.
Travel-पर्यटन

देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 1


सियाम रीप च्या विमानतळावर माझे विमान थोडेसे उशिरानेच उतरते आहे. सिल्क एअर सारख्या वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध विमान कंपनीच्या उड्डाणांना उशीर सहसा होत नसल्याने आजचा उशीर थोडासा आश्चर्यकारकच आहे. विमानात माझ्याशेजारी बसलेल्या जर्मन जोडप्याला भारताविषयी खूप कुतुहल असल्याने सबंध प्रवासात त्यांनी माझ्याबरोबर खूप गप्पा मारलेल्या आहेत. समोर दिसणारा विमानतळ स्वच्छ व नीटनेटका वाटतो आहे. विमानतळाच्या इमारतीचे स्थापत्य मोठे वैशिष्ट्यपूर्ण वाटते आहे. आगमन, निर्गमन हे सगळे एकाच पातळीवर आहे. कौलारू छप्पराची असावी अशी दिसणारी ही इमारत आहे. मी आगमनअशी पाटी लावलेल्या प्रवेशद्वारामधून आत शिरतो आहे. समोरच हत्तीच्या पाठीवर बसलेल्या एका मूर्तीचा शुभ्र रंगाचा एक मोठा पुतळा उभा आहे. माझ्या पुढे जाण्याच्या घाईगडबडीत, मी ती मूर्ती बुद्धाची आहे असे समजतो. बर्‍याच नंतर, इतर अनेक मूर्ती बघितल्यावर व हत्तीच्या पाठीवर बसलेली बुद्धाची मूर्ती दुसरीकडे कोठेच न बघितल्याने, ती मूर्ती बुद्धाची असणे शक्य नाही हे माझ्या लक्षात आले आहे.

आधी बरेच यत्न करून मी कंबोडिया देशाचा ईव्हिसा मिळवलेला असल्याने मी चटकन इमिग्रेशन काउंटर्स कडे जातो आहे. विमानातले माझे बहुतेक सहप्रवासी, आगमनानंतर मिळणारा व्हिसा काढण्याची तजवीज करण्यात गुंतलेले असल्याने मला रांगेत उभे न राहता पुढे जायला मिळाले आहे. विमानतळावरचा कर्मचारी व अधिकारी वर्ग बघून मात्र एकंदरीत भारताची आठवण होते आहे. तशीच संशयी व उर्मट मनोवृत्ती या मंडळींचीही दिसते आहे. मात्र विमानतळाची अंतर्गत व्यवस्था व सोई या सर्व प्रवाशांना सुखकर वाटतील अशाच आहेत. मी माझी बॅग घेऊन विमानतळाच्या बाहेर येतो. सियाम रीप शहरात आमची सर्व व्यवस्था बघणार आहेत ते श्री बुनला, समोरच माझ्या नावाची पाटी हातात घेऊन माझी वाट पहात उभे आहेत. मी त्यांना हात हलवून अभिवादन करतो. ते लगेचच माझ्याजवळ येऊन औपचारिक गप्पागोष्टी करत आहेत. इतक्यात शेजारच्या कोपर्‍यात उभ्या केलेल्या एका मानवी आकाराच्या मूर्तीकडे माझे लक्ष जाते. मूर्तीचा चेहरा व डोक्यावरची पगडी हे जरा निराळेच वाटतात. मात्र त्या मूर्तीला असलेले चार हस्त व त्यापैकी दोन हातात् असलेल्या शंख व व चक्र या वस्तू त्या मूर्तीची लगेच मला ओळख पटवतात. ही मूर्ती नक्की विष्णूचीच आहे यात शंकाच नाही. म्हणजे देवांच्या सहवासातले माझे दिवस अगदी विमानतळापासूनच आता सुरू झाले आहेत.

माझे हॉटेल सियाम रीप शहराच्या अगदी मध्यवर्ती भागातच आहे. हॉटेलच्या खोल्या नीटनेटक्या, आरामदायी व स्वच्छ आहेत. फारशा ऐषारामी दिसत नाहीत. मी बरोबरच आणलेले भोजन पटकन उरकतो व देवांच्या भेटीला जायला लवकर तयार होतो. सियाम रीप हे शहर कंबोडिया देशाच्या मध्यवर्ती भागात पण पश्चिमेला आहे. सियाम रीप हे या गावाचे असलेले नावही मोठे विचित्र आणि गंमतीदार आहे. सियाम रीप चा ख्मेर भाषेतला अर्थ होतो सयामचा पराभव. अमृतसरला पाकिस्तानचा पराभवकिंवा पेशावरला अफगाणिस्तानचा पराभवअशा नावाने ओळखण्यासारखेच हे नाव आहे. संस्कृतमधल्या रिपू शब्दावरूनच रीप हा शब्द आलेला आहे. कंबोडिया मधले लोक स्वत:ला ख्मेर असे म्हणतात. कंबोडियामधली एक मोठी नदी टोनले सापया नदीच्या जवळच असलेल्या या गावाजवळचा भाग अगदी पुरातन कालापासून या देशाच्या राजधानीचा भाग होता. ..नंतरच्या 5व्या किंवा 6 व्या शतकात, इथल्या ख्मेर राजांनी आपली राजधानी या भागात प्रथम स्थापन केली. कंबोडिया हे या देशाचे नाव कुंबोज किंवा संस्कृतमधल्या कुंभ या शब्दावरून आलेले आहे. चौदाव्या किंवा पंधराव्या शतकात, पश्चिम सीमेकडून होणार्‍या सततच्या सयामी किंवा थायलंडच्या आक्रमणांमुळे ही राजधानी ख्मेर राजांनी पूर्वेला नॉम पेन येथे हलवली व ती आजमितीपर्यंत तेथेच आहे.

ख्मेर संस्कृती व धर्म हे भारताशी नेहमीच जोडलेले किंवा संलग्न राहिलेले आहेत. इथल्या पुरातन राजांनी हिंदू नावे नेहमीच स्वत: धारण केलेली आहेत व हिंदू किंवा बौद्ध हेच धर्म या देशात गेली 1500 वर्षे प्रचलित राहिलेले आहेत. ख्मेर राजे स्वत: हिंदू किंवा बौद्ध धर्मांचे पालन करत व धर्मशास्त्रांप्रमाणे सर्व रूढ्या व विधींचे मन:पूर्वक पालन करत असत. आजही या देशातले 90% टक्क्याहून जास्त नागरिक हे स्थविर पंथाचे बौद्ध धर्मीय आहेत. दुसरी एक गोष्ट मला महत्वाची वाटली या देशावर इतिहासात कधीच इस्लामपंथियांची आक्रमणे झालेली नाहीत. त्यामुळेच बहुदा गेली 800 किंवा 900 वर्षे या देशातील देवळे व मूर्ती टिकून राहिल्या असाव्या.

ख्मेर भाषेत अंगकोर हा शब्द संस्कृत नगरी या शदावरून आलेला आहे व त्याचा अर्थ नगर किंवा शहर असा होतो. सियाम रीप जवळचे सर्वात मोठे असलेले व ख्मेर राजांनी स्थापना केलेले अंगकोर थॉमया नगराला भेट देण्यासाठी मी आता निघालो आहे. ख्मेर मधे थॉम या शब्दाचा अर्थ सर्वात मोठे असाच होतो. त्यामुळे या नगराच्या नावापासूनच त्याचा मोठेपणा दिसतो आहे. माझी गाडी थांबते व मी खाली उतरतो. समोर दिसणारे दृष्य़ मनाला थक्क व स्तिमित करणारे आहे हे मात्र नक्की. अंदाजे 25 फूट उंचीची एक भक्कम व लालसर रंगाची दगडी भिंत मला जरा लांबवर दिसते आहे व या भिंतीने, तिच्या वर दिसणारी उंच व घनदाट झाडी सोडली तर पलीकडचे बाकी सर्व दृष्य़ पडदा टाकल्यासारखे बंद केले आहे. ही भिंत आणि मी उभा आहे ती जागा यामधे निदान 325 फूट रूंद असलेला व डावी बाजू पाण्याने पूर्ण भरलेला असा एक खंदक दिसतो आहे. पाण्यावर मधून मधून विकसित झालेली कमल पुष्पे डोकावत आहेत. या खंदकावरून पलीकडे जाण्यासाठी दगडांपासून बनवलेला एक पूल माझ्या नजरेसमोर दिसतो आहे. या पुलाच्या टोकाला व खंदकाच्या पलीकडच्या काठावर एक भव्य गोपुर उभे आहे. या गोपुराच्या शिखरावर दगडात कोरलेले तीन भव्य चेहेरे दिसत आहेत. दगडी पुलाच्या कठड्याकडे माझे लक्ष जाते. हा दगडी कठडा(Railing) एखाद्या अंगावर खवले असलेल्या सर्पासारखा दिसणारा बनवलेला आहे. माझ्या डाव्या हाताला या सर्पाची हवेत वक्राकार वर जाणारी शेपूट मला दिसते आहे तर उजव्या बाजूच्या कठड्याच्या टोकाला मला याच पंचमुखी सर्पाने उंचावलेली त्याची निदान 5/6 फूट उंच अशी फणा दिसते आहे. डाव्या बाजूच्या कठड्याला 54 आधार आहेत हे सर्व आधार(Baluster) मानवी उर्ध्व शरीराच्या आकाराचे आहेत व त्यांचे चेहरे शांत व सौम्य भासत आहेत. उजव्या बाजूच्या कठड्याचे तसेच 54 आधार तशाच मानवी उर्ध्व शरिराचे आहेत परंतु त्यांचे चेहरे मात्र दुष्ट भाव असलेले दिसत आहेत. दोन्ही बाजूंच्या चेहर्‍यांची केशरचनाही अलग प्रकारची आहे. दोन्ही बाजूंच्या पुतळ्यांनी हातातील सर्प मात्र घट्ट पकडलेला आहे.

अंगकोर थॉमचे दक्षिण प्रवेशद्वार

असुरांच्या उर्ध्व शरीराच्या आकाराचे कठड्याचे आधार

माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो. माझ्या समोर देव आणि दानव यांनी पुराणात वर्णन केलेल्या समुद्रमंथनाचे दृष्य साकारले आहे. माझ्या डाव्या बाजूचे देव आहेत तर उजव्या बाजूचे दानव. दोघांच्याही हातात वासुकी सर्प आहे व ते त्याला घट्ट पकडून समुद्र मंथन करत आहेत. मी समुद्र मंथनाची काल्पनिक चित्रे वर्षानुवर्षे बघत आलो आहे पण एवढ्या भव्य प्रमाणातले व त्रिमितीतले समुद्र मंथन या पुलाच्या कठड्यांच्या द्वारे साकार करण्याची ख्मेर स्थापत्य विशारदांची कल्पना मात्र अवर्णनीय आहे.

देवाचा चेहरा (मागे खंदक दिसतो आहे)

असुराचा चेहरा

देवाचा चेहरा

मी पुलावरून दोन्ही बाजूला असलेल्या देव व दानव यांच्या मूर्तींकडे दृष्टीक्षेप टाकत पुढे जातो आहे. पुलाच्या टोकाला असलेले गोपुर, सत्तर, पंचाहत्तर फूट तरी उंच आहे. शहरात प्रवेश करणार्‍या प्रत्येकाला, या गोपुराखालूनच जाणे आवश्यक असल्याने, इथल्या स्थापत्यकारांनी हे गोपुर अतिशय भव्य व देखणे बांधले आहे. अंगकोर थॉम मधे प्रवेश करण्यासाठी एकूण 5 मार्ग आहेत. यातल्या प्रत्येक मार्गावर असेच एक गोपुर बांधलेले आहे. या गोपुरावर भव्य आकाराचे चार चेहरे कोरलेले आहेत.हे चेहरे सातवा जयवर्मन किंवा अवलोकितेश्वर या राजाचे आहेत असे मानले जाते. या अंगकोर थॉम नगरात प्रवेश करू इच्छिणार्‍यांना हे चेहेरे सुखकर प्रवासासाठी अभयच प्रदान करत आहेत असे मला वाटते. गोपुराच्या दोन्ही बाजूंना तीन मस्तके असलेला व या समुद्र मंथनातूनच बाहेर आलेल्या ऐरावत हत्तीचे शिल्प आहे व या हत्तीवर हातात वज्र घेतलेली इंद्रदेवाची स्वारी आरूढ झालेली दिसते आहे. द्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपालांची शिल्पे कोरलेली आहेत व वरच्या बाजूला इंद्रदेवाला साथ देण्यासाठी गंधर्व आहेत. इंद्राचे शिल्प बघितल्यावर समुद्र मंथनाचे शिल्प आता पूर्ण झाल्यासारखे वाटते आहे.

3 मस्तके असलेल्या ऐरावतावर बसलेल्या इंद्राची मूर्ती (मधल्या मस्तकाची सोंड नष्ट झालेली दिसते.)

सातवा जयवर्मन राजाची 4 मुखे असलेले प्रवेश गोपुर

गोपुरामधल्या प्रवेशद्वाराची कॉरबेल प्रकारची कमान

या गोपुराच्या मधे असलेल्या प्रवेशद्वारामधून मी आत शिरतो. आत शिरताना सहज वर बघितले. नेहमीची कमान येथे दिसली नाही. कदाचित कमान बांधण्याचे कौशल्य त्या वेळी या शिल्पकाराना प्राप्त झालेले नसावे. भिंतीचे दगड थोडे थोडे पुढे बसवून (Corbel arch) कमानीसदृष्य आकार या ठिकाणे निर्माण केला गेला आहे. माझी गाडी पलीकडच्या बाजूस उभी आहे. समुद्र मंथनाचे हे शिल्प व त्याचे निर्माते यांच्या सृजनशीलतेबद्दलचे अपार कौतुक माझ्या मनात दाटत असतानाच मी गाडीत बसतो आहे व गाडी या नगराच्या भौमितिक केंद्रबिंदूवर असलेल्या बायॉन(Bayon) या देवळाकडे निघाली आहे.

15 नोव्हेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 1

  1. dear shekhar,
    punar bheticha aanand tuza blog vachun milala.
    pudhil lekhachi aaturtene vaat pahato aahe

    Posted by ashok patwardhan | नोव्हेंबर 16, 2010, 8:57 सकाळी
  2. खूपच छान माहिती! तुम्हाला अशी ठिकाणे प्रत्यक्ष पाहायला मिळतात व त्यात तुम्ही आम्हालाही सहभागी करून घेता याबद्दल खूप धन्यवाद!

    Posted by निसर्गवार्ता | मार्च 17, 2012, 1:51 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: