ध बनवण्यात आले होते. अंगावरची कोरलेली आभूषणे, वस्त्रे व मूळचा सोनेरी रंग मधून मधून डोकावतो आहे. त्या मूर्तीच्या पुढे जात जात मे प्रवेशवास्तूच्या टोकाला जातो व तेथून बाहेर पडून त्या कोपर्‍यातून दिसणारा मंदिराचा देखावा डोळ्यात साठविण्याचा प्रयत्न करतो आहे.

विष्णूचा मानवनिर्मित बुद्ध अवतार

प्रवेशवास्तूच्या कोपर्‍यातून दिसणारे अंगकोर मंदिर

प्रवेश वास्तूच्या मंदिरासमोरच्या भिंतीवर अप्सरांची अनेक कोरलेली भित्तिशिल्पे मला आता दिसत आहेत. यातल्या काही अप्सरा जोडीने आहेत तर काही एकट्या. प्रत्येक अप्सरेच्या हातात, गळ्यात, कानात विविध प्रकारची आभूषणे मला दिसत आहेत. मी चालत मधल्या पुलापर्यंत येतो व पायर्‍या चढून मंदिराचा रस्ता धरतो आहे. मंदिराच्या दर्शनीय भागावर काही दुरुस्तीचे काम चालू असल्याने थोड्या बाजूला असलेल्या प्रतिध्वनी कक्षामधून मी देवळात प्रवेश करतो आहे.

प्रवेशवास्तूची मंदिरासमोरची भिंत

भिंतीवरच्या कोरलेल्या खिडक्या व त्यांचे गज

कोरीव अप्सरा

हतीवरील योद्धा

वृषभावरील योद्धा

धनुर्धारी योद्धा

हे देऊळ सुद्धा बायॉन देवळाच्या धर्तीवर म्हणजे तीन पातळ्यांवरच बांधलेले आहे. पहिल्या पातळीवरच्या गॅलरीज 215 मीटर लांब व 187 मीटर रूंद आहेत. दुसर्‍या पातळीवरच्या गॅलरीज 115 मीटर लांब व 100 मीटर रूंद आहेत. या गॅलरीज पहिल्या पातळीच्या गॅलर्‍यांच्या चौकोनाच्या मध्यभागी बांधलेल्या आहेत. या दुसर्‍या पातळीच्या गॅलर्‍यांच्या चौकोमाच्या मध्यभागी तिसर्‍या पातळीवरच्या 60 मीटर चौरस आकाराच्या गॅलर्‍या बांधलेल्या आहेत. ही तिसरी पातळी, दुसर्‍या पातळीच्या उंचीपेक्षा, कल्पना करता येणार नाही अशा उंचीवर, म्हणजे 40 मीटरवर बांधलेली आहे. तिसर्‍या पातळीवर मंदिराची शिखरे किंवा कळस बांधलेले आहेत. मंदिराची एकूण उंची तब्बल 65 मीटर किंवा 213 फूट आहे. कागदावर हे आकडे वाचून फारसे काही लक्षात येत नाही पण वर चढण्याचा प्रयत्न करू पाहणार्‍याला मात्र हे आकडे भेडसावल्याशिवाय रहात नाहीत.

अगदी थोडक्यात सांगायचे तर इजिप्तमधले पिरॅमिड जसे जमिनीपासून बांधत वर नेले आहेत तशीच काहीशी ही बांधणी मला वाटते आहे. अर्थात त्या वेळी छताची स्लॅब वगैरे तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यामुळे एवढे मोठे स्थापत्य एकावर एक असे मजले चढवून बांधणे शक्यच नव्हते. त्यामुळेच कदाचित ख्मेर स्थापत्य विशारदांनी एखादा डोंगर रचावा त्या पद्धतीने या मंदिराची रचना केली आहे.

मी असे वाचले होते की मंदिर दोन पद्धतीने बघता येते. एकतर पहिल्यांदा पहिल्या पातळीवरच्या भित्तिशिल्पांसून सुरुवात करायची किंवा नाहीतर प्रथम वर तिसर्‍या पातळीपर्यंत चढून जायचे व नंतर मंदिर बघत खाली यायचे व पहिली पातळी गाठायचा. मी हाच मार्ग अवलंबवावा असे ठरवतो व वर जायच्या पायर्‍या चढायला सुरुवात करतो.

20 नोव्हेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 3 « अक्षरधूळ -- Topsy.com - नोव्हेंबर 21, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: